नांदेड :
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि मदतीसाठी राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी फडणवीस यांची परभणी येथे जावून भेट घेतली. यावेळी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांची उपस्थिती होती.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट घेतल्यानंतर नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतक-यांची दयनिय अवस्था आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन, कापूस, उडीद, मुग आणि ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कापून ठेवलेले सोयाबिन पावसाच्या पाण्याने वाहून गेले किंवा पाण्यात कुजले आहे. ज्वारीच्या कणसावर मोड फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे कापूस झडून गेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शेतक-यांना आतापर्यंत कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही. नांदेडसह मराठवाड्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे वाझोटे दौरे होत आहेत. केवळ सहलीप्रमाणे हे दौरे होत असून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करत आहे. त्यामुळे ओळा दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला भाग पाडावे, अशी विनंतीही फडणवीस यांच्याकडे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे ….