ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर
( एका सत्याग्रहाच्या निमित्तानं..
ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, ओबीसी जनगणना..हे मुद्दे सद्या महाराष्ट्राच्या राजकारणाला व्यापून बसले आहेत. महाविकास आघाडीसह सर्व पक्षांनी राजकारणाच्या पलिकडे जावून त्याचा विचार करायला हवा. गेल्या ९० वर्षांपासून ओबीसींची जनगणना का नाही ? हा एकच प्रश्न भारतीय राजकारणाचा कपटी चेहरा उघडा करायला पुरेसा आहे. देशातील, महाराष्ट्रातील युवक पुढे येवून ही घाण दूर करतील का ? त्या त्या पक्षातील ओबीसी सेल आतातरी रिचार्ज होतील का ?
.. चला.. स्वतःपासून सुरूवात करू या.. एका सत्याग्रहाची.. )
•••
काळ कोणताही असो, युवा पिढी नेहमीच काळाच्या पुढे असली पाहिजे. असते सुद्धा. नवं ज्ञान, नवं विज्ञान आणि सामाजिक परिवर्तनातील ताजेपणा सर्वात आधी जर कुणाशी दोस्ती करत असेल, तर युवकांशी ! युवकांची पाटी कोरी असते. मनाची दारं खिडक्या खुल्या असतात. त्यामुळे आपल्याला हवं ते त्यावर लिहिलं जाऊ शकते. आधी महाविद्यालयीन शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांची वैचारिक, मानसिक जडघडण योग्य रीतीनं केली जाईल, असा अभ्यासक्रम शाळा आणि कॉलेजमध्ये असावा. जात, पात, धर्म यापेक्षा समता – मानवता महत्वाची आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. मूर्तिपूजा नको, व्यक्तिपूजा नको, अंध विश्वास नको, अशा गोष्टी जुन्या पिढीच्या तुलनेत नव्या पिढीच्या मनावर बिंबवणं सोपं आहे. अर्थात ह्या गोष्टींची जबरदस्ती कुणावरही केली जाऊ नये. ही वैयक्तिक बाब आहे. पण त्यांचं सार्वजनिक प्रदर्शन केलं जाणार नाही, याची मात्र सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. मात्र कुठल्याही परिस्थितीत भूमिका दुटप्पी नको. कुणीही असो, सार्वजनिक ठिकाणी बोलतांना वेगळं आणि खाजगीत वागताना वेगळं असं असता कामा नये. अर्थात आपली स्वतःची भूमिका आणि कुटुंबातील इतर व्यक्तींची भूमिका त्यांनी त्यांनी आपल्या मनाप्रमाणे ठरवायला हवी. ती समर्पक किंवा विरोधी अशी काहीही असू शकते. तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही. असू नये !
ज्या देशाची युवापिढी जागरूक, दूरदर्शी, कर्तृत्ववान त्या देशाचं भवितव्य उज्वल ! आपल्या युवकांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण आणि धर्म या सर्व आघाड्यांवर सदैव जागरूक आणि पुढं असायला हवं ! त्यासाठी वाचन, मनन, चिंतन याची सवय लागली पाहिजे. युवा पिढी ही डोळस असली पाहिजे. इतिहासापासून बोध घेवून भविष्याचा वेध घेता आला पाहिजे. त्यासाठी पूरक आणि प्रेरक वातावरण युवा पिढीला उपलब्ध करून देणं, हे सरकारचं काम आहे. समाजाचं काम आहे. पण त्याही आधी कुटुंबाचं काम आहे. आपलं ओझं इतरांच्या खांद्यावर देणारी पिढी आपल्याला नको. समाजाचं ओझं आपल्या खांद्यावर पेलण्याची ताकद असलेली नवी पिढी आपल्याला तयार करता आली पाहिजे. त्यासाठी समतावादाचा पाया पक्का असला पाहिजे. युवकांनी सुद्धा स्वतःहून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
• युवक हा स्वतंत्र विचाराचा हवा. कुणाचाही वैचारिक गुलाम असता कामा नये.
• जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर राजकारणाचा प्रभाव अनिवार्यपणे पडत असतो. कारण कोणताही निर्णय असो, तो राजकीय मंचावरूनच घेतला जातो. त्यामुळे आपल्या युवकांना राजकारणाचं व्यवस्थित आकलन असणं गरजेचं आहे.
• प्रत्येक युवकानं राजकारणात सहभागी असलंच पाहिजे, असा मात्र त्याचा अर्थ नव्हे. पण मतदान करतांना कुणाला करायला हवं, याचं भान आणि वास्तववादी आकलन त्याला असणं गरजेचं आहे.
• राजकारणाचं मला काय करायचं ? मला त्यात इंटरेस्ट नाही, राजकारण हे चांगल्या लोकांचे काम नाही, असली नकारात्मक भूमिका कुणीही घेता कामा नये. युवकांची तर मुळीच नको.
• हा देश माझा आहे. या देशाचं जे काही बरं वाईट होईल, त्याचा फायदा किंवा तोटा मलाच होणार आहे, त्यामुळे मला त्याबाबत सदैव चौकस राहायला हवं, ही सकारात्मक भूमिका युवकांची असायला हवी.
• अलीकडे विविध क्षेत्रात विद्यार्थिनी, युवती आघाडीवर दिसतात. त्यांचा अभ्यास आणि आकलन देखील व्यापक असल्याचं जाणवते. अशावेळी कुटुंब आणि समाजानं त्यांना योग्य प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मुलगा किंवा मुलगी असा भेद आपण करू नये.
• समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण अशा विविध क्षेत्रात युवा नेतृत्व जाणीवपूर्वक पुढं आलं पाहिजे. त्यासाठी समाजानं त्यांना मदत करणं, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
• राजकारणामध्ये असलेली घराणेशाही ही लोकशाहीला मारक आहे. ती संपवणं गरजेचं आहे. त्यासाठी नव्या दमाच्या कर्तृत्ववान युवकांना नेता म्हणून पुढं आणायला हवं.
• शहीद भगसिंग यांचा जोश, बाबासाहेब आंबेडकर यांची सम्यक दूरदृष्टी आणि महात्मा गांधी यांची सर्वसमावेशक नेतृत्वक्षमता.. यांच्या प्रकाशात वाटचाल करणारा युवक आपल्याला हवा आहे. हे काम सोपं नाही, पण आपण त्या दिशेनं काम करायचं ठरवलं, तर काहीही अशक्य नाही. असे १०० युवक जरी आपण तयार करू शकलो, तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण कायापालट व्हायला वेळ लागणार नाही.
• सध्याच्या राजकारणात मुखवटे कोणतेही दिसत असले, तरी बहुतेक सारे पक्ष एकमेकांचे सख्खे मावसभाऊ आहेत, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. सत्ता कुणाचीही आली, तरी ते एकमेकांना सांभाळून घेणार, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट झालेलं आहे.
• हा चक्रव्यूह भेदायचा असेल, तर पुन्हा एकदा अभिमन्यू समोर आला पाहिजे. मात्र यावेळी त्याची परिपूर्ण तयारी असली पाहिजे. घात होणार नाही, याची जबाबदारी समाजानं घेतली पाहिजे. शेवटी मतदान करणं तर समजाच्याच हातात आहे. समाज एक झाला, एकत्र येवून ठाम निर्धार केला, तर ना पैशाची गरज आहे, ना गाड्या घोड्यांची.
शेवटी.. मतदार जर आम्हीच आहोत, तर आमचीच पोरं आमचे सरदार होऊ शकत नाही का ? घराणेशाहीला तडा देण्याचं काम शेवटी तुम्हा आम्हालाच करावं लागेल ना ?
राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी अशी मोहीम राबवली गेली पाहिजे. सर्वांनी मिळून निर्णय घेतला, तर इतिहास बदलायचा वेळ लागणार नाही ! युवा भारत, नवा भारत, हे स्वप्न प्रत्यक्षात यायलाही वेळ लागणार नाही ! पण त्यासाठी आधी शंभर युवा, महाराष्ट्र नवा..! अशी सुरुवात महाराष्ट्रातून करू या..!
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
•••
महादेव मिरगे
महासचिव
लोकजागर अभियान
9372794271•9004397917(व्हाट्सअप्प)
ओबीसी जनगणना सत्याग्रह जिल्हा/विभाग निहाय संपर्क
• मनीष नांदे – प्रदेश संघटक
9545025189
• डी. व्ही. पडिले – मराठवाडा
9890585705
• मुंबई विभाग – रवींद्र रोकडे
9773436385
• कोकण विभाग – समीर देसाई
9004048002
• पश्चिम महाराष्ट्र – राजकुमार डोंबे 7378583559
• अमरावती विभाग – प्रभाकर वानखडे 8806385704
• नागपूर विभाग – महेंद्र शेंडे
8055502228