आमची जनगणना आम्हीच करणार ..;- लोकजागर अभियान

ओबीसी जनगणना सत्याग्रह:

१८ ऑक्टोबर २०२०, रविवार पासून राज्यभरात सुरू…

ओबीसींची शेवटची जातनिहाय जनगणना १९३१ ला इंग्रज सरकार तर्फे करण्यात आली. १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी ओबीसी समाजाला सामाजिक स्वातंत्र्य मात्र अजूनही मिळालं नाही. वारंवार मागणी करून देखील गेल्या ९० वर्षांपासून ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसींची संख्या देशात ५२ टक्के होती. म्हणजेच देशाच्या सत्ता, संपत्ती मधे त्यांचा ५२ टक्के हिस्सा असायला हवा होता. पण प्रामुख्यानं शेतीशी आणि श्रमाशी निगडित असलेला हा समाज सत्तेपासून तसा दूरच राहिला. त्याला कायम दुय्यम दर्जाची वागणूक मिळत राहिली. त्याच्या शेतमालाला भाव मिळाला नाही, श्रमाला प्रतिष्ठा मिळाली नाही. देशाला जगवण्यासाठी तो शेतामध्ये मरत राहिला, कर्जापायी आत्महत्या करत राहिला. पण सरकारला दया आली नाही. मतपेटीसाठी त्याचा वापर होत राहिला. तोही मुकाट्यानं सहन करत राहिला.

महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा म्हणून ओळखला जातो. संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरोबा कुंभार, नरहरी सोनार, चोखोबा, रविदास, मुक्ताबाई आदी संतांच्या वारकरी संप्रदायाचा महान वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. अगदी अलीकडच्या काळात देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतांनी महाराष्ट्राच्या समतावादी, मानवतावादी परंपरेत भर घातली आहे. पण त्याच महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला ओबीसी समाज मात्र प्रस्थापितांचा गुलामच राहिला. त्याला सत्तेच्या शीर्षस्थानी पोहचू न देण्याचं षडयंत्र कायम शिजत राहिलं. जाती – धर्माच्या नावाखाली त्याची दिशाभूल होत राहिली. तो सुद्धा गाफील राहिला.

वारकरी संप्रदायानं जातीभेदाच्या भिंती केव्हाच उध्वस्त केल्या असल्या तरी, राजकीय व्यवस्थेला मात्र ते नको होतं. त्यामुळे ओबीसी आणि मागासवर्गीय एकत्र येणार नाहीत याची सदैव काळजी घेतली गेली. सत्ताधारी असो की विरोधक सारे मावसभाऊ आळीपाळीनं मलिदा खात राहिले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्या हातात गेल्यानंतर स्वातंत्र्याची लढाई खऱ्या अर्थानं सर्वव्यापी झाली. त्याचवेळी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयानंतर मागासवर्गीय समाजात ऐतिहासिक चेतना निर्माण झाली. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना स्थान देण्याचा दूरदर्शीपणा महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दाखवला, ही या देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना होती. देशाची राज्यघटना लिहिण्याचा ऐतिहासिक मान बाबासाहेबांना मिळाला. त्यामुळे ओबीसी – बहुजनांच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा पहिला हुंकार घटनेमध्ये अधोरेखित झाला. एस सी, एस टी समाजाला तर आरक्षण मिळालेच पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मार्गही बाबासाहेबांनी आखून दिला..आणि त्यातूनच भविष्यात होऊ घातलेल्या क्रांतीची बीजं पेरली गेली. नव्या भारताच्या निर्मितीचा पाया रचला गेला. आज काही मंडळी गांधी – नेहरू यांना शिव्या देण्यात धन्यता मानत असले, तरी.. विचार करा, की जर,
१) गांधी – नेहरू यांचा बाबासाहेबांना विरोध असता, ( काही मतभेद जरूर होते..) तर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश कोणत्या आधारावर झाला असता ? कुणी केला असता ?

२) नेहरू जर मागासवर्गीय समाजाच्या विरोधात असते, तर घटनेमधील बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी त्यांना फेटाळून लावता आल्या नसत्या का ? किंवा संपूर्ण राज्य घटनाच नाकारण्याचा निर्णय घेतला असता, तर बाबासाहेब काय करू शकत होते ? बाबासाहेबांच्या बाजूने किती खासदार होते ? बहुमत तर नेहरू यांच्याकडेच होते ना ?

ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेत नाही. जाती जातीत विष कालवण्याचं काही लोकांचं काम अजूनही सुरूच आहे. गांधी – आंबेडकर वाद निर्माण करून ओबीसी – मागासवर्गीय एक येणार नाहीत, यासाठी सुपारी घेवून काम करणारी मंडळी तिकडेही आहे.. इकडेही आहेत..! पण.. आम्हाला गांधी आणि आंबेडकर दोन्ही हवे आहेत !

वी.पी. पंतप्रधान झाले आणि त्यांनी मर्यादित स्वरूपात का होईना, मंडल आयोग लागू केला. ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्या रागातून त्यांचं सरकार पाडण्यात आलं. मंडल आयोग हा ओबीसींच्या विरोधात आहे, एससी साठीच आहे, असा भ्रम जाणीवपूर्वक पसरविण्यात आला. खुद्द ओबीसी समाज मंडल आयोगाच्या विरुद्ध उभा राहिला होता, हे वास्तव आहे. मात्र एससी समाजानं निर्धार पूर्वक ओबीसींच्या हक्काची लढाई आपल्या खांद्यावर घेतली होती..! ओबीसी – बहुजन एकतेचा अर्धवट राहिलेला अध्याय आता आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना करून घ्यायची आहे. पण सरकार हे करणार नाही. आणि म्हणूनच सरकारची वाट न पाहता, आम्हीच आमची जनगणना करणार हे ऐतिहासिक पाऊल आपल्याला उचलावे लागत आहे. सरकारच जर ओबीसी विरोधी असेल, तर आपल्याला न्याय कसा मिळणार ?

म्हणून.. आम्हीच आमची जनगणना करून घेवू. आम्हीच आमचे शेत मोजून घेवू. आम्हीच आमच्या नातेवाईकांचा शोध घेवू. दूर गेलेली नाती नव्याने घट्ट करू. आम्हीच आमच्या शेताला कुंपण करू. जंगलात जाऊन लांडग्यांना, कोल्ह्यांना सभ्यता, न्याय शिकवत बसण्यापेक्षा आधी आपले कुंपण मिळून मजबूत करू. आपल्याला कुणाच्याही शेतावर अतिक्रमण करायचे नाही. पण त्याचवेळी आपल्या शेतावर कुणी अतिक्रमण करणार नाही, याचीही काळजी घ्यायची आहे. आधीचे अतिक्रमणही काढून फेकायचे आहे !

थोडक्यात..
झालं तेवढं बास झालं..
आता..

आमची जनगणना आम्हीच करणार !

आणि म्हणूनच हा ओबीसी जनगणना सत्याग्रह लोकजागर अभियान तर्फे जाहीर करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सत्याग्रहात विविध संस्था/संघटनांनी सहभागी होण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतला आहे. पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अशा सर्व संस्था/संघटनाचे मनःपूर्वक स्वागत करतो. आभार मानतो. इतरही संस्थांनी खुल्या दिलाने सहभागी व्हावे, अशी विनंती करतो. वेगळ्या निमंत्रणाची वाट न पाहता एकत्र येवून आपण एक नवा इतिहास घडवू या !

आम्हाला कुणाचे काहीही नको

आम्हाला आमचे ५२ टक्के हवे आहे !

धन्यवाद !

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष

लोकजागर अभियान

सत्याग्रही साठी सूचना आणि आचारसंहिता
• सत्याग्रह यशस्वी व्हावा यासाठी, गाव, तालुका, जिल्हा पातळीवर विविध समित्या तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये सहभागी व्हा. शिस्त पाळा. सूचनांचे काटेकोर पालन करा.
• काही निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावे लागणार आहेत. ते घेतांना सर्वसमावेशक असतील, याची काळजी घ्या.
• ओबीसी जनगणनेचा स्वतंत्र फॉर्म आपणास पाठवित आहोत. त्याच्या झेरॉक्स/प्रिंट करून घ्या.
• एका फॉर्मवर साधारणपणे ३/४ कुटुंबांची माहिती येईल. त्या हिशेबाने संख्येच्या प्रमाणात झेरॉक्स काढा. माहिती नीट भरून घ्या.
• सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह..सत्यासाठी आग्रह.. स्वतःपासून सुरूवात ! म्हणून आधी आपलं घर, आपला गाव यातील जनगणनेकडे लक्ष द्या. ती पूर्ण करून घ्या.
• जनगणना करणाऱ्या सत्याग्रहीचे/समन्वयकाचे नाव तसेच सहयोगी संस्था/संघटना यांचे नाव फॉर्ममध्ये दिलेल्या ठिकाणी स्पष्ट अक्षरात लिहा.
• आपल्याकडे जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्या, तरी तो नियोजनाचा भाग आहे. मात्र आपण सारेच सत्याग्रही आहोत याची जाणीव ठेवा. सर्वांचा मान राखा.
• सत्याग्रहींची नावे जास्त असल्यास स्वतंत्र कोऱ्या कागदावर मोबाईल नंबरसह लिहून यादीला जोडा.
• झेपेल तेवढीच जबाबदारी घ्या. उगाच घाई करू नका. कुणाशी स्पर्धाही करू नका. ही दीर्घकालीन लढाई आहे. त्यासाठी तयार रहा. नियोजनपूर्वक काम करा.
• लढाई जेवढी कठीण आहे असे वाटेल, तेवढीच सोपी देखील आहे. मात्र, त्यासाठी आपली राजकीय, वैचारिक गुलामगिरी सोडा. समाजाच्या हिताचा विचार करा. मनापासून एक या.
• शक्य असेल तिथे बॅनर, होर्डिंग लावा. मात्र अवास्तव खर्च करू नका. पैशासाठी कुणावरही जबरदस्ती करू नका.
• आपापल्या घराच्या भिंती रंगवा.
सरकारी इमारतीवर किंवा कुणाच्याही घरावर परवानगीशिवाय काहीही लिहू नका. तो कायद्याने गुन्हा आहे.
• कीर्तनकार, प्रवचनकार किंवा लोककलाकार यांनी जनगणनेचा प्रचार, प्रसार करावा, म्हणून विनंती करा.
• कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी, महिला आणि इतरही घटक सोयीनुसार एकत्र या. पूर्ण शक्तिनिशी काम करा.
• नोंदणीसाठी देखील कुणावरही जबरदस्ती करू नका. विनंती करा. महत्त्व पटवून द्या.
• आपापल्या गावातील/वॉर्डातील/मोहोल्ल्यातील १०० टक्के जनगणना करून घ्या.
शारीरिक अंतर ( फिजिकल डिस्टंसिंग ) पाळा. गर्दी करू नका. कोरोना संदर्भातील सरकारी निर्देशांचे काटेकोर पालन करा.
• सोशल मीडियावरून जोरात प्रचार करा. ओबीसी जनगणना करून घ्यायला सांगा.
• आम्ही सोबत आहोत, अशा कॉमेंट्स सोशल मीडियावर देवून शांत बसू नका. सत्याग्रहाशी संबंधित जिल्हा, विभाग पदाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करा. कुठे आणि कसे सहभागी होणार ते सांगा. कोणती जबाबदारी घेणार तेही सांगा.
• एससी, एसटी, एनटी, अल्पसंख्यांक आणि इतरही समविचारी बांधवांची मदत घ्या.
• आपल्याला कुणाकडेही निवेदन द्यायचे नाही, कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जायचे नाही. कोणत्याही नेत्याच्या मागे लागायचे नाही. त्यांना मदतही मागायची नाही. हा जनतेचा सत्याग्रह आहे. म्हणून जनतेचे सहकार्य घ्या.
कुणाच्याही विरुद्ध घोषणा देवू नका. आपण फक्त आपल्या ओबीसी समाजाची जनगणना करत आहोत, याची जाणीव ठेवा.

• आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या..! स्वतःची काळजी घ्या. सौजन्याने वागा !

आपण खालील घोषणा देवू शकता..

झालं तेवढं पुरे झालं..

आमची जनगणना आम्हीच करणार !

बावन टक्के ओबीसी..

बावन टक्के आरक्षण !

सर्वांची सत्ता.. सर्वांचे सरकार

ओबीसी मुख्यमंत्री..बहुजन सरकार !

अपना इरादा नेक है..

ओबीसी – बहुजन एक है !

आपण सत्याग्रहासाठी खालील भूमिकेतून सहभागी होऊ शकता.
सत्याग्रही
सत्याग्रही संस्था/संघटना
सत्याग्रही समन्वयक
सत्याग्रही संघटक

लोकजागर संयोजक

आपले नाव, गाव, पता, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर यासह आपली माहिती खालील मोबाईल नंबरवर जिल्हा निहाय नोंदवा. अभियानाची सविस्तर माहिती आणि पुढील नियोजन आपल्याला कळविले जाईल.

लोकजागर अभियान तर्फे आयोजित या सत्याग्रहामध्ये आपण आपल्या संस्था किंवा संघटनेच्या नावासह सहभागी होऊ शकता. सर्व समविचारी मित्र आणि संघटनांचे स्वागत आहे !

धन्यवाद !

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
एम. एस. मिरगे
महासचिव
लोकजागर अभियान

9004397917

ओबीसी जनगणना सत्याग्रह जिल्हा/विभाग निहाय संपर्क
• मनीष नांदे – प्रदेश संघटक
9545025189
• डी. व्ही. पडिले – मराठवाडा
9890585705
• मुंबई विभाग – रवींद्र रोकडे
9773436385
• कोकण विभाग – समीर देसाई
9004048002
• पश्चिम महाराष्ट्र – राजकुमार डोंबे 7378583559
• अमरावती विभाग – प्रभाकर वानखडे 8806385704
• नागपूर विभाग – महेंद्र शेंडे
8055502228
• केंद्रीय कार्यालय – चंद्रकांत लोणारे
9960014116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *