मनिषा वाल्मिकी : देशाचा आवाज झाला मुका..

काल खैरलांजी प्रकरणाचीच अन्यायकारक १४ वर्षे जन्मठेपेबद्दल निषेध व्यक्त करुन काळा दिवस म्हणून पाळला जात असताना खैरलांजीची घटना पुन्हा जिवंत झाली. उत्तर प्रदेश मध्ये घटना घडली असली तरी ती देश की बेटी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये कथित सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय मनिषा वाल्मिकी या दलित युवतीचा सोमवारी दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. हाथरस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करून कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या मुलीला सोमवारी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्याआधी ती दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत होती.
१४ सप्टेंबरला आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असताना या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, “माझी बहीण आई आणि मोठा भाऊ गवत कापण्यासाठी गेले होते. भाऊ गवताचा एक भारा घेऊन घरी आला होता. आई गवत कापत होती आणि ती मागे होती. तिथेच तिला खेचून सामूहिक बलात्कार करण्यात आला. माझ्या आईला ती बेशुद्धावस्थेत सापडली.” कुटुंबीयांनी तिला बेशुद्धावस्थेत असतानाच आधी स्थानिक आरोग्य केंद्रात नेलं आणि तिथून पुढे अलिगढ मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं. मेडिकल कॉलेजमध्ये ती १३ दिवस व्हेंटिलेटरवर होती. सोमवारी तिला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, जिथे तीनच्या सुमारास तिनं प्राण सोडले. पीडितेच्या भावानं सांगितलं, “तिची जीभ कापण्यात आली होती. मणक्याचं हाड तुटलं होतं, शरीराचा एकही अवयव काम करत नव्हता. ती बोलू शकत नव्हती, कुठला इशाराही करू शकत नव्हती.”

पीडितेच्या भावानं आरोप केला आहे की सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं हाताळलं नाही आणि घटनेच्या दहा दिवसांनंतरही कुणाला अटक केली नव्हती. त्यानं सांगितलं की, सामूहिक बलात्काराचं कलमही तेव्हाच जोडण्यात आलं, जेव्हा माझ्या बहिणीनं सर्कल ऑफिसरला जबानी देताना इशाऱ्यानंच आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांनी केवळ हत्येच्या प्रयत्नाचे आरोप ठेवले होते आणि त्यात एकाच आरोपिचं नाव घेतलं होतं. कुटुंबीयांचं म्हणणं आहे, की पीडित बेशुद्ध झाली होती आणि तिच्यासोबत काय झालं, हे त्यांना माहीत नव्हतं. पीडितेच्या भावानं सांगितलं, “माझी आई आणि भाऊ तशाच अवस्थेत पोलीस स्टेशनला गेले होते. त्यांना जे जसं समजलं, तशी तक्रार त्यांनी दिली होती. पण पोलिसांनी दहा दिवसांपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.”

पीडितेच्या भावानं सांगितलं की, या घटनेनंतर आरोपींकडून त्यांना धमकी देण्यात आली होती. पोलिसांना त्याविषयी माहिती दिल्यावर कुटुंबाला सुरक्षा देण्यात आली आहे. आम्ही खूप घाबरलो आहोत. ते लोक खूप ताकदवान आहेत. आम्हाला गाव सोडून जावं लागू शकतं.  दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.रात्री १० वाजता पीडित तरुणीचा मृतदेह रुग्णालयातून बाहेर काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आलं. परवानगी न घेताच मृतदेह नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर कुटुंब धरणे आंदोलन करत असून इतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार करण्यात आल्याने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही गुन्हा रोखला नाहीत पण गुन्हेगाराप्रमाणे वागलात अशी टीका प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश प्रशासनावर केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “रात्री २.३० वाजता कुटुंबीय विनंती करत होते, पण उत्तर प्रदेश प्रशासनाने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जेव्हा ती जिवंत होती तेव्हा तिला सरकारने कोणतीही सुरक्षा दिली नाही. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचारही केले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुंबीयांचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार काढून घेतला. मृत पीडितेला सन्मानही दिला नाही”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात. अत्याचार रोखले नाहीत तर एका निरागस मुलगी आणि तिच्या कुटुंबावर दुप्पट अत्याचार केले. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या कार्यकाळात न्याय नाही तर फक्त अन्याय सुरु आहे”. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

गावातल्याच उच्च जातीतल्या चार जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.  चारही आरोपींना अटक करून तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे.  पीडितेच्या कुटुंबीयांनाही गावात सुरक्षा देण्यात आली असली तरी कोर्टाकडे फास्ट ट्रॅक सुनावणीची मागणी करणे आवश्यक आहे. हाथरसच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनीही ट्वीट करून मदतीचं आश्वासन दिलं आहे. “चंदपा पोलीस स्टेशनवाल्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना  ४१२५००रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. आज  ५८७५०० रुपयांची अतिरिक्त मदत दिली जात असून एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.”सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांना सध्यातरी मदत मिळाली नसल्याचंही त्यानं सांगितलं. “खासदारांनी लखनऊला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यास सांगितलं होतं. आम्ही बहिणीचा उपचार करणार की सीएमना जाऊन भेटणार?”

पोलिसांवर निष्काळजीपणाच्या आरोपाविषयी एसपींचं म्हणणं आहे की, “कुटुंबीयांनी जी तक्रार दिली त्यानुसारच सुरुवातीला खटला दाखल करण्यात आला. नंतर तपासादरम्यान मुलीचा जबाब नोंदवल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं, तसं कलम बदलण्यात आली.” सामूहिक बलात्कार मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट झाला का, या प्रश्नावर एसपींचं म्हणणं होतं की त्याविषयीची माहिती सध्या उघड करता येणार नाही.

आझाद समाज पार्टीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद शनिवारी पीडितेला भेटण्यासाठी अलिगढमध्ये गेले होते. त्यांनी पीडितेवर चांगले उपचार आणि तपासात निष्काळजीपणाचा मुद्दा उचलून धरला. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेनंतर अनेक शहरांत विरोध प्रदर्शनं केली. पार्टीच्या एका कार्यकर्त्यानं बीबीसीला सांगितलं, “दलित स्त्रीवर अन्याय झाला म्हणून सगळे गप्प आहेत. एका दलित मुलीसोबत सामूहिक बलात्कार आणि नंतर तिचा मृत्यू यानं कुणाला काही फरक पडत नाही.”

बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांनीही या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मायावतींनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘यूपीच्या हाथरस जिल्ह्यात एका दलित मुलीला आधी वाईट पद्धतीनं मारण्यात आलं. मग तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ही अतिशय लाजिरवाणी आणि अति-निंदनीय गोष्ट आहे. अन्य समाजाच्या मुली-बहिणीही आता उत्तर प्रदेशात सुरक्षित नाहीत. सरकारनं याकडे लक्ष द्यावं अशी बीएसपीची मागणी आहे.” पीडितेच्या मृत्यूनंतर मायावती यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी केली आहे.

महिला अधिकार कार्यकर्ता योगिता भयाना या प्रकरणावर सातत्यानं ट्वीट करत आहेत. सरकारनं कितीही दावे केले तरी अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. कारण कुठे ना कुठे प्रशासन आणि सरकार महिलांच्या सुरक्षेविषयी गंभीर नाही.त्या सांगतात, “या प्रकरणी पीडितेला गंभीर शारीरिक दुखापत झाली होती. ती मेली असं समजून टाकून देण्यात आलं. पण पोलिसांनी सुरुवातीपासून हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही. पहिली अटक करण्यासाठीही दहा दिवस लावले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून लक्षात येतं की पोलीस अशा घटना रोखण्याविषयी गंभीर नाहीत. एकीकडे आपण महिलांना देवी म्हणतो आणि दुसरीकडे अशा घटना घडतात. गेल्या काही महिन्यांतच उत्तर प्रदेशात अशा अनेक गंभीर घटना झाल्या आहेत. बाराबंकीमध्ये १३ वर्षांच्या दलित मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. हापुडमध्ये सहा वर्षांच्या मुलीचे बलात्कारानंतर डोळे फोडण्यात आले होते. वारंवार अशा घटना घडतायत, पण पोलीस-प्रशासन कोणतंच ठोस पाऊल उचलत नाही. 

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करणे बाबत राहुल डंबाळे पक्षनेते रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी केली आहेउत्तर प्रदेश , हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १९ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. या अमानवीय घटनेचा निषेध नोंदविणे आवश्यक झालेले आहे कारण अशा प्रकारच्या घटना देशभर विशेषता उत्तर प्रदेश मध्ये वारंवार घडत आहेत. 
उत्तर प्रदेशात दलित अत्याचाराच्या घटनांचा कळस घातला गेलेला आहे. चित्रपटाला शोभेल अशा प्रकारच्या थरारक घटना सातत्याने त्याठिकाणी घडताहेत. यापूर्वी जमिनीच्या कारणावरून दोनशे ते अडीचशे सवर्ण समाजाच्या लोकांनी अंदाधुंद गोळीबार करून २० दलित-आदिवासींना ठार मारले होते, यातील आरोपींना अटक करण्या एैवजी याचा निषेध नोंदवायला जाणाऱ्या प्रियंका गांधींनाच उत्तर प्रदेश सरकारने अटक केले. दुसऱ्या घटनेत जातीय अत्याचाराचा प्रतिबंध केला म्हणून चंद्रशेखर आजाद उर्फ रावण याला रासुका अंतर्गत जेलमध्ये डांबले. नुकतेच अशाच एका जाती अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले असता त्यांना देखील अटक करण्यात आले होते. 
एकंदरीतच जातीय अत्याचाराच्या घटना घडवण्यासाठी जात्यांध, धर्मांध वृत्तीच्या लोकांना रान मोकळे करून देणे आणि अशा घटना घडल्यानंतर सुद्धा त्या आरोपींना अटक न करणे, या सोबतच जे या घटनेचा निषेध नोंदवतील त्यांच्यावर मात्र अटकेची कारवाई करणे. अशा चुकीच्या पद्धतीचा राज्यकारभार उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे हाथरस येथे जातीय हत्याकांडात व अत्याचारात बळी पडलेल्या मनीषा वाल्मिकी या भगिनीला आदरांजली अर्पण करून पुढील प्रमाणे आपणानाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. १) उत्तर प्रदेश येथील योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करण्यात यावे. २) दलित अत्याचाराच्या प्रश्नावर देशभरातील सर्वच सरकारांनी कठोरतेने भूमिका घ्यायला हवी. ३) हाथरस हत्याकांडातील मनीषा वाल्मिकी यांचेसह देशभरातील सर्वच जातीय अत्याचार आतील हत्त्यांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावेत. 

जात बघून मेणबत्या पेटवणा-यांनो ! मनिषा वाल्मिकी या तरुणीवर पाशवी अत्याचार होतो परंतु तिला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींच्याच समर्थनात कलेक्टरकडे जातदांडग्यांचा अन् धनदांडग्याचा मोर्चा वळतो, तेव्हा या देशात गरीब दलित मुलीच्या अब्रूला काय किंमत आहे की नाही असा प्रश्न पडतो. केवळ गरीब दलित मुलगी आहे म्हणून तिच्यावर वाटेल तेव्हा अत्याचार करणार आणि कोठे वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ कापणार हे कोणत्या विकृत अवलादींचे संस्कार म्हणायचे ? 

मनिषा वाल्मिकी ही आता जिवंत नाही राहिली. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे. तिच्यासाठी अजूनतरी कुठेच मेणबत्या पेटलेल्या दिसल्या नाहीत. निर्भयाच्यावेळी मेणबत्ती पेटवणा-या भारतातातील त्या तथाकथित स्त्रीवादी संघटना आता कुठे गायब झाल्या आहेत. जात बघून जर या देशात मेणबत्या पेटवल्या जाणार असतील तर जातीच्या ठेकेदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की महालात राहणारी स्त्री असली काय आणि पालात राहणारी स्त्री असली काय या दोन्हीही तेवढ्याच सन्माननीय आहेत – असतात, जेवढा आपण या राष्ट्राच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो. नराधमांचा निषेधच पण जात बघून मनिषाकडे दूर्लक्ष करणा-या त्या पुरोगाम्यांचाही सातारा येथील विचारवंत तथा पत्रकार अरुण  विश्वंभर यांनी निषेध व्यक्त केला आहे. 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे प्रा. डॉ ‌. राजेंद्र गोणारकर लिहितात. कालकथित राजा ढाले यांचाआज जन्मदिन आज ही त्यांचा १९७२ साली लिहिलेला “काळा स्वातंत्र्य दिन ” हा लेख उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषावरील निर्घृण अत्याचार व हत्येचा जळजळीत निषेध करतांना  सारखा अस्वस्थ करतो आहे,अजून ही आपण तिथंच आहोत का?
त्यांनी लिहिलं होतं- ……….असला राष्ट्रध्वजाचा अपमान नि राष्ट्रध्वज के कुणाच्या ×××××××घालायचाय का?राष्ट्र हे लोकांचं बनतं, त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की प्रतिकांच्या(ध्वज) अपमानाचं दुःख मोठं? काय मोठं? आमच्या अब्रूची किंमत एका पातळाच्या किंमती एवढी !एवढी पातळ? या गुन्ह्याला म्हणूनच राष्ट्र ध्वजाच्या अपमानाला होणाऱ्या दंडापेक्षा जबर शिक्षा हवी आहे. नपेक्षा लोकांत राष्ट्रप्रेम राहणार आहे काय?  त्यांनी पुढे जे लिहिलं होतं ते ही खूप विचार करावा असं आहे– लोक म्हणतात की, साखर कारखान्याची मस्ती चढलेला जमीनदार वर्ग या अत्याचाराच्या मुळाशी आहे. मला हे पटत नाही. या अत्याचारामागं सबंध स्पृश्य वर्ग आहे. चातुर्वर्ण्यला मानणारा प्रत्येक गधडा आहे. राजा ढाले यांचे स्मरण करतांना देशात पुन्हा वाटतं आपण चाललो तर खूप पण अजूनही अंतर मिटलंच नाही. निर्भयाला न्याय मिळतो, रेड्डी ला न्याय मिळतो. प्रियंका भोतमांगेला का नाही? मनिषाला मिळेल का ? यानंतर #justicformanishawalmiki हा ट्रेंड प्रसारित होत आहे. नराधमांनी तिची जीभ कापली आणि भारत मुका झाला.अरे किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी? असा प्रश्नही डॉ. गोणारकरांनी विचारला आहे. 

डॉ. प्रा. जे. टी. जाधव म्हणतात की, सोमरसात समरसझालेल्या मिडियाला ‘हथरस’ कसे दिसणार? हा मिश्किल आणि तितकाच गांभीर्यपूर्वक प्रश्न विचारला आहे. 

Justice For Manisha  असे लिहून पुसद येथील आंबेडकरी चळवळीतील अग्रणी युवा कार्यकर्ते हेमंत इंगोले म्हणतात की, १४ वर्षा पुर्वी  घडलेले खैरलांजी हत्याकांड न्यायाच्या प्रतीक्षेत भोतमांगे कुटुंबप्रमुखाचा शेवटी  करुन अंत होतो न्याय मात्र मिळत नाही ,याच घटनेची पुंन्हा १४वर्षांनी याच तारखेला  पुनरावृत्ती होते.. नराधम मनीषावर अमानुश बलात्कार करुन तिची जिभ छाटतात ,मानेची हड्डी मोडतात  संपुर्न शरीरास अत्यंत निर्दयतेने  अमानुष ईजा पोहचवल्या जातात आनी शेवटी ऊपचारा दरम्यान तिचा ईस्पितळातच करुन अंत होतो. परंतु दलाल प्रसार माध्यमे या घटनेची जराही दखल न घेता कंगना सारख्या नटीची ब्रेकींग न्युज तासंतास चालवतात,फक्त  जिवाचा धोका आहे म्हनताच या नटीस ईथली वांझ व्येवस्था वाय सुरक्षा देते परंतु  मनिषा सारख्या माय बहीनींवर भरदीवसा बलात्कार करुन त्यांना जिवे मारले  जाते  याची साधी वाच्यताही कोनताच पक्ष प्रसार माध्यमांवर  करतांना दिसत नाही. ज्या पध्दतीने प्रियंका रेड्डीच्या मारेक-यांना   ऐन्काऊन्टर करुन ठार मारले  त्याच पध्दतीने मनिषाच्याही मारेक-यांचा  बलात्कारी नराधमांचा  एन्कॉऊन्टर होईल  का…? पिडीत मनिषाची जात न बघता न्याय दिला जाईल का…?

             उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १५ दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे मृत्यूशी झुंज संपली. गेल्या दोन आठवड्यांपासून जीवन व मृत्यूशी लढाई लढत असलेल्या हाथरस येथील चंदपा भागातील तरुणीने आज दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या घटनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेदेखील सोशल मीडियावर या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रितेश देशमुखने ट्विट करत लिहिले की, इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्या दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले पाहिजे.

          पीडित मुलगी १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्काराला बळी पडली होती आणि तिची प्रकृती सोमवारी बिघडल्यानंतर तिला अलीगडच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आरोपींनी महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
                चंदपा परिसरातील घडलेल्या या घटनेचा सीओ सादाबाद स्तरावर तपास सुरू आहे. या घटनेनंतर तपासात काय केले गेले आहे, यासह त्याने संपूर्ण प्रकरणांचा अहवाल आपल्या उच्च अधिकाऱ्यांना पाठविला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मुलीला जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची जीभ कापली गेली होती आणि मान देखील तुटली होती. १९ सप्टेंबरला जेव्हा कार्यवाहक सीओ सादाबाद महिला कॉन्स्टेबलसमवेत तिचा जबाब नोंदवण्यासाठी आली, तेव्हा पीडितेची प्रकृती फारशी चांगली नव्हती. तिची प्रकृती पाहून जबाब नोंदविणारी टीमही भावनिक झाली. स्वतःवर होणारे हल्ले आणि क्रौर्य याबद्दल ती मुलगीच सांगू शकत होती. हल्ल्याबरोबरच  २०  सप्टेंबरला छेडछाड करण्याचे कलम वाढविण्यात आले. त्यानंतर सीओ सादाबाद या प्रकरणात २१ सप्टेंबर रोजी जेव्हा जबाब नोंदविण्यासाठी आले तेव्हा कुटुंबीयांनीही मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. यावर, सीओ २२ सप्टेंबर रोजी पुन्हा महिला कॉन्स्टेबलसह परत आले, जेव्हा मुलीने हावभाव करत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, गुन्ह्यात काही कलम वाढवून, चारही आरोपींना तुरूंगात पाठविण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी मुखेडचे ॲड.संजय भारदे यांनी जाहीर निषे़ध केला आहे. योगी मोदी सरकाचा अन् यांच्या बोलातालावर नाचणाऱ्या पोलीसांच्या मुजोर दंडुकेशाहीचा. उत्तर प्रदेश पोलिस हथरस घटनेतील पिडितेच्या अंत्यविधीसाठी का घाई केली ? अरे तुम्ही जनतेचे सरंक्षक आहात भक्षक नाही.साला अशात तुम्ही लय माज आल्यासारखे करून कुत्र्यासारखे वागता.काय समजावं तुम्हाला बदमाशाचे साथी नरभक्षक की संरक्षक. थु थु.मोदी योगी हरामांनो काही असेल लाज लज्जा तर राजीनामा देऊन मोकळे व्हा.वाट लावली देशाची शांतता सुव्यवस्था संविधान लोकशाहीची. कळाली तुमची औकात जात! असा संताप  व्यक्त केला आहे. 


   कंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा या विषयावर ना. रामदास आठवले यांनी  पाठिंबा दिला. त्यावर स्वरा भास्कर म्हणाली की….उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. “या पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? पायल पेक्षा या पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांच्या मदतीची गरज अधिक होती.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जात पाहूनच या देशात मेणबत्या पेटवतल्या जातात. या मुद्द्यावर समाजमाध्यमात रान पेटले आहे. त्यामुळे न्याय मिळेल की नाही, हा एक अनुत्तरित राहणारा प्रश्न आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

 संपादकीय३०.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *