आज 14 नोव्हेंबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपण बालक दिन म्हणून साजरी करत असतो. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबाद येथे झाला.पंडीतजींचे वडील मोतीलाल नेहरू हे एक नामांकित राष्ट्रीय लढ्यातील ज्येष्ठ पुढारी होते. तर आई स्वरूपरानी धार्मिक वृत्तीच्या होत्या. जवाहरलाल नेहरू यांचे कुटुंब मुळातच श्रीमंत, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे होते.
आपल्या वडिलांचा वारसा हा पंडितजींनी पुढे चालू ठेवला. ते स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी होते . आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. ते प्राथमिक शिक्षण घेत असताना फर्टिनंट टी बुक्स या शिक्षकाने त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार टाकले. त्यांना वाचनाची आवड लावली.विज्ञानाची आवड लावली. शिक्षणासाठी ते 1905 साली इंग्लंडला गेले. व तेथे हॅरो विद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. आणि नंतर ट्रिनिटी महाविद्यालयात (केंब्रिज विद्यापीठ) प्रवेश घेतला.याच काळात त्यांना ट्रिव्हेल्यन लिखित गॅरिबाल्डिचे चरित्र वाचण्यास मिळाले. यासोबतच काहूर,मँझिनी, बर्नाडशाँ,लौ.डिकीन्सन,आयव्हँन ब्लॉक, हँवलाँक हेलिस,एबिंग क्राफ्ट,ओटो व्हायनिंजर,आँस्कर वाईल्ड,आणि वाल्टर पेटर ईत्यादी प्रसिद्ध लेखकांची पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. यापैकी लौ.डिकीन्सनआणि मेरीडिथ टाऊन झेंन्ड यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.
यावेळी भारतात वंग -भंग चळवळ जोरात होती. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार, व सशस्त्र क्रांती हा केंब्रिज विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांचा चर्चेचा विषय होता. तसेच इंग्लंड मधील उदारमतवादाचाही त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांचे मन फेबियन समाजवादी चळवळीकडे आणि ईतर समाजवादी विचारांकडे ते आकर्षिले गेले. आणि स्वतः च्या देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम भावना वाढत गेली. जवाहरलाल नेहरु 1912 मध्ये भारतात आले. त्यावेळेस भारतात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. काही काळ त्यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला.व त्यासाठी त्यांनी वकिलीत मन रमवण्याचा प्रयत्न केला. पण तेथे ते न रमता त्या ऐवजी राजकारणाकडेच वळले. 1916 मध्ये दिल्ली येथील कमला कौल यांच्याशी त्यांचे लग्न झाले. 1917 मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. त्याच भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी होय.
पंडितजींचा 1919 सालापासून काँग्रेसी घनिष्ठ संबंध आला. पहिल्या महायुद्धात भारताचे अपरिमित शोषण करण्यात आले होते. जुलमी रौलेट कायदा करण्यात आला होता. त्यातच जालियनवाला बाग हत्याकांड घडला. हे सारे पाहून त्यांनी कट्टर साम्राज्यवादी विरुद्ध दंड थोपटले. या हत्याकांडाच्या चौकशीसाठी काँग्रेसने चौकशी समिती नेमली. त्या समितीला पंडितजींनी सहाय्य केले. गांधीजींनी 1921 मध्ये ही असहकार चळवळ सुरू केली. आणि त्यावेळेस पंडितजींना प्रथम अटक झाली. त्यांच्यासाठी हा स्वातंत्र्यलढ्यातील पहिलाच प्रसंग होता.
पुढे ते 1923 मध्ये काँग्रेसचे सरचिटणीस झाले. आणि 1927 मध्ये ब्रुसेल्स येथे झालेल्या पददलित राष्ट्राच्या परिषदेला त्यांनी हजेरी लावली. आणि युरोप रशियाचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय परिषद युरोप रशियाचा दौरा हा त्यांचा जागतिक करणाचा पहिला अनुभव होता. सुभाषचंद्र बोस व इतर तरुण त्याच्या सहकार्याने त्यांनी ‘ इंडियन डिपेंडन्स युथ लिग’ ही संस्था स्थापन करून देशभर संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाचा हिरीरीने प्रचार व प्रसार केला. याचाच परिणाम 1929 मध्ये त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले.
रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राने भारताचे स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली आणि याच प्रतिज्ञेची सांगता. त्यांच्याच नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री बारा वाजता झाली. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताचे पहिले पंतप्रधानपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले. आणि राष्ट्रपती पद डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी भूषविले. आणि हा देश स्वतंत्र कारभार करण्यासाठी सज्ज झाला. भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. आणि संसदीय लोकशाही या देशात आनंदाने नांदु लागली. संविधानाने देशाला समता, बंधुता,न्याय आणि स्वातंत्र्य ही बहुमोल अशी देणगी दिली.आणि जगात आदर्श स्थान मिळविले.
जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या कार्यकाळात बहुमोल योगदान दिले. हिंदू कोड बिल मंजूर करून महिलांना वारसा घटस्फोटाचा हक्क दिला. भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले . अस्पृश्य, महिला व अल्पसंख्यांक दर्जा यांना समान संधी उपलब्ध होऊन भारतीय नागरिक समान एकसंघ बनविण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यात आले. त्यांच्या या पुढाकाराने नियोजन मंडळाची स्थापना होऊन भारतात आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले. त्यांनी देशात औद्योगिकीकरणाचा पाया घातला. राष्ट्रीयकरण्याचे धोरण स्विकारता सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे खाजगी क्षेत्रालाही त्यांनी उत्तेजन दिले. आफ्रो-आशियाई