अहो आश्चर्यम ! तांदळाच्या दाण्यांवर भगवद्गीता !!!

दुनिया गोल आहे असा शोध लागल्यानंतर ती गोलमाल असल्याचीही प्रचिती येऊ लागली होती. अनेक शोध लागत होते आणि ते अत्यंत आश्चर्यकारक होते. या शोधांनी जगभरातील लोकांचे मानवी जीवनच बदलून टाकले. त्याआधीही चमत्काराच्या गोष्टी आपण ऐकतच होतो. पण ते चमत्कार म्हणजे अंधश्रद्धा आणि जादू वगैरे काही नसते यावर आपला विश्वास असतो. जगात आजही वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या चमत्कार असलेले आपल्याला दिसतात. नवनवीन लागलेले शोध म्हणजे चमत्कारच होय. साधा सायकलचा शोध घेऊ. त्याकाळी जमीनीवर पाय न ठेवता माणूस हवेत उडत येत असल्याचा हा चमत्कार होता. अंधारात उजेडाचा दिवा लागणं हा काय कमी चमत्कार होता? असे अनेक चमत्कार भारतीय पुराणशास्रांत शोधून सापडतील. परंतु आजकालही अनेक आश्र्चर्य आपल्या अवतीभवती घडून येतात. आपला विश्वास बसला तरीही त्याची शेवटपर्यंत चिकित्सा आपण करीत बसतो. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपण सहजासहजी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवीत नाही. 

तेलंगाणा‌ येथे  काल २० ऑक्टोबर रोजी अशीच एक बातमी ऐकायला, वाचायला, पहायला मिळाली. हा काही चमत्कार नव्हे पण संपूर्ण मेहनतीने, जिद्दीने काहीही करायचं ठरवलं तर, जगातील कोणतीही गोष्ट ते करण्यापासून रोखू शकत नाही. अशीच कमाल हैदराबादच्या  एका लॉ शिकणाऱ्या विद्यार्थीनीने केली आहे. तिने तब्बल ४०४२ तांदळाच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद् गीता लिहिली आहे. हा मात्र प्रयत्नांचा चमत्कारच आहे. 

ती देशातील पहिली महिला मायक्रो-आर्टिस्ट  असल्याचं या विद्यार्थीनीने म्हटलं आहे. या विद्यार्थीनीने एक मायक्रो-आर्ट प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्यात तिने ४०४२ तांदळांच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद् गीता लिहिली आहे. मायक्रो-आर्टिस्ट रामागिरी स्वरिकाने  हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तिला एकूण १५० तास लागले असल्याचं सांगितलं. आतापर्यंत तिने दोन हजारहून अधिक मायक्रो-आर्टवर्क तयार केले आहेत. रामागिरी स्वरिका मिल्क आर्ट, पेपर कार्विंग, तिळावरही ड्रॉइंग करते.

रामागिरीने याविषयी बोलताना सांगितलं की, तिला नेहमीच कला आणि संगीत विषयात आवड होती. तिला लहानपणी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून तिने तांदळाच्या दाण्यावर गणपती बाप्पाच्या चित्रासह मायक्रो-आर्ट करण्यास सुरुवात केली. तिने केवळ एका तांदळाच्या दाण्यावर, इंग्रजी वर्णमालाही लिहिली होती.

२०१९ मध्ये रामागिरीला दिल्ली सांस्कृतिक अकॅडमीकडून  राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आलं आणि तिला भारतातील पहिली मायक्रो-आर्टिस्ट म्हणून मान्यता देण्यात आली. २०१७ मध्ये तिला आंतरराष्ट्रीय ऑर्डर बुक ऑफ रिकॉर्ड्सने  सन्मानित करण्यात आलं होतं.

आतापर्यंत तिने दोन हजारहून अधिक मायक्रो आर्ट्सवर काम केलं आहे. रामागिरी लॉची विद्यार्थी असून तिचा न्यायाधिश होण्याचा मानस आहे.

 हैदराबादच्या एका चिमुरड्याने वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. हा चिमुरडा केवळ एक वर्ष नऊ महिन्यांचा आहे. हैदराबादच्या या आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टीने त्याच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेने, शार्प मेमरीने  सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. आदिथ विविध देशाचे झेंडे, कार-कारचे लोगो, अल्फाबेट्स, फळं, भाजीपाला अगदी काही क्षणात ओळखतो.

घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू, व्यवसाय, प्राणी यासह इतर अनेक गोष्टी, त्यांची नावं, अनेक वस्तूंची ओळख सांगतो. गोष्टी, वस्तू लक्षात ठेवण्याच्या आदिथच्या या स्मरणशक्तीसाठी, त्याच्या या जबरदस्त बुद्धीमत्तेसाठी वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

आदिथ अनेक कोडी अगदी सहजतेने अशी काही सोडवतो की, पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. आदिथच्या या स्मरणशक्ती, शार्प बुद्धीमत्तेमुळे त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड, सर्टिफिकेट्स ऑफ नॅशनल रेकॉर्ड्स त्याच्या नावे आहेत. सावल्यांवरुन वाहनं ओळखणं, अतिशय जटिल रंग-संगती, रंग नमुने, प्राण्यांचे आवाज, पक्षी, शरीराचे अवयव अशाप्रकारच्या अनेक गोष्टी आदिथ चुटकीसरशी ओळखतो.

आदिथचे आई-वडील अरुण साई आणि स्नेहिता यांनी सांगितलं की, आदिथने आतापर्यंत १७ कॅटेगरीमधील २७२ चित्र ओळखली असून त्याला ‘Super Kid’ आणि ‘The Mnemonist Wonder Kid’ ही उपाधी देण्यात आली आहे. खासदार वीरेंद्र शर्मा आणि वर्ड बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांनीही या चिमुकल्या आदिथचं कौतुक केलं आहे.

मुले मुली आता कोणत्याही क्षेत्रात एकमेकांपेक्षा काही कमी नाहीत. त्यामुळे मुलींसाठी काही अचानक योजना जाहीर झाल्या अथवा अनेक सवलती दिल्या गेल्या तर आश्र्चर्य वाटू नये.  स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार बरेच प्रयत्न करत आहे. आता लोकांची मानसिकताही बदलत चालली आहे. बऱ्याच खासगी हॉस्पिटलमध्ये तर प्रसुतीचा खर्चही घेतला जात नाही. बँका, पोस्टाच्याही विविध योजना मुलींसाठी आहेत. आता त्यात आणखी एका योजनेची भर पडली आहे.  मुलगी जन्माला येताच अकरा हजार रुपये दिले जाणार आहेत. 

देशामध्ये लैंगिक असमतोल वाढू लागला आहे. दर हजार पुरुषांमागे स्रियांची संख्या घटत आहे. या लैंगिक असमानतेवर काम करणारी संघटना जेनेक्सने ही घोषणा केली आहे. जेनेक्सने शनिवारी सांगितले की, या योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे, मात्र त्यासाठी प्रसुतीच्या आधी पालकांनी त्यांचे नाव जेनेक्सच्या वेबसाईटवर नोंदवावे लागणार आहे. 

जेनेक्सने सांगितले की, या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील लोकांना मोफत घेता येणार आहे. म्हणजेच यासाठी कोणतेही शुल्क किंवा अन्य स्वरुपात पैसे स्वीकारले जाणार नाहीत. यासाठी पालकांना www.genexchild.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. प्रसुतीनंतर मुलगी झाल्यास त्या पालकांना ११००० रुपये दिले जाणार आहेत. 

या योजनेचे महत्वाचे उद्दीष्ट जन्माला येणारी मुलगी १८ वर्षांची झाल्यावर स्वत:च्या पैशांनी सशक्त, पायावर उभी राहू शकेल हे आहे. तसेच अल्पवयीन असताना तिला मिळणारे हे पैसे शिक्षण, व्यवसाय किंवा लग्नाचे वय झाल्यानंतर तिच्या लग्नासाठीदेखील वापरण्यास स्वतंत्र असणार आहे. याचाच अर्थ तिच्यावर हे पैसे कधी वापरावेत याचे बंधन असणार नाही. 

