कोरोनाकाळात शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत स्पष्ट निर्देश ; शालेय शिक्षण विभागाचे २९ आॅक्टोबर रोजी निघाले परिपत्रक
नांदेड –
जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेने १५ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात दिलेल्या निवेदनानुसार शाळेतील शिक्षकांच्या उपस्थित राहण्याच्या संदर्भात जो संभ्रम होता तो लवकरच दूर करु असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार आता २९ आॅक्टोबर रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. नांदेडसह शिक्षक सेनेच्या इतर जिल्हा शाखांनीही शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. शिक्षण मंत्र्यांनी याबाबत दिलेला शब्द पाळल्यामुळे शिक्षक सेना नांदेड जिल्हा शाखेने समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना काळात सर्वच आस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत २४ जून, २२ जुलै तसेच १७ आॅगस्ट रोजी स्वतंत्र परिपत्रक काढूनही संभ्रम कायम होता. शिक्षणविभागातील अधिकारी अनेक तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या सूचना देत होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन तमाम शिक्षकांना मानसिक त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आॅनलाईन शिक्षण पद्धतीचा समग्र आढावा घेण्यासाठी १५ सप्टेबर रोजी जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने २९ आॅक्टोबर रोजीच्या परिपत्रकान्वये सर्वच आस्थापनांच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
राज्यातील सर्वच आस्थापनांच्या शाळांत आता यापुढे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून आॅनलाईन, आॅफलाईन तसेच दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी शाळेतील एकूण कार्यरत पदसंख्येच्या ५०% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ही संख्या आॅनलाईन, आॅफलाईन, दूरस्थ तसेच कार्यालयीन कामकाजासाठी योग्य ती काळजी व उपाययोजना करुन उपस्थित राहणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची आहे.सरकारने लाॅकडाऊन ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविला आहे. दिवाळीनंतरच शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा सरकारचा मानस असून तोपर्यंत सदरील परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून शिक्षक बांधवांना नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कोणतेही तोंडी आदेश देऊ नयेत असे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी म्हटले आहे.