माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

आजपासून राज्यात ग्रंथालये सुरु करण्यास राज्य सरकारकडून‌परवानगी दिली जाणार आहे. टप्याटप्याने सर्व काही सुरळीत सुरू होत‌ आहे. परंतु केंद्र सरकारने धार्मिक स्थळे खुली केली असताना राज्यात देवीदेवता अजूनही कुलुपबंदच आहेत. त्यामुळे भाविक भक्तांना तसेच तमाम श्रद्धाळूंना आपली भक्ती, श्रद्धा कुलुपबंद असल्याची जाणीव होत‌ आहे. देव बंद आणि आपल्या भक्तीचा श्वास गुदमरत असल्याची जाणीव होऊन मंदिरासमोर सर्वत्र दार उघड उद्धवा अशी आर्त साद घालणारं हे आंदोलन सुरू आहे. याबाबत राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिका घेतली आहे. 

राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे राज्यात बार, रेस्टोरंट आणि समुद्र किनारे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे देव-देवता मात्र लॉकडाऊनमध्ये अडकून पडले आहेत. मागच्या तीन महिन्यात विविध शिष्टमंडळांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली. यात धार्मिक नेते, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे.

पत्राच्या सुरुवातीलाच ठाकरे यांना उद्देशून राज्यपाल म्हणतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशी संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.

तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश होता, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

राज्यपालांच्या पत्रास उत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही खरमरीत पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. तसेच महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा सणसणीत टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.
‘मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का?’ असा प्रश्न राज्यपालांनी पत्रात विचारला होता. त्यावर ठाकरे म्हणतात, आपल्याला असा प्रश्न का पडावा? आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र मी एवढा थोर नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे ‘सेक्युलर’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभाच ‘सेक्युलर’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का, असा सवाल ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.

ठाकरे पुढे म्हणतात, इतर राज्यात, देशात बरेवाईट काय घडते आहे, ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. आपल्याला अनेक शिष्टमंडळांनी भेटून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत विनंती केली. त्यातली तीन पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो! प्रार्थना स्थळं उघडण्याबाबत सरकार जरुर विचार करत आहे. पण जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे होते तसेच तो एकदम उठवणे देखील अयोग्य आहे. घरोघरी जाऊन उपचार करणारे महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य आहे, अशी आठवण करून देत, ठाकरे यांनी राज्यपालांच्या विनंतीचा सरकार गांभीर्याने विचार करत असून, सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी खात्री देतो असेही ठाकरे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ह्यमाझे कुटूंब, माझी जबाबदारी ह्य हि मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिलीय. 

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned secular yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? 

केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा  secularism आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही devine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. पुढे त्यांनी लवकरच योग्य ती काळजी घेऊन मंदिरे उघडली जातील असे म्हटले आहे. 

मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असं थेट आव्हान शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांन देण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांचा एकेरी उल्लेख करत शरसंधान साधलं. ‘ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली,’ असं राऊत म्हणाल्या.

‘ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिनं त्याच भूमिकेत राहावं. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करू नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही,’ असं प्रत्युत्तर राऊत यांनी अमृता फडणवीस यांना दिलं.

‘वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्यातील धर्मस्थळे सुरू करण्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातली भाषा घटनाविरोधी असून राष्ट्रपतींना ते मान्य आहे का, असा सवाल प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
‘उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचं हिंदुत्व पक्कं असून भक्कम पायावर उभं आहे, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे‌ असंही म्हटलं आहे. कारण महाराष्ट्रात हिंदुत्व काय असतं बाळासाहेब ठाकरे यांनी इथल्या हिंदूंना शिकवलं आहे, असं म्हणतात. शिवसेना मराठी माणसांसाठी स्थापन झाली. हिंदुत्वाचं बाळकडू लहानपणापासून पाजलं गेलं आहे. ते रक्तातच आहे. त्यामुळे ते शिकविण्याचा विषय नाही. हा देश‌ कोणत्याही एका धर्माचा नाही. एका जातीपंथाचा नाही. तो धर्मनिरपेक्ष आहे. तुम्ही तुमचं हिंदुत्व बाळगता, त्याचा अभिमान बाळगता तेव्हा या देशाने धर्मनिरपेक्षता स्विकारली आहे हे विसरता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मला कोणाच्याही हिंदुत्त्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हटले आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी वापरलेल्या भाषेबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. पवार म्हणतात, सर्व धर्मांना समान न्याय देणारी धर्मनिरपेक्ष घटना देशाने स्वीकारली आहे. घटनेतील तत्वांचा आदर केला पाहिजे. मात्र राज्यपालपदाची प्रतिष्ठा ढासळत आहे. राज्यपालांच्या पत्रातील भाषेची आपण नोंद घेतली असेलच. पत्रातील भाषा, आशय या दोन्ही गोष्टी घटनात्मक पदावर असणाऱ्यांना साजेशा असाव्यात.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ज्या भाषेत पत्र लिहिलं, त्यावरची नाराजी व्यक्त केलीय. राज्यातली देवस्थानं उघडण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झालाय.याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. राज्यपालांनी त्यांच्या पत्रात नमुद केलेल्या काही आक्षेपार्ह विधानांवर शरद पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
कोरोना काळात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आज राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपालांनी या पत्रामधून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती. 

आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष‌ हा शब्द जोडला गेला आहे. ज्याचा अर्थ सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि त्यांचे रक्षण होते, असा होतो. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीने संविधानामधील अशा आचारांनुसार वागले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. सोशल मीडियावर राज्यपालांना भाज्यपाल म्हटले जात आहे तसेच मी माझ्या नागरिकशास्त्राच्या शिक्षकांना सकाळपासून शोधतो आहे की ज्यांनी कोणत्याही राज्याचे राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे नसतात तर ते त्या राज्यातील जनतेचे असतात. असे म्हणून खिल्ली उडविली जात आहे. ते संवैधानिक पदावर असतात. तसेच ते कोणत्याही धर्माचे लांगूलचालन करु शकत नाहीत. ते पद धर्मनिरपेक्ष असेच असते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पहाटे घेतलेल्या शपथविधीच्या घटनेपासून आत्तापर्यंतच्या एकंदरीत वागण्यामुळे ते आता बदलले जाऊ शकतात असे काही राजकीय जाणकार भाष्य करु लागले आहेत. 

राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली. त्यानंतर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे.  त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावरून  भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘होय, तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज जृखरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून त्यांनी केव्हाच फारकत घेतली आहे. त्यांनी त्याची प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही. या मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली, त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

याचबरोबर,  हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसलात आहात. तुम्हाला हेही नाकारता येणार नाही की, कसाबला बिर्याणी खायला घातली. त्यांच्याशी तुम्ही संगनमत केले आहे. ज्यावेळी पंढरपूरला पुजेला गेलात त्यावेळी आमच्या विठूरायाच्या चरणाला स्पर्शही केला नाही, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज आहे. तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालीय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने टीकेचे लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. धर्मनिरपेक्षता संपलीय, आता भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्या विधानाचा आधार घेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. माननीय मुख्यमंत्री यालाही प्र्त्युत्तर देणार आहेत का? की हे नेहमीप्रमाणे निव्वळ राजकारण आहे. इतरांना दोष देण्याआधी स्वत:च्या घरातील प्रश्न सोडवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. याबाबत कंगनाने ट्विट केले आहे. राज्यपालांकडून गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे, याबद्दल चांगले वाटले. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडले. मात्र, राजनीतिकदृष्ट्या मंदिरं बंद ठेवली. बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे, असे कंगना राणौतने ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशात अचानक लॉकडाऊन लादणे योग्य नव्हते. त्यामुळेच, एकदम ते पूर्णपणे रद्द करणेही उचित ठरणार नाही, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुर्तास नकार दर्शवला आहे. त्यासोबतच, राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी जशात तसे उत्तर दिलंय. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंचं उत्तर हे ऐतिहासिक ठेवा असेल, असे म्हणत राज्यपाल कोश्यारी  हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.  
”राज्यपाल हे घटनात्मक पद असून, घटनेनुसार राज्य चालतंय का नाही, हे पाहणं त्यांचं काम आहे. ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला, त्या शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे, आम्हाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही, आमचा आत्मा आणि मन हिंदुत्वाचं आहे. आजच, पतंप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलंय की, महाराष्ट्राला अद्यापही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे, जनतेची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं कौतुक करायला हवं, असा सल्लाच संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींना दिलाय. भगतसिंग कोश्यारी यांनी सेक्युलर घटनेला अनुसरुनच राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर योग्य असून तो ऐतिहासिक ठेवा असेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दिल्लीत ८ जूनला मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला. त्याच सुमारास देशभरात मंदिरे उघडली गेली. मात्र, त्यामुळे कुठे कोरोनाची लाट आल्याचे चित्र नाही. त्यामुळे आवश्यक काळजी घेत सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे. ही रास्त भूमिका आहे. परंतु हिंदुत्व, सेक्युलॅरिझम हे शब्द वापरुन टोचून बोलण्याची किंवा राजकारण पेटवण्याची आवश्यकता नाही. सरकारने टाळेबंदीत अनेक नियम केले पण मोठ्या प्रमाणावर ते पाळले गेले नाहीत. त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. त्यामुळे मंदिरे उघडली की इतर धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे उघडावी लागतील. तिकडे लोक नियमाप्रमाणे वागताहेत की नाही, हे पहावे लागेल. इथे प्रश्न भक्तीचा, श्रद्धेचा आहे. त्यामुळे आरत्या, प्रार्थना, भजन, प्रासंगिक वा इतर दीर्घकालीन कार्यक्रम यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांचा ओघ सुरू राहतो. त्यातच यात्रा, जत्रा असतात. मोठ्या प्रमाणावर लोकांना आवरणे शक्य नसते. इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धार्मिक स्थळे खुली झालीच पाहिजेत ह्याबद्दल‌ दुमत नाही परंतु ते करत असताना सरकारला कोणतीही किंमत चुकवावी लागणार नाही याची काळजी घेऊन अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील कारण हा सरकारपुढे असलेला सगळ्यात मोठा पेच आहे. 

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय

१५.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *