महिलांविषयक वादग्रस्त विधानांचा देश

       या देशात स्रीरुप म्हणजे देवीचे रुप म्हणून पुजले जाते, भजले जाते. देवी देवतांची कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील. परंतु त्याच स्रीला अबला समजून छळतात, लुटतात. ती एक केवळ उपभोग्य वस्तू आहे असे समजले जाते. तिला कोणते स्वातंत्र्य नाही अशी पुरुषी मानसिकता असलेला समाज  तिच्या गुलामीचा पुरेपूर फायदा घेतो. ती नवऱ्याला मालक समजते. तिची गुलाम मानसिकता तिच्या आई पासून, आईच्या आईपासून परंपरागत पद्धतीने आलेली असते. आपण पुरुषाची मालमत्ता आहोत अशी तिची धारणा झालेली असते. त्यामुळे पुरुषी समाजाने स्रीचा यथेच्छ उपभोग घेतला. तिला कधी बळजबरीने लुटले. तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी संपविले. जाळून मारले. नुकतीच घडलेली हाथरसची घटना म्हणजे कहरच होता. बलात्कार करुन पीडितीची जीभच कापली. परंतु स्रीला तुच्छ समजून या संदर्भात अनेकांची जीभ घसरली आहे. 

              हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. लोक न्यायाची मागणी करत असताना भाजपा नेत्यानं मुलीचीच चुक असल्याचं सांगत मुक्ताफळे उधळली आहेत. हाथरस प्रकरणातील आरोपी निष्पाप असून पीडित मुलगीच आवारा असल्याचं विधान भाजपा नेत्यानं केलं. त्याचबरोबर अशा मुली नेहमी मृतावस्थेतच सापडतात, असं धक्कादायक विधानही या नेत्यानं केलं आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील भाजपाचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी हाथरस प्रकरणावर बोलताना मुक्ताफळं उधळली आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात श्रीवास्तव यांनी मुलीचे आरोपीशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीवास्तव यांनी हाथरस पीडितेबरोबरच बलात्कारांच्या घटनांमध्ये मरण पावलेल्या पीडितांविषयीही संतापजनक व्यक्तव्य केलं आहे. त्यावरून आता श्रीवास्तव यांच्यावर टीका केली जात आहे.
“मुलीनं मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल, कारण प्रेमप्रसंग होता. ही गोष्ट सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरही आली आहे. मुलीला पकडलं गेलं असेल. शेतामध्ये असंच होतं. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदुळाच्या शेतात का सापडत नाहीत? या गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? यांची मरण्याची जागा तीच आहे. कुठेही ओढून नेल्या जात नाहीत. यांना ओढून नेताना कुणी पाहत नाही. मग या घटना यांच्या सोबत का घडतात? हे देशपातळीवर माहिती आहे, मी काहीही चुकीचं बोललो नाही. पण मुलगी दोषी नाही, मुलं दोषी आहेत,” असं वादग्रस्त भाष्य श्रीवास्तव यांनी केलं आहे.

           ही मुलं निदोर्ष असून, त्यांना वेळेत सोडलं गेलं नाही, तर मानसिक त्रासाला सामोर जावं लागेल. त्याचं गेलेलं वय कोण परत करणार आहे? सरकार त्यांना नुकसानभरपाई देणार आहे का? सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावं,” अशी मागणीही श्रीवास्तव यांनी केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा श्रीवास्तव यांच्या विधानांवर बोलताना म्हणाल्या,”त्यांना कोणत्याही पक्षाचा नेता संबोधन योग्य नाही. ते स्वतःची आदिम आणि आजारी मानसिकता दाखवत आहेत. या प्रकरणी त्यांना नोटीस पाठवणार आहे,” असं शर्मा यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून भाजपच्या आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

हाथरस येथील घटनेनंतर देशभरात टीका केली जात आहे. त्यानंतर आता बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामध्ये ते म्हणाले, ‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यामुळेच बलात्कार होतात’. सुरेंद्रसिंह यांना पत्रकारांनी रामराज्य उत्तर प्रदेशात असल्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचे कारण काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणे हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात.’

हाथरस येथे घडलेले सामुहिक बलात्काराचे प्रकरण देशभर संतापाची लाट उसळण्यास कारणीभूत ठरले. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून देशभरात लोक रस्त्यावर आले. या प्रकारच्या घटना देशात घडणे ही लाजिरवाणी बाब असल्याची भावना सार्वत्रिक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार आणि खासदार याबाबत आक्षेपार्ह विधाने करत असल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एका भाजपा नेत्याने या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बलात्काराबाबत मुक्ताफळे उधळली आहेत. मुलीनेच मुलाला शेतामध्ये बोलावलं असेल. बहुतांश वेळेला असंच होतं. त्यातही पकडली गेली असेल. मात्र, नेहमी मुलेच दोषी, मुली नाही. असं कसं? असं धक्कादायक विधान या नेत्यानं केलं आहे. 

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील भाजप पक्षाचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य एका व्हीडिओच्या माध्यमातून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या हाथरस प्रकरणात मुलीचेच मुलाशी प्रेमप्रकरण असेल आणि तिनेच त्याला शेतात बोलावलं असेल, असा धक्कादायक दावा या नेत्याने केला आहे. बलात्काराच्या घटनेत बहुतांश वेळेला असंच होतं, मी काही चुकीचं बोलत नाहीये, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठत आहे.

मुलीनंच मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल, कारण त्यांच्यात प्रेमप्रकरण असेल. ही गोष्ट सोशल मीडिया, चॅनेलवरही आली आहे. बहुतेकदा शेतामध्ये हेच होतं. ज्या मुली याप्रकारे मरतात, त्या अशाच काही ठिकाणी सापडतात. उसाच्या शेतात, तुरीच्या शेतात, बाजरीच्या शेतात, नाल्यामध्ये, जंगलामध्ये सापडतात. तांदळाच्या शेतात का नाहीत सापडत? गव्हाच्या शेतात मेलेल्या का आढळत नाहीत? यांच्या मरणाची जागा हीच आहे. त्या कुठेही ओढून नेल्या जात नसतात. ओढून नेलं जात असताना त्यांना कुणी पाहतही नाही मग यांच्यासोबतच असं का घडतं? हे देशपातळीवर सगळ्यांना माहितीय. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. पण असं असताना मुलगी दोषी नाही, आणि मुले मात्र दोषी! असं एकूण वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

या प्रकरणातील मुले निर्दोष आहेत, त्यांना वेळेत सोडलं गेलं नाही तर मानसिक त्रासाल सामोरे जावे लागेल. त्यांचं वय गेलं तर परत कोण करणर ते? सरकार नुकसानभरपाई देणार आहे का? सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना या वक्तव्याबाबत नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यांना कोणत्याही पक्षाचा नेता संबोधने योग्य नाही, ते त्यांची आजारी आणि जूनाट मानसिकता दाखवत आहेत, असंही त्या म्हणाल्या. या  प्रकराच्या वक्तव्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.

               उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. एकीकडे संताप व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमधील शाब्दिक वादही शिगेला पोहोचला आहे. विरोधकांकडून उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रश्न विचारले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीका होत असतानाच भाजपाच्या माजी आमदारानं या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची तिच्या आई व भावानं हत्या केल्याचा दावा भाजपा माजी आमदारानं केला आहे.

एका  वृत्तवाहिनीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.  माजी आमदार राजवीर सिंह पहेलवान यांनी असा आरोप केला की, पीडित मुलीची हत्या तिच्या आई व भावानेच केली आहे. “मुलीची तिच्या आईने व भावानेच हत्या केली आहे. या प्रकरणात जातीवादावरून राजकारण केलं जात आहे. चारही युवक निर्दोष आहे. त्यांना फसवण्यात आलं आहे,” असा दावा ठाकूर यांनी केला आहे.
“हे प्रकरण मारहाणीचं आहे. जर चार मुलांवर गुन्हा दाखल झाला असता, तर त्यांची कोणतीही तक्रार नव्हती. पण, या सामूहिक बलात्काराच्या आरोपांबरोबरच युवकांना अटक केल्यानं लोकांमध्ये रागाची भावना आहे. या मतदारसंघातील लोकांशी चर्चा झाली आहे. ज्यांना जनाधार नाही, तेच लोक आंदोलन करत आहेत. सरकारला विनाकारण बदनाम केलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला असं वळणं दिलं गेलं की, हाथरस देशभरात बदनाम व्हावं. आम्हाला एसआयटीच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. सत्य समोर येईलच,” असा विश्वास माजी आमदार पहेलवान यांनी व्यक्त केला आहे.

यापुर्वीही अनेकवेळा महिलांबाबत अनेक वादग्रस्त विधाने जबाबदार लोकांनी केले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या एका ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असताना त्यांनी सरकारने केलेली नोटाबंदी, जीएसटी सारख्या मुद्द्यांना मुलींची उपमा देत मुलाच्या इच्छेने मुली जन्माला येण्याशी जोडले होते. मुलाची आशा लावून बसलेलो असताना ५ मुली जन्माला आल्या. नोटांबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी, मंदी या पाच मुली जन्माला आल्या, मात्र, अजूनी ‘विकास’ जन्माला आलेला नाही, असे ट्विट पटवारी यांनी केले होते.

पटवारी यांच्या या ट्विटनंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना चांगलेच धारेवर धरले. या बाबत स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पटवारी यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या एका घाणेरड्या नेत्याने काँग्रेसच्या विकृत मानसिकतेला आपल्या ट्विटद्वारे प्रदर्शित केले होते.  संपूर्ण देश वीरांगणा राणी दुर्गावतींच्या बलिदानाचा दिवस साजरा करत असताना दुसरीकडे काँग्रेस मुलींचा अपमान करण्याचे काम करत आहे, असे म्हणत काँग्रेसच्या याच विकृत मानसिकतेच्या नैना सहानी, सरला मिश्रास प्रीति मिश्रा सारख्या अनेक मुली बळी ठरल्या आहेत का?, असा सवालही मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला.
मात्र, या ट्विटनंतर रात्री जीतू पटवारी यांनी आपल्या या वादग्रस्त ट्विटबाबत खेद व्यक्त केला. मोदी यांनी नोटाबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी आणि मंदी आणत देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडून टाकली आहे. जनता हे सर्व केवळ विकास होईल या आशेने सहन करत आली आहे. हे माझे विचार व्यक्त व्हावेत म्हणून मी केलेल्या ट्विटमुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो, असे पटवारी यांनी आपल्या नंतरच्या ट्विटमध्ये म्हटले. 
       भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा यांच्या ट्विटची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे विचार असणारे लोक स्वत:ला नेता समजतात ही दु:खाची गोष्ट आहे, असे शर्मा म्हणाल्या. ते आपल्या समर्थकांना काय शिकवतात याचे मला आश्चर्य वाटते. या प्रकरणात जीतू पटवारी यांच्याकडून स्पष्टीकरण घेतले जावे, असे शर्मा म्हणाल्या.

‘मासिक पाळी सुरू असताना पतीसाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात कुत्र्यांचा जन्म घेतील आणि त्यांच्या हातचे खाणारे पती पुढच्या जन्मी बैलाचा जन्म घेतील,’असे वादग्रस्त विधान स्वामी कृष्णस्वरूप दासजी यांनी केले होते.
दासजी हे स्वामीनारायण मंदिराशी संबंधित आहेत. या मंदिराकडूनच भूज येथे एक कॉलेज चालविले जाते. या कॉलेजमध्ये दोनच दिवसांपूर्वी मासिक पाळी सुरू आहे का हे तपासण्यासाठी ६० मुलींना अंतर्वस्त्रे काढण्याचा प्रकार घडला होता. पाळी सुरू असताना मुलींना इतरांसाठी जेवण बनवायचे नाही असा या कॉलेजच्या वसतिगृहाचा नियम आहे. तो मोडला जात नाही ना हे तपासण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. त्यावर दासजी यांनी हे विधान केले.  ‘जर पाळी सुरू असताना महिलांनी बनविलेले अन्न खाणारे पुरूष पुढच्या जन्मी नक्की बैलाचा होणार. माझे विचार आवडले नाहीत तरी मला काही फरक पडत नाही. हे सर्व शास्त्रात लिहिले आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. पण तुम्हाला इशारा देतोय. मासिक पाळीचा काळ ही एक प्रकारची तपस्याच आहे हे महिलांना समजत नाही. पुरुषांनी स्वयंपाक करणे शिकले पाहिजे. त्याची तुम्हाला मदत होईल,’ असे विधान दासजी यांनी केले. दासजी यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

 हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद देशभर उमटले. बलात्कारावर एका दाक्षिणात्य निर्मात्याने असंवेदनशील वक्तव्य केलेले असताना राजस्थानमधील एका मंत्र्याने संतापजनक विधान केले.  महिलांवरील बलात्काराला टीव्ही आणि मोबाइल जबाबदार असल्याचा दावा या मंत्र्यांने केला आहे. टीव्ही व मोबाइल येण्याआधी महिलांवर बलात्कार होत नव्हता, असेही या मंत्र्यांने म्हटले.

भंवर लाल मेघवाल असं या मंत्र्याचं नाव. त्यांच्याकडे राजस्थान सरकारमध्ये समाज कल्याण मंत्रालयाची जबाबदारी आहे. टीव्ही आणि मोबाइल येण्याआधी बलात्काराच्या घटना फारशा घडत नव्हत्या. परंतु, तरुण मुलांच्या हातात मोबाइल व घरात टीव्ही आल्याने ते या गुन्हेगारीकडे वळली आहेत. ते टीव्ही आणि मोबाइलमध्ये अश्लिल दृश्य पाहून बलात्कार करीत असल्याचे भंवर लाल म्हणाले. जयपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. कोर्टाने बलात्काराच्या प्रकरणावर तीन महिन्यात निकाल द्यायला हवा. तसेच बलात्कारातील आरोपींना फाशी द्यायला हवी, असे ते म्हणाले. हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळले. या धक्कादायक व संतापजनक घटनेनंतर भंवर लाल यांनी हे विधान केले होते. 

  बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी वादग्रस्त विधान करणे आता नवीन राहिले नाही. २०१२ मध्ये दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर हरियाणामधील एका खाप पंचायतीच्या नेत्याने असेच वादग्रस्त विधान केले होते. चायनीज फास्ट फूड चाऊमिन या बलात्काराला कारणीभूत असल्याचा दावा या नेत्याने केला होता. २०१५ साली बिहारच्या एका मंत्र्याने बलात्काराला मोबाइल फोन आणि मासांहार जबाबदार असल्याचे म्हटले होते. तर २०१४ साली मध्य प्रदेशातील भाजपचे नेते बाबुलाल गौर यांनी बलात्काराला बॉलिवूडचे चित्रपट जबाबदार असल्याचे म्हटले होते.
महिला जिन्स घालत असल्याने बलात्काराच्या घटना घडत असल्याचेही बाबुलाल गौर यांनी म्हटले होते. मुलींनी मोबाइल फोनचा वापर करू नये. तसेच मुलांसोबत डान्स करू नये, असे अंजुमन मुस्लिम पंचायतीने म्हटले होते.
बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानांमुळेच जास्त चर्चेत असते. पुन्हा एकदा पायलने हैदराबाद येथील महिला पशुचिकित्सकाची हत्या आणि बलात्कारावर वादग्रस्त विधान केलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

सामुहिक बलात्काराप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली.  यात दोन वाहनचालक आणि एक क्लीनर होता. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावं होती. पायलने ट्वीट करत म्हटलं की, ‘राम राम जी, मुस्लिम परिसात एका हिंदू मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली.’ तिच्या याच ट्वीटमुळे लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
एका युझरने लिहिले की, ‘रिकाम्या डोक्यात असे विचार येतात. हिला बोलायला कोणी सांगितलं.’ तर अजून एका युझरने लिहिलं की, ‘थोडी तरी लाज बाळग. यातही तू हिंदू- मुस्लिम आणतेस?’
एका गुरुवारी रात्री हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. लवकरच आरोपींना प्रसारमाध्यमांसमोर उभं करण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

 केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अॅन्ना इडननं फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यानं खळबळ उडाली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘नशीब बलात्कारासारखे आहेत, जर ते रोखणे शक्य नसेल तर त्याचा आनंद घ्या,’ असं पोस्टमध्ये म्हटलं होतं. या पोस्टमुळं मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अॅन्ना यांनी माफी मागितली.

अॅन्ना इडननं फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली.  या पोस्टमध्ये तिचे पती आणि काँग्रेस खासदार हिबी इडन यांचा फोटोही शेअर केला आहे. नशीब बलात्कारासारखे आहेत, जर ते थांबवता आले नाही तर त्याचा आनंद घ्या,’ असं त्यात नमूद केलं.  या पोस्टवरून खळबळ माजली. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि अॅन्नासह खासदार हिबी यांच्यावरही टीकेची झोड उठली. या वादानंतर अॅन्ना यांनी माफी मागितली आहे.
कोच्चीमध्ये  पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचलं होतं.  लोकांनी अॅन्नाच्या पोस्टचा संबंध या परिस्थितीशी जोडला.  कोच्चीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची त्यांनी या पोस्टमधून खिल्ली उडवली आहे, असा आरोप केला जात होता. या पोस्टवरून मोठा वादंग झाला. सोशल मीडियावर लोकांनी खासदार हिबी यांच्यासह पत्नीवर टीकेची झोड उठवली. वाद निर्माण झाल्यानंतर अॅन्नानं ही पोस्ट फेसबुकवरून हटवली आणि माफीही मागितली.

हिबी इडन हे केरळमधील एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत. ते पहिल्यांदाच निवडून आले आहेत. याआधी ते काँग्रेसचे आमदारही होते. २०१९मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. यापूर्वी २०१३मध्ये सीबीआयचे तत्कालीन संचालक रंजित सिन्हा यांनीही अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केलं होतं. बलात्कार रोखू शकत नसाल तर, त्याचा आंनद घेता का? असं विधान त्यांनी केलं होतं. सट्टेबाजीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांची जीभ घसरली होती. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये एका चिकित्सक तरुणीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. ट्विटरवरदेखील #RIPPriyankaReddy हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी ही मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. या प्रकरणात आता राज्य सरकारच्या एका मंत्र्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
तेलंगनातील गृहमंत्री महमूद यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त विधान करत म्हणाले की, ‘मृत तरुणी एक डॉक्टर होत्या. त्या शिक्षित होत्या. मग त्यांनी आधी बहिणीला फोन का केला? त्यांनी आधी १०० नंबरवर फोन करायला हवा होता ना’ महमूद यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी हैदराबादच्या सायबराबादा पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. यातील दोघे गाडीचे ड्रायवर आणि क्लीनर होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पण याबद्दल कोणाला काही कळू नये म्हणून तिची हत्या केली. दरम्यान, लवकरच आरोपींना माध्यमांसमोर आणू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबाबत अनेक अभिनेत्री पुढे येऊन बोलत आहेत. त्यानंतर नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी याबाबत वादग्रस्त विधान केले. त्या म्हणाल्या, ”कास्टिंग काऊच होणे ही नवीन बाब नाही. हे बाबा आदम यांच्या पिढीपासून सुरु आहे. बॉलिवूड बलात्कार करून सोडून देत नाही तर त्या बदल्यात बॉलिवूड खायला देते”.

कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. यावर सरोज खान म्हणाल्या, प्रत्येक मुलीवर कास्टिंग काऊचसारखा प्रकार करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतो. कास्टिंग काऊच होणे ही नवीन बाब नाही. हे बाबा आदम यांच्या पिढीपासून सुरु आहे. सरकारमधील लोक असा प्रकार करतात तर इतर सर्व फिल्म इंडस्ट्रीतील लोकांच्या मागे का लागला आहात. बलात्कार करून फिल्म इंडस्ट्री सोडून देत नाही. तर निदान त्या बदल्यात खायला तरी देते. मात्र, असे करताना हे संपूर्ण त्या मुलीवर आधारित आहे, की काय करायचे अशी तिची इच्छा आहे. कोणासोबत जावे किंवा नाही हे त्यांनी ठरवायला हवे. 
”जर तुमच्याकडे कला असेल, तर तुम्ही स्वत:ला विकणार का, असा सवाल करत त्या पुढे म्हणाल्या, फिल्म इंडस्ट्रीबाबत काहीही सांगू नका. बॉलिवूड इंडस्ट्री आमचे माय-बाप आहेत”.
सरोज खान यांच्या या वादग्रस्त विधानावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

संसदेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना सरकारने तिसऱ्यांदा हे विधेयक संसदेत मांडले. या विधेयकाला अनेकांकडून विरोध होत झाला. यावर अनेकांकडून प्रतिक्रियाही आल्या. कोणत्याही धर्माच्या खासगी बाबींमध्ये सरकारने हस्तक्षेप करणे योग्य नाही. पत्नीला गोळी घालण्यापेक्षा तिला तलाक दिलेला केव्हाही बरा, असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे खासदार एस.टी.हसन यांनी केले. 

कधी कधी पती पत्नीमध्ये केवळ विभक्त होण्याचाच पर्याय शिल्लक असतो. अशावेळी पत्नीला गोळी घालण्यापेक्षा तिला तिहेरी तलाक देऊन वेगळे झालेले चांगले, असे हसन म्हणाले. इस्लामने महिलांना कायन न्यायच दिला आहे. पत्नी जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या पतीपासून वेगळी होऊ शकते. शरीयत आणि मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणे गैर आहे. जर तुम्ही एखाद्या पुरूषाला तिहेरी तलाकनंतर तीन वर्षांची शिक्षा दिली तर तो कुटुंबाला भत्ता कसा देऊ शकेल, असा सवाल त्यांनी यावेळी केला. हिंदू आणि ख्रिस्ती धर्मातील पुरूषांना एका वर्षांची शिक्षा होते, तर मुस्लिम धर्मातील तरूणांना तीन वर्षांची शिक्षा का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात. अशी ८० ते ९० टक्के प्रकरणे ओळखीच्या लोकांमधील विसंवादातूनच घडतात, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले होते. त्याचा व्हिडिओ झळकल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर  खट्टर यांनी आपल्या विधानांचे समर्थनच केले. त्यावेळी खट्टर म्हणाले होते की,  प्रियकर व प्रेयसी बराच काळ एकत्र फिरतात. मात्र, जेव्हा खटके उडू लागतात, एकमेकांशी पटेनासे होते त्यावेळी चित्र वेगळे असते. प्रियकराने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार प्रेयसी पोलिसांकडे दाखल करते. सहमतीतून बलात्काराची प्रकरणे असे मी कुठेही म्हटलेले नाही. बलात्काराच्या सर्वाधिक तक्रारी ओळखीच्या लोकांकडूनच केल्या जातात. हे माझे मत नाही, तर पोलिसांनीच तसा अहवाल दिला आहे. या समस्येकडे सामाजिक अंगाने पाहावयास हवे. हरियाणातील गुरगाव, फरिदाबाद येथे २०१६ मध्ये बलात्काराच्या १,१८७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत म्हटले आहे. त्यात बलात्काराची ९९६ व सामूहिक बलात्काराची १९१ प्रकरणे आहेत. २०१४ मध्ये महिला अत्याचाराची ९,०१०, २०१५ मध्ये ९,५११, २०१६ मध्ये ९,८३९ प्रकरणे नोंदविण्यात आली.
काँग्रेस व केजरीवाल यांनी केला तीव्र निषेधखट्टर यांनी केलेले वक्तव्य महिलांविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. ट्वीटवर त्यांनी म्हटले की, खट्टर यांनी केलेला दावा निंदनीय आहे. या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. खट्टर हे बलात्कार प्रकरणांचे समर्थन करीत असल्याचा प्रहार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले, एखाद्या मुख्यमंत्र्याचीच अशी मानसिकता असेल, तर तेथील महिला सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा करता येईल का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. 

शिवरायांच्या आणि मोठ्या अभिमानाने फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही असे म्हणत छाती फुगवून महाराष्ट्राची महानता दर्शविल्या जाणाऱ्या राज्यात काय चालते? हे सगळ्या देशाला माहिती आहे.  राज्याचे माजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. व्यासपीठावर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात असे वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केले होते. परतूर तालुक्यातीला एका गावातील वीज केंद्राचे उद्धाटन करण्यासाठी आलेल्या बबनराव लोणीकर यांचा तोल सुटला. त्यांच्या या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच राज्यातील सरकार त्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देईल. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, असे लज्जास्पद विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे. स्टेजवर त्यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, तहसिलदार मॅडम, सरपंच बसलेले होते. लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर तहसिलदार मॅडम स्टेजवरून उठून गेल्या. परंतु, लोणीकर यांना याविषयी काहीच वादग्रस्त वाटले नाही. मी जे काही बोललो त्यात काहीच वावगं नाही, असे लोणीकर म्हणालेत. 
परतूर तालुक्यातील एका गावात वीज उपकेंद्राचे उद्धाटन बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. स्टेजवर त्यांचा मुलगा बसला होता. जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि तहसिलदार मॅडम बसलेल्या असताना लोणीकर यांनी हे विधान केल्याने याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला.  लोणीकर यांच्या विधानाचा तहसिलदार संघटनेने याचा निषेध केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला.  गर्दी जमवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणाऱ्या लोणीकर यांनी जाहीर माफी मागावी तसेच तहसिलदार असलेल्या महिलेने पुढे येऊन लोणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे विद्या चव्हाण एका टीव्ही माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या. 

 संतती जन्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसानंतर माफी मागितली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत इंदुरीकर महाराज यांनी माफी मागितली होती. 

इंदुरीकर महाराज यांनी माफीनामा जारी करत ही माफी मागितली. माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य केलं होतं. त्याचा गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून विपर्यास केला गेला. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले होते. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, असं इंदुरीकर महाराज यांनी या माफीनाम्यात म्हटलं. इंदुरीकर यांनी राज्यातील सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला. 

 ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. अंनिससह विविध सामाजिक आणि महिला संघटनांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही या वादात उडी घेत इंदुरीकरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुरुवातीला या वादावरून अंग काढून घेणारे इंदुरीकर महाराज यांनी प्रकरण अंगाशी येताच माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

सम विषम तारखेच्या वादग्रस्त विधानावरुन सुरु झालेलं इंदुरीकर महाराजांचं प्रकरण अधिकच तापत राहिलं. आपल्या विनोदी किर्तनशैलीमुळे प्रसिद्ध इंदुरीकरांचं वक्तव्य त्यांच्या अंगलटी आलं. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते.   त्यांच्यावर राजकीय वर्तुळातूनही टीकाही करण्यात आली. मात्र, या वादाला खतपाणी मिळालं ते भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विराधामुळे आणि इंदुरीकरांच्या समर्थकांकडून त्यांना केलेल्या ट्रोलींगमुळे… हा वाद पुढे इंदुरीकर महाराज विरुद्ध तृप्ती देसाई असा रंगला. 
वास्तविक पाहता महिलांविरोधी किंवा महिलांवर हास्यात्मक वक्तव्य करण्याची इंदुरीकर महाराजांची ही काही पहीलीच वेळ नव्हती. यापुर्वीही त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते. परंतू कीर्तन सोडून शेती करतो म्हणण्याची पाळी इंदुरीकर महाराजांवर पहील्यांदाचं आली. त्यांची काही वादग्रस्त वक्तव्य अशी होती….

“चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं.”“पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे.”“नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज.”“नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?”“पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?”“पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे.”“गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या.

 पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने इंदुरीकरांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही गुन्हा दाखल झालाच पाहीचे अशी भूमीका घेतली. अशातच तृप्ती देसाई यांनी अहमदनगर पोलिस अधीक्षकांना भेटून ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करु असा इशारा दिला होता. 
तृप्ती देसाई  यांची पोलिस अधीक्षकांची भेटही चांगलीच चर्चेत आली. या भेटीदरम्यान तृप्ती यांनी इंदुरीकरांना तिथे उपस्थित राहण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र, “तू तारिख, वेळ आणि ठिकाण सांग, तुला तिथं येऊन *** करुन मारीन’ असं म्हणत ‘तु येऊनच दाखवं’ असं धमकीवजा आव्हान शिवसेना नेत्या स्मिता अष्टेकर यांनी दिलं होतं. 

यानंतर प्रकरणाची वाढती तीव्रता लक्षात घेता इंदुरीकर महाराजांनी  एका पत्रकाद्वारे माफी मागितली. “माझ्या वाक्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले. परंतु माफीचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. माफीनंतरही तृप्ती देसाईंचा आक्रमकपणा कमी झाला नाही.

“आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडवणार म्हणणारे पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत,” अशी टिकाही देसाई यांनी केली. पुढे त्यांनी गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांना काळे फासण्याचा, तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला होता. 

या वक्तव्यावर आता मनसे नेत्या रुपाली ठोंबरेही  मैदानात उतरल्या आहेत. “आता हे खूप अती होतंय, तू येच ग शुर्पणखा, कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ तुझ्या उघड्या डोळ्यांनीच. तू काळ फासायला असलीस तर आम्हीच एक लाख रुपये देऊ तुला. . असे खुले आव्हान पाटील यांनी दिलं होतं. तसेच सदसदविवेकबुद्धीने धर्माचा प्रचार करत एखादा दाखला दिला तर त्यासाठी गुन्हा दाखल करण्याची काहीच गरज नसते. असेही पाटील यांच्याकडून स्पष्ट केले.

 घाटकोपर येथे साजऱ्या झालेल्या दहिहंडी उत्सवाच्या गर्दीसमोर भाजपचे आ. राम कदम यांनी जोशात येऊन वादग्रस्त वक्तव्य केले होते. या जोशातच त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला. गर्दीसमोर कोणतेही काम असल्यास आपल्याला संपर्क साधू शकता असे सांगत राम कदम यांनी आपला मोबाइल क्रमांक जाहीर करून टाकला. शिवाय, तरुणांना सल्ला देताना त्यांचे भान सुटले. तरुणांना कशी मदत करणार हे सांगताना कदम म्हणाले, ‘एखाद्या तरुणीला प्रप्रोज केलं आणि ती नाही म्हणतेय, प्लीज मदत करा. मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचे. तुमचे आई-वडील म्हणाले, साहेब ही मुलगी पसंत आहे तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार…’ या वक्तव्यांमुळे भाजपचे राम कदम पुन्हा एकदा वादात सापडले होते. 
राम कदम यांचे अपहरणाचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीकास्त्र सुरू झाले. सोशल मीडियात याचे जोरदार पडसाद उमटले. नेटकऱ्यांनी राम कदम यांना ट्रोल केले. राम कदम यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर, मंगळवारी त्यांनी याबद्दल माफी मागितली. ‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, त्या दुखवल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो,’ असे ट्विट करून कदम यांनी त्या दिवशी रात्री उशिरा माफी मागितली.

स्त्रियांच्या संदर्भातील कोणताही निर्णय़ घेण्याचा अधिकार हा केवळ पुरुषांनाच आहे, असे राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्यातून ध्वनित होते. स्त्रियांचे हक्क, समानता, अधिकाराच्या प्रश्नांवर स्त्री संघटना सातत्याने कार्य करतात. ही जाणीवजागृती समाजामध्ये रुजत असताना चित्रपट, माध्यमे वा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणे कदापि मान्य होणार नाही. त्याचा आम्ही निषेध करतो अशी भूमिका अनेक संघटनांनी घेतली होती. 

 भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे आयोजित केलेल्या दहिहंडीत एक वादग्रस्त विधान केलं आहे.  त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर भलतंच व्हायरल झाल्यानंतर  आ.  कदम यांच्यावर समाजातील विविध स्तरातून त्यांचा निषेध केला गेला. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली आणि तिने लग्नाला नकार दिला तर मला सांगा. मी त्या मुलीला घरातून पळवून आणण्यास मदत करतो, असे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केले. यावर पुण्याच्या एका मराठी मुलीने कदम यांना ओपन चॅलेंजही दिलं होतं. 
राम कदम यांचा वादग्रस्त असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पुण्यातील मिनाक्षी डिंबळे-पाटील या तरुणीने कदम यांना व्हिडीओ व्हायरल करून ओपन चॅलेंज दिलं. यांत तिने म्हटलं, तुम्ही मला मुंबईला बोलवा किंवा मी मुंबईत येते. तुम्ही मला एक बोट लावून दाखवा बाकी पुढे बघू. तुमचे वक्तव्य लांच्छनास्पद आहे. आपण महाराष्ट्रात राहतो हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, इथं स्त्रीला देव्हाऱ्यातील देव म्हणून जपलं जात. तुम्हाला आजवर खूप फोन केले तुम्ही त्याचे उत्तर दिलं नाही आता मात्र, तुमच्या फोनची मी वाट पाहते आहे.
आता राम कदम ह्या मुलीचे चॅलेंज स्वीकारता का? या कडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं.  तर एका मराठी वृत्त वाहिनीने कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत. जोवर महाराष्ट्राची माफी मागता नाही. तोवर वृत्तवाहिनीवर कदम यांना न दाखवण्याच्या निर्णय घेतला होता. 

महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानाबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या बाबतीतही घडला होता. मनसेच्या उमेदवारांला आमदार व्हायचे आहे, पण त्याला बलात्कार करायचा होता, तर निवडणुकीनंतर करायला हवा होता, अशी धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केले होते. 
आर. आर. पाटील यांची वादग्रस्त क्लिप खासदार संजय काका पाटील यांनी त्यावेळी पत्रकारांना दिली होती. कवठेएकंदच्या सभेत आर आर पाटिल यांच धक्कादायक वक्तव्य केले आहे. मनसेचा उमेदवार येथे उभा केला आहे. पण बलात्काराच्या आरोपाखाली तो अटकेत होते. आमदारच व्हायचं होतं, तर किमान त्याने निवडणुक झाल्यावर बलात्कार करायला पाहिजे होत, असे आर. आर. पाटील यांनी  वक्तव्य केले होते. 

महिलांशी आणि महिलांच्या प्रतिष्ठेची विषयी अर्थ काढण्याची गरज नाही. महिलांचा अवमान करणे हा माझा उद्देश नव्हता. यात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया मागाहून आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली होती.   विरोधकांच्या आरोपांबद्दल उपरोधक टीका करत होतो, त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे पुन्हा आर. आर. पाटील यांनी वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हटले होते. 

अशा राज्यकर्त्यांच्या राज्यात भारत बलात्कार्‍यांचा देश म्हणून ओळखला गेला नाही, तरच नवल ! वृत्तवाहिनीने खडसवल्यानंतर क्षमा न मागता पाटील यांनी व्यक्त केला वरवरचा खेद ! अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. पाटील म्हणाले होते की, मनसेचे काही लोक मला भेटले आणि म्हणाले, आबा आमचा पाठिंबा तुम्हाला आहे. आमच्या उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या उमेदवाराला आपल्या मतदारसंघाचा आमदार व्हायचे होते, तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा, असे संतापजनक वक्तव्य माजी गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी कवठेएकंद येथील सभेत केले. या वेळी उपस्थितांनी पाटील यांच्या या विधानाला उत्स्फूर्तपणे समर्थन देत टाळ्या आणि शिट्टया वाजवल्या. या वक्तव्यामुळे राज्यात रा.रा. पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 

या संदर्भात रा.रा. पाटील यांना एका वृत्तवाहिनीने प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले, मनसेच्या उमेदवारावर २००७ मध्ये एक बलात्काराचा गुन्हा नोंद होता. त्याच्यावर अन्यही गुन्हे नोंद आहेत. आताही तो कारागृहात असल्याने मी उपरोधिकपणे असे बोललो. यातून बलात्कारपीडित महिलांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता; मात्र तरीही जर कुणी माझ्या विधानाचा विपरित अर्थ काढून वाईट वाटून घेत असेल, तर मी खेद व्यक्त करतो. या वेळी वारंवार सांगूनही पाटील यांनी क्षमा मात्र मागितली नाही. 
     या भाषणामुळे सातत्याने शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या रा.रा. पाटील यांचे पुरोगामित्वाचे ढोंग समोर आले. यामुळे पाटील यांचा सोज्वळतेचा बुरखा फाटला आहे. या वक्तव्यामुळे रा.रा. पाटील यांची पात्रता काय ते समजले आहे. अशा प्रकारे सामाजिक असंवेदनशील लोकांना निवडून द्यायचे का ? याचा विचार आता लोकांना केला पाहिजे. रझा अकादमीच्या मोर्च्याच्या कालावधीत गृहमंत्र्यांचे पोलीस खाते महिला पोलिसांचेही रक्षण करू शकले नाहीत. पाटील यांनी आतापर्यंत शासकीय यंत्रणांना हाताशी धरून निवडणुका जिंकल्या आहेत, असा आरोपही त्यांच्यावर झाला. 

रा.रा. पाटील यांच्याकडून बलात्कारपीडित महिलांचा अवमान झाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिली होती.  रा.रा. पाटील यांना उपरोधिकपणे इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करण्याची काय आवश्यकता होती ? त्यांनी बलात्कारपीडित महिलांचा अवमान केला असून त्या संदर्भात क्षमा मागितली पाहिजे. आता बोलून पुन्हा त्यापासून रा.रा. पाटील घूमजाव करून घाणेरडे राजकारण करणार असतील, तर ते चुकीचे आहे. पाटील यांचा निषेध करावा तितका अल्पच आहे. रा.रा. पाटील यांचे घाणेरडे राजकारण आहे असे मनसे नेते बाळा नांदगावकर  म्हणाले होते. यापुर्वीही विधानसभेच्या अधिवेशनात घरोघरी पोलीस दिला, तरी बलात्कार थांबणार नाहीत असे विधान केले होते.

महिलांच्या बाबतीत वाचाळ विधाने करणारे सगळ्यात जास्त राजकीय नेतेच आहेत. सत्तेची धुंदी आणि परिस्थितीचे भान नसणे हे त्याची मुख्य कारणे आहेत. त्याशिवाय मूर्खपणा आणि अज्ञानपणाही जोडीला असतात. बोलण्याचे काही तारतम्य त्यांना नसते. काही वेळा तर जाणीवपूर्वक विधान केले जाते. त्यानंतर माध्यमांनीच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असे म्हणून सारवासारव केली जाते. राजकीय पक्षाच्या अंगलट आलेच तर त्यांचे ते वैयक्तिक मत आहे असेही म्हटले जाते. परंतु ज्या महाराष्ट्राने स्रियांचे शिक्षण, कुटुंबाची प्रगती पर्यायाने समाजाचे शिक्षण आणि प्रगती घडवून आणली. जो महाराष्ट्र स्रियांचे अधिकार आणि हक्क यांच्याविषयी बोलतो. जिथे म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतात. जो महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्या महाराष्ट्रात महिलांविषयी ही भाषा? ही वागणूक? सगळंच काही लांच्छनास्पद आहे. शरमेची बाब आहे. साऱ्या देशाने महाराष्ट्राचा आदर्श घेतला पाहिजे असा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे, हे सर्व मराठी लोकांनी लक्षात घेतले पाहिजे!

गंगाधर ढवळे,नांदेड

 संपादकीय /०७.१०.२०२०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *