यावर्षी १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यावर्षी नवरात्रामध्ये गरबा वा दांडियाचं आयोजन करता येणार नाही. सार्वजनिक आणि घरगुती नवरात्र उत्सव, दुर्गापूजा साजरी करताना या नियमांचं पालन करावं लागेल. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवासाठीही अशाच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.
नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. देवीच्या घरगुती मूर्तीची उंची २ फूट तर सार्वजनिक मंडळामधल्या देवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा कमी असावी. देवीच्या आगमनाची वा विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. पारंपरिक मूर्तीऐवजी घरातील धातू वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शाडूच्या मातीची मूर्ती असल्यास तिचं विसर्जन घरच्या घरी करावं. विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावं. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
महापालिका वा स्थानिक प्रशासनांची धोरणं आणि न्यायालयाने दिलेल्या सूचनांचं पालन करून मंडप उभारावा. गरबा – दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी. उत्सवासाठी स्वेच्छेने देण्यात आलेली वर्गणी वा देणगी स्वीकारावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत आणि आरोग्य – समाज विषयक जनजागृती जाहिरातींतून करण्यात यावी. रक्तदान शिबीरांसारख्या आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करावं.आरती, भजन-कीर्तन वा इतर धार्मिक विधी करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन वा केबल नेटवर्कद्वारे करावी. मंडळांच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची सोय असावी.दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी फिजीकल डिस्टंन्सिंगचे आणि स्वच्छतेचे नियम पाळण्यात यावेत.
मंडपामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्ते नसावेत. दसऱ्याला रावणदहनाचा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपाचा करावा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान व्यक्ती तिथे हजर राहू शकतात.
राज्यामध्ये टप्याटप्याने विविध सेवा आणि कार्यालयं सुरू होत आहेत. पण धार्मिक स्थळे बंदच ठेवण्यात येत असून या वर्षात येणाऱ्या प्रत्येकच सण उत्सव साजरा करण्यात मर्यादा येत आहेत. राज्यात रेस्टाँरंट्स, जिम, शाळा – कॉलेजं, सिनेमा आणि नाट्यगृहं अजूनही बंद आहेत.
मुंबईतली लोकल रेल्वे सेवा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाही. पण ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास लोकल्स सर्वांसाठी खुल्या करण्याचा आमचा विचार असल्याचं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी यांनी सांगितले आहे. “ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आणखी काही गोष्टी सुरू होतील आणि मग त्यासाठी वाहतुकीच्या इतर पर्यायांनाही परवानगी द्यावी लागेल, ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास कदाचित आम्ही लोकल टेन्स सुरू करू,” असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. तर अत्यावश्यक सेवांसोबतच इतर लोकांसाठीही लोकल सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने २९ सप्टेंबर रोजी राज्य सरकारला दिली आहे. वकिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली. त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ही सूचना केली आहे.
तसेच राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्या हॉटेल्समधून फक्त होम डिलीव्हरी वा पार्सल न्यायला परवानगी आहे. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन कार्यपद्धती निश्चित करणार असल्याचं गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितलं आहे.
अनलॉकच्या पाचव्या टप्प्यातल्या गाईडलाईन्स राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. यामध्ये पाच ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स – रेस्टॉरंट्स, बार आणि फूड कोर्ट्स सुरू होणार आहेत. सोबतच राज्यांतर्गत रेल्वेसेवाही सुरू होईल. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी सुरू करायला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. पण शाळा – कॉलेजं, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, स्विमींगपूल, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो रेल्वे मात्र बंदच असतील.
महाराष्ट्रातली हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार, फूडकोर्ट्स पाच ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी खुली होतील. पण त्यांना पन्नास टक्के क्षमतेने काम करावं लागेल. या सेवांसाठीची वेगळी नियमावली पर्यटन खातं ठरवून देणार आहे. राज्यांर्तगत रेल्वेसेवा लगेच सुरू होतील. पहिलं आणि शेवटचं स्टेशन राज्यामध्येच असणाऱ्या ट्रेन्स पुन्हा धावू लागतील.लोकांची वाढलेली रहदारी लक्षात घेता मुंबई MMR भागातल्या लोकल ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येईल. मुंबईच्या डबेवाल्यांना MMR भागामध्ये लोकलमधून प्रवास करायला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाकडून QR कोड घ्यावा लागेल.पुण्यामधल्या लोकल ट्रेन्सही सुरू होतील. त्यांना मुंबई मेट्रोपोलिटन रिजन (MMR) सारखेच नियम पाळावे लागतील. पुणे पोलीस आयुक्त हे त्यासाठीचे नोडल ऑफिसर असतील.ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना राज्यांतर्गत आणि दोन राज्यांमधली वाहतूक विना-अडथळा कोणत्याही वेळी करता येईल. ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांवर यासाठीचे कोणतेही निर्बंध नसतील. यापूर्वीच्या अनलॉकच्या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी यापुढेही कायम राहतील.
राज्यभरातली प्रार्थनास्थळं यापुढेही बंद राहणार आहेत. कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी आहे. लग्नासाठीची आमंत्रितांची संख्या ५० पेक्षा कमी असावी लागेल. तर अंत्यसंस्कारांसाठी २० जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. राज्यामधल्या नवरात्रोत्सवासाठी सरकारने याआधीच नियमावली जाहीर केलेली आहे. यानुसार यावर्षी राज्यामध्ये गरबा – दांडियाचं आयोजन करता येणार नाही.
करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता १७ ऑक्टोबरपासून सुरु होणारा या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षांचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवी मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.
देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी.या वर्षी शक्यतो पारंपरिक देवी मुर्तीऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सँनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवी मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी करण्यात यावी.
मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्ती कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलावू नयेत, त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
अशा मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जाहीर केल्या आहेत. त्या सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करून शासन, प्रशासनास सहकार्य करावे व करोना विरुद्धच्या युद्धात सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय सार्वजनिक उत्सव मंडळांकडून घेण्यास सुरुवात झाली असून कळवा येथील पारसिकनगर भागातील संघर्ष मंडळाने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासह गरबाही रद्द करण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर मंडळेही असाच निर्णय घेणार की उत्सव साजरा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात राज्य शासनाने नियमावली तयार करून ती लागू केली होती. असे असले तरी अनेक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला होता. तर इतर मंडळांनी नियमावलीचे पालन करत साधेपणाने उत्सव साजरा केला. असे असतानाच महिनाभरावर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवावरही करोनाचे सावट आहे. या उत्सवामध्ये गरब्याचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते आणि त्या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी तरुणाईसह नागरिक मोठ्या संख्येने येतात. याशिवाय गरबा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परंतु करोनामुळे या उत्सवावरही निर्बंध येण्याची शक्यता असतानाच काही मंडळांनी गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मंडळे खरोखरच अभिनंदनास पात्रच आहेत.
कळवा येथील पारसिकनगर भागात संघर्ष मंडळाच्या वतीने मोठा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यंदा गरब्याचे आयोजन करू नका आणि देवीची प्रतिष्ठापना एखाद्या व्यक्तीच्या घरी करण्यात यावी, अशी विनंती परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार मंडळाने उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यायात तीनशे नवरात्रोत्सव मंडळे असून ही मंडळे यंदा उत्सव साजरा करणार की रद्द करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यभर वाढणारी रुग्णसंख्या पाहता सर्वांनी सावधगिरी पाळली पाहिजे. नवरात्रोत्सवात एकत्र भेटणे, दर्शनाला एकत्र येणे धोकादायक ठरू शकते. एकंदरीत वाढती रुग्णसंख्या जरा चिंताजनक आहे. मृत्युदर घटला असला तरी रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करावा, असेही डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे.
स्थलांतरात आपली संस्कृतीही सोबत घेऊन आलेल्या बंगाली भाषकांनी मुंबईत पाय रोवताना बंगाल प्रांतातील अनोखा दुर्गा पूजेचा उत्सवही मुंबईत रुजवला. बंगाली शैलीचे मोठाले मंडप, तिथल्या अस्सल कारागिरीतून घडलेल्या मूर्ती अशी खासियत असलेली दुर्गापूजा यंदा साधेपणाने करण्याचा निर्णय विविध उत्सव समित्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे तरुण कार्यकर्त्यांकडून पुढे आलेल्या विचारानुसार बंगाली नवरात्रोत्सवाचे वैशिष्टय़ असलेल्या मूर्तिपूजेऐवजी घटपूजेला प्राधान्य देण्याचा मानस उत्सव प्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गापूजेचा उत्सवही मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थिती होणार आहे. देवीच्या मूर्तीसोबत घटपूजेचा मान या पूजेला असल्याने अनेक मंडळांनी मूर्ती न उभारता केवळ घटस्थापना करण्याच्या निर्णय घेतला आहे. ‘दरवर्षी २० फुटाची मूर्ती घडवली जाते. परंतु यंदा पूजा कशी पार पाडावी, स्वरूप कसे असावे याबाबत चर्चा सुरू आहे. मंडपाची परवानगी, मूर्तीची घडवणूक याबाबतही सरकारी सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रतीकात्मक उत्सव करण्याकडे कल असेल. विशेष म्हणजे तरुण कार्यकर्त्यांकडून केवळ घटस्थापना करण्याचा विचार पुढे येत आहे.
शिवाजी पार्कवरील बंगाल क्लबची दुर्गापूजा मुंबईत प्रसिद्ध आहे. दरवर्षी १६ फुटी मूर्ती इथे विराजमान होते. परंतु यंदा चार फुटाची मूर्ती घडवण्यात येणार आहे. शिवाय उत्सवकाळात गर्दी जमू नये यासाठी समितीच्या निवडक लोकांना प्रवेश देऊन अन्य भाविकांसाठी ‘लाइव्ह’ दर्शनाची व्यवस्था असेल. तर ‘घटस्थापना करून दुर्गापूजा होईल. परंतु सरकारी निर्देशांची वाट पाहत आहोत. नियमांचे पालन करत उत्सव केला जाईल,’ असे गोरेगाव येथील दुर्गा पूजेचे प्रमुख उत्पल चौधरी यांनी सांगितले.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला बंगाली भाषकांचा नवरात्रोत्सव सुरू होतो. देवीची भव्य मूर्ती, सोबत सरस्वती, लक्ष्मी, गणपती, कार्तिक आदी देवतांच्या मूर्ती अशी एकत्रित पूजा केली जाते. या मूर्ती कोलकाताहून आणलेल्या मातीपासून घडवल्या जातात. त्यासाठी दोन महिने आधी बंगालहून कलाकार दाखल होतात. खास बंगाली शैलीतील कापडी महाल उभारले जातात. दररोज विविध पूजा, होम, पारंपरिक कार्यक्रम असा सोहळा असतो. ज्या ठिकाणी ही दुर्गापूजा होते तिथे आसपासच्या विभागातील सर्व बंगाली भाषिक उत्सव साजरा करतात.
‘देवीची मूर्ती घडवणारे कलाकार नुकतेच बंगालहून येऊ घातले आहेत. उत्सव साजरा करत असताना सामाजिक जाणीव जपली जाईल. उत्सवात जमलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येईल. तसेच रक्तदान आणि इतर सामाजिक उपक्रमही उत्सवकाळात होतील,’ असे बंगाल क्लबचे अध्यक्ष जॉय चक्रवर्ती यांनी सांगितले.
नवरात्रविषयक एक अख्यायिका सांगितली जाते.पूर्वी एक महिषासुर नामक राक्षसाने पृथ्वीवर खूप थैमान घातले होते. देवदेवता ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होत. तो सर्वांनाच फार त्रास देत होता. तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नांव ठेवलं महिषासुर मर्दिनी.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात.
खऱ्या अर्थानं नवरात्रात नवदुर्गा म्हणून आजच्या काळातल्या आधुनिक पद्धतीनेही साजरा केला पाहिजे. नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाचे स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीला उत्सव फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे
एखाद्या महिलेने कोणतीही रचनात्मक गोष्ट करण्याचा निश्चय केला की कितीही संकटे आली तरी ती त्यांवर मात करते. मग तिचे काम वैयक्तिक पातळीवरचे असो की सामाजिक स्तरावरचे. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध केले आहे. अशा अनेक दुर्गाचे प्रेरणादायी कार्य गेली अनेक वर्षे काही संस्थांकडून सुरू आहे. या उपक्रमातून कर्तृत्ववान महिला समाजापुढे येतात. त्यापैकी काही महिला शहरांतील तर काही ग्रामीण भागातीलही असू शकतात.
यामुळे विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध केलेल्या जगण्याची, संघर्षाची, जिद्दीची, चिकाटीची, परिश्रमाची कहाणी उजागर होते. काही जणी अनेक अडचणींशी टक्कर घेत रूढ अर्थाने यशस्वी झालेल्या असतात , तर काहींनी वैयक्तिक पातळीवरच, पण प्रामाणिकपणे काम करून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवलेला असतो. सर्वासाठी आदर्शवत ठरणाऱ्या अशा महिलांचा या नवदुर्गांचा दरवर्षी गौरव करण्यात आला पाहिजे. नवरात्रोत्सव असाच साजरा झाला पाहिजे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
०१.०९.२०२०