नांदेड –
संपूर्ण दु:खमुक्तीच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे श्रामणेर संस्कार आहे. बुद्ध धम्मातील अत्यंत शुद्ध, पवित्र आणि जीवनातील अनेक दुर्लभ दालने खुली करणारा हा संस्कार आहे. श्रामणेर संस्कृती रुजविल्याशिवाय मानवी जीवनातील धम्माचा विकास होत नाही असे प्रतिपादन भंते श्रद्धानंद यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात काव्यपौर्णिमा मालेतील चौतिसाव्या काव्यपौर्णिमेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी भंते मेत्तानंद,भंते श्रद्धानंद, भंते सुमेध, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, रणजीत गोणारकर, एकनाथ कार्लेकर, माजी सैनिक पांडूरंग सावंत, उमाकांत सावंत, आप्पाराव नरवाडे, संजय मोरे, मुरलीधर पाईकराव यांची उपस्थिती होती.
आश्विन पौर्णिमेला वर्षावास समाप्ती होते. शहरातील अनेक बुद्ध विहारात ठिकठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे धम्मपठण सुरु होते. या पौर्णिमेला त्याचा समारोप केला जातो. याचेच औचित्य साधून सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या काव्यपौर्णिमेचे उद्घाटन खुरगाव येथे करण्यात आले. यावेळी भंते धम्मकीर्ती यांनी भंते चंद्रमणी यांच्या उपस्थितीत धम्मसंदेश दिला. दान पारमितेचे महत्व अनेक उदाहरणांनी स्पष्ट केले. त्यानंतर आॅनलाईन काव्यपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यात बाबुराव पाईकराव, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, डॉ. दिलीप लोखंडे, सुधा जाधव, ऋषिकेश हेरे यांनी सहभाग नोंदवला. या गुगल मीटद्वारे घेण्यात आलेल्या आॅनलाईन काव्यमैफिलीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले.
बेलानगरात आॅफलाईन कविसंमेलन
शहरातील बेलानगर परिसरात आश्विन पौर्णिमेनिमित्त काव्यपौर्णिमा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात भारतीय संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपुजन करुन कविसंमेलनास प्रारंभ करण्यात आला. अतिथी कवी शरदचंद्र हयातनगरकर यांच्या विशेष उपस्थितीत आणि रणजीत गोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, थोरात बंधु, रुपाली वैद्य वागरे, कैलास धुतराज, निवृत्ती लोणे यांनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी कोव्हिड १९ बाबतीत योग्य ती काळजी घेऊनच कार्यक्रम संपन्न झाला.
काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांनी प्रास्ताविक केले. संवादसूत्र शीघ्र कवी कैलास धुतराज यांनी हाती घेतले तर आभार प्रदर्शन एकनाथ कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरुप वैद्य, स्वराली वैद्य, सुमेध हनमंते, विशालराज वाघमारे, सुनंदा वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, मारोती कदम, आ. ग. ढवळे यांनी परिश्रम घेतले.