नाथाभाऊंचे अखेर सीमोल्लंघन

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या खदखदीनंतर नाथाभाऊंनी सीमोल्लंघन केलंच! गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती काल संपुष्टात आली. बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम मुंबईच्या पक्षकार्यालयात काल संपन्न झाला. ‌त्यांना पक्षाचा गमचा देऊन स्वागत केले. एकनाथ खडसे यांच्या सोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, बोदवडचे कृउबा सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदा खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी,औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

४० वर्ष भाजपासोबत असलेले ओबीसी नेते म्हणून ओळख असणारे एकनाथ खडसेंनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली, खडसे काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, आगामी काळात एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्यातील राजकारणात किती परिणाम होतील ते पाहायला मिळेल, मात्र सध्या तरी बिहार विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या भाजपातून जाण्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. बिहारमधील महायुती खडसे यांच्या जाण्याने भाजपाची ओबीसी विरोधी प्रतिमा म्हणून निर्माण करण्याची तयारी करत आहे. आरजेडीचे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी सांगितले की, गेल्या ६ वर्षांपासून भाजपाकडून एकनाथ खडसेंचा छळ केला जात होता, कारण ते ओबीसी समाजातील आहेत. खडसे यांनी भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. महत्त्वाचे म्हणजे खडसे हे केवळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जात नव्हते तर ते महाजन-मुंडे गटाचे खंदे समर्थकही होते.  महाजन-मुंडे या जोडीने महाराष्ट्रात भाजपाला मोठी ताकद दिली होती असं ते म्हणाले.

एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केल्यानंतर आता बिहारमध्ये विरोधी पक्ष हा मुद्दा जोरदार उचलून धरणार आहे.  भाजपामध्ये मागासवर्गीयांचा सन्मान केला जात नाही तर जुन्या नेत्यांचा आदरही राखला जात नाही असा प्रचार भाजपाच्या विरोधात केला जाणार आहे. ज्यांनी भाजपाला कष्ट करून मोठे केले आता पक्ष त्यांना बाजूला ठेवत आहे. या माध्यमातून बिहारमधील जुन्या नेत्यांच्या समर्थकांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांचा समावेश आहे ज्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे बिहार निवडणुकीत विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुती निवडणूक सभा आणि जनसंपर्कातून भाजपाविरोधी प्रचार करणार आहे. एकनाथ खडसेंची सोडचिठ्ठी असो वा यशवंत सिन्हा, या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्या जातील असं राजदच्या नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु एकनाथ खडसे यांच्या जाण्याने बिहार निवडणुकीत मोठा फरक पडणार नाही आणि विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, म्हणून या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे.

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला. एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

२०१६ मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या मुद्दयावर खडसे यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक ५२/२अ/२ मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांच्या नावानं खरेदी केला होता. हा भूखंड त्यांनी तीन कोटी ७५ लाख रुपयांना अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केला होता, तर त्याची त्यावेळची बाजार भावाची किंमत चाळीस कोटी इतकी होती असं सांगितलं जात होतं.

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी ३७ लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसंच त्यांच्या या निर्णयामुळे शासनाचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये ३० मे २०१६ ला तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.

लाचलुचपत विभागाकडून खडसेंना क्लीनचिट दिली गेली.
हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्यानं गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयानं गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते. एप्रिल २०१७ मध्ये लाचलुचपत विभागानं एकनाथ खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि अब्बास उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. चौकशीनंतर एप्रिल २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागानं पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट दिली. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कुठलंही नुकसान झालं नाही, असं लाचलुचपत विभागानं त्या अहवालात म्हटलं होतं.
‘आरोपांमध्ये तथ्य नाही’ अशी लाचलुचपत विभागानं क्लीनचिट दिल्यानंतर खडसे यांनी त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं, “दोन वर्षं माझ्यावर एकप्रकारे मीडिया ट्रायल केली गेली. माझ्यावरील आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. पण या काळात माझे मित्र कोण आणि शत्रू कोण हे मला समजलं. पक्षासाठी मी झटलो असताना जे माझ्याविरोधात गेले त्यांच्याबाबत आता मला काही बोलायचे नाही.”

पुण्याच्या सत्र न्यायालयात भूखंड खटला प्रलंबित
लाचलुचपत विभागानं खडसे यांना क्लीनचिट दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला यात तक्रारदार करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. दमानिया यांनी पूर्वीच लाचलुचपत विभागाला खडसेंच्या या कथित गैरव्यवहाराची तक्रार दिली होती. पण, त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यानंतर लाचलुचपत विभागाने खडसेंना क्लीनचिट दिल्यानं आपल्याला देखील तक्रारदार करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा दाखला दिला. यानंतर न्यायालयानं त्यांना या खटल्यात तक्रारदार केलं. याबाबतचा खटला सध्या पुण्यातील सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.

लाचलुचपत विभागानं खडसे यांना क्लिनचिट दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी अॅड. असिम सरोदे यांच्या माध्यमातून आपल्याला या खटल्यात तक्रारदार करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. “हेमंत गावंडे यांच्यापूर्वी अंजली दमानिया यांनी खडसेंच्या घोटाळ्याबाबत कागदपत्रांसोबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पण, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती. लाचलुचपत विभागानं न्यायालयात खडसेंना क्लीनचिट दिली. त्यानंतर गावंडे या अहवालाबाबत न्यायालयात हरकत घेणार नाहीत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही कोर्टाला आमची तक्रार निदर्शनास आणून दिली. तसंच एखाद्या आर्थिक घोटाळ्याच्या खटल्यात कोणीही सामान्य व्यक्ती लाचलुचपत विभागाच्या चौकशी अहवालाच्या विरोधात याचिका दाखल करू शकते, हे सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या उदाहरणाने दाखवून देण्यात आलं.

“त्यानंतर या प्रकरणी दमानिया यांना तक्रारदार करण्यात आलं. या खटल्याची सुनावणी सध्या पुण्यातील सत्र न्यायालयात सुरू आहे. दमानिया यांनी खटल्याबाबतचे विविध पुरावे लाचलुचपत विभागाला दिले होते. पण, तरीही खडसे यांना लाचलुचपत विभागाने क्लिनचिट दिली होती. पण, चौकशीची मागणी केली नसताना माझा राजीनामा घेतला गेला, असं खडसेंनी म्हटलं.
भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत खडसे म्हणाले, “माझ्या चौकशीची तसंच राजीनाम्याची मागणी कुठल्याही पक्षाने केली नव्हती.”
चौकशीची मागणी नसताना माझा राजीनामा घेतला गेला. मी पक्षासाठी चाळीस वर्षं काम केलं. मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे, आणि त्यांच्यामुळे मी राजीनामा दिला आहे. माझ्यासमाोर एक बोलायचे आणि पोलिसांना वेगळे सांगायचे असे प्रकार झाले. त्यामुळे मला चार वर्षं मानसिक त्रास झाला. माझा काय गुन्हा आहे हे मला पक्षाने सांगावा मी राजकारणच सोडेन.”

खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील म्हणाले की, कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने आले आहेत त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचं पालन कुठेतरी कमी पडलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मागील ४-५ वर्षात असा बदल झाला की पहिल्या रांगेत बसणाऱ्या नेत्याला मागच्या रांगेत बसावं लागलं असं राजकारण झालं, एकनाथ खडसेंवर जो अन्याय झाला त्यावर सगळ्यात जास्त मीच बोललो असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाचं राजकारण कधीही ऐकलं नव्हतं. विरोधी पक्षात असला तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यायचो. राज्यात सुसंस्कृत राजकारण करायचं हे यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं, पण मागच्या कालखंडात कुठेतरी राज्यातलं राजकारण बदललं, लोकसभा निवडणुकीत मोठा फटका राष्ट्रवादीला बसला, विधानसभा निवडणुकीवेळी भलेभले नेते, ज्यांच्यावर शरद पवारांनी विश्वास ठेवला ती माणसं आम्हाला सोडून दिली. मात्र राज्याच्या राजकारणात शरद पवारांचे विचारच जनता स्वीकारेल हा ठाम विश्वास आम्हाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अनेक घटना सगळ्यांसमोर आहे. वयाच्या ७९ व्या वर्षीही शरद पवार राज्यभर फिरले, तरुण कार्यकर्ते खवळून उठला होता. शरद पवारांना सुडबुद्धीने ईडीची नोटीस पाठवली, त्यातून आताच्या सरकारचा पाया रचला गेला असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. सभागृहात विचारलं होतं कटप्पाने बाहुबली को क्युं मारा? सगळे त्यावेळी हसले होते. पण आजही ते (फडणवीस) टीव्ही बघत असतील. आता त्यांना कळलं असेल टायगर अभी जिंदा है आणि पिक्चर अभी बाकी है..”

आता जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ५-६ आमदार निवडून येतील याचा विश्वास वाटू लागला आहे. गेल्या ४० वर्षापासून एकनाथ खडसेंनी अनेकांना न्याय मिळवून दिला. विकासाची दृष्टी असणारे, प्रशासनावर वचक असणारा नेता राष्ट्रवादी आले त्याचा आनंद आहे. एकनाथ खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल. जळगाव जिल्ह्यातून किमान ५-६ आमदार एकनाथ खडसेंमुळे निवडून येईल असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी एकनाथ खडसे म्हणाले, मला विधानसभा निवडणुकीवेळी खूप त्रास देण्यात आला. मी काय गुन्हा केला म्हणून मला छळण्यात आलं, हे मी विचारत होतो, पण ते मला आतापर्यंत सांगण्यात आलं नाही. तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, असं जयंत पाटील मला म्हणाले. तर मी जयंत पाटील यांना म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सीडी काय प्रकरण आहे ते. ज्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करेल. भाजप ज्या वेगानं वाढलं, त्याच्या दुप्पट वेगानं मी राष्ट्रवादी वाढवून दाखवेल. मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर होती. पण, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादीमध्ये जा म्हणून सांगितलं. जळगावमध्ये पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल. आतापर्यंतच सगळ्यांत मोठा कार्यक्रम होईल. जळगावमधील सगळ्यात मोठं ग्राऊंड ओतप्रोत भरून दाखवेल. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी तुम्हाला सांगतो. जर शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असती.

गेल्या ४० वर्षांपासून भाजपमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजप पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षात बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे बाहेर पडत असल्याचे खडसेंनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

‘माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ दाखल केला. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते , असा धक्कादायक खुलासा खडसेंनी केला. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली.

‘भारतीय जनता पक्षाचे चाळीस वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही.  मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला होता, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकशी झाल्या’ असं खडसे यांनी सांगितले. इतक्या दिवसांपासून खूप अत्याचार सहन केले. माझ्या चौकशीची मागणी कुणीही केली नाही. विधिमंडळातील रेकॉर्ड काढावे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला. त्यानंतर मी चारवर्ष काढले. पण, मला काय मिळाले काही नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली होती. एखाद्या मंत्र्याच्या पीएवर अशी पाळत ठेवणे हे धक्कादायक आहे. अशी माहिती विधानसभेत देण्यात आली आहे, असंही खडसे म्हणाले. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप युती तोडण्याची माझी भूमिका नव्हती. युती तोडण्याचा निर्णय हा सर्वांनी मिळून घेतला होता. विरोधी पक्ष नेता असल्यामुळे मला फक्त घोषणा करावी लागली होती.

जळगाव जिल्हा हा गांधी – नेहरूंच्या विचारांचा जिल्हा होता. या जिल्ह्यावर काँग्रेसची सत्ता होती. पण नव्या पिढीच्या लोक एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे गेले. संपूर्ण जिल्ह्यातला सर्वांत प्रभावी नेता ते ठरले. एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद वाढेल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या टीव्हीवर येत आहेत पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ते काही दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. एकनाथ खडसे यांनी कोणतेही पद मागितले नाही. ते म्हणाले माझी कसलीही अपेक्षा नाही. हे शरद पवार यांच्या भाषणातील काही मुद्दे आहेत.

‘बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा हे विधान भोवलं’
याआधी, “बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे या माझ्या वक्तव्यानंतर जे घडले ते सगळ्यांनी पाहिलं,” अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. आपल्या राजीनाम्यासाठी सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही खडसे यांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, “एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो…अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं. गेल्या काही काळात एकनाथ खडसेंनी सातत्याने जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका करत होते.

माझी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मला खूप त्रास दिला गेला. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडतोय,’ असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप सोडत असल्याची घोषणा केली होती. तसेच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडण्यामागची कारणं आणि आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेवेळी खडसे म्हणाले “माझ्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आले, जर मी त्यातून बाहेर पडलो नसतो तर ३ वर्षे जेलमध्ये गेलो असतो. किती आरोप सहन करायचे? मला खूप त्रास दिला गेला. गेली चार वर्षे मानसिक तणावाखाली जगलो.” आपली सर्व सहनशक्ती संपल्याच खडसे यांनी म्हटलं. मी लाचार, कोणाचे पाय चाटत बसणाऱ्यांपैकी मी नाही. मला पद मिळालं, मी मेहनत केली. तुमच्या उपकारांमुळे पद नाही मिळालं. खडसे यांच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे मात्र पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं‌ आहे.

खडसे पक्ष सोडणार नाहीत असं शेवटपर्यंत वाटत होतं’
” खडसेंनी जे आरोप केले होते, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे खडसे यांच्यावर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं हे तेच सांगू शकतात,” अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या राजीनाम्याबाबत व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, अगदी त्यांनी पत्रकार परिषद घेईपर्यंत मला आशा होती की, ते पक्ष सोडणार नाहीत. पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे. ते ज्या पक्षात जात आहेत, तिथे त्यांनी समाजपयोगी काम करावं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

“एकनाथ खडसेंनी शरद पवार किंवा राष्ट्रवादीवर आरोप केले होते, हे खरं आहे. पण एक लक्षात घ्यायला हवं की, ते तेव्हा विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याचं कामच आहे हे. सरकारमध्ये जर एखादी गोष्ट चुकीची वाटली, एखादी व्यक्ती चुकीची वाटली तर ते बोलणारच,” असं म्हणत एकनाथ खडसेंनी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेबद्दल छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

भुजबळांनी त्यासंदर्भात स्वतःचंही उदाहरण दिलं. “मी स्वतः शिवसेनेत होतो. मी पण शरद पवारांविरोधात ‘भूखंडाचं श्रीखंड’ वगैरे कोलाहल केला होता. पण त्यांना हे कळत होतं की, विरोधी पक्षातला माणूस त्याचं काम करत आहे. त्यासाठी आयुष्यभर कटुता वगैरे ठेवण्यात अर्थ नाही.”

आपलं उदाहरण देऊन भुजबळ यांनी म्हटलं की, “आता जर खडसेंचा विचार त्यांचा विचार बदलला असेल किंवा आपली भूमिका त्यांना पटत असेल, ते बरोबर येऊन पक्षाची ताकद वाढत असेल तर सोबत घ्यायला काय हरकत आहे?”

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच सांगितलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचं स्वागत केलं आहे.

खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असंही पाटील यांनी म्हटलंय. खडसे यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याचं पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असं जयंत पाटील यांनीच जाहीर केलं होतं. भाजपचे काही आमदारही राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. ते कोरोनाचा काळ संपल्यानंतर येतील असं पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. आता फक्त खडसेंनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल.

महाआघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त काळ चालेल, तसंच आठ ते दहा दिवसात भाजपच्या तीन ते चार मोठ्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे, तेही पक्षात यायला उत्सुक आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने मी आनंदी असून पक्षास यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षातील माझ्या सारख्या तरुणांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समवेत आयुष्यातील मोठा काळ घालवत पक्षाला बळ दिले,  अनेक आमदार – खासदार निवडून आले, पक्ष संघटन वाढवले परंतु त्यांच्या सारख्या लोकनेत्यावर भाजपने व्यक्तिगत व राजकीय असा दुहेरी अन्याय केला व तो अजिबात योग्य नव्हता हे त्यांनी सांगितलं.

सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून नाथाभाऊंची ओळख असून त्यांच्या पूर्वीच्या पक्षात असताना मी त्यांच्या सोबत काम देखील केलेले आहे. चाळीस वर्षांपेक्षा प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्द असलेल्या नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने पक्षाला नक्कीच बळ मिळेल तसेच माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या या अनुभवाचा फायदा होईल असं मतही मुंडे यांनी व्यक्त केलं.

खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपचा खान्देशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  वडिलांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू असल्यामुळे मी परळीत आहे, अन्यथा मी सुद्धा नाथाभाऊंच्या स्वागत सोहळ्यास व्यक्तिशः उपस्थित राहिलो असतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय  एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा.खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो असंही अजित पवारांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

“पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, खडसेंसारख्या नेत्याने पक्षाची चाळीस वर्षें सेवा केली आहे. त्यांनी जाऊ नये असं मला सतत वाटायचं,” अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. “हे धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांच्या मनात खंत होती, माझ्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटायचं, तो चर्चेतून संपेल असं वाटायचं,”

“आम्ही बिलकुल कमी पडलो नाही, त्यांच्याबाबतच्या तीन बाबी कोर्टात आहेत, त्यामुळे पक्ष त्यांच्याबाबत निर्णय घेऊ शकत नव्हता, आता त्यांनी दिल्याघरी सुखी रहावं,” असं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय हा खडसेंना त्यांच्या स्वत:साठीच अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भाजप सोडायला नको होता. ज्या पक्षाने त्यांच्यावर टीका केली भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच पक्षात ते गेले हे सगळं टाळता आलं असतं असं मतही त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.

रावसाहेब दानवे म्हणाले, राजकारणात जरा धीर धरावा लागतो. काही काळ जावू द्यावा लागतो. खडसेंच्या बाबतीत भाजपमध्ये मतभेद नव्हते. सगळ्यांनाच ते राहावे असंच वाटत होतं. मात्र काही गोष्टी या न्यायप्रविष्ट होत्या. ४० वर्षे त्यांनी पक्षाचं काम केलं. तळातल्या कार्यकर्त्यापासून ते विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री असा त्यांचा प्रवास झाला त्यामुळे त्यांच्या जाण्याने दु:खच झालं.

मात्र ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षानेच त्यांच्यावर टीका केली होती. खडसे थोडे थांबले असते तर सगळं निस्तरता आलं आलं असतं. मात्र तसं झालं नाही. आता दिल्या घरी त्यांनी सुखी राहावे. ते तिकडे गेले असले तरी ते आमचे मित्र आहेत असंही दानवे यांनी सांगितलं

एकनाथ खडसे यांचा राजीनामा मिळाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय आधीच घेतला होता. भाजपकडे त्यांना शुभेच्छा देण्यावाचून भाजपकडे पर्यायही शिल्लक नव्हता. आता खडसे तर राष्ट्रवादीत आलेच आहेत, त्यांचे जोरदार स्वागतही झाले आहे. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटात सद्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. यानंतर काय राजकीय घडामोडी होतील. पुढील राजकारणाची काय बेरीज, वजाबाकी वा समीकरणे ठरतील, हे लवकरच कळेल.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२४.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *