नांदेड,दि.21-
मराठवाड्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढग फुटी झाली. त्यामुळे खरीप पिकांचा हातातोंडासी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व त्या सोबतच मराठवाड्यातील रस्ते आणि पूल यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौर्यावर आले होते. यावेळी तुळजापूर येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजीमंत्री बस्वराज पाटील, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री सिध्दराम मेहेत्रे, आ.धीरज देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा यात समावेश होता.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस पक्षानी असे म्हटले आहे की, सोयाबीन पीक कापणीस आले असताना अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक नदीनाल्यांना पूर आला. शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी साचले. सोयाबीनसह ऊस,बाजरी, मका, सूर्यफूल, कांदे व फळभाज्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे अनेक रस्ते, रस्त्यावरील पूल वाहून गेले किंवा उखडल्या गेले. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण येत आहे. अनेक गावांमधील पाझर तलाव, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. मराठवाड्याला या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
यासाठी शासनाने शेतकर्यांना प्रति हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी, अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्या शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, फळबागांसाठी वेगळे पॅकेज द्यावे, शेतकर्यांचे वीज बील माफ करण्यात यावे, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे, पूरग्रस्त शेतकर्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.