कवी – विंदा करंदीकर
कविता – देणार्याने देत जावे
गोविंद विनायक करंदीकर (उर्फ विंदा करंदीकर).
जन्म – २३/०८/१९१८ (धालवली – सिंधुदुर्ग).
मृत्यू – १४/०३/२०१० (मुंबई).
विंदा यांचं नाव साहित्यक्षेत्रात अग्रक्रमाने मानाने घेतलं जातं ते त्यांच्या चौफेर लेखनामुळे आणि रसिकांच्या मनात निर्माण केलेल्या अढळ स्थानामुळेच. विंदानी कविता, बालसाहित्य, अनुवादीत साहित्य, समीक्षण, विरूपिका असं विविध प्रकारात आपला ठसा उमटविला.
अष्टदर्शने, स्वेदगंगा, धृपद, जातक, विरुपिका, मृद्गंध अशा एकापेक्षा एक सरस साहित्यकृती रसिकांना दिल्या.
विंदा कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल संवेदनशील होते. त्यांच्या लेखनातही याबद्दलचा संदर्भ बऱ्याच ठिकाणी आलेला दिसतो. हैद्राबाद मुक्तीसंग्राम मध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यात त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला.
राष्ट्रीय स्वयंसंघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारीक प्रवास होता.
अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन हा पेशा स्विकारला.
विंदा यांचा संकलित काव्यसंग्रह “आदिमाया” हा विजया राजाध्यक्ष यांनी १९९० मध्ये प्रकाशित केला.
“विंदा करंदीकर यांची समग्र कविता” याचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनने २०१५ मध्ये केले आणि विंदांच्या अनेक निवडक कविंतांचा नजराणा रसिकांना दिला.
“अजबखान” ते “सात एके सात” विंदांचे असे एकूण १३ बाल कवितासंग्रह प्रकाशित झाले.
कविता, ललितबंध, समीक्षा, इंग्रजी समीक्षा, अनुवाद अशा प्रकारात विंदांनी विपूल लेखन केले.
विंदांनी १९८१ मध्ये संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रुपातर केले.
सातत्याने जवळपास ६५ वर्षे लेखन करून विंदा साहित्यक्षेत्रात सक्रीय होते. विंदांच्या साहित्यात आपल्याला एकाचवेळी सामर्थ्य, सुकोमलता, विमुक्तपणा, संयम, अवखळपणा, मार्दव, गांभिर्य, मिश्कीलपणा, प्रगाढ वैचारिकता, नाजूक भावसौंदर्य असे विविध भाव, प्रकार पहायला मिळतात. त्यांच्या कविता या थेट रसिकांशी संवाद साधत पुढे येतात, आणि हीच त्यांची विलक्षण हातोटी होती.
विंदांच्या साहित्यातील विपूल कार्याची दखल घेऊन देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा ४१ वा “ज्ञानपीठ पुरस्कार” त्यांच्या “अष्टदर्शन” या साहित्यकृतीसाठी २००३ मध्ये प्रदान करण्यात आला.
वि.स.खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे विंदा हे तिसरे मराठी साहित्यिक आहेत.
या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार असे साहित्यातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
विंदाच्या पश्चात विंदाच्या नावाने महाराष्ट्र सरकारतर्फे २०११ पासून साहित्यिकांसाठी “विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार” दिला जातो.
“देणाऱ्याने देत जावे” या विंदांच्या गाजलेल्या छोट्याशा कवितेमध्ये मानवी जीवनाविषयीचा मोठा आशय सामावलेला आहे. निसर्ग नेहमीच परोपकारी भावनेने आपल्याला देत असतो, शिकवत असतो आणि यातूनच आपलं जीवन आपण घडवत असतो, सुखकर करीत असतो.
विंदा सांगतात हिरव्या पिवळ्या माळरानाकडून जीवनाचे विविध रंग घ्यावेत. सह्याद्रीच्या कड्या कडून कणखर पणा घेतला पाहिजे. छातीसाठी ढाल घेतली पाहिजे. म्हणजेच जीवनात आपण कठीण परिस्थितिलाही धीराने तोंड देत मार्गक्रमणा केली पाहिजे. ढगांकडून सततचे बदलत राहणारे वेगवेगळे आकार घेतले पाहिजेत. म्हणजेच जीवनातल्या विविध गोष्टींचा सुख दु्ःखांचा अनुभव घ्यायला हवा.
जीवनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या पृथ्वीवरील निसर्गातून होकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजेत.
उधाणलेल्या समुद्राकडून पिसाळलेली आयाळ म्हणजेच जीवनातील जगण्याचा उदात्तपणा घेतला पाहिजे.
तर दुथडी भरून वाहणाऱ्या भिमेतून तुकोबाची माळ म्हणजेच जीवनात अध्यात्म, सात्विकपणा यांचाही अनुभव घेतला पाहिजे. संतांसारखे सदाचारी वागले पाहिजे.
शेवटी विंदा सांगतात की देणाऱ्याने भरभरून देत जावे आणि घेणाऱ्यानेही भरभरून घेत जावे. एवढे घ्यावे की एक दिवस देणाऱ्याचे परोपकारी हातच घ्यावेत म्हणजे आपणही परोपकारी वृत्तीने इतरांना सतत देत राहिलं पाहिजे. वाचकांना अनेक अर्थाने ही कविता भावते. वेगवेगळे जीवनमुल्यांचे कंगोरे या कवितेतून नव्याने उलगडत जातात. चला तर मग प्रत्यक्ष या कवितेचाच आनंद घेऊयात.
देणार्याने देत जावे
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे !
◆◆◆◆◆
- विंदा
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■