महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

◾️नाशिक येथील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लब तसेच खारघर येथील ‘एमटीडीसी रेसिडन्सी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-उद्घाटन

◾️महाराष्ट्र पर्यटन डेटा बँकचे प्रकाशन
◾️विविध उपक्रमांनी जागतिक पर्यटन दिन साजरा

मुंबई; दि. 27

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्त्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक दिलीप गावडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, पूर्वी एरियल फोटोग्राफी करत असताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. राज्याचे सौंदर्य आणि वैभव डोळ्यात मावत नाही. हे वैभव जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यातील फक्त पर्यटनस्थळांचा विकास करुन चालणार नाही. तिथे जायचे कसे, राहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्यंभूत माहिती आणि सोयी-सुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने कामकाज सुरु केल्यानंतर लगेच रायगडच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांचा निधी दिला. कोकणातील चिपी विमानतळही आता लवकरच सुरु होत आहे. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असे ते म्हणाले.

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अनेक देशाचे पर्यटन हे मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. युरोपियन देश, अमेरिका आदी देशांना दरवर्षी सुमारे 8 कोटी पर्यटक भेट देतात. आपल्या राज्यातही पर्यटन क्षेत्रात असाच वाव आहे. मराठवाड्यात कृषी पर्यटन, विदर्भातील जंगल, कोकणातील समुद्र किनारे यांची माहिती पर्यटकांना देता येईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती बरोबरच राज्याला मोठा महसूलही मिळतो. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ यांनी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची संकल्पना मांडली. ते म्हणाले की, नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस इथे राहावे यासाठी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. परिसरातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगीगड आदी पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहे. आज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. कोकणात आता हॉटेल ताज गुंतवणूक करत आहे. येत्या काळात तिथे दोन पंचतारांकित हॉटेल्स तसेच चिपी विमानतळही लवकरच सुरु होईल. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन टुरिजम आणि साहसी पर्यटनाच्या धोरणावर काम सुरु आहे. वन आणि जलसंपदा विभागाबरोबर समन्वय करुन इको टुरिजम, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, सायकलिंग आदी उपक्रम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. वन विभागाच्या गेस्ट हाऊससंदर्भातही चर्चा सुरु आहे. वानखेडे स्टेडियमची सफर, गेट वे ऑफ इंडियाचा विकास, बीएमसी इमारत पर्यटन आदी उपक्रमही हाती घेण्यात येत आहेत. महाबळेश्वर, माथेरान आदी स्थळांना पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणत आहोत. पर्यटनामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांक आणण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी शासनामार्फत सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे ते म्हणाले.

पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या की, पर्यटन विभागासाठी राज्य शासनाने प्रथमच भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. उद्योग, ग्रामविकास, नगरविकास याप्रमाणेच आता आपण राज्याच्या पर्यटन विकासाकडे लक्ष देत आहोत. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले. या क्षेत्राला लवकरच पूर्वपदावर आणू. खारघरमध्ये आज सुरु होत असलेल्या एमटीडीसी रेसिडन्सी या पर्यटक संकुलामुळे पर्यटकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. सिडको आणि एमआयडीसीसोबत करार करुन या संकुलाची देखभाल आणि मेंटेनन्स करण्यात येईल. रायगड किल्ला, जिल्ह्यातील समुद्रकिनारे, इतर पर्यटनस्थळे यांच्या विकासासाठी शासनामार्फत सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन संचालनालयाद्वारे आयोजित किल्ले फोटोग्राफी, व्हीडीओग्राफी व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि एमटीडीसी रेसिडन्सीमध्ये विविध सुविधा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टद्वारे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या रिसॉर्टमध्ये 4 ट्वीन व्हिला (प्रत्येकी 3 कक्ष), 28 पर्यटक कक्ष, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतिक्षा कक्ष व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या बोट क्लबमधील 11 बोटी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहेत. या पर्यटन संकुलाचे आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले.

याशिवाय आज खारघर (नवी मुंबई) येथील सेक्टर-12 मधील सुसज्ज अशा चार मजली ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. या संकुलात 27 कक्ष, 2 लोकनिवास, सोविनियर शॉप, उपहारगृह, व्यायामशाळा, सभागृह, अंतर्गत खेळ, स्वागत कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई परिसरात असलेल्या सिडको, एमआयडीसी आणि खाजगी उद्योगांमुळे विविध कामासाठी येथे येणाऱ्या व्यावसायिक पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच नजीकच्या काळात नवी मुंबई विमानतळ विकसित होत आहे. याअनुषंगाने एमटीडीसीने हे पर्यटक संकुल विकसित केले आहे.

#नांदेड #CMOMaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *