राज्याची सत्ता हस्तगत केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा रविवारी २५ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पार पडला. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मेळाव्याचं आयोजन करण्याची शिवसेनेची परंपरा असते. पण यंदाच्या वर्षी कोरोना साथीमुळे हा मेळावा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होतं. अखेर हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला गेला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. राज्यात नोव्हेंबर २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.
शिवसेनेची ५३ वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते.
सरकार स्थापन झाल्यापासून मी ऐकतोय सरकार पडेल, सरकार पडेल. आजही मी म्हणतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलायला सुरुवात केली.
उद्धव ठाकरेंनी यावेळी हिंदुत्वापासून विरोधकांच्या राजकारणाबद्दल सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून आज बोलणार आहे. जर एखादा शब्द इकडे-तिकडे गेला तर मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभतं का, असं विचारलं जाईल. पण तरीही मला संयमाचं महत्त्व माहीत आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
उद्धव ठाकरेंनी यावेळी थेट कोणाचं नाव घेतलं नसलं, तरी आपला रोख कोणाकडे आहे, हेदेखील लपवलं नाही.
“मी सत्तेत आल्यापासून अनेक जण म्हणतात की, हे सरकार पडणार. पण, मी सतत म्हणत आलोय आणि आताही आवाहन करतोय की, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीये. पण जर का वाटेला जाल, तर मुंगळा कसा डसतो हे कळेल,” असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत भाजपच्या इतर नेत्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत या आक्षेपाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे काय काम करतो हे तुम्हाला गरगर फिरून चालणार नाही. त्या फिरण्याला काही अर्थ नाही. जे काम झालं ते पुढच्या महिन्यात समोर ठेवणार.
भाजपचं सरकार म्हणजे अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या आहेत. महाराष्ट्राने हा खेळ बंद पाडला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींच्या नेतृत्वावर टीका केली. कोरोना आल्यानंतर घंटा बडवा. थाळ्या बडवा. हेच तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदूत्व असं नाही, असं म्हणत त्यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला टोला लगावला. ही थेट पंतप्रधानांवर टीका नसली तरी ‘थाळ्या-टाळ्या’ हा टोमणा त्यांना उद्देशून होता. जीएसटी करप्रणालीवरही त्यांनी भाष्य केलं. जीएसटी पद्धत चुकली असेल तर पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करावी. मी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जीएसटी या करप्रणालीविषयी चर्चा करायला हवी.
बिहार निवडणुकीत मोफत लस देण्याच्या आश्वासनावरही ते बोलले.’बिहारला फुकट लस देत आहे आणि महाराष्ट्राचे 38 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आम्हाला कर्ज काढायला सांगत आहे. पण, का म्हणून आम्ही कर्ज काढायला हवं?’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी तुम्ही ‘सेक्युलर’ झाला आहात का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला होता. याचाच आधार घेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाष्य केलं आणि थेट नाव न घेता कोश्यारी यांच्यावर टीका केली. “मंदिर का उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारलं जात आहे. कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली, त्यावेळी आता जे हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते त्यावेळेला शेपट्या घालून कोणत्या बिळात बसले होते काय माहिती? यांना त्याकाळी घराच्या बाहेर कुणीही न ओळखणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. काळ्या टोपी खाली डोकं असेल त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा.” उद्धव ठाकरेंनी म्हटलं, की मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांच्या राजकीय संघटनेनं पाळायला हवं. राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा, असं मोहन भागवतांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री कंगना राणावत तसंच पत्रकार अर्णब गोस्वामींवरही उद्धव यांनी निशाणा साधला. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी जे राजकारण झालं, त्याचाही संदर्भ त्यांच्या वक्तव्यांना होता. दहा तोंडानी रावण बोलतोय, असं म्हणत मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना त्यांनी रावणाची उपमा दिली. “मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हटलं गेलं. घरी खायला येत नाही म्हणून मुंबईला यायचं आणि महाराष्ट्राची बदनामी करायची. ही अशी रावणी औलाद. कोरोनाचं संकट असतानाही महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जातेय,” असं उद्धव यांनी म्हटलं.
“मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलीस निकम्मे, महाराष्ट्रात सगळीकडे गांज्याची शेती आहे, अशी बदनामी करण्यात आली. पण, मला मुंबईला पोलिसांबद्दल अभिमान आहे. छातीवर गोळ्या झेलून अतिरेक्यांना जिवंत पकडणारे जगातील एकमेव पोलीस दल मुंबईचं आहे.” जो कुणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. भाजपनं जो डाव हरियाणाच्या कुलदीप सिंग बिष्णोई यांच्याबरोबर खेळला तोच डाव आता ते बिहारमध्ये खेळत आहे. महाराष्ट्रात हाच डाव आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमध्ये आता ते नीतीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत आहे, माझ्या नितीश कुमार यांना शुभेच्छा आहेत.
सुशांतनं आत्महत्या केली तर तो बिहारचा पुत्र. असेलही. बिहारचा पुत्र म्हणून महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागले, असं म्हणत आदित्य ठाकरेंचं नाव कसं या प्रकरणात आणलं याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. सध्या एक बेडूक आणि त्यांची दोन पिलं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणे तसंच त्यांचे पुत्र नीलेश आणि नितेश राणेंना टोला लगावला. बेडकानं बैल पाहिला असं एक गाणं होतं. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकून बाबांना सांगितलं, असंही त्यांनी म्हटलं.
केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. दानवे यांच्या लग्न तुम्ही केलं आणि पैसे मात्र बापाकडे मागत आहात, या वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, दानवे जी, ते तुमचे बाप असतील, माझा बाप इथं माझ्यासोबत आहे. तुमचे भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ.
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून देशाच्या राजकीय पटलावरील अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घालत उद्धव ठाकरेंनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली.
शिवसेनाचा मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या सत्तापदी विराजमान झाल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसैनिकांना संबोधित केलं. मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा शिवसेनेचा हा पहिला दसरा मेळावा. राज्याचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात राजकीय विषयांवर बोलणं टाळलं.
मुख्यमंत्री पदाचा मास्क असल्यामुळे राजकीय विषयांवर भाष्य करणार नाही, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी रविवारी, मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन भाजपवर हल्लाबोल केला.
जीएसटीसारखा राष्ट्रीय मुद्दा उपस्थित करून, थेट पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं. जीएसटी परताव्याच्या मुद्यावरून ठाकरे विरुद्ध मोदी सरकार हा वाद नवा नाही. राज्याच्या हक्काचे पैसे केंद्र देत नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी वारंवार बोलून दाखवली. केंद्राने राज्याचे ३८ हजार कोटी द्यावेत ही मागणी उद्धव ठाकरेंनी परतीच्या पावसाने उद्धव्स्त झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर केली होती. पण, दसरा मेळाव्याच्या भाषणात जीएसटी पद्धत फसली आहे. प्रतप्रधानांनी प्रामाणिकपणे ही चूक मान्य करावी आणि पुन्हा जुन्या करपद्धतीवर गेलो पाहिजे अशी मागणी केली. जीएसटीचा पैसे देत नसाल तर, माझी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे..पुढे या..चर्चा करू..अशी भूमिका त्यांनी घेतली.
भाजपशासित राज्यांना सोडून देशातील इतर राज्य जीएसटीच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. जीएसटीच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष उघड दिसून येत आहे. त्यामुळे देशातील इतर मुख्यमंत्र्यांना या मुद्यावर एकत्र करून उद्धव ठाकरे भाजपविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भाजपविरोधी मोट बांधून राष्ट्रीय राजकारणात आपली छाप निर्माण करून, देशाच्या राजकारणात पाऊल टाकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतो आहे.
वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झालं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असलेली भाजपसोबतची साथ उद्धव ठाकरेंनी सोडली. गेल्या वर्षभरात देशाच्या राजकीय पटलावर महत्त्वाच्या अनेक मुद्यांना हात घालत उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांच्या केंद्रातील सत्ताकेंद्राला आव्हान दिलं. देशाची आर्थिक आणि सामाजिक घडी विस्कळीत होत असल्याची टीका ठाकरेंनी केली होती.
उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करतायत का? याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, “राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांना थेट हात घालून उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय दृष्टीने ही अत्यंत चांगली भूमिका म्हणावी लागेल. जीएसटीच्या मुद्द्यावर थेटपणे नेतृत्व करणार असं त्यांनी सांगितलं नाही. पण, येत्या काही दिवसात आपल्याला उद्धव ठाकरे या आघाडीचं नेतृत्व करताना दिसून येतील. लोकांसाठी महत्त्वाचा असा आर्थिक मुद्दा उचलून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय राजकारणात येण्याचं पहिलं पाऊल टाकलं आहे.”
केंद्र सरकार राज्यांवर अन्याय करतं. राज्यांचा हक्क देत नाही. राज्यांच्या अधिकारात ढवळाढवळ करतं असे आरोप अनेक राज्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केले आहेत. मुंबई केंद्राला पैसा देते. पण, त्यामोबदल्यात मुंबईला काहीच मिळत नाही, अशी भूमिका मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने या आधीदेखील उघडपणे घेतली आहे.
उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात छाप उमटवायची आहे?
याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, “भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी थेट मोदी, शाह किंवा भाजपवर इतक्या तिखट भाषेत आरोप केले नाहीत. सत्तेत असताना सामन्यातून, सरकारच्या त्रुटी दाखवण्याच्या माध्यमातून हळूहळू टीका सुरू केली. आता, सर्व मुख्यमंत्र्यांना एकत्र करून चर्चेची भूमिका म्हणजे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणात छाप उमटवायची आहे हे स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंची ही भूमिका गैरभाजपशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पटणारी आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका घेताना दिसू शकतील.”
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भविष्यात या राष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्र करेल असं वक्तव्य दसरा रॅलीत केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.
कोरोना काळामध्ये राज्यांना मोठं नुकसान झालं आहे. केंद्राकडे राज्यांचे जीएसटीचे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त थकित आहेत. या मुद्यावर केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामाने आहे. गैरभाजपशासित राज्यांनी केंद्र सरकारला कर्ज काढून जीएसटीचे थकित पैसे देण्याचा आग्रह धरला होता. २०१९ च्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढले. मुख्यमंत्रीपदाचा खडा या दोन मित्रांच्या मैत्रीत पडला आणि राज्यात नवं समीकरणं जन्माला आलं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात उद्धव ठाकरे आगपाखड करत होते. त्यांच्याच मांडीला-मांडी लावून त्यांनी सत्ता स्थापन केली.
दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपवर थेट हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना एकत्र येण्याचे सर्व दोर कापले आहेत का? यावर बोलताना ज्येष्ठ राजकीय पत्रकार संजय जोग म्हणतात, “जीएसटी पद्धत फसवी आहे असा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलाय. पंतप्रधानांनी चूक प्रामाणिकपणे मान्य करावी आणि पुन्हा जुन्ही पद्धत आणावी ही मागणी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचे सर्व दरवाजे आता बंद झाल्याचं सूचित केलं आहे.”
महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत. केंद्रीय नेतृत्वाने एखादा फॉर्म्युला तयार केला, आणि उद्धव ठाकरेंना तो मान्य झालं तर एकत्र येवू, असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर, काडीमोड करून वेगळे झालेले हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली. यावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करत, शिवसेनेने हात पुढे करावा असं म्हटलं. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं.
यापुढे शिवसेना आणि भाजप कधीच एकत्र येणार नाहीत. २५ वर्षांपेक्षा जास्त मित्र असलेल्या या दोन्ही पक्षातील सर्व दोर आता कापले गेले आहेत. भाषणाच्या ओघात उद्धव ठाकरेंनी मोदींना अहंकारी राजा, आणि भाजप नेत्यांना कळसूत्रीच्या बाहुल्या म्हटलं. त्यांचा रोख कळसूत्रीच्या बाहुल्यांकडे जास्त होता. पण, आजच्या भाषणावरून शिवसेना-भाजप आता कधीच एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट दिसत आहे.
मात्र, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा अनेकवेळा उल्लेख केला. ते सामना मध्ये छापण्याचेही सुचविले. मोहन भागवतांनी हिंदुत्व या संज्ञेचा व्यापक अर्थ सांगितला होता. उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना सरसंघचालकांचं ऐका असा टोला लगावला. उद्धव ठाकरे जरी भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत नसले तरी, संरसंघचालकांचं ऐका असं म्हणत त्यांनी भाजपसोबत पुढील काळात पुन्हा जोडण्यासाठी मोहन भागवतांचा सुप्त धागा अजूनही बाकी ठेवलाय. वारंवार त्यांनी सरसंघचालकांचा उल्लेख यासाठीच केला होता, असा एक अन्वयार्थ निघतो.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय /
२७.१०.२०२०