उद्याचा महाराष्ट्र आणि ओबीसी जनगणना सत्याग्रह


सरकारनं विशिष्ट समाजातील काही लोकांच्या दबावाला झुकून एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तो एका राजकीय कटाचा भाग आहे. आणि त्यात तथाकथित ओबीसी नेते देखील सामील आहेत, हे विदारक सत्य आहे. आता त्यावर कोरडा गदारोळ सुरू आहे.

ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत, असा थोडासा देखावा दिसतो. पण त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. संघर्षाचे मुळ कारण, अन्यायाविरुद्ध ओबीसी नेत्यांनी केलेला युक्तिवाद, त्यांनी घेतलेली भूमिका आणि ओबीसी समाजाने अशा लोकांवर ठेवलेला बिनडोक विश्वास ह्यातच ओबीसींच्या पराभवाची कारणे दडलेली आहेत. कडुनिंबाच्या झाडाला कितीही खत पाणी घाला.. त्याला लिंबू, संत्रा, मोसंबी असली फळं येत नसतात, एवढं साधं आपल्याला कळत नसेल, तर दोष आपला आहे, झाडाचा नाही ! ओबीसी चळवळीचं देखील हे अपयश आहे, हे मान्य करायलाच हवे.

पण हे काही पहिल्यांदाच घडते आहे, असंही नव्हे. याबाबत आमची लोकजागर ची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. दिशा स्पष्ट आहे. कसलाही संभ्रम नाही. ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा, अशी विनंती आहे. पटेल तर प्रामाणिकपणे सोबत या. अन्यथा सोडून द्या..!

• जीवनाला स्पर्श करणारा कोणताही निर्णय राजकीय मंचावरूनच केला जातो, असे आम्ही मानतो. घरच्या लग्नापासून देखील त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव असतो.
लोकशाहीमध्ये जशी जनता असेल, तसेच नेते मिळत असतात. आपण इमानदार तर नेते इमानदार, आपण विकावू तर नेते विकावू.. म्हणून सुरुवात स्वतःपासून करायला हवी, असे आम्ही मानतो. ( अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतात, पण अपवादाने नियम सिद्ध होत नाही. )
• ओबीसी समाज अजूनही मानसिक गुलामगिरीतून बाहेर आला नाही. राजकीय पद, सत्ता, संपत्ती बघून तो आपले नेते ठरवतो. म्हणजे एखादा टपोरी, दलाल किंवा खोटारडा माणूस देखील सत्तेत असेल, श्रीमंत असेल तर ओबीसी/बहुजन समाजाला त्याचा नेता म्हणून स्वीकार करतांना लाज वाटत नाही. ( मग तो चोऱ्या करून, दरोडा टाकून श्रीमंत झाला असेल, तरी लोकांना फरक पडत नाही.. ) त्याच्या अवतीभवती तो भाऊ भाऊ करत शेपटी हलवतो. त्याच्या सोबत फोटो काढण्यात त्याला भूषण वाटते.
• ओबीसी, बहुजन समाजातील तथाकथित विचारवंत, काही वक्ते भाषणातून महापुरुषांच्या नावाची लांब यादी घोकून घोकून बोलतात. बॅनरवर विविध महापुरुषांच्या फोटोंची लाईन लागलेली असते. प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र लाचारी, लाळघोटेपणा, दुटप्पीपणा, दांभिकपणा, दलाली ठासून भरलेली असते. जातीच्या महापुरुषांचे नाव आणि फोटो एवढ्या भांडवलावर कुणीही आमचा नेता बनून जातो.

• व्यक्तीचे विचार, समर्पण, त्याग, प्रामाणिकपणा आम्हाला फारसा महत्त्वाचा वाटत नाही. उदा. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केला. त्यासाठी त्यांची खुर्ची गेली. पण आमच्यासारखे काही मूर्ख लोक सोडले ( मी त्यावेळी नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुख होतो. ते पद सोडून व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वात जनता दलात सामील झालो. पण माझं अभिनंदन कोणत्याही मंडल चळवळीतील विद्वान नेत्यानं केलं नाही. फक्त बाळासाहेब अग्ने, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर ह्या दोन व्यक्तींनी मात्र कौतुक केलं आणि त्या दोन्ही मागासवर्गीय आहेत. उलट आमचे ओबीसी तर सेना सोडली नसती तर तुम्ही मंत्री झाले असते, अशी माझीच कीव करत होते..असो ! ) तर त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी फारसे कुणीही आले नाहीत. बहुतेक चळवळी तर ‘ब्राह्मण ब्राम्हण’ असा जप करण्यातच गुंग होते. त्यांचा तो जप अजूनही थांबला नाही. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ‘ब्राह्मण द्वेष’ हाच त्यांच्याकडे रामबाण उपाय आहे. यावर अजूनही प्रभावी लस सापडली नाही. हा सारा प्रकार वैताग आणणारा आहे. त्यातून आपण बाहेर पडायला हवं, असं आम्ही मानतो.

लोकजागरचं धोरण स्पष्ट आहे. दिशा निश्चित आहे. निर्धार पक्का आहे. सारेच कार्यक्रम पारदर्शी आहेत. कोणताही छुपा अजेंडा नाही. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सर्व आघाड्या ह्या लोकजागर अभियानाच्या अविभाज्य अंग आहेत. राजकीय परिवर्तन हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, यावर आम्ही ठाम आहोत. त्याला अनुसरूनच आमची वाटचाल सुरू आहे. नवा स्वतंत्र आणि स्वाभिमानी पर्याय निर्माण झाल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात समतेची, सर्वसमावेशक राजकारणाची पहाट उगवणार नाही, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत.

ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार !
आमची जनगणना, आम्हीच करणार !

बावन टक्के ओबीसी, बावन टक्के आरक्षण !

अंतिमतः साऱ्या चळवळींचा परिणाम लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठीच व्हायला हवा. अन्यथा ती चळवळ फसवी, बालिश, अपरिपक्व आहे याची आम्हाला जाणीव आहे. बाथरूम मधील शॉवरच्या धारा आणि खरा पाऊस ह्यातला फरक आम्हाला समजतो.

मात्र वरील मुद्दे हे प्रासंगिक असमतोल दूर करण्यासाठी आहेत. आमचा मुख्य अजेंडा किंवा जाहीरनामा आमच्या अकरा कलमी कार्यक्रमामध्ये आहे.

लोकजागर अभियानचा अकरा कलमी कार्यक्रम
१. झिरो ते हिरो अर्थव्यवस्था
२. जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही
३. गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार
४. कृषी धर्म, कृषी संस्कृती
५. सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार
६. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य
७. एक गाव, एक परिवार
८. युवा भारत, नवा भारत
९. गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय
१०. प्रगत महिला, समर्थ समाज

११. सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता

तूर्तास..
ओबीसी जनगणना सत्याग्रह १८ ऑक्टोबर पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करत आहोत. आमची जनगणना आम्हीच करणार..! हा साधा, सोपा आणि स्वावलंबी कार्यक्रम घेवून आम्ही निघालो आहोत.

कृपया समजून घ्या. आमच्या सोबत या. मनापासून सत्याग्रहात सहभागी व्हा. अशी विनंती करतो आणि थांबतो..!

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
•••

संपर्क – 9004897917 • 9960014116 • 9545025189 • 855502228

( सूचना – माझा लेख छापण्यासाठी / फॉरवर्ड करण्यासाठी / शेअर करण्यासाठी माझ्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. हीच माझी परवानगी समजावी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *