संपादकीय
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशपातळीवरील क्रमवारीत महाराष्ट्राचे स्थान उंचावले
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी लोकसेवा परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेतील सर्वच यशवंतांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. स्वागत यासाठी की महाराष्ट्रातील ९० पेक्षा अधिक मुलांनी या परीक्षेद्वारे शिरकाव केलेला आहे. तसेच देशपातळीवरील क्रमवारीत महाराष्ट्राचे स्थान उंचावले गेले आहे. राज्यातून अभिषेक सराफ प्रथम तर नेहा भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यातील पंधरा जणांनी चमकदार कामगिरी केली आहे. राज्यातील निकालावर नांदेड जिल्ह्याने आपली छाप सोडली आहे. नायगाव तालुक्यातल्या शेळगाव गौरी येथील योगेश बावणे यांनी देशात ६३ वा क्रमांक मिळविला आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस बु. माधव विठ्ठल गिते हे २१० व्या क्रमांकावर आहेत. नागणी ता. बिलोली येथील आकाश आगळे यांनी आॅल इंडिया रँकिंगमध्ये ३१३ व्या स्थानी आहेत. तर लोह्यात वास्तव्यास असलेले सुनील शिंदे यांनी पनवेल येथे इनकम टॅक्स आॅफिसर म्हणून सेवेत असताना युपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. बीड येथील मंदार पत्की यांचा २२, परभणी येथील कुणाल चव्हाण २११ बीड येथील किशोर मंकले यांनी अंधत्वावर मात करून १४३ वा क्रमांक मिळविला आहे. औरंगाबाद येथील राजेश महाजन (२१४) , लातूरच्या उमरगा तालुक्यातील निलेश गायकवाड, अंबाजोगाईचे वैभव वाघमारे, केज तालुक्यातील आडस येथील नेहा किर्दक, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुरगा येथील असित कांबळे, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अभिजित वायकोस, अक्षय भोसले ,सिल्लोड येथील अंकिता वाकेकर यांनी यश मिळवले आहे. तसेच मुंबई पुण्यासह नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जळगाव येथील विद्यार्थी या परीक्षेत चमकले आहेत.
जिद्द, चिकाटी, आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन केले तर हमखास यश मिळते. दहावी बारावी या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाले की विद्यार्थी खचतात. पहिल्याच प्रयत्नात काही जणांना यश मिळावे असे वाटते. परंतु यश मिळविण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. कठोर परिश्रम करावे लागतात. आपण बारावी नंतर साहजिकच मेडिकलचे स्वप्न पाहतो. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावेत, अशी आपली अपेक्षा असते. ते मिळाले नाही तर इंजिनिअर व्हावे वाटते. काही जणांना आपली सर्वच अपत्ये ही शासकीय सेवेत असावेत. त्यांना नोकरी मिळावी अशी पालकांची इच्छा, अपेक्षा असतात. त्या नकळतपणे विद्यार्थ्यांवर लादतो. त्यामुळे त्यांचा कल कुणीकडेही असला तरी ते आपल्या अपेक्षांचं ओझं घेऊन ते जगतात आणि अभ्यास करतात. परंतु पालकांनीही त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांचे त्यांना क्षेत्र निवडू द्यावे. आईवडिलांची इच्छा आपण पूर्ण करु शकत नाही, हे लक्षात आल्यामुळे दडपणाखाली जातात. त्यामुळे त्यांच्यात नैराश्यही येते. कदाचित ते टोकाचेही पाऊल उचलू शकतात. याची जाणीव पालकांना असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी वगळता, प्रशासकीय सेवा, नागरी सेवा यांच्यातील विविध शाखांमध्ये आपण जाऊ शकतो. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपल्या आवडीनुसार आपले करियर करु शकतो. प्रतिकुल परिस्थितीतही आपण विजयश्री खेचून आणू शकतो. तेव्हा प्रयत्न आणि अभ्यास यांचे सातत्य आवश्यक आहे. या सेवांमधील परीक्षा देणाऱ्या अभ्यासकांना त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देणे आवश्यक आहे कारण या निकालामुळे मराठी माणसांची मान उंचावली आहे. त्यामुळे आम्हाला या यशवंतांचा अभिमान आहे. युगसाक्षी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.
गंगाधर ढवळे ,नांदेड