◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – वसंत बापट
कविता – सदैव सैनिका पुढेच जायचे
विश्वनाथ वामन बापट (उर्फ वसंत बापट).
जन्म – २५/०७/१९२२ (कऱ्हाड, सातारा).
मृत्ये – १७/०९/२००२ (वर्षे ८०).
वसंत बापट हे कवी, लेखक, बालकवी, पत्रकार, प्राध्यापक होते.
त्यांनी तरूण वयात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यासाठी ऑगस्ट १९४३ ते जानेवारी १९४५ या काळात त्यांना तुरूंगवासही भोगवा लागला.
वसंत बापट मराठी व संस्कृतचे प्राध्यापक होते.
१९८३ ते १९८८ या काळात त्यांनी साधना नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले.
वसंत बापट यांनी सामाजिक विषमता, अन्याय, निसर्ग, श्रुंगार, जनजागृती, विद्रोह अशा विविध विषयांवर कविता केल्या.
इंग्रजी आणि संस्कृत कवितेचा प्रभाव त्यांच्यावर होता.
गुरूदेव टागोर यांच्या कवितेतील मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदतावादी प्रवृत्ती यांचे ठळक संस्कार त्यांच्या कवितेवरती होते.
नादमाधुर्यता, लयबद्धता, गेयता, अलंकार प्रभुत्व, उपरोध, उपहास, नाट्यमयता व विविधांगी शब्दकळा ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये होती.
बिजली, अकरावी दिशा, सकीना, मानसी, अनामिकेचे अभंग आणि इतर कविता, ताणेबाणे, तेजसी, प्रवासाच्या कविता, महोदय, शततारका, रसिया…. असे त्यांचे अनेक उत्तमोत्तम कविता संग्रह प्रकिशित झाले.
चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकविता संग्रह प्रकाशित आहेत.
बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले.
१९९९ मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
युगोस्लाव्हिया येथे आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले.
अमेरीका आणि आखाती देशात त्यांच्या कवितांच्या “काव्यदर्शन” या कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी मिळाली.
वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या तिघांनी सतत ४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कवितांचे कार्यक्रम केले. त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांवर मोहिनी केली होती.
वसंत बापट यांच्या अनेक कविता शालेय अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या अनेक कवितांची सुंदर गीते झाली –
केवळ माझा सह्य कडा…
गगन सदन तेजोमय…
देह मंदिर चित्त मंदिर…
शतकानंतर आज पाहिली…
आभाळाची आम्ही लेकरे…
उत्तुंग आमुची उत्तर सीमा…
सदैव सैनिका पुढेच जायचे…
सैन्य चालले पुढे…
वसंत बापट यांच्या अशा अनेक रचना आजही आपल्या मनामनात आहेत.
वसंत बापट यांची “सदैव सैनिका पुढेच जायचे” ही खूप गाजलेली कविता शालेय अभ्यासक्रमात होती. शब्द आणि लय सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या या कवितेने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले. तालासुरात मोठ्याने सादर करताना या कवितेची एक वेगळीच गंमत आहे.
प्रथमदर्शनी सीमेवरच्या सैनिकाला उद्देशून ही कविता लिहिल्यासारखे वाटते…
तर आपलं आयुष्य म्हणजे रणांगण आहे. आणि आपण या रणांगणातले शूर सैनिक आहोत, अशी कल्पना करून वसंत बापट आपल्याला जीवनात सतत पुढे जायचं आहे, मागे वळून न पाहता सतत प्रगती करायची आहे, यशस्वी व्हायचं आहे, असा संदेश देताना दिसतात.
या जीवनपथावर अनेक संकटे येतील, अनेक प्रलोभने दिसतील, अनेक अडचणी, अडथळे येतील पण या सर्वांवर मात करीत तुला यशस्वी व्हायचं आहे. याबद्दल आश्वस्थ करतात.
जगात सर्वत्र शांतता नांदेल, सुख सौख्य होईल, तोपर्यंत तू मागे हटू नकोस, सतत प्रयत्न करीत रहा असा मोलाचा संदेश देतात.
या कवितेत आपल्या अजून काही वेगळा अर्थ सापडतो का हे पहा…
सदैव सैनिका पुढेच जायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे ||धृ.||
सदा तुझ्या पुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मध्येच या विजा भयाण हासती
दहा दिशातुनी तुफान व्हायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||१||
प्रलोभने तुला न लोभ दाविती
न मोहबंधने पदास बांधती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो गजान्त वैभवी
न दैन्य हे तुझे कधी सरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||२||
वसंत वा शरद् तुला न ती क्षिती
नभात सुर्य वा असो निशापती
विदीर्ण वस्त्र हो मलिन पावले
तरी न पाय हे कधी विसावले
न लोचनां तुवां सुखें मिटायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||३||
नभात सैनिका प्रभात येऊ दे
खगांसवे जगा सुखात गाउ दे
फुलाफुलावरी सुवर्ण शोभु दे
जगास शांतता सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||३||
-वसंत बापट
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/