जेनेक्सचे संस्थापक पंकज गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही दीड लाख नेटवर्क पार्टनरांसोबत मिळून या योजना तयार केली आहे. आम्हाला याचा अभिमान वाटत आहे. पुढील पिढी स्वावलंबी आणि स्वतंत्र बनविण्याच्या दिशेने हे एक छोटेसे पाऊल आहे. कंपनीने यासाठी कोणतीही परकीय किंवा परदेशातून मदत घेतलेली नाही, तसेच आम्ही विविध योजनांतील सदस्यांकडूनही पैसे घेतलेले नाहीत. 

शोधांच्या जगात नुकताच एक शोध लागला आहे. तो आहे एका अत्याधुनिक डिव्हाईसच्या बाबतीत. ऑस्ट्रियामधील स्टार्टअप(Good news) सॉफ्टवेअर कंपनी मोटोबिटने वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर एक अनोखे  यंत्र डिझाइन केले आहे. हे डिव्हाइस(Good news) विशेषत: मोटारसायकल स्वारांसाठी डिझाइन केलेले आहे. हे डिव्हाइस कंपनीमार्गे वाहन चालविणार्‍या व्यक्तीशी ऑनरोड कम्युनिकेट करेल. डिव्हाइसच्या मदतीने, वाहनचालकांचे लक्ष रस्त्यावर आणि वाहनांच्या वेगावर असेल. या डिव्हाइसला ‘ सेंटिनेल’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या, हे डिव्हाइस क्राऊडफंडिंग वेबसाइटवर १२८ डॉलर (सुमारे ९,५०० रुपये) मध्ये बुक केले जाऊ शकते.
सेंटिनेल स्मार्टफोनद्वारे केले जाऊ शकते  कनेक्टमोटरसायकल ड्रायव्हर्स ब्लूटूथद्वारे सेंटिनेलला त्यांच्या स्मार्टफोनशी कनेक्ट देखील करू शकतात. रस्त्यावर मोटरसायकल चालविताना हे डिव्हाइस ड्रायव्हरला सतर्क ठेवते. मोटरसायकल चालक त्यांच्या मनगटात किंवा पट्ट्यातही ‘सेंटिनेल’ बसवू शकतात. सेंटिनेल मोटरसायकल चालकांच्या वर्तनाचे विश्लेषण देखील  करते. डिव्हाइस चालक हायस्पीडमध्ये  असताना वेग कमी करण्याचे संकेतही त्यांना देतात.

आपत्कालीन सेवांना अपघाताचा संदेशही पाठवेलस्टार्टअप कंपनी मोटोबिटच्या म्हणण्यानुसार, मनगटावर डिव्हाइस परिधान केल्याने मोठे रस्ते अपघात टाळता येऊ शकतात. दरम्यान, मोटोबिटने ऑडिओ किंवा व्हिज्युअल सूचनाऐवजी मोटारसायकल चालकांशी संवाद साधण्याच्या मार्गाने हॅप्टिक फीडबॅक वापरणे निवडले आहे. या डिव्हाइसच्या मदतीने एखादा रस्ता अपघात झाल्यास आपत्कालीन सेवांसाठी शक्य तितक्या लवकर संदेश देखील पाठविला जाऊ शकतो.
डिव्हाइसमध्ये उपलब्ध करून देण्यात आला  ग्रुप राइडिंग मोडसेंटिनेलमध्ये ग्रुप राइडिंग मोड देखील आहे.  सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, मित्रांचा एक ग्रुप या डिव्हाइसच्या सहाय्याने एकमेकांशी योग्य आणि सुरक्षित अंतर निश्चित करून मोटारसायकल चालविताना प्रवासाचा आनंद घेऊ शकता. दरम्यान,   सेंटीनल  तयार करण्यासाठी दोन वर्षे संशोधन करावे लागले. यानंतर, हे एक उत्तम साधन बनले. अशी अपेक्षा आहे की २०२२ मध्ये भारतात याची पहिली शिपमेंट येईल.

गायीच्या शेणाचा आश्र्चर्यकारक शोध बघू. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी काही दिवसांपूर्वी गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च केली. या चिपमुळे मोबाईलमधून पसरणारे रेडिएशन कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. कथिरिया यांनी ‘कामधेनू दीपावली अभियाना’ची घोषणा केली. यावेळी त्यांनी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली अनेक उत्पादनं लॉन्च केली होती. मात्र आता तब्बल सहाशे शास्त्रज्ञ आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी कामधेनु आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांना पत्र लिहून त्यांचा हा दावा सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. 
‘इंडिया मार्च फॉर सायन्स’ने या संदर्भात वैज्ञानिक प्रयोग केव्हा आणि कोठे झाले आहेत? तसेच या संधोधनातील प्रमुख संशोधक कोण होते? या बाबतची माहिती मागितली आहे. यासोबतच गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या चिपबाबत करण्यात आलेल्या अभ्यासाबाबतचे परिणाम कोठे प्रसिद्ध झाले या प्रश्नाचे उत्तर देखील इंडिया मार्च फॉर सायन्सने मागितले आहे. उत्पादनं लॉन्च करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कथिरिया यांनी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या चिपचे फायदे सांगितले होते.
 गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च झाल्यानंतर मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा केला गेला आहे. गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली चिप तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण अतिशय कमी होतं. तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असल्यास ही चिप अतिशय प्रभावी ठरेल” असं कथिरिया यांनी सांगितलं आहे. या चिपला गौसत्व कवच असं नाव देण्यात आलं असून त्याची निर्मिती राजकोटमधील श्रीजी गौशाळेकडून केली जाते. राष्ट्रीय कामधेनू आयोग केंद्रीय मत्सोत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. 
गेल्या वर्षी सहा फेब्रुवारीला आयोगाची स्थापना करण्यात आली. गाय आणि गोवंश संरक्षण, संवर्धन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन करण्यात आला. याबद्दलची घोषणा  २०१९-२० साठीच्या अर्थसंकल्पात केली गेली. कथिरिया यांनी अभिनेता अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वी गोमूत्राबद्दल केलेल्या विधानाकडे लक्ष वेधलं होतं. ‘मी दररोज गोमूत्र प्राशन करतो, असं अक्षय कुमारनं म्हटलं होतं, हे कदाचित तुम्हाला आठवत असेल. वैद्यकीय कारणांमुळे गोमूत्र प्राशन करत असल्याचं अक्षय म्हणाला होता,’ असं कथिरिया यांनी सांगितलं. आयुर्वेदिक औषधांचे विविध फायदे आहेत. मात्र आपण ते विसरले आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

गायीवरुन आठवलं! सकाळी देवदर्शन घेऊनच कामाला सुरूवात करणारे अनेक जण असतात. परंतु हीच कृती औरंगाबादेतल्या सोयगाव तालूक्यातील जरंडी  गावातील  एक गाय मागील काही वर्षांपासून नियमितपणे करत आहे. चरायला जाण्यापुर्वी ही गाय नियमितपणे मंदिरात येते आणि देवदर्शन घेते, असे काही गावकऱ्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सातत्याने गायीचे निरिक्षक करणाऱ्या विष्णू वाघ आणि दिलीप गाडेकर या तरूणांनी सांगितले की, जंगलात जाण्यापूर्वी ती गाय कळपातून आधी हनुमानाच्या मंदिरात जाते आणि त्यानंतर पुन्हा कळपात शिरते. ही गाय गावातच मोकाट म्हणून सोडण्यात आली आहे. गावातील गुराखी या गायीला अनेक वर्षांपासून चरायला जंगलात घेवून जात असतो.  
मंदिरात माणसे असतानाही ही गाय मंदिरात शिरते. कुणाला काहीही इजा न करता थेट मुर्तीपाशी जाते. काही सेकंदासाठी मुर्तीजवळ उभी राहते आणि पुन्हा आपल्या मार्गाला निघून जाते, असे ग्रामस्थ म्हणाले.

अशी गुणकारी गाय कुणाला नको असते? आपला देश कृषीप्रधान देश आहे. शेती करीत असतांना पशुपालन आणि संवर्धन केले गेले. माणसाचा जीव पाळीव प्राण्यांत गुंतलेला असतो. मग हे पाळीव प्राणी माणसाळले नाहीत तरच नवल!परंतु काही पाळीव जनावरे जन्मतः च नवलाईची असतात. तेव्हा असे काही घडले की आश्र्चर्य वाटू लागते. असाच काहीसा प्रकार मंचर येथे घडला. ‘राणी’ नावाच्या गायीला एका शेतकऱ्याने तब्बल १ लाख ३१ हजार १११ रुपयांना खरेदी केले. ह्या ‘खरेदी’ची चर्चाच झाली नसती तरच नवल. हौसेला मोल नसते असे म्हणतात तेच खरे. या हौसेपोटीच मग वाट्टेल ती किंमत मोजून आपली आवडीची गोष्ट मिळवली जाते. पण इतर लोक आश्र्चर्य व्यक्त करीत आहेत. 
मंचर येथील शेतकरी गणेश अनंतराव खानदेशे यांच्या राणी नावाच्या गाईला वाघापूर येथील शेतकऱ्याने तब्बल एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपयांना विकत घेतले आहे. वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या या राणी गायीचे सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू असून परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

       पुणे जिल्ह्यातील मंचर येथील गणेश अनंतराव खानदेशे यांच्या गोठ्यातील राणी नावाच्या गायीचं  कौतुक केले जात आहे. त्यांनी पंजाबमधून ऐंशी हजाराला एक गाय खरेदी केली होती. तिला इकडे आल्यानंतर वासरू झाले.मग योग्य व्यवस्थापनातून त्यांनी ह्या गाय वासरांचे उत्कृष्ट संगोपन केले.आठ दिवसात दोन वेळेस २५ लिटर दुध देत आहे.

राणी या गायीचे वजन साडेपाचशे किलो असून तिने ऐंशी किलो वजनाच्या कालवडीला जन्म दिला. ही गाय अतिशय शांत स्वभावाची आहे, रंगाने सफेद ,काळीबांडी, शरिराचा पुढील भाग लहान व मागील भाग मोठा, दोन दाती, कान डोके लहान, सडात योग्य अंतर आहे. कासेची ठेवण गुडघ्याच्या वर,मागील पायाची बाजू सरळ,या इतर सर्व बाबी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने वाशीम, सांगली,कोल्हापूर, जालना, धुळे, नाशिक, सोलापूर, सातारा, नांदेड, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, पुणे या भागातील लोक गाय पाण्यासाठी व खरेदीसाठी आले होते.
महाराष्ट्रात आपल्या वातावरणात तयार झालेली ABS ब्रीडची जास्त दुध देणारी गाय असल्याने दुधाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना देखील या सर्वगुणसंपन्न आंबेगावच्या राणी गायीची उच्चांकी भावाने एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपये रुपयांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक विश्वास रकटे पा.यांनी मंचर येथून खरेदी केली. 
आता सद्याच्या वातावरणात जुन्या नाण्यांची आणि नोटांची नवलाईची बाब समोर आली आहे.  जुनी नाणी, नोटा जपून ठेवायची अनेकांना आवड असते. विविध प्रकारचे कॉईन्स आणि नोटा जमवण्याचा अनेकांना छंद असतो. सध्या पैशाचे व्यवहार करतान  ५०, १००, ५००, २००० च्या नोटा या हमखास वापरल्या जातात. पण पाच आणि दहा रुपयांच्या जुन्या नोटा जास्त वापरल्या जात नाही. नव्या नोटाच सर्वत्र पाहायला मिळतात. मात्र आता अवघ्या दहा रुपयांची जुनी नोट तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देणार आहे. दहा रुपयांची जुनी नोट तब्बल २५ हजार मिळवून देऊ शकते. आता बोला!

सध्या बाजारात दहा रुपयांच्या नव्या नोटा पाहायला मिळतात. मात्र काही वर्षांपूर्वी एका बाजूला अशोकस्तंभ असलेली नोट होती. तसेच तीन तोंडाचा सिंह असलेली नोटही होती. आता हीच नोट तुमचं नशीब चमकवू शकते. या दुर्मिळ नोटेवर  १९४३  मधील भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी आहे. दहा रुपयांच्या या नोटेवर एका बाजुला अशोकस्तंभ तर दुसऱ्या बाजुला नावेचे चित्र आहे. तसेच पाठच्या बाजूला इंग्रजीत 10 Rupees असं लिहिलं आहे. 
जर तुमच्याकडे दहा रुपयांची ही नोट असल्यास ती २५ हजार मिळवून देणार आहे. विशेष म्हणजे घरबसल्या ही नोट ऑनलाईन देखील विकता येणार आहे. इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर या नोटा विकता येणार आहेत. या प्लॅटफॉर्मवर या नोटेला उत्तम किंमत मिळणार आहे. या वेबसाईट्स व्यतिरिक्त कॉईनबाजारवर देखील ही नोट विकता येणार आहे. तिथे जवळपास यासाठी २५ हजार मिळणार आहेत. मात्र यासाठी नोट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यावरून तिची योग्य ती किंमत ठरवली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तुमच्याकडे जुनी नाणी असल्यास तुम्हाला लखपती होण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. तुमच्याकडे २५ पैशांचं खास नाणं असल्यास तुम्ही अगदी घरबसल्या लखपती होऊ शकता. २५ पैशांच्या खास नाण्याला १.५ लाख रुपयांचा दर मिळत आहेत.

तुमच्याकडे असलेल्या २५ पैशांच्या खास नाण्याचा फोटो काढून संकेतस्थळावर अपलोड केल्यास अनेकजण त्यासाठी बोली लावतील. यापैकी कोणालाही तुम्ही नाणं विकू शकता.इंडियामार्टच्या संकेतस्थळावर जुन्या नोटा आणि नाण्यांचा लिलाव सुरू आहे. तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी असल्यास तुम्ही लखपती होऊ शकता. तुमच्याकडे २५ पैशांचं चंदेरी रंगाचं नाणं असल्यास तुम्ही त्याचा लिलाव करू शकता. ते विकून तुम्हाला १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. जर तुमच्याकडे वैष्णो देवीचा फोटो असलेली ५ आणि १० पैशांची नाणी असतील, तर तुम्हाला खूप चांगली रक्कम मिळू शकते.

वैष्णोदेवीचा फोटो असलेली नाणी २००२ मध्ये जारी करण्यात आली. नाण्यांवर वैष्णोदेवीचा फोटो असल्यानं अनेक जण ही नाणी लकी मानतात. बरेच जण या नाण्यांसाठी लाखो रुपये मोजायला तयार आहेत. ब्रिटिश काळातल्या नोटांनादेखील चांगली मागणी आहे. त्यांनाही चांगली किंमत मिळत आहे.अशोक स्तंभ असलेल्या १० रुपयांची नोट आधी चलनात होती. ३ सिंहांचा फोटो असलेली ही नोट आता दुर्मीळ झाली आहे. तुमच्याकडे ही नोट असल्यास तुम्हाला २० ते २५ हजार रुपयांची कमाई करण्याची संधी आहे.

आपल्या देशात कमाईची साधनं कमी आहेत. बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्या आपल्या समोर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे साधनसंपत्ती पुरेशी होत नाही. पावसाच्या लहरीपणामुळे काही पिकत नाही किंवा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. काही पिको अथवा न पिको  आपल्या देशात कितीही उपाययोजना केल्या तरी लोकसंख्येचे पीक मात्र जोमानं येतं. याच महिन्यात १०- १०- २०२० या युनिक तारखेला विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकांचा विवाह मुहूर्त नसल्यामुळे आणि विवाह नोंदणी कार्यालये बंद असल्याने हिरमोड झाला. परंतु शहरातील २८ बालकांनी मात्र ही तारीख बरोबर गाठली आणि १०- १०- २०२० या तारखेला जन्म तब्बल २८ बालकांनी घेतला.
औरंगाबादेतल्या घाटी रूग्णालयात या युनिक तारखेला १८ मुले आणि १० मुलींनी जन्म घेतला. विशेष काही प्लॅनिंग केले नाही, तरी आपले अपत्य या अनोख्या तारखेला जन्मले आहे, याचा अतिशय आनंद झाला, असे पालकांनी सांगितले. अंकशास्त्रानुसारही ६ हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे १०- १०- २०२० या तारखेची बेरीजही ६ येत असल्याने ही तारीख शुभ असल्याचे अंकशास्त्रज्ञांनी सांगितले. आता अंकशास्त्रानुसार आणि त्यानुसार नसतांनाही या देशात प्लॅनिंग करुन अथवा न करता देशभरात कुठे कुठे किती आणि कसे बाळं जन्माला येतील याचा नेम नाही किंवा नियम नाही. कोट्यावधीवर लोकसंख्या असणाऱ्या या देशात भरमसाठ बालके एकाचवेळी जन्माला येत असतील तर त्याचे काही नवल वाटण्यासारखे नाही. 

काही विकृत पद्धतीने जन्माला आले की आपल्याला आश्र्चर्यच वाटते. परंतु म्हशीऐवजी हेल्याने दूध दिले तर आजच्या काळात नवल वाटण्यासारखे काही नाही. कारण कुठे कुठे काय काय घडत आहे. ऐकावे ते नवलच अशा पद्धतीने सगळे काही घडत असते. आता लिंगपरिवर्तनाच्या घटना घडू लागल्या आहेत. समलिंगी लोकांना लग्नाची परवानगी मिळू लागली आहे. याच नवलाईच्या काळात स्रीऐवजी पुरुष बाळंत झाला तर? अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल असे काही मेरठ येथे घडले आहे. मेरठमध्ये एक पुरूष चक्क बाळंत झाला अशी घटना घडली. इतकेच नव्हे तर त्यानं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.  हे कसं शक्य झालं, आश्चर्य वाटून घेतल्यासारखे आहे. पण वरकरणी हा जरी चमत्कार वाटू लागला तरी त्यामागे मोठे वैज्ञानिक कारण आहे. 
पुरूष बाळंत होत नाहीत, हा निसर्गनियम आहे. मात्र मेरठच्या डॉक्टरांनी चमत्कार घडवला. तब्बल अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एका पुरूषाचं बाळंतपण केलं. त्याचं झालं असं की, गुडगावला राहणाऱ्या ममता नावाच्या महिलेला सात वर्षांपासून मुलबाळ नव्हतं. वांझोटेपणाचं जीणं जगणारी ममता उपचारांसाठी मेरठच्या जिंदाल टेस्ट ट्यूब सेंटरमध्ये आली. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की, ममता ही स्त्री नसून, चक्क पुरूष आहे. 
स्त्रियांमध्ये एक्सएक्स गुणसूत्रे असतात, तर पुरूषांमध्ये एक्सवाय. निसर्गाच्या विकृतीमुळं ममताच्या शरीरात एक्सवाय गुणसूत्रं होती. मात्र पुरूषाचं लिंग विकसित झालं नव्हतं. एक अविकसित गर्भाशय मात्र तिच्या शरीरात होतं. तिच्यात कोणतंही स्त्री हार्मोन नव्हतं की तिला मासिक पाळीही येत नव्हती.

 डॉक्टरांपुढं मोठं आव्हान होतं. एखाद्या बाळाला जन्म देण्याएवढं गर्भाशय विकसित करण्यासाठी त्यांनी ममतावर हॉर्मोन्स आणि एंडोक्रिनल उपचार सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि तब्बल ३२ वर्षानंतर ममताला पहिल्यांदा मासिक पाळी आली. त्यानंतर ममताच्या पतीच्या वीर्यातून शुक्राणू घेऊन, टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानानं ते ममताच्या गर्भाशयात सोडण्यात आलं. या प्रक्रियेमध्ये अनंत अडचणी आल्या. मात्र डॉक्टरांच्या या महत्प्रयासांना फळ आलं. गेल्या ६ फेब्रुवारी रोजी ममतानं दोघा जुळ्या मुलांना जन्म दिला.
बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती आता उत्तम आहे. एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिल्यानंतर ममता समाधानी आहे.
एका पुरूष असलेल्या व्यक्तीला महिला बनवणं आणि तिच्यापोटी दोघा बाळांना जन्माला घालणं, याला चमत्कार नाही तर काय म्हणायचं…?

गंगाधर ढवळे ,नांदेड 

संपादकीय

२१.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *