उपक्रम – स्मृतिगंध (क्र.२४) कविता मनामनातल्या… (विजो) विजय जोशी – डोंबिवली *कवी – वा. रा. कांत


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – वा. रा. कांत
कविता – बगळ्यांची माळ फुले

वामन रामराव कांत (वा.रा. कांत)
जन्म – ०६/१०/१९१३ (नांदेड).
मृत्यू – ०८/०९/१९९१ (मुंबई) (७८ वर्षे).
टोपण नाव – रसाळ वामन, अभिजित, कांत, वा.रा.कांत.
त्यांनी वा.रा.कांत या नावाने बरेच लेखन केले.
कविता, समीक्षा, अनुवाद, नाट्यलेखन अशा विविध क्षेत्रात विपूल लेखन केले.
कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांनी संपादक म्हणून व आकाशवाणीवर नोकरी केली.

वा.रा.कांत यांना घरातील धार्मिक अध्यात्मिक वातावरणाचा आई कडून वारसा लाभला आणि तिथूनच लहानपणीच काव्याची गोडी लागली. वडीलांची शिस्त कडक होती.
बालपणापासूनच आतुरता आणि अस्वस्थता हा त्यांच्या एकूण प्रतिभेचा आणि साहित्य निर्मितीचा स्थायीभाव होता.
वा.रा.कांत याच्या काव्यात लय, नाद, सूर, आशय, शब्दसौंदर्य ही वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात.
द्विदलार्थी कविता “दोनुली” हा नवा काव्यप्रकार वा.रा. कांत यांनी मराठी साहित्यात आणला.
वा.रा.कांत हे तसे प्रसिद्धीपराङमूख होते/राहिले. पण त्यांच्या काव्याने गाण्यांनी इतर अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

दोनुली, पहाटतारा, बगळ्यांची माळ, मरणगंध (नाट्यकाव्य), मावळते शब्द, रुद्रवीणा, वाजली विजेची टाळी, वेलांटी, शततारका, सहज लिहिता लिहिता… असे त्यांचे उत्तमोत्तम काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
वा.रा.कांत यांचे चरित्र “कविवर्य वा.रा.कांत” कृ.मु.उजळंबकर यांनी लिहिले आणि कालिंदी प्रकाशनाने ते प्रकाशित केले.

१९६२-६३ मध्ये वेलांटी या काव्यसंग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
१९७७-७८ मध्ये मरणगंध या नाट्यकाव्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
१९७९-८० मध्ये दोनुली या काव्यसंग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार मिळाला.
१९८९-९० मध्ये मावळते शब्द या काव्यसंग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार मिळाला.
असे साहित्यातील अनेक मानांकित पुरस्कार वा.रा.कांत यांना प्राप्त झाले.

१९८८ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी त्यांना सन्माननित करण्यात आले.
१९८९ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद हैद्राबाद तर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी त्यांना सन्माननित करण्यात आले.
१९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रतिर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृती देऊन सन्मान करण्यात आला.

वा.रा.कांत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक अजरामर रचना रसिकांना मिळाल्या –
आज राणी पुर्विची ती प्रीत तू मागू नको…
त्या तरुतळी विसरले गीत…
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात…
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे…
सखी शेजारिणी तू हसत रहा…

अशा वा.रा.कांत यांच्या अनेक गाजलेल्या रचना, गीते आजही रसिकमनावर गारूड करून आहेत.

वा.रा.कांत यांची शब्द, लय, आणि आशय सौंदर्याने नटलेली एक अजरामर कविता “बगळ्यांची माळ फुले” या काव्याचा आस्वाद आपण घेऊयात.
वा.रा.कांत यांच्या या काव्याला
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – पं. वसंतराव देशपांडे
यांनी संगीताचा साज चढविला आणि एका अजरामर गीताची निर्मिती झाली. आज एवढ्या वर्षांनंतरही हे गीत आपल्या सर्वांच्याच मनामनात आहे.

प्रियकराची प्रियसीच्या आठवणीत विरह व्यक्त करणारी ही भावनिक आशयसंपन्न रचना वाचताना/ऐकताना आपल्याला भावूक बनवते.
प्रियकर प्रियसी सोबतच्या भेटीच्या आठवणीतले क्षण, जागा, स्मृती आठवून प्रियसी विषयीची मनाची घालमेल, तडफड आपल्या शब्दांत व्यक्त करतो.
आपण एकत्र बसून आकाशातून रांगेने उडणारे बगळे पहायचो. ही उडणाऱ्या बगळ्यांची माळ आजही आकाशात तशी फुलते/दिसते. तेव्हा तुला आपल्या भेटीची आठवण होते का? असा प्रश्न प्रियकर त्याला सोडून गेलेल्या प्रियसीला विचारीत आहे.
शेवटी तो प्रियसीला प्रश्न विचारतो की माझी जशी तुझ्या विरहात तडफड होते तशी तुझ्या मनाचीही तडफड होते का…?
अत्यंत तरल आणि भावूक अशा या रचनेचा आनंद आपण घेऊयात…

बगळ्यांची माळ फुले

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात.

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात.

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?

  • वा. रा. कांत
    ◆◆◆◆◆
    संदर्भ – इंटरनेट

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.

Vijay Joshi sir


(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)

सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *