महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती १२’ हा रिअॅलिटी शो सध्या वादात सापडला आहे. या शोमध्ये अमिताभ यांनी विचारलेल्या एका प्रश्नावरून सोशल मीडिया ते स्थानिक पातळीपर्यंत वाद सुरु झाला आहे आणि आता याप्रकरणी बिग बी शिवाय केबीसी १२ च्या मेकर्सविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार नोंदवली होती. नंतर ती मागे घेण्यात आली.
हिंदू धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. आधी लखनौमध्येही याप्रकरणी अमिताभ व केबीसी १२ च्या मेकर्सविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली होती. मनुस्मृतीबद्दल या शोमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात जातीय मतभेद निर्माण करणारा असल्याचे त्यांनी म्हटले होते. यापूवीर्ही, केबीसी ११ मध्ये काही प्रश्नांवरून आक्षेप नोंदविण्यात आला होता. तेव्हा वाहिनीने यावर माफी मागितली होती.
गेल्या शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी मनुस्मृतीसंदर्भात एक प्रश्न विचारला होता. ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या याकार्यक्रमात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी यांनी हजेरी लावली होती.
२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?
असा हा प्रश्न होता. यासाठी चार पर्याय देण्यात आले होते – अ) विष्णु पुराण
इ) भगवत गीता
उ) ऋग्वेद
ऊ) मनुस्मृती.
यानंतर स्पर्धकाने मनुस्मृतीचा पर्याय निवडला होता आणि त्याचे उत्तर बरोबर आले होते.
या प्रश्नावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. या प्रश्नामुळे हिंदू धर्मीय आणि बौद्ध धर्मीय व्यक्तींना धार्मिक आणि मानसिक आघात पोहोचला आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशात पाहण्यात आला आहे. असे प्रश्न विचारून हिंदू, धर्म, धर्मग्रंथ, धर्मनिष्ठा यांचा अपमान करून हिंदू धमीर्यांच्या भावना दुखावणे हाच उद्देश स्पष्ट होत आहे, असा आरोप अभिमन्यू पवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. इतिहासातील जखमांच्या खपल्या काढून सौहार्दपणे एकमेकांसोबत राहणाऱ्या हिंदू-बौद्ध धर्मियांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रश्न विचारण्यात आला आहे, असा दावाही पवार यांनी केला होता.
३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात “२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रति जाळल्या?” असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले, अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसेच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही.”, असा थेट आरोप पवार यांनी केला आहे.
हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. पण स्यूडो सेक्युलॅरिझम ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. लातूर पोलीस अधीक्षक यांच्याकडे मी लिखित तक्रार नोंदवली आहे. हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलीस गुन्हा नोंदवू शकतात लवकरच एफआरआय नोंदवला जाईल अशी अपेक्षा आहे.”, अशी माहिती त्यांनी दिली.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे १२ वे पर्व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून सोशल मीडिया ते स्थानिक पातळीपर्यंत वाद सुरू झाला आहे. ‘मनुस्मृती’संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून फिल्म मेकर विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, या शोवर कम्युनिस्टांनी कब्जा केल्याचे म्हटले आहे.
फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात केबीसी १२ मध्ये विचारण्यात आलेला एक प्रश्न आहे. शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या कर्मवीर स्पेशल अॅपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी मनुस्मृतीसंदर्भात जो प्रश्न विचारला होता तो
व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे, ‘केबीसीला कम्युनिस्टांनी हायजॅक केले आहे. इनोसंट मुलांनी हे शिकावे, की कल्चरल वॉर कसे जिंकावे. याला कोडिंग म्हणतात.’ विवेक यांच्या शिवाय अनेक यूझर्सनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकांनी आरोप केला आहे, की या प्रश्नाच्या ऑप्शन्समध्ये केवळ एकाच धर्माच्या धर्मग्रंथांचा उल्लेख केला आहे. हे चूक आहे.
या प्रश्नावरून केबीसीच्या अडचनी वाढण्याची शक्यता आहे. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात जातीय मतभेद निर्माण करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही, केबीसी ११ मध्येही काही प्रश्नांवरून आक्षेप नोंदविण्यात आला होता. तेव्हा वाहिनीने यावर माफी मागितली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारलेल्या प्रश्नावरून वादंग उठल्यानंतर अमिताभ बच्चन निवेदन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सोनी टिव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली आहे.”
६ लाख ४० हजार रुपयांसाठी विल्सन आणि सोनी यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. ह्या प्रश्नाचं उत्तर समजावताना बिग बी यांनी पुढील स्पष्टीकरण दिलं…प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की १९२७ मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता यांना वैचारिकदृष्ट्या योग्य मानणाऱ्या ‘मनुस्मृती’ या प्राचीन हिंदू ग्रंथाचा निषेध करत त्याच्या प्रती जाळल्या होत्या.
सध्या सोशल मीडियावर यासंबंधीचा नवीन वाद सुरू झाला असून अनेकांनी या शोचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. तसंच या प्रश्नामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचीही मतं अनेकांनी मांडली. या प्रकरणानंतर आता ‘कौन बनेगा करोडपती १२’ वर बहिष्कार घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
या घटनेचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणी ‘केबीसी’ आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
मागील वर्षीही केबीसीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत हिंदु राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता. आता पुन्हा हिंदु धर्मग्रंथांविषयी अयोग्य माहिती सांगत मनुस्मृतीचा अपमान केला आहे. वर्ष १९२७ मध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले; मात्र यानंतर म्हणजे ११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलतांना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ‘मी जातीनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. तसेच दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’ तसेच दहन करण्यापूर्वी आपण मनुस्मृती हा ग्रंथ वाचला नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. यातूनच मनुस्मृतीचे महत्त्व बाबासाहेबांनी अधोरेखित केले होते. या घटनेतून केबीसीच्या हिंदुविरोधी वृत्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
जर हिंदु धर्मग्रंथ डॉ. बाबासाहेबांनी दहन केला, हा प्रश्न केबीसीमध्ये विचारला जात असेल, तर ‘तक्षशिला’ आणि ‘नालंदा’ ही हिंदूंची प्राचीन विश्वविद्यालये अन् त्यांतील अमूल्य ग्रंथसंपदा कोणी जाळून कायमची नष्ट केली ?’, ‘अफगाणिस्तानातील बामियान येथील प्राचीन बुद्धमूर्तींचा विध्वंस कोणत्या धर्मग्रंथांचे अनुसरण करणार्यांनी केला ?’ ‘शार्ली हेब्दो’वरील आक्रमण करणार्या आतंकवाद्यांनी कोणत्या धर्मग्रंथांतून प्रेरणा घेतली ?’ अशा प्रकारचे अन्य पंथियांविषयीचे प्रश्न विचारण्याचे धाडस केबीसी आणि अमिताभ बच्चन करतील का ?
हेतूतः हिंदु धर्म, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्या ‘केबीसी’ आणि ‘सोनी टीव्ही’ यांचा हिंदु समाजाने निषेध करावा आणि संस्कृतीरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी या वेळी केले.
अभिमन्यू पवार यांनी सदरील तक्रार मागे घेतली आहे. केबीसी मध्ये विचारल्या गेलेल्या अशा प्रश्नांमूळे सामाजिक सलोखा आणि सामंजस्य यावर बाधा येते. तणाव निर्माण होऊ शकतो, यासाठी तक्रार दाखल केली होती. तथापि या तक्रारीनंतर यातील मुख्य हेतू दुर्लक्षित होऊन इतर मुद्द्यांवर राजकारण केले जात आहे. यातून जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे तक्रारीचा मूळ उद्देशच नष्ट होत असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आल्यामुळे सदर तक्रार विनाअट मागे घेण्यात आल्याचे पवार यांनी पोलिस अधीक्षक लातूर यांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.
मनुस्मृतीवरुन वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वाद निर्माण होऊन मनुस्मृती दहन करण्याचे प्रकार घडले आहेत. एखाद्या क्षुल्लक गोष्टींसाठी वाद निर्माण करुन त्याला राजकारणाची हवा देण्याचे प्रकार घडतात. भारतीय जनता आधीच धर्मभोळी आहे. तशीच ती भावनाप्रधान आहे. इथे जरासे जरी खट्टू झाले तरी भावना दुखावल्या जातात. आणि नंतर त्या भडकतात. यामधून दोन समाज आमने-सामने येतात. परंतु हे आजच्या अँड्रॉइड समाजाला समजत नाही. त्याद्वारे तर सतत आग धगधगत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हे योग्य नाही. कोरोनासारख्या आपत्तीतही माणसाची मग्रुरी कमी झाली नाही. धर्मवेडेपणा कमी झाला नाही. आजही धार्मिक प्राबल्य तसूभरही कमी झालेले नाही. धर्माच्या नावाखाली यानंतरही दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात. यामागे नेहमी आणि नेमके कोण असते याबद्दल जनता अनभिज्ञ राहिलेली नाही. परंतु जाणत्या , शिकल्या सवरल्या लोकांनी दोन समाजात सलोखा आणि सामंजस्य कसे राखले जाईल, याबाबत प्रयत्नरत राहिले पाहिजे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
७.११.२०२०