समाजातील सर्वच घटकांना लैंगिक शिक्षणाची गरज


यवतमाळ जिल्ह्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. गर्भवती मातेच्या उदरातून मृतावस्थेत असलेले अर्भक रस्त्यावर कधी गळून पडले ते मातेलाही कळले नाही. आठ महिने पूर्ण झाल्याने गर्भवतीने सोनोग्राफी केली. त्यात गर्भ मृत असल्याचे समजताच ती सुन्न झाली. दुचाकीवरून खासगी रुग्णालयात जात असतानाच प्रसवकळा सुरू झाल्या.  त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. यात रस्त्यावरच प्रसूती झाली अन् तो मृत गर्भ कधी बाहेर पडला हे समजलेच नाही. ही मन सुन्न करणारी घटना यवतमाळ शहरातील भोसा नाका परिसरात घडली. मृत अर्भक सापडल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी शोध घेतला असता हे भयाण वास्तव पुढे आले आहे. 

                  मुरझडी येथील एक गर्भवती महिला  सकाळी आपल्या सासऱ्यासोबत यवतमाळला आली. दत्त चौकातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी केली. गर्भ मृत असल्याचे सांगून तिला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.  सासरा आणि सून दोघेही दूचाकीवरून खासगी रुग्णालयाकडे रवाना झाले. दुचाकीवरच अवघडलेल्या अवस्थेत तिचा प्रसवकळा सुरू झाल्या. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. सासऱ्याला सांगण्याच्या आतच गर्भ खाली पडला. त्यानंतर काही वेळातच महिला बेशुद्ध झाली. पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर देखील कोणीच नव्हते. पाऊस थांबताच मृतावस्थेतील अर्भक पाहून खळबळ उडाली. शहरातील भोसा नाका परिसरात मंगळवारी भरस्त्यावर मृत अर्भक सापडले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अवधूतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच घटनेचा छडा लावला. अर्भक कुटुंबीयांच्या स्वाधीन केले गेले. त्यानंतर मुरझोडीत त्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसरी घटना नाशिकची. कौळाणे येथे जानेवारी २०१९ मध्ये अवैध गर्भपाताचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणी चौकशीदरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार व हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला होता. आता पुन्हा एकदा शहरातील भरवस्तीत एक स्त्री अर्भक नदीपात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. गेल्या काही वर्षांत सातत्याने मालेगावातील अवैध गर्भपाताचे प्रकरण चर्चेत राहिले आहे. याआधीही डॉ. देवरे बंधूंना या प्रकरणी शिक्षा झाली होती. कौळाणे येथील गर्भपात केंद्र जानेवारीत उघड झाले होते. मात्र त्यानंतरही वारंवार अशा घटना समोर येत असल्याने मालेगाव अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून पुढे आले.
         रामसेतूनजीक नवीन सावित्रीबाई फुले पादचारी पुलाजवळ मोसम नदीपात्रात एक अर्भक पडलेले असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांना फोनवरून  रात्री साडेआठच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच वाडिले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात लाल कपड्यात गुंडाळून ठेवलेले ते अर्भक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. सामान्य रुग्णालयात अर्भक आणले असता, ते मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नरेंद्र भिकन खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. हा अवैध गर्भपात व स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. जनमानसात बदनामी होऊ नये या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. कौळाणे येथील गर्भपात प्रकरणानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस, तसेच आरोग्य यंत्रणेपुढे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान निर्माण झाले होते. 

