गुरुजींची जबाबदारी कोण घेणार?

        नांंदेड जिल्ह्यात शिक्षकांना शाळा उपस्थिती बाबत सक्ती असु नये, अशी मागणी  शिक्षक सेना नांंदेड केली होती. तसेच शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , पदोन्नत मुख्याध्यापक  यांनी तोंडी आदेश देऊन शिक्षक बांधवाना शाळा पूर्ण दिवस , अर्धा दिवस करा असे सांगितले होते. शिक्षक उपस्थिती 50% , 100% किंवा दररोज एक नसेल तर शाळेच्या नियोजनाप्रमाणे असावी असे वेगवेगळे तोंडी आदेश देऊन सक्ती करत होते. शाळा बंद दिसली की लगेच नोटीस देणे , वेतनवाढ बंद करणे , खुलासा मागणे  किंवा निलंबन ची नोटीस ती तात्काळ अमंलबजावणी  बाबत लिहिलेले होते. ते सत्य होते.  महिला व शिक्षक बांधवाना याचा त्रास होऊ लागला होता. याबद्दल लिहिले होते तर सदरील मागणीचा गैरसमज करुन घेऊन गैरसमज  पसरवत आहेत असा अर्थ काढुन जावई शोध लावण्यात आला .          

                       शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रोजी कोरोना आणि निमोनियामुळे आमचे शिक्षक बांधव मृत्यू पावले आहेत. यापूर्वी १ आॅगस्ट रोजी वहाद तांडा ता. कंधार  येथील कार्यरत मुख्याध्यापक कोरोनाने गेले. एक गुरुजी अनेक पिढ्या घडवणारे आमचा बांधव आहे. आज कोण जबाबदार आहे यांना ?  जीव गेला ना शेवटी ?  हे कशामुळे झाले?  हा अट्टाहास प्रशासनाकडून झाल्यामुळे. एक राष्ट्रनिर्माता गेल्याचे दु:ख प्रशासनाला आहे काय? त्यात काही मान्यवर (नेते म्हणून घेणारे ) असे लिहितात की कोरोना रोगाचा बाऊ करु नका ! आता जीव गेला हे कसे करणार ?  आमचा गुरुजी फक्त आदेशाचे पालन म्हणून मुगगिळुन गप्प आहे. आज नांंदेड जिल्ह्यात बरेच शिक्षक बांधव दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. तर काही घरीच उपचार घेत आहेत.तर उपचार घेऊन घरी आहेत. हे कशामुळे झाले ? शिक्षण विभागाच्या अट्टाहासामुळे. आता हे अशा परिस्थितीत  जर विद्यार्थ्यांच्या संपर्कात आले तर काय होइल ? विद्यार्थ्यांचे आरोग्याशी खेळणे होइल का नाही ?        
                आॅनलाइन शिक्षण असताना शाळेत उपस्थिती चा का अट्टाहास चाललेला आहे. आता जे काम चालु आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच  आहे.  पण  आम्ही,  आपण ,  स्वतः किती कर्तबगार आहोत? विद्यार्थीप्रिय आहोत? विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी किती आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा  प्रयत्न चालू आहे. परंतू हे एरवी कधी दिसुन आले नाही आम्ही पाहतच आलो आहोत. सध्या देशावर  काय जगावरच संकट आहे. या संकटाना  समजून न घेता आपलाच कित्ता गिरवू  लागले आहेत. आर्थिक परिस्थिती कमी असणारे विद्यार्थी आहेत ते सर्व खेड्यापाड्यातील आहेत, हे सर्व बांधव जाणुन आहोतच. शिक्षक बांधव हे आपले काम अविरतपणे करतच आलेले आहेत. कोव्हिड कर्तव्यावर असतांना जिवाची पर्वा केली नाही.  अजुनही आपण कर्तव्य करणार आहोतच. यात कोणतीही शंका घेण्यासारखे नाही. अर्धापूर तालुक्यातील शेकडो राष्ट्रनिर्मात्यांचे वेतन बंद होते त्यावेळी फुकटचे वेतन घेत असल्याची मानसिकता इतर सामान्य नागरिकांप्रमाणे प्रशासनाचीही होत असेल तर ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. 


             ” विद्यार्थ्यांसाठी शिक्षक ” हे सर्व शिक्षक बांधव जाणुन तर आहेतच. शिक्षकसेना शिक्षकांसाठी संघर्ष करते म्हणजे ती विद्यार्थीप्रिय नाही असा त्याचा अर्थ होत नाही. अर्थाचा अनर्थ शिक्षक सेना करीत नाही. शिक्षक सुखी असेल तरच विद्यार्थी घडेल.  शिक्षकांबद्दल आताच का एवढ्या शंका कुशंका घेतल्या जात आहेत? काही अधिकारी पैसा उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे.  शिक्षक बांधवाची इतकी पिळवणूक कशासाठी ? आता एकेक गुरुजी रोगाने दगावत असतील तर यास कोण जबाबदार आहे? लोहा तालुक्यात तर एका शिक्षकाचे अख्खे कुटुंबच पाॅझिटीव्ह आले आहे. त्यांचा खर्च कुणी करायचा? असे अनेक शिक्षक बांधव आहेत ज्यांच्या टेस्ट केल्यानंतर ते पाॅझिटिव्ह येऊ शकतात. आता ते कोरोनासह जगत आहेत. जे शिक्षक शाळेवर उपस्थित‌ राहत आहेत. त्यांच्यात लक्षणे नसतील तरीही कोरोना असू शकतो असा एक निष्कर्ष निघाला आहे. आजार बळावला तरच आपण त्याकडे गांभीर्याने पाहतो.  यातून काही गंभीर परिणाम घडून आले तर काय होईल याची कल्पना प्रशासनाने करावी. कोणत्याही सुविधा न देता गावातील सर्वेक्षणाचे काम दिले गेले.  शिक्षक मोठ्या प्रमाणावर कोरोना पाॅझिटिव्ह येत असतील तर  कोण घेणार ही जबाबदारी ?              

santosh ambulgekar

                       – संतोष अंबुलगेकर , नांदेड.
                       मो.8237742176 

(लेखक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *