सोलापूर;
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. तेथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी सरकार तुमचंच आहे आणि सदैव तुमच्यासोबत आहे, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशही त्यांनी सुपूर्द केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतिवृष्टीच्या संवेदनशील विषयातही राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांचा समाचार घेतला व केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘ही राजकारणाची वेळ नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल?’, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी मला फोन आला होता. पूरस्थितीबाबत माहिती घेताना त्यांनी आवश्यक ती मदत करू, असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही’, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले.
आणखी दोन दिवस पूरग्रस्त भागात फिरणार :
केवळ काहीतरी घोषणा करायची म्हणून करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरू केले आहे. पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल. जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं. उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.