सहा टक्के मध्ये तुम्हाला किती वाटा हवा ?

यांचे चेहरे बघा आणि सांगा..

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर अभियान
•••

महाराष्ट्राच्या निर्मिती पासून सत्तेवर कुंडली मारून बसलेला प्रस्थापित मराठा समाज ६० वर्षानंतरही घराणेशाहीच्या पलीकडे बघायला तयार नाही. सत्तेसाठी मराठा – कुणबी एक म्हणून बोंब मारायची आणि सत्ता मिळताच स्वतःच्या गरीब मराठा समाजाकडे देखील ढुंकून बघायचं नाही, ही त्यांची आजवरची निती राहिली आहे. मग ओबीसी समाजाचा – ओबीसी मधील कुणबी समाजाचा काय संबंध ? इकडे आमचा गरीब कुणबी शेतकरी आत्महत्या करतो आणि हे त्यातही राजकारण करतात. त्याची संख्या मराठा शेतकरी मोजून दिशाभूल करतात. मराठा समाजाची संख्या ३२ टक्के सांगतात. मग तेली, कुणबी, माळी कुठं गेलेत ? ते काय एकूण ८/१० टक्केच आहेत का ? एकीकडे सांगतात, आम्ही ५२ टक्यामध्येच आहोत.

मित्रांनो, का अशी दिशाभूल करता ? कोकणा मधील कुणबी समाजाची काय अवस्था आहे, तुम्हाला माहीत नाही का ? आमच्या विदर्भात येवून बघा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा सारख्या भागात जाऊन बघा.. खरा कुणबी असलेल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे..! त्यांच्या अंगावरच्या कपड्यांना किती ठिगळं आहेत ? त्याच्या पायात चपला आहेत की नाहीत ? त्याच्या पोरांचं फाटकं दप्तर बघा. आमच्या आया बहिणींच्या अंगावरच्या लुगड्यांना कशा गाठी असतात, तेही बघा..! वयाच्या ३५/४० व्या वर्षातच खोलात गेलेले गाल बघा. वाकलेला बांधा बघा. खपाटीला गेलेलं पोट बघा.. आणि मग ठरवा माझ्या मराठा नेत्यांनो, खरंच आमच्याशी तुमचं नातं आहे का ? आमचा विदर्भातला कुणबी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतो, तेव्हा तुमचं मराठा नेतृत्व किती वेळा मदतीला धावून आलं ? तुमच्या कोंबड्या मेल्या तरी रातोरात सरकारी पॅकेज जाहीर करणारे तुम्ही लोक, आमच्या शेतकऱ्यांच्या साठी मात्र गप्प राहता ! त्याच्यासाठी काय दिलं त्याचे आकडे पण येवू द्या बाहेर एकदा ! तेव्हा तुमचं कुणब्याशी काहीही नातं नसते.. आणि आरक्षण मिळावं म्हणून मात्र कुणब्यांची संख्या मराठे म्हणून सांगता ! वा.. नेते.. वा ! मानलं तुम्हाला !

सत्ता तुमची, फसवे आयोग तुमचे, खोटी आकडेवारी तुमची, अहवालही तुमचेच आणि रातोरात आरक्षणही तुम्हालाच ! वा ! क्या बात है !

आता पुन्हा न्यायालयाने तुमचं आरक्षण बाजूला ठेवताच, तुम्ही मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी मध्ये घ्या, म्हणून दबाव टाकता ? तुमच्या १२/१४ टक्के विद्यार्थ्यांच्या हितासाठी ( तोही निर्णय वादग्रस्त असताना..) आमच्या ८६ टक्के विद्यार्थ्यांच्या मानेवर बिनधास्त सुरी चालवता ? गरिब पोरांच्या पाठीत बेधडक खंजीर खुपसता ? आणि वरून पुन्हा शिवाजी महाराजांचा वारसा पण सांगता ? जिजाऊंचा जयजयकार करता ? वा ! राजे वा ! तुम्ही खरंच पराक्रमी आहात ! कारण सत्ताच तुमच्या हातात आहे ! आमच्यातले काही घरभेदी तुमची चाकरी करून समाजाला तुमच्या कळपात आणून सोडण्याच्या कामी आधीच लागले होते. आता पुन्हा तुम्ही त्यांची रसद वाढवा. जोरात कामाला लावा ! चालू द्या.. जोरात ! तुमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, दलाल पण आहेत, तेव्हा दिशाभूल करण्याचे सोहळे आणखी जोरात आयोजित करा !

पण मला एक समजत नाही,
• तुम्ही जर ५२ टक्यामधे आहात, तुम्ही जर कुणबी आहात.. तर मग कुणब्यांना तर मंडल आयोगाने आरक्षण दिलेच आहे ? मग पुन्हा वेगळे मागण्याची गरज का ?
• जर तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, तर तुम्हाला पुन्हा मोर्चे काढण्याची गरज काय ?
• किंवा खरे कुणबी तर आरक्षणात आधीच आहेत. मग तुमचे प्रकरण नेमके काय आहे ?

• ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याला तुम्ही सहकार्य का करत नाही. त्याला तुमचा विरोध का ? खरे आकडे बाहेर आल्यामुळे तुम्हाला काही अडचण होणार आहे का ?

बंधुंनो, तुम्ही आमचं काहीही ऐकणार नाही, आमची स्वतंत्र जनगणना व्हावी, यासाठी मदत करणार नाही, ओबीसी मध्ये घुसून त्यांच्या आरक्षणावर अतिक्रमण करतांना तुम्ही जराही विचार करणार नाही, याची साक्ष आजवरचा इतिहास देतो आहे. आम्ही म्हणायचं, तुम्हाला पण आरक्षण मिळायला हवं, आणि तुम्ही म्हणायचं, आम्हाला मिळणार नसेल, तर सर्वांचं आरक्षण रद्द करा. आम्हाला नाही, तर कुणालाच नाही ! ग्रेटच ! तुमचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत !

.. आणि म्हणूनच लोकजागर अभियान तर्फे आम्ही ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरुवात १८ ऑक्टोबर पासून केलेली आहे. आमची जनगणना, आम्हीच करणार असा निर्धार करून आमचे सत्याग्रही महाराष्ट्राच्या विविध भागात घरोघरी जात आहेत. जनगणना करत आहेत. लोकांचाही त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. जनगणना करतानाचे फोटो आमच्याकडे पाठवत आहेत.

कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या सारख्या भागातील ते फोटो मी पाहिले.. आणि मन सुन्न झालं..! एकदा तुम्ही पण आमच्या लोकांचे चेहरे बघा, म्हणजे खरा ओबीसी कसा दिसतो हे तुम्हाला समजून येईल. त्यांचे कपडे, घरं, मुलं, बायका, संसार.. सारं एकदा नीट बघा ! जात म्हणून बघू नका.. माणूस म्हणून बघा ! आणि मग सांगा, खरंच तुम्ही या ओबीसी मध्ये येता का ? विचारपूर्वक सांगा.. खरंच आहे का आमच्याशी नातं ?

तुमचे मोर्चे पण आठवा. तुमचा मोर्चातील थाट आठवा. मोर्चातील श्रीमंती आठवा..! कपडे, दागिणे, गाड्या.. जाऊ द्या ! मी माझ्या समाजाच्या, चेहऱ्या बद्दल बोललो, तुमच्या बद्दल बोलणार नाही..! पण एकदा तुमचेही फोटो बघून घ्या.. आणि मग सांगा..

आमच्या ५२ टक्के ओबीसींना मिळणाऱ्या ६ टक्के आरक्षणात तुम्हाला नेमका किती वाटा हवा..?

आम्ही तुमची वाट बघू..शेवटी सरकारही तुमचंच आणि निर्णयही तुमच्याच हातात..!!

तूर्तास एवढंच..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *