◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – आरती प्रभू
कविता – १) दुःख ना आनंदही,
२) सप्रेम द्या निरोप
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (उर्फ आरती प्रभू).
जन्म – ०८/०३/१९३० (बागलांची राई, तेंडोली, वेंगुर्ला).
मृत्यू – २६/०४/१९७६ (मुंबई) (४६ वर्षे)
कवी, लेखक आरती प्रभू यांनी कविता, कादंबरी, नाटक, पटकथा, चित्रपट, अनुवाद, स्फुटलेखन, बालवाङ्मय, एकांकिका अशा विविध साहित्य प्रकारात आणि क्षेत्रात लेखन केलं.
जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे या त्यांच्या प्रसीद्ध कलाकृती आहेत.
शिक्षण आणि उपजीवीकेसाठी आरती प्रभू यांनी वास्तव्याची अनेक ठिकाणी बदलली.
“वैनतेय” या साप्ताहिकात “कुढत का राहायचे?” ही कविता १७/०२/१९५३ ला प्रकाशित झाली आणि पहिल्यांदा ते कवी म्हणून प्रकाशझोतात आले.
आणि त्यानंतर आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून त्यांनी मराठी मनाला अक्षरशः भुरळ घातली. त्यांच्या कविता ही जणू त्यांच्या खडतर आयुष्याची जीवनरेखाच होती. कारण त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये त्यांच्या दुःखाच्या व्यथा व्यक्त झाल्याचे दिसते.
कोंडुरा ही त्यांची चित्रपट कलाकृती खूप गाजली.
एक शुन्य बाजीराव हे नाटकही खूप प्रसिद्ध झाले, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची प्रशंसा झाली.
त्यांनी लिहिलेली अनेक भावगीते, चित्रपटगीते गाजली. आजही ती रसिकांच्या मनामनात आहेत….
ती येते आणिक जाते…
येरे घना येरे घना…
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…
तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी…
अशी अनेक गाणी आजही आपल्या सर्वांमुखी आहेत.
आरती प्रभू यांच्या “नक्षत्रांचे देणे” या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
चौफेर लेखन करणाऱ्या आरती प्रभू या प्रतिभावंत साहित्यिकाचे आयुष्य अल्पायुषी म्हणजे अवघे ४६ वर्षांचे राहीले.
आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये जीवन, दुःख, वेदना या विषयी प्रामुख्याने भाष्य केलेले आढळते. त्यांचे स्वतःचे दुःख व्यथा त्यांच्या बऱ्याच कवितेत परावर्तीत झाल्याचे दिसून येते.
“दुःख ना आनंदही” या कवितेत, मी स्वतः कुणीच नाही, आपले आयुष्य हे एखाद्या नावे प्रमाणे सतत पुढे जात असते, सरकत असत. मी फक्त एक माध्यम आहे या जीवनचक्रात पुढे पुढे जाताना, अशा आशयाची भावना व्यक्त करतात.
तर “सप्रेम द्या निरोप” या कवितेत, आपण रिकाम्या हाताने इथे आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत. हे शरीर नश्वर आहे. जो पर्यंत आपण सचेत आहोत तोपर्यंत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे अशा स्वरूपाचा आशय व्यक्त होतो.
लय, आशय आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या आरती प्रभू यांच्या या दोन्ही कवितांचा आनंद आपण घेऊयात –
दु:ख ना आनंदही
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा,
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही
– आरती प्रभू
◆◆◆◆◆
सप्रेम द्या निरोप
तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगऱ्याचा पानी मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा
“सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे”
◆◆◆◆◆
– आरती प्रभू
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■