        एकीकडे कोवळ्या कळ्यांना नख लावण्याचे प्रकार थांबत नाही, तोच एका नवजात अर्भकाला कचराकुंडीत फेकल्याचा प्रकार नाशिक येथील नवीन आडगाव नाका परिसरात उघडकीस आला. विशेष म्हणजे हे अर्भक पुरुष जातीचे होते. त्याला पिशवीत घालून फेकल्याचे आढळले. मॉर्निंग वॉक करणाऱ्या जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांच्या मदतीने अर्भकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास  सर्व्हिस रोडच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक नवी मोठी पिशवी आढळली. कचरा गोळा करणारी एक महिला त्या पिशवीजवळून गेली तरी तिने त्या पिशवीला हात लावला नाही. त्याचे पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी जवळ जाऊन पिशवी पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यात बेडशीटमध्ये गुंडाळलेले नवजात अर्भक असल्याचे दिसले. ते हालचाल करीत असल्याने ते जिवंत असल्याची त्यांना खात्री पटली. त्याच वेळी शहरातील आनंद ग्रुपचे काही सदस्यही मॉर्निंग वाक करीत तेथे आले. आडके यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. आडगाव पोलिस तेथे दाखल झाले. अर्भकाला महिला पोलिसांच्या मदतीने पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
अर्भकाला ठेवण्यात आलेली पिशवी आकाराने मोठी आणि नवी होती, तसेच ज्या बेडशीटमध्ये त्याला गुंडाळण्यात आले होते, ते बेडशीटही चांगले होते. त्यावरून हे अर्भक ज्याने फेकले त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंतच्या घटनांमध्ये स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, पुरुष जातीचे अर्भक फेकल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. गस्तीवर असलेले आडगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुनील गांगुर्डे यांनी या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 
        सातारा जिल्हा रुग्णालय अनेक गैरप्रकारांमुळे चर्चेत असतानाच रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ५ मधील स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये ५ मानवी भ्रूण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेला तीन दिवस उलटले तरी रुग्णालय प्रशासन त्याबाबत काहीही माहिती देण्यास तयार नव्हते. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आणखी काही मृत अर्भके सापडण्याची शक्यता रुग्णालयीन सूत्रांनी व्यक्त केली होती.  सातारा जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजचा पाइप चोकअप झाल्यामुळे चोकअप काढण्यासाठी सफाई कामगारांना पाचारण केले होते. आठ दिवसापूर्वी हे काम सुरू असताना स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये तब्बल ५ मृत मानवी भ्रूण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही सर्व अर्भके सडलेल्या अवस्थेमध्ये सापडली. जिल्हा रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत मानवी भ्रूण आढळूनही रुग्णालय प्रशासनाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

सातारा जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत तर अर्भकांसाठी सुसज्ज अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला येत असतात. शासनाने गर्भलिंग निदानावर बंदी घातली आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या मृत अर्भकांची संख्या पाहता जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. 
 उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. अज्ञात महिलेने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास काटेरी झाडाझुडपानी वेढलेल्या विहिरीत फेकून दिले. हंगरगा रस्त्यालगत असलेल्या एका पडीक पडलेल्या शेत जमिनीत हे पुरुष जातीच्या अर्भकास फेकून अज्ञात महिलेने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. 
मृत अवस्थेत पडलेल्या पुरुष जातीच्या अर्भकाचे कुञे लचके तोडत होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती तुळजापूर पोलीस स्टेशनला व आरोग्य विभागाला देण्यात आली. यावेळी मृत अवस्थेत पडलेल्या पुरूष जातीच्या अर्भकास पाहण्यासाठी गावातील महिलासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रकरणी पोलीस पाटील परमेश्वर खताळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिले विरूध्द तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

अशा अनेक घटना अधूनमधून आपल्याला ऐकायला मिळतात. टीव्ही, वृत्तपत्रांतून आपण वाचतो, पाहतो. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले बाळ अर्भकावस्थेत असतांना गर्भपात करून बाहेर आलेले अर्भक कुठेही फेकून दिले जाते. मुलगीच व्हावी या उद्देशानेही मोठ्या प्रमाणावर सर्वत्रच स्रीजातीचा गर्भ पाडण्याचे पातक घडत राहिले. २०१२ साली एक भयंकर घटना महाराष्ट्रात उघडकीस आली. परळीच्या डॉ. सुदाम मुंडे यांचे राक्षसी रुप उघडकीस आले.  वैद्यकीय पेशा असला तरी राजकीय मंडळींत उठबस करणाऱ्या येथील डॉ. सुदाम मुंडे याच्या पापाचा घडा भोपा ता. धारूर येथील विजयमाला पटेकर हिच्या मृत्युमुळे भरला. बेकायदा गर्भलिंगनिदान करून गर्भपात करताना १८ मे २०१२ ला विजयमालाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिनाभर फरारी असलेला डॉ. मुंडे व त्याची पत्नी डॉ. सरस्वती पोलिसांना शरण आले. तेव्हापासून दोघेही कोठडीची हवा खात होते. त्यांना पुन्हा दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. 

परळी जि. बीड येथील उच्चशिक्षित असलेले हे डॉक्‍टर दांपत्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम होते. पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदविधारक होता. परळीतील मोजक्‍या स्त्रीरोग तज्ज्ञांपैकी असल्याने या दांपत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. त्यातच बसस्थानकासमोर असल्याने त्याचे रुग्णालय गजबजलेले असायचे. यातून मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दांपत्याने पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले. परळीतील मोजक्‍या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा आविर्भाव आणला आणि आपल्या या कृत्याचा फैलाव वाढविला. परळीतील सिमेंट कारखान्यातील वाहतूक, औष्णिक वीज केंद्राच्या राखेच्या वाहतूक व्यवसायात त्याच्या मुलाची बड्या राजकीय मंडळींसोबत भागीदारी होती. सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना पुढच्या खुर्चीवर बसणारा सुदाम मुंडे इकडे रुग्णालयात राजरोस बेकायदा गर्भातील कळ्या खुडत असे. गर्भपात केलेले अर्भक शेतातल्या विहिरीत आणि कुत्र्यांना खाऊ घातल्याचा आरोपही त्याच्यावर झाला. मात्र, त्याचा पुरावा आढळला नसला तरी त्याने या गर्भांची नेमकीनेमकी विल्हेवाट कशी लावली, हेही समोर आले नाही.  
डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करी. मात्र, त्याने निर्णाण केलेल्या दबावामुळे कुठलीही यंत्रणा डोळेझाक करी. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर थेट आरोप करूनही कुठलीच यंत्रणा दखल घेत नसे. डॉ. सुदाम मुंडे याच्या रुग्णालयाला आरोग्य विभागाने १० खाटांची मान्यता दिली होती. विजयमाला पटेकर मृत्यू प्रकरणानंतर आरोग्य आणि महसूल पथकाने केलेल्या पाहणीत  ६४ खोल्यांच्या रुग्णालयात ११७ खाटा आढळल्या. डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असले तरी इथे स्त्री रुग्णांवरील उपचार कधी झालेच नाहीत. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते. राज्यातील विविध भागांसह शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे येत असत. त्यामुळे अक्षरशः या रुग्णालयात नेहमीच जत्रा भरलेली असायची. या प्रकरणात जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हेसह  १० जणांना अटक झाल्यावरून याला दुजोराच मिळाला.

डॉ. सुदाम मुंडे याच्या प्रकरणाशी संबंधित एकाचा मृत्यू तर दोघांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील साक्षीदारांची फितुरी व आत्महत्या यांचा जवळचा संबंध असल्याचा संशय आहे. मुंडेच्या रुग्णालयातील नर्स व त्याचा कारभार पाहणारा डॉ. केंद्रे या दोघांनी आत्महत्या केली होती. पोलिसांनी या दोन्ही आत्महत्यांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. डॉ. मुंडेच्या रुग्णालयावर वर्ष  २००५ मध्ये आरोग्य व महसूल यंत्रणेने छापा टाकून गर्भलिंग निदान होत असल्याचे उघड केले. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असताना डॉ. मुंडे असे कृत्य पुन्हा पुन्हा करत होता. विजयमाला पटेकर हिच्या मृत्युप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात गेले. तीन साक्षीदार तपासल्यानंतर हे प्रकरण बीडच्या न्यायालयात हलविण्यात आले. त्या वेळी न्यायालयीन कोठडीत असलेला डॉ. सुदाम मुंडे, त्याची बाहेरची यंत्रणा या माध्यमातून तो दबावासाठी सूत्रे हलवायचा. या प्रकरणातील साक्षीदारच सुरक्षित नसल्याचे दोन आत्महत्यांवरून स्पष्ट झाले होते. या प्रकरणात साक्षी नोंदविलेले साक्षीदार एकेक करून फितूर होत गेले. सुदाम मुंडे याच्या रुग्णालयात काम करणारे आणि या प्रकरणात साक्षीदार असणारे आता पूर्वीच्या ठिकाणी आढळत नाहीत. यातील बहुतेकांनी परळी सोडली.  आता राज्यातील कोणत्याही दवाखान्यात गर्भलिंगनिदान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
             वयात येणाऱ्या मुलामुलींकडूनही तारुण्य सुलभ भावनांना वाट मोकळी करून देतांना शारीरिक संबंध आले तर काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. त्यामुळे बदनामी आणि अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी घडत राहिल्यामुळे जे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी लैंगिक शिक्षणाची मागणी पुढे आली. परंतु लैंगिक शोषणाच्या, अनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्वच घटकांना ती गरजेची आहे. लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे; पण मानवतेवर प्राण्यांमध्ये असते, तशी मानवामध्ये ह्या प्रेरणेचे नियमन करण्याची काही नैसर्गिक यंत्रणा नाही. मानवामध्ये ह्या प्रेरणेचे कार्य व आविष्कार प्राण्यांप्रमाणेच पुनरुत्पादनापुरताच मर्यादित असता, तर लैंगिक शिक्षण अनावश्यक ठरले असते. ‘स्त्री-पुरुषांमधील शारीरिक फरक व पुनरुत्पादनयंत्रणा अथवा त्यांच्यातील लैंगिक व्यवहारासंबंधी सामाजिक नीती ह्यांचे शिक्षण’ म्हणजेच लैंगिक शिक्षण.  अशा व्यक्तीला सुखी, निरोगी व समाजमान्य असे लैंगिक समायोजन करण्यास साहाय्य व्हावे, हा लैंगिक शिक्षणाचा हेतू सामान्यपणे सांगितला जातो.

                   लैंगिक शिक्षणाच्या चळवळीमुळे जननेंद्रिये व तत्संबंधीच्या विषयांभोवती वैज्ञानिक व यथोचित वातावरण तयार झाले. लैंगिकता ही जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून तिच्याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ज्ञान म्हणून अधिकृतपणे समावेश झालेला असो वा नसो, त्याचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. शिवाय त्याविषयी करण्यात येणाऱ्या चर्चा व अभ्याससत्रांमुळे त्याविषयीचे निषेधाचे व दमनकारक निर्बंधाचे वातावरण हळूहळू विरघळू जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक प्रेरणेच्या जाणीवपूर्वक नियमनाकडे नेणाऱ्या घटकांवर वाढता भर देण्यात येऊ लागला आहे.

                      शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाची गरज नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेने व्यक्त केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश केल्यास त्याचा मुलांवर नकारात्मक, वाईट परिणाम होईल असे मत ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’ने (एसएसयूएन) व्यक्त केलेे. संघाचे प्रचारक दीनानाथ बत्रा यांनी स्थापन केलेल्या एसएसयूएनने शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाच्या समावेशाऐवजी मुले,पालकांच्या समुपदेशनाची गरज असल्याचे म्हटले आहे.                      लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते. लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्या आंदोलनांना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात. लैंगिकतेशी संबंधित विचार ‘विवेकपूर्ण’ बनवणे अभिप्रेत आहे. पालक, मोठी भावंडे, शिक्षणसंस्था आणि वैद्यकीय संस्था हा या प्रकारचे शिक्षण देण्याचा एक योग्य मार्ग समजला जातो.
                    भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली वयात येण्याचे वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणाऱ्या बदलांची योग्य ती जाणीव करून देणे आवश्यक आहे. आता शालेय वयापासून मुलं-मुली हे स्मार्टफोन, इंटरनेट वापरतात. विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून दाखवली जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्या नकारात्मक परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून त्यांना निकोप कामजीवनाची ओळख, स्वत:च्या शरीराची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे. तसेच समाजात बलात्कार, लैंगिक आत्याचाराच्या घटना, अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावणं, अशा अनेक घटना घडतात. यामागे अनेक कारणं आहेत, पण एक महत्त्वाचं कारणं, ते म्हणजे ‘लैंगिक शिक्षणा’चा अभाव !
                   मुलांना शाळेत पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपयुक्त ठरणारे अवयव, कार्य इत्यादींवरही एक धडा आहे. पण केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग शिक्षक शिकवतात. परंतु, पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जातो, तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जातो. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळांत शिक्षक, शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे अनेकदा हा धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येतो. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नाही. हा विषय वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल.
                साधारणतः  इयत्ता ६ वीपासून तरी मुलांना लैंगिक शिक्षण आवश्यक आहे.शरीरात अचानक होणारे बदल आणि शारीरिक आकर्षण या वयापासूनच वाढतं, त्यामुळे त्यांच्यात होणारे बदल त्यांना स्वीकारणं अवघड जाणार नाही, बऱ्याच वेळा याबाबतीत पुरेशी माहिती नसल्यामुळे मुलं-मुली केवळ शारीरिक आकर्षणाचे बळी ठरतात आणि त्यांच्यात लहान वयातच लैंगिक संबंध निर्माण होतात. असे शरीरसंबंध ठेवण्याचं योग्य वय कोणतं हे मुलांना लहान वयातच बिंबवलं तर आज निर्माण होणारे अनेक लैंगिक प्रश्न सुटतील. 

               अनेक वेळा कुटुंबात मुलांशी आमचा लैंगिक विषयावर संवाद होत नाही. पालक म्हणून अनेकवेळा या विषयावर मुलांशी कशा प्रकारे संवाद साधायचा यावर आम्हालाही मर्यादा येतात.  लैंगिक शिक्षण हे शाळेंमध्ये दिले गेले तर आम्हालाही त्या शालेय अभ्यासाच्या निमित्ताने  मुलांशी संवाद साधने सोप्पे होईल. त्यामुळे शाळेमध्ये एखादा तास न घेता स्वतंत्र  पुस्तक आणि अभ्यासक्रम असावा. या अभ्यासामुळे येणारी पिढी ही लैंगिक साक्षर असेल , ही आत्ताच्या काळाची गरज आहे. ​​​​​​​शाळेत त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांकडून अचूकपणावर भर देत हे शिक्षण दिले जावे.जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र वगैरे विषयांतील तज्ज्ञ माणसे, त्याचप्रमाणे डॉक्टर व परिचारिका यांचादेखील त्यात सहभाग असावा. लैंगिक शिक्षणाचा जो भाग वर्गातील पाठामध्ये अंतर्भूत करता येत नाही, त्यासाठी तज्ज्ञांची चर्चात्मक व्याख्याने आयोजित करावीत. कोणत्याही गोष्टीचे दमन केले तर त्यााविषयी उत्सुकता वाढते. तसेच मुलांमध्ये होते. त्यामुळे त्यांना योग्य वयात योग्य ज्ञान देणे गरजेचे आहे.  लैंगिक शिक्षण शाळेबरोबरच घरातूनही मिळाला हवे. मासिक पाळीविषयी मुलींना सांगण्यापेक्षा मुलांनाही किशोर वयात होणारे बदल सांगितले पाहिजे. संवाद राहिला तर गैरसमज दूर होतात, असा अनुभव आहे. शोषण फक्त मुलींचेच होते असे नाही तर मुलांवरही अत्याचार होतात. त्यामुळे शिक्षण आणि संवाद आवश्यक आहे. आताचा विद्यार्थी अधिक शार्प आहे. चुप्पी तोडा बोलायला शिका आणि नाही म्हणायला शिका हेदेखील सांगण्याची गरज आहे. म्हणून लैंगिक शिक्षण देणे गरजेचं आहे.  
​​​​​​​लैंगिक शिक्षण दिल्यास नकारात्मक परिणाम होतो, असे आजवर कुठल्याही संशोधन किंवा अभ्यासातून निष्कर्ष आलेले नाहीत. याउलट युनेस्कोसारख्या जागतिक संस्थांनी जगभर केलेल्या संशोधनातून लैंगिक शिक्षणाची गरज अधोरेखित केली आहे. बऱ्याच देशांमध्ये सरासरी ३ पैकी २ मुलींना पाळीबद्दल काहीही माहिती नसते. फक्त ३४ टक्के युवकांना एचआयव्ही बद्दल किमान जुजबी माहिती आहे. डॉ. राणी बंग यांनी महाराष्ट्रभर हजारो युवकांसाठी ‘तारुण्यभान‘ शिबिरे घेतली. त्या शिबिरांमध्ये अतिशय सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुणांनाही असलेले अपुरे लैंगिक ज्ञान, माहिती, गैरसमज यांची पातळी पाहिली तर लक्षात येईल की लैंगिक शिक्षणाचे तीनतेरा वाजलेले आहेत.  या विरोधकांच्या लैंगिक शिक्षणााबद्दल परीक्षा घेतली तर मला खात्री आहे की, त्यातील बहुतांश लोक नापास होतील. बारावीपर्यंत बऱ्याच गोष्टी संवादातच होत नसल्याने कळत नाहीत. मुलींना विशेष वर्ग घेऊन सांगितले जाते. परंतु मुलांना सांगितले जात नाही. जागरुकतेसाठी विद्यार्थी असो वा विद्यार्थिनी, दोघांनाही किशोरवयात होणारे बदल, जागरुकता याविषयी माहिती दिली पाहिजे. जागरुकता झाल्यास आणि माहिती मिळाल्यास गैरप्रकारांनाही आळा बसेल.

बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती नसतात. त्याची माहिती व्हायलाच हवी. मुली असो वा मुले दोघांनाही होणाऱ्या बदलांविषयी माहिती दिली पाहिजे. आमच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा मुद्दा आहे. तो आम्हाला शिकवला जातो. परंतु या विषयावर सर्वच जणांना शिकवले जाते अथवा मोकळेपणाने बोलतातच असे नाही. प्रत्येक वयोगटात होणारे बदल हे मुलगा असो वा मुलगी, जागरुकतेसाठी शिकवले पाहिजेत. किशोरवयीन मुलांमध्ये होणारे बदल असो वा लैंगिक शिक्षण, याविषयी आपल्याकडे मोकळेपणे बोलले जात नाही. बऱ्याच वेळा घरातही पालक लाज वाटते, असे विषय कसे बोलायचे म्हणून बोलत नाहीत. संवाद आणि विषयांबद्दल माहिती देताना खुलेपणा असेल तर गैरसमज दूर होतील. त्यामुळे जसे शैक्षणिक आणि करिअर विषयावर मार्गदर्शन करतात. तसेच जीवनोपयोगी विषयांवरही मार्गदर्शन हवेच. 
​​​​​​​लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता या शिक्षणात फरक आहे. मानवी शरीरातील अवयव, बाळ कसं जन्मतं, शरीरसंबंध, पुरुष- स्त्रीचे जननेंद्रिय आदी माहिती लैंगिक शिक्षणात येते. लैंगिकता शिक्षण मात्र व्यापक आहे. यात आपण स्वत:च्या लैंगिकतेबद्दल किती सजग आहोत, लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने विचार मांडू शकतो का, याचा विचार केला जातो. एखाद्या व्यक्तीने नातेसंबंधामध्ये आपलं मत मांडून समाेरील व्यक्तीनं ते मान्य करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लैंगिक शिक्षण दिले गेल्यास मुलं प्रयोगशील होतील आणि त्याचे वाईट परिणाम दिसून येतील ही अनाठायी भीती दिसून येते. आठवी, नववीच्या मुलांना हे शिक्षण मिळायला हवं. पण सरकारच्या पातळीवर इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. युनिसेफ आणि यशदा या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यात १०० शाळांमधील मुलांना दिलेल्या लैंगिक शिक्षणाचे परिणाम अजून तरी समोर आलेले नाहीत. दुसरे म्हणजे किशोरवयीन मुलीला आई किंवा इतर स्त्रियांकडून मासिक पाळीविषयी सांगितले जाते. पण  किशोरवयीन मुलाला मात्र स्वप्नावस्थेबद्दल सांगितले जात नाही. अशा वेळी लैंगिक शिक्षणाची खरी गरज भासत असते.
एका विशिष्ट समाजाची संस्कृतीच सर्व समाजाने स्वीकारली पाहिजे, असा विचार करणाऱ्या लाेकांना हे शिक्षण नको आहे. लैंगिक शिक्षण तर नकोच आहे. विषमता नैसर्गिकच आहे, असे त्यांना वाटते. पुरुष श्रेष्ठ,  बाई ही कनिष्ठच असायला हवी. ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे नकोत. त्यांना ज्ञानाचा मक्ता फक्त एकाच वर्गाकडे हवा. असे लोक आपले हीत जोपासण्यासाठी नेहमीच बदलांना विरोध करत आले आहेत. कारण त्यांच्या सत्तेला सुरुंग लागेल, असे त्यांना वाटत असते. शरीर साक्षरतेविषयी बोलायचे झाले तर, वाढत्या वयात शरीराची माहिती असणे, यात काहीच वाईट नाही. मुलांना या बदलांची माहिती मिळाली तर मुले अधिक जबाबदारीने वागतील, ते शहाणे होतील. बालपणापासून लैंगिक शिक्षण मिळाल्यास त्याच्याकडे अश्लील म्हणून नव्हे तर जीवनविषयक आवश्यक ज्ञान म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येक नागरिकांत विकसित होईल. इंटरनेटसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या माध्यमांमुळे सध्या सर्वांना सर्व प्रकारचे ज्ञान खुले झाले आहे. मात्र त्याबाबतची परिपूर्ण आणि सर्व शंका निरसन करणारी माहिती फक्त शालेय अभ्यासक्रमातूनच मिळू शकते.
             लैंगिक शिक्षणामध्ये स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची रचना, त्यांचे कार्य, प्रजननयंत्रणा, त्याचबरोबर जननेंद्रियांची स्वच्छता, त्यांचे रोग, शिवाय लैंगिक व्यवहाराबाबतची धार्मिक व सामाजिक नीतिबंधने वगैरेंची माहिती समाविष्ट केली पाहिजे. ह्यांपैकी कोणती माहिती वयाच्या कोणत्या टप्प्यावर व कशा भाषेत दिली पाहिजे, ते बालविकासतज्ज्ञांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरविले पाहिजे. लैंगिक व्यवहाराच्या अनिष्ट व विघातक बाजूवर- उदा. व्यभिचार, गुप्तरोग, अनौरस संतती, कौमार्यावस्थेतील मातृत्व इत्यादींवर भर न देता, ती बाजू टाळता येण्यासाठी आवश्यक ती माहितीही समाविष्ट केली पाहिजे. त्याचप्रमाणे लैंगिक व्यवहारांतून, शोषणातून येणाऱ्या शारीरिक व मानसिक विकृती, अपमार्ग, दुष्ट सामाजिक प्रभाव वगैरेंबाबतही तरुणांना आणि समाजातील सर्वच घटकांना सावध करण्यापुरते तरी महत्त्व देऊन शिक्षण दिले पाहिजे.

गंगाधर ढवळे,नांदेड 

संपादकीय २५.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *