या महाराष्ट्राच्या भुमिचा इतिहास आजचा नसून हजारो वर्षापासूनचा राहिलेला आहे.तेंव्हापासून आजतागायत ही भुमी अढळ ताऱ्याप्रमाणे आपले स्थान टिकवून आहे.या मातीला अश्मयुगीन काळापासून स्वतःची अशी ओळख आहे.बोद्धकाळात ‘मरहठ’ असा उल्लेख केलेला आढळून येतो.अशा बऱ्याच ऐतिहासिक तथ्यावरुन महाराष्ट्र निर्मितीचा अभ्यास आपणास करता येईल.मग ते शिलालेख असतील,धातूशील्प असतील त्यातून मरहठ किंवा महाराष्ट्राबद्धल आपणास माहिती मिळेल.तदनंतर आपण सर्वसाधारण पणे जो अभ्यास करतो,जो इतिहास आपणास ज्ञात आहे. त्याबद्दल आपण बोलू.महाराष्ट्रात खुप महान अशी संत परंपरा होऊन गेली आहे. ज्याने महाराष्ट्रात च नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या मराठी मातीने अनेक संत आपणास दिले आहेत. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, मिराबाई,चोखोबा अशी कितीतरी नावे घेता येतील. संतानी भक्तीच्या मार्गाने जात लोकांचं अज्ञान दुर करून त्यांना सत्याच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
या मराठी मातीने शौर्य काय असते हे महाराष्ट्रासह देशाला व जगाला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या रुपाने दाखवून दिले आहे. मुघलांसारख्या ताकदीसमोर स्वतः चं राज्य कसं उभं करायचं हे शिवबाच्या माध्यमातून याच मराठी मातीने दाखवून दिले आहे.
मराठी माती ,मराठी माणसं खुप क्रांतिकारी असतात हे जगाने पाहिले आहे. मग तो स्वराज्याच्या क्रांतीच्या रुपात असो नाहीतर या देशाच्या स्वातंत्र्य क्रांतीचा संग्राम असो.याच मातीने राष्ट्रनिष्ठा कशी असावी, देशभक्त कशी असावी हे कित्येक वेळा दाखवून दिले आहे. सावरकर असतील, राजगुरू असतील यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन इथल्या मातीचा बलीदानाचा गुणधर्म जगासमोर सिद्ध केला आहे.
परिवर्तन/प्रबोधन – याच मराठी मातीने परिवर्तन आणि प्रबोधन कसे स्विकारावे आणि आचरण कसे करावे याचा देशाला धडा घालून दिला आहे. महात्मा फुले,रानडे, लोकहितवादी, आगरकर, यांनी जुन्या परंपरा,रिती यांनी तिलांजली देऊन चांगल्याचा स्विकार, सत्याचा स्विकार, कर्मकांडांचा बहिष्कार यांच्या विरोधी लढा अन् स्रियांचा सन्मान, बालविवाहाविरोधी चळवळ,विधवा पुर्नविवाह या सारख्या सुधारणावादी चळवळीचा पुरस्कार, या सुधारणावादी धोरणाच्या पुरस्काराची शिकवन या मातीने देशाला घालून दिली आहे.
सामाजिक क्रांती– स्थिरस्थावर झालेल्या सनातनी प्रवृत्तीविरोधात लढा देण्याचा मार्ग याच मातीने दाखवला आहे. कर्मकांडांचा बिमोड कसा करायचा याच मातीने शिकवले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर याच मातीतून उगवलेलं नक्षत्र आहे.राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अन्नाभाऊ साठे या सारख्या महापुरुषांच्या रुपात देशात समतेची राष्ट्रभक्तीची एकात्मतेची बिजे कसे रोवावेत या मराठी मातीने जगास दाखवून दिले आहे. याच मराठी मातीने देशाला राज्यघटना दिली आहे.जी जगात सर्वात मोठ्या लोकशाहीचे वहन करत आहे.सामाजिक चळवळ,आंबेडकरी विचारांची पेरणी ही मराठी माती मोठ्या जोमाने जनमानसात रूजवत आहे.
शिक्षणाची गंगा– समाज प्रबोधनासाठी आवश्यक काय असेल तर शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात तळागाळातील लोकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली आहे. त्यामुळे देशातल्या इतर राज्यांपेक्षा एक जागृत, सुशिक्षित समाजमन या महाराष्ट्राच्या मातीत आढळून येतं.कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरु केलेली संस्था असेल,सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष असेल मराठी मातीची देन आहे.
स्रीशक्तीचा सन्मान कसा करायचा हे या मराठी मातीनेच शिकवले आहे.आज महाराष्ट्रातील स्रिया देशातील इतर राज्यांच्या स्रियांच्या तुलनेत चांगले जीवन व्यतीत करत आहेत. त्यात आणखी सुधारणेला वाव आहे. पण काळानुसार बदल स्विकारायची शिकवनच मराठी मातिची आहे.डॉ आनंदीबाई गोपाळ जोशी पहिल्या महीला डॉक्टरची देन या मराठी मातीचीच आहे.
साहित्याची खाण- मराठी मातीतून एकापेक्षा अनेक असे साहित्यिक या देशाला लाभले आहे. अव्वल दर्जाचे साहित्य या मराठी मातीची देण आहे.
संस्कृतीचं माहेर- सण उत्सव,समारंभ हे मराठी मातीच्या अंगात भिनलेलं आहे. संस्कृती ही मराठीचं या महाराष्ट्राचं माहेर आइ.संस्कृती इथे रोपाजली जाते. वेगवेगळ्या सणसमारंभातून ती मोठ्या प्रमाणात उठून दिसते.
वारकरी– वारकऱ्यासारखा समुदाय या महाराष्ट्रात या मातीत भक्तीचे खेळ खेळतो.अंधश्रद्धेपेक्षा डोळस.होऊन तो विठ्ठलाला भजतो.
खेळ– रांगड्या मातीत रांगडे खेळ खेळून अनेक राखाडे पैलवान झाले आहेत. या मातीने क्रिकेटला तेंडुलकर, गावसकर,वेंगसकर,झहीरखान असे खेळाडू दिले आहेत. कुस्ती,कबड्डी या सारख्या खेळांत मराठी मातीने जगाच्या पाठीवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
शेतकरी– मराठी माणूस जर काही जपत असेल तर ती म्हणजे आपली काळी आई.महाराष्ट्र आज देशात एक प्रगतशील राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. त्याला जबाबदार इथला शेतकरी, इथला मजूर आहे. म्हणून मराठी मातीतली माणसं मराठीला म्हणजेच महाराष्ट्राला आणखीन मजबूत करण्याचे काम करत आहेत.त्याचबरोबर देशाचं पोट भरण्याचं काम करत आहेत.
नेतृत्व-देशाचं नेतृत्व करण्यासारखी माणसं या मराठी मातीने या देशाला दिली आहेत. वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांची फळी या मातीची देण आहे.
मराठी मातीला समृद्ध बनवण्यासाठी या महाराष्ट्रातील एक न एक मराठी माणूस आज कष्ट घेत आहे. कोणाचे कष्ट उठून दिसतात तर कोणाचे लपून असतात.पण ते या मराठी मातीला आकार देण्यासाठीच असतात.सगळं काही गोडगोड आहे अशातला भाग नाही आणखी बऱ्याच सुधारणांना वाव आहे. परिवर्तनाला वाव आहे. तो बदल,परिवर्तन, प्रबोधन ही मराठी माती सहज स्विकारेल आणि नक्कीच या देशाला दिशा देण्याचे काम ही मराठी माती करेल.
सतीश यानभुरे
86054522772
२४/१०/२०२०