उपक्रम – स्मृतिगंध (क्र.२६) कविता मनामनातल्या… (विजो) विजय जोशी – डोंबिवली **कवी – नारायण सुर्वे


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – नारायण सुर्वे
कविता – दोन दिवस

नारायण गंगाराम सुर्वे
जन्म – १५/१०/१९२६
मृत्यू – १६/०८/२०१० (मुंबई) (८४ वर्षे).

गंगाराम सुर्वे आणि काशीबाई सुर्वे या कापड गिरणीत काम करणाऱ्या जोडप्याने त्यांना कापड गिरणीसमोर रस्त्यावर अनाथ सापडलेल्या जीवाला आधार दिला आणि मुलासारखे वाढविले. त्याला नारायण असे नाव दिले. तोच मुलगा पुढे कवी नारायण सुर्वे म्हणून प्रसिद्ध झाला.


परळच्या (मुंबई) बोगद्यात चाळीत कमालीचे दारीद्र्य, अपरंपार कष्ट, जगण्यासाठीचा संघर्ष यातून सुर्वे यांचे आयुष्य शेकून निघाले. एकंदरीत जन्माला आल्यापासूनच नारायण सुर्वे यांची परवड सुरू झाली. अतिशय गरीबीत चौथी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे घरगडी, हॉटेल मध्ये कप बशा धुवायचे काम, दूध टाकणे, गोदरेज कंपनीत पत्रे उचलणे, हमाली, शाळेत शिपाई आणि तिथून पुढे शिक्षक असा विचित्र आणि कष्टप्रद आयुष्याच्या प्रवासात सुर्वे यांना अनेक अनुभव आणि धडे मिळाले. गुजराण करण्यासाठी अशी छोटी मोठी कामे करत असतानाच मोठ्या हिमतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आणि कविता लेखनाचा छंदही जोपासला.

या साऱ्या खडतर आयुष्याचे ताणे बाणे त्यांच्या कवितेत परावर्तीत झाल्याचे दिसून येते. १९५८ मध्ये नवयुग मासिकामध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली.
“डोंगरी शेत माझं गं” हे त्यांचं पहिलं गाजलेलं गीत, एच.एम.व्ही. ने त्याचे ध्वनीमुद्रण केले.

नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता.
१९६२ मध्ये “ऐसा गा मी ब्रम्ह” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला राज्यशासनाचा पुरस्कारही मिळाला.
त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहिरनामा, पुन्हा एकदा कविता, सनद असे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले.

नारायण सुर्वे यांना साहित्यातील योगदानाबद्दल १९९८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
२००४ मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार,
मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार,
सोव्हिएत रशियाचा नेहरू अवार्ड,
महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार,
कराड साहित्य पुरस्कार,
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार
असे साहित्यातील अनेक मानांकित पुरस्कार नारायण सुर्वे यांना प्राप्त झाले.

त्यांच्या गाजलेल्या अनेक रचना रसिकांची दाद मिळवत असत –
मास्तर तुमचं नाव लिवा
असं पत्रात लिवा
सर कर एकेक गड
मनिऑर्डर
मुंबईची लावणी
गिरणीची लावणी

अशा त्यांच्या अनेक कविता आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत…

आयुष्यभर कष्ट, दुःख, गरिबी सहन केल्यावर सारं आयुष्य सुखाची वाट पाहण्यात गेलं आणि दुःखात गेलं. आता कितीसे दिवस बाकी आहेत, अशा आशयाची जीवनाकडे तक्रार मांडणारी “दोन दिवस” ही नारायण सुर्वे यांची कविता खूप गाजली. त्यांच्या कष्टप्रद आयुष्याचे सारंच जणू या त्यांच्या कवितेत उतरलं आहे.
आयुष्यात अनेकवेळा चंद्र उगवला, तारे फुलले, रात्री गेल्या, पण माझं आयुष्य भाकरी (रोजीरोटी) शोधण्यातच बर्बाद झाले अशा प्रकारची खंत सुर्वे त्यांच्या या कवितेत व्यक्त करताना दिसतात.

माझे हातच जणू दारिद्र्याकडे गहाण टकले असावेत अशी माझ्या आयुष्याची परिस्थिती आहे.
मी हरघडी जगाचा विचार केला. दुःख कसं झेलावं, जगावं कसं हे जीवनाच्या शाळेत शिकलो हे अनुभव मांडत असताना शेवटी कवी म्हणतो की झोतभट्टीत पोलाद शेकलं जातं तस माझं आयुष्य शेकलं गेलं…
अशी कष्टप्रद आयुष्याची शोकांतिकाच जणू नारायण सुर्वे आपल्या कवितेत मांडताना दिसतात.
ही कविता वाचल्यावर नारायण सुर्वे यांच्या अतिशय कठीण परिथितीत संघर्ष केलेल्या खडतर आयुष्याची आपल्याला कल्पना येते…

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

  • नारायण सुर्वे
    ◆◆◆◆◆
    संदर्भ – इंटरनेट

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.

Vijay Joshi sir


(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)

सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *