◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – अनंतफंदी
कविता – बिकट वाट वहिवाट नसावी
अनंत घोलप (उर्फ अनंतफंदी).
जन्म – १७४४
मृत्यू – १४/११/१८१९.
वास्तव्य – संगमनेर (अहमदनगर).
कवी, शाहीर अनंतफंदी हे पेशवाईतील सर्वात लोकप्रिय शाहीर होते. अनंतफंदी यांचा काळ म्हणजे दुसऱ्या बाजीरावाचा काळ.
अनंतफंदी यांच्या पुर्वजांचा गोधळी आणि सराफीचा व्यवसाय होता.
अनंतफंदी याच्या बालपणातच त्यांचे वडील वारले.
अनंतफंदी हे लहानपणी खूप उनाड आणि खोडकर होते.
तत्कालीन श्रुंगेरीपीठाच्या शंकराचार्यांनी अनंत घोलप यांचे अनंतफंदी असे नामकरण केले.
अनंतफंदी यांनी त्यांच्या रसाळ प्रासादीक भाषेत वेगवेगळ्या प्रकारात लावण्या, पोवाडे, फटका, कटाव अशा अनेक रचना लिहिल्या.
मार्मिक भाषेत समाजातील व्यंगावर बोट ठेवणाऱ्या उपदेशपर रचना म्हणजे फटका ह्या काव्यप्रकाराचे अनंतफंदी हे जनक समजले जातात. अशा फटका प्रकारातील अनेक रचना अनंतफंदी यांनी त्याकाळात केल्या आणि समाजागृतीचे काम केले.
शार्दुलविक्रीडीत आणि शिखरणी या वृत्तात अनेक रचना अनंतफंदी यानी केल्याचे दिसते.
काही काळ त्यांनी तमाशातही काम केले. मलकफंदी, रतनफंदी, राघवफंदी आणि हे अनंतफंदी अशी त्यांची तमाशाची चौकडी होती.
उतारवयात अनंतफंदी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून किर्तनेही केली.
“फंदी अनंतकाळाचा सागर” आणि “समोर गाता कोणि टिकेना” अशा शब्दात होनाजी बाळा यांनी अनंतफंदी यांचा गौरव केला होता.
“लुंडे गुंडे हिरसे तट्टू” हा अनंतफंदी यांचा उपदेशपर फटका विशेष प्रसिद्ध आहे.
“श्रीमाधवकवन” (माधवग्रंथ) हे ओवीबद्ध काव्य अनंतफंदी यांनी लिहिले.
अनंतफंदी यांनी अनेक रचना त्या काळात केल्या असल्या तरी काही मोजक्याच रचना आज उपलब्ध आहेत.
असा हा जगावेगळा आगळावेगळा कवी शाहीर साहित्यक्षेत्रात अनेक अजरामर रचना देऊन वयाच्या ७५ व्या वर्षी अनंतात विलीन झाला.
अनंतफंदी यांच्या मृत्यूनंतर २०० वर्षांनीसुद्धा त्यांच्या काव्याची आणि त्यांच्या नावाची आजही चर्चा होते हाच त्यांच्या प्रतिभेचा पुरावा आहे.
प्रो.शिरीष गंधे, संगमनेर यांनी अनंतफंदी यांच्या चरीत्र व साहित्याचा अभ्यास करून ते अनंतफंदी यांच्या विषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी व्याख्याने देत असतात. २०१९ या वर्षी अनंतफंदी यांची २०० वी पुण्यतिथी झाली. या निमित्ताने २०१९-२० या वर्षभरात अनंतफंदी यांची ओळख करून देणारी २०० व्याख्याने महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन करण्याचा संकल्प प्रो.शिरीष गंधे यांनी केला आहे.
अनंतफंदी यांनी फटका या प्रकारात अनेक रचना केलेल्या आहेत. आपल्या मार्मिक शब्दांनी समाजात दिसणाऱ्या वर्मावर अचूकतेने बोट ठेवून आपल्या काव्याच्या माध्यमातून शब्दांचे हळूवार फटके मारून समाजप्रबोधन करण्याचे बहुमुल्य काम त्यांनी त्यांच्या अनेक रचनांमधून केलेले दिसते. त्यामुळे अनंतफंदी यांना फटका या रचनेचे जनक मानले जाते.
त्यांची अशीच एक गाजलेली फटका रचना “बिकट वाट वहिवाट नसावी” या रचनेचा आपण आस्वाद घेऊयात.
या रचनेमध्येही अनंतफंदी यांनी समाजात दिसणाऱ्या मानुष्यच्या अवगुणांवर अचुकतेने बोट ठेवल्याचे जाणवते. एक सुदृढ समाज बनविण्यासाठी आपण समाजात कसे वागले पाहीजे, काय नाही केले पाहिजे याचा संविस्तर पाढाच जणू अनंतफंदी यांनी या आपल्या रचनेत मांडला आहे. सरळ शब्दातील साधी सोपी पण लयबद्ध रचना वाचल्यावर आपल्या मनाचा ठाव घेते, हे नक्कीच….
बिकट वाट वहिवाट नसावी
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको,
संसारामधी असा आपला उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण धरुनी निखालस खोट्या बोला बोलु नको,
अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणी तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको,
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधी फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करू नको ॥ १ ॥
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलूं नको,
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुनी हेवा झटू नको
मी मोठा शाहणा धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको,
एकाहूनू चढ एक जगामंधि थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको,
दो दिवसाची जाइल सत्ता अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामीन राहू नको ॥ २ ॥
उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको,
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजिभाकरी तूपसाखरे चोरू नको,
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधीं विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको,
आता तुज गुज गोष्ट सांगतो सत्कर्मा तूं टाकू नको
सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥
- अनंतफंदी
संदर्भ –
१) इंटरनेट
२) प्रो.शिरीष गंधे, संगमनेर (अनंतफंदी यांच्या चरीत्र व साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते) यांच्याशी चर्चा.
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■