रस्त्यावरचा हॅप्पीवाला बर्थ डे

      आजकाल तरुणाईमध्ये रस्त्यावरच वाढदिवस साजरा करण्याचे फॅड आले आहे. असा वाढदिवस साजरा करताना दहा बारा जणांचे टोळके रस्त्यावरच्याच छोट्या मोठ्या किंवा मोठ्यात मोठ्या दुकानातून आवश्यकतेनुसार केक खरेदी करायचा आणि आपल्या गल्ली, नगरात किंवा  जिथे सोयिस्कर होईल तिथे रस्त्यावरच गाड्या उभ्या करुन हॅप्पीवाला बर्थ डे साजरा केला जातो. घरदार सोडून सर्व मित्र मैत्रीणीना रस्त्यावर जरा अधिकच मनमोकळेपणाने वाढदिवस साजरा करता येतो. थोडीशी अधिकची हुल्लडबाजीही करता येते. सायंकाळी किंवा रात्री अथवा अगदीच मध्यरात्री बंद झालेल्या दुकानासमोर, एखाद्या छोट्या मोठ्या हाॅटेलात फ्री आणि फुकट हा कार्यक्रम सुरू होतो. आधीच प्रकाशित झालेल्या बॅनरप्रमाणे केक कापून झाल्यावर आणि त्यातला तो पांढरा पदार्थ (क्रीम ) तोंडाला फासून घेण्याचा वा इतरांना फासण्याचा कार्यक्रम झाल्यावर सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी फोटोसेशनही बराच वेळ चालते. यात बड्डे बाॅय किंवा बेबीला नाराज केले जात नाही. आता तर बार आणि रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळे पार्ट्यांना अधिकचा रंग चढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे फॅड आता ग्रामीण भागातही पसरु लागले आहे.


     सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील आदेशानुसार सार्वजनिक चौकात, रस्त्यावर रात्री उशिरा वाढदिवस साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या बहुसंख्य तरुण विशेषतः गुन्हेगारी प्रवृतेचे तरुण रात्री उशिरा भर रस्त्यात वाहने लावून केक कापून वाढदिवस साजरा करतात. मोठमोठ्याने गाणी लावतात. परवानगी नसली तरीही डीजे लावतात. आरडाओरडा करून हॉर्न वाजवतात, हातात तलवारी घेऊन डीजेच्या तालावर नाचतात. यामुळे वाहतूक कोंडी होते, भांडणे होतात आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो.
यामुळे यासर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर आणि चौकात वाढदिवस साजरा करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कलम २९०, १४३, १४३, १४९ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकारामध्ये संबंधितांना एक वर्षाचा कारावास सुद्धा होऊ शकतो.

रात्री बारानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळून आल्यास, ‘बर्थ डे बॉय’ना त्यांचा केक लॉकअपमध्ये खावा लागतो. माहिती कळताच गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करतात. या मोहिमेसाठी गुन्हे शाखेचे पोलीस दररोज शहरातून गस्त घालत असतात. 
गल्लीबोळात व सार्वजनिक रस्त्यावर एखाद्या मुलाचा, नेत्याचा किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सर्वत्र सुरू आहे. रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी उभे राहून मोटरसायकल, कारवर केक कापला जातो. केक कापण्यासाठी तलवार, चाकू आदी धारदार शस्त्राचा वापर केला जातो. मोबाईलवर गाणी लावून सार्वजनिक शांततेचा भंग केला जातो. फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला जातो. अशा प्रकारचा विचित्र प्रकार शहरात ठिकठिकाणी पाहावयास मिळतो. केक कापून आवाज करणे, गोंधळ घालणे आदी प्रकार सर्रास घडतात. या प्रकारामुळे नियमांचा भंग तर होतोच; मात्र आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. 


नांदेड येथील प्रख्यात लेखक डॉ. जगदीश कदम यांनी शहरातील व्यापाऱ्यांसह यासंदर्भानेच एक तक्रार केली होती. भाग्यनगर टी.पाॅईंटवर पोलीस चौकी उभारा असेपरिसरातील रहिवाशांच्या वतीने नांदेड एस.पी.ना निवेदन दिले होते. नांदेड येथील भाग्यनगर चौकात सायं ६ ते १० या वेळात प्रचंड गर्दी होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.बेशिस्त वाहनांचा उच्छाद असतो, टारगट मुले ट्रिपलसीट गाड्या चालवतात. त्यामुळे अपघात होतात. भर चौकात रस्त्यावर जमून वाढदिवस साजरा करणे, फटाके फोडणे, अंड्याचा एकमेकांवर मारा करणे असे प्रकार सर्रास घडतात. संध्याकाळच्या वेळी टारगट मुलांच्या हैदोसामुळे महिला आणि विद्यार्थिनींना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. रस्त्यावर उभे राहून धुम्रपान करणे, दुकानासमोर अस्ताव्यस्त गाड्या लावून तासनतास रस्त्यावर टवाळक्या करीत उभे राहणे, व्यावसायिकांना धमकावणे असे प्रकार घडत आहेत. या सगळ्या बाबींना पायबंद करण्यासाठी भाग्यनगर टी.पाईंटला पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी करणारे एक निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले.या निवेदनावर या परिसरातील चाळीसच्या वर रहिवाशी आणि व्यापा-यांच्या सह्या होत्या. 
मोठी गर्दी जमवून गोंधळ करीत साजरा होणाऱ्या या वाढदिवसाच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या वतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाढदिवस साजरा करताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरल्यास भारतीय दंड विधान कलम ३४१, १४३ मुंबई पोलीस कायदा १३५ व ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हे शाखेच्या या मोहिमेत कॉलेजचे विद्यार्थी जर सापडले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन भवितव्य खराब होऊ शकते. विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी रस्त्यावर वाढदिवस साजरा न करता तो घरात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये साजरा करावा. अन्यथा कारवाई अटळ आहे असे आवाहन गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. 

या प्रकरणात माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ही मोहीम राबविली जात आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तर त्यांना जॉबसाठी परदेशात जाण्यासाठी अडचणी येतात. पुढे नोकरीला अडचणी येऊ शकतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत:ची  व आई-वडिलांची नाचक्की होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तरुणांनी नियमांचे पालन करावे. शहरात जर असा प्रकार घडत असेल तर, पाहणाऱ्या व त्रास होणाऱ्या लोकांनी याला आळा घालण्यासाठी पोलीसांशी संपर्क   साधण्याबाबत कळवले जाते. ते शक्य नसेल तर मोबाईलवर  मेसेज करावा. वाढदिवसाची माहिती सांगणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येते. शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन गुन्हे शाखेकडून केले जाते. 
पिंपरीत रात्री १२ वाजता भर रस्त्यात वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर फटाके वाजवून रात्री गोंधळ घातला जात असल्याने वाकड पोलिसांनी कारवाई केली.


असा वाढदिवस साजरा करणाऱ्या १३ जणांना पोलिसांनी वाढदिवसाच्याच मध्यरात्री ताब्यात घेतले. शहरात गेल्या काही वर्षांपासून मध्यरात्री रस्त्यावरच केक कापला जात होता. राजकीय नेत्यांसह युवा कार्यकर्ते असे वाढदिवस साजरा करीत होते. याचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे रात्री दहानंतर सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. असा वाढदिवस साजरा केल्यास पुढील वर्ष तुरुंगातच काढावे लागू शकते, अशी तंबीदेखील देण्यात आली आहे.

ही कारवाई वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी केली आहे. माने म्हणाले, ‘ मध्यरात्री काही मित्रांनी केक आणून काळेवाडी येथील एका शाळेसमोर वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्यामुळे येथील एका नागरिकाने वाकड पोलिसांना फोनद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांत पोलिसांनी तेथे येऊन वाढदिवस असलेल्या मुलासह १३ जणांना ताब्यात घेत बेकायदा जमाव करणे; तसेच जनतेला उपद्रव करणे या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.’ याप्रकारे कोठेही वाढदिवस साजरा केला जात असेल, तर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


असाच एक प्रकार येरवड्यात घडला. रस्त्यावर बुलेट लावून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या चार तरुणांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अतिउत्साही पोरांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी तेजस पवार यांनी यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही निष्कारण घराबाहेर पडून संचारबंदीचा भंग न करणे अपेक्षित आहे. असे असतानाही ज्याचा वाढदिवस होता त्याने मित्रांसोबत वाढदिवस करण्याचे नियोजन केले. शनिवारी सायंकाळी जयप्रकाशनगरमध्ये आरोपींनी रस्त्याच्या कडेला बुलेट आणि मोपेड दुचाकी लावून त्यावर केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणाची माहिती येरवडा पोलिसांना समजल्यावर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी तरुण सामाजिक अंतरचे नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
औरंगाबाद शहरातील सिडको एन ३ भागात रस्त्यावर दोन कुटुंबियांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण चांगलच महागात पडलंय. शहरावर कोरोनाचं संकट असतांना १५ ते २० नागरिकांनी रस्त्यावर एकत्र येऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं शहरात मोठी संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी पोलिसांनी सर्वच उपस्थितांवर गुन्हा दाखल करण्यात केला. 

सांगलीतही भरचौकात रस्त्यावरच मित्राचा वाढदिवस साजरा करुन हुल्लडबाजी व आरडाओरड करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  रात्रीच अटक केली. अनपेक्षितपणे झालेल्या या कारवाईमुळे या चारही तरुणांच्या जल्लोषावर पाणी फिरले. त्यांना संपूर्ण रात्र पोलीस कोठडीची हवा खावी लागली. दुसऱ्या दिवशी या चौघांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीच्यावेळी रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेले होते. रात्रीच्या वेळी हे पथक वाढदिवसाच्या रात्री शहरात गस्त घालत होते. हरभट रस्त्यावरुन हे पथक टिळक चौकात आले असता, हे चारही संशयित जोरजोराने आरडाओरड करुन हुल्लडबाजी करीत होते. त्यांचे नृत्यही सुरु होते. यापैकी एकाचा चेहरा केकने माखलेला होता. त्यांच्या या वर्तनामुळे सार्वजनिक ठिकाणच्या शांततेचा भंग झाला होता. त्यामुळे पथकाने चौघांना ताब्यात घेतले. शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, हा वाढदिवस असल्याचे निष्पन्न झाले. पण हा वाढदिवस घरी साजरा न करता ते टिळक चौकात रस्त्यावरच करीत होते. वाढदिवसाच्या नावाखाली त्यांनी हुल्लडबाजी केली. केक कापून तो एकमेकांच्या चेहऱ्याला लावताना त्यांची जोरजोरात आरडाओरड सुरु होती. त्यांच्या या वर्तनामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास झाला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली.
दोन महिन्यांपूवी टिळक चौकालगत असणाऱ्या गणपती मंदिराजवळ रस्त्यावरच वाढदिवस साजरा करणाऱ्या पाचजणांना अटक केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेच ही कारवाई केली होती.  टिळक चौकात अशाचप्रकारची कारवाई केली. येथून पुढे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.शहरात रात्रीनंतर अकरानंतर खुलेआम खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे, पान दुकाने तसेच हॉटेल सुरू असतात. यातून गर्दी निर्माण होऊन वादावादीचे आणि मारामारीचे प्रकार घडत आहेत. पण शहर पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाºया मित्रांच्या टोळक्याला दोनवेळा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू असताना शहर पोलिसांना याची काहीच खबर नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


करमाळ्यात अशीच एक घटना घडली. जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असून संचारबंदी लागू असताना सार्वजनिकरित्या तलवारीने केक कापून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या २३ जणांसह बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  करमाळा तालुक्यातील हिसरे गावाच्या शिवारात २४ एप्रिलला रात्री ९ ते १० च्या सुमारास संचार बंदी असूनही सार्वजनिकरित्या तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.  यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस शिपाई देखील यामध्ये सहभागी होता.
याच काळात मुंबईत निगरगट्टपणाची हद्द झाली. मुंबईतील नागपडा परिसरात एका तरुणाने रस्त्यावर फटाके वाजवून वाढदिवस साजरा केला. या घटनेने लॉकडाऊनच्या नियमांचे तीन तेरा वाजविले होते.   एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. वाढदिवसाच्या रात्री त्याच्या मित्रांनी रस्त्यावर केक कापला आणि रस्त्यावर मोठं मोठ्याने फटाके वाजवले. हे प्रकरण पोलिसांना कळताच त्यांनी त्या तरुणाला लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यावर त्याच म्हणणं आहे की तो सामाजिक कार्यकर्ता आहे!
सोशल मीडियावर विडिओ करताना त्याने कॅपशन दिलं होत की, लॉकडाऊन असताना वाढदिवस साजरा करतोय. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग चे नियम न पाळल्याने त्याला अटक केली. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले आणि सोशल मीडियाची व्हिडिओ सुद्धा डिलीट करायला लावली.
 वाढदिवस साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात.  काही जण मित्रमैत्रिणींसमवेत वाढदिवस साजरा करण्याला प्राधान्य देतात. तर काहींना भररस्त्यात केक कापून बर्थ डे साजरा करण्यास आवडते. अशाच प्रकारचा रस्त्यावर वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये वाढदिवस साजरा करणारी व्यक्तीनं सुरीनं नव्हे, तर बंदुकीच्या गोळीनं केक कापल्याचं पाहायला मिळाला.

 या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली आहे. त्या मुलानं जन्मदिवसाचा केक सुरीनं नव्हे, तर बंदुकीची गोळी चालवून कापला आहे. केकवर मेणबत्तीही लावली होती. जिला बंदुकीच्या गोळीनं विझवण्यात आलं. सोशल मीडियावरून या व्हिडीओवर खूप टीका झाली आहे. रस्त्यावर खुलेआम अशा पद्धतीनं बंदुकीच्या गोळीनं केक कापल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  पोलीसही त्या बंदुकधाऱ्याचा आता शोध घेत आहेत. ट्विटरवर एका व्यक्तीनं हा व्हिडीओ शेअर केला असून, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचत्या मेरठमधला असल्याचं सांगितलं गेलं. हा व्हिडीओ टिकटॉकचा होता. टिक-टॉकवर ज्या युजर्सनं हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर मेरठचा पत्ता दाखवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली व्यक्ती भर रस्त्यावर हातात बंदूक घेऊन  आणि केकला दूर ठेवून त्यानंतर एका व्यक्तीनं त्या केकवर बंदुकीतून गोळी झाडली आहे. इतर लोक त्याला प्रोत्साहन देत होते. 

२० मिनिटांचा हा व्हिडीओ पाहून उत्तर प्रदेशचे पोलीसही अचंबित झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी मेरठ पोलिसांना याची सूचना दिली. परंतु मेरठ पोलिसांनी हा आमच्या भागातील व्हिडीओ नसल्याचं सांगितलं. त्यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस आता त्या व्हिडीओतील मुलांचा शोध घेत होते. 


दस्तुरखुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रस्त्यावरच वाढदिवस साजरा केला होता. हो, पण तो दिवसा. महाराष्ट्रराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईला जात असताना पुणे- मुंबई महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा वाढदिवस असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर खुद्द देशमुख काही क्षण रस्त्यावर थांबले, उपनिरीक्षकाला शुभेच्छा दिल्या, त्याहीपुढे जाऊन त्यास आपल्या हाताने केक भरविला. थेट गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीतच वाढदिवस करण्याचे “गिफ्ट” मिळाल्याने पोलिस अधिकारी देखील भारावला ! 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सर्वसामान्य नागरीकांत, पोलिसात मिसळणारे मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. राज्यात लॉकडाऊन असतानाही देशमुख यांनी तब्बल 24 जिल्ह्याचा दौरा केला. हे दौरे सुरु असतानाच बंदोबस्तवर असणाऱ्या व वाटेत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याना भेटुन, त्यांच्याशी संवाद साधण्याचा देशमुख यांचा नियमितचाच नित्यक्रम. ते पुणे दौऱ्यावर होते. रात्री मुक्काम केल्यानंतर ते सोमवारी सकाळी मुंबईला निघाले.
नेहमीप्रमाणे त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचेशी संवाद साधला.त्यावेळी त्यांना पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी केक मागविला. देशमुख यांच्या उपस्थितीतीच रस्तयाच्याकडेला उभे राहून जाधव यांनी पोलिसांच्या गाडीवर ठेवलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. देशमुख यांनी स्वत: जाधव यांना आपल्या हाताने केक भरवुन त्यांना शुभेच्या दिल्या. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.
विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात काही व्यापारी, व्यावसायिक तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींही साजरा करण्यात पुढाकार घेतात. यातून लोकांचे एकत्र येणे होते. त्यांचे काही मनोरथही साध्य होतात. वाढदिवसामागे काही हेतुही असतात. पण काही लोक विशिष्ट संदेश देण्यासाठी किंवा सद्भावनेने साजरा करतात. लाॅकडाऊनमध्ये अनेक मोठ्या धुरंधर लोकांना आपले वाढदिवस साजरे करणे टाळले.‌ तरीही कोरोनासोबत जगणे आहे म्हणून साजरे झालेच. 
सिरोंचा जि. गडचिरोली येथे एक आदर्शवत वाढदिवस रस्त्यावरच साजरा झाला. अनेकजण आपला वाढदिवस धूमधडाक्‍यात साजरा करतात. मोठा केक, डिजे, मेजवान्यावरच बहुतांश लोकांचा भर असतो. पण, येथील उपेंद्र मुलकला नामक समाजसेवी युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त असा कोणताही वायफळ खर्च न करता रस्त्यावरील धोकादायक खड्डा स्वत: बुजवून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. येथील उम्मीद (द होप) फाउंडेशनच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

सिरोंचा येथील मुख्य मार्गावर गणेश मंदिरासमोर मागील तीन ते चार महिन्यांपासून रस्त्यात मोठा खड्डा पडला होता. पण, या खड्ड्याबद्दल नागरिकांनी अनेकदा माहिती देऊनही संबंधित विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, या विभागाचे कर्मचारी रोज या मार्गाने ये-जा करत असतात. तरीही या खड्ड्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती.
त्यामुळे उम्मीद फाउंडेशनचे सदस्य उपेंद्र मुलकला यांच्या वाढदिवसानिमित्त हा खड्डा बुजविण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला. या उपक्रमात संघटनेचे अध्यक्ष अमितकुमार तिपट्टी यांच्यासह सदस्य अतुल सोनेकर, रोहित गंटे व इतर सदस्यांनी सहभाग घेतला.
आता पावसाचे दिवस असल्याने अनेकदा या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचत होते. त्यामुळे वाहनचालकांना खड्डा दिसत नव्हता. त्यातून अनेकदा अपघात घडत होते. कित्येक नागरिकांना जखमी व्हावे लागायचे. याबद्दल नागरिकांनी ओरड करूनही त्यांच्या मागणीची संबंधित विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. अखेर वाढदिवसाच्या निमित्ताने उम्मीद फाउंडेशनने नागरिकांची ही समस्या दूर करत इतरांसाठी एक प्रेरक उदाहरण निर्माण केले आहे.
खरे तर वाढदिवसानिमित्त अशा उपक्रमाची गरज आहे. वाढदिवस, लग्न, बारसे किंवा असे अनेक कार्यक्रम नागरिक साजरे करतात. पण, या सोहळ्यांना सामाजिक उपक्रमाचीही जोड देता येऊ शकते. उम्मीद फाउंडेशनने या उपक्रमाच्या माध्यमातून हाच संदेश दिला आहे. तसेच अशा उपक्रमांची नितांत आवश्‍यकता असल्याचेही संघटनेने सांगितले.


वाढदिवसाचे हे फॅड अलिकडच्या वीसतीस वर्षांचेच. पुर्वी फारशा हौसेने वाढदिवस वगैरे साजरे होत नसत. शासकीय कार्यक्रम वगळता जयंत्या मयंत्याही होत नसत.   पाश्चिमात्यांकडून सर्व सामान्य माणसांनी आपल्या आणि आपल्या नातेवाईकांचा हॅप्पीवाला बर्थ डे साजरा करण्याची शिकवण घेतली. आपल्याकडे तर  जन्मतारखांचीच नोंद कुठे नव्हती. बहुतांश जन्मतारखा तर शाळेतल्या गुरुजींनीच सोयीप्रमाणे नोंदविल्या आहेत. गरीबांना भाकरीचाच प्रश्न मोठा होता. फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना वाढदिवसाचे कुठले वेड असणार? 
दिल्लीत राहणारे अविजीत बाजपेयी आणि त्यांचे मित्र यांनी गेल्या वर्षापासून ‘ हैप्पी बर्थडे भारत’ नावाचा एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत ते रस्त्यांवर राहणाऱ्या गरीब मुलांचा वाढदिवस एक साधीच पण झकास खाऊ पार्टी देऊन साजरा करतात. आज या उपक्रमात २२०० पेक्षा जास्त लोकं सहभागी झाली आहेत आणि १० वेगवेगळ्या शहरांमध्ये आजपर्यंत २०० पेक्षा अधिक मुलांचे वाढदिवस मोठया झोकात साजरे झाले आहेत. ज्यांना आपली जन्मतारीख सुद्धा नीट माहित नाहीये अशा मुलांना आनंद देणाऱ्या या आगळ्या उपक्रमाला आमचा सलाम आणि शुभेच्छा !


गंगाधर ढवळे,नांदेड

 संपादकीय/०६.०७.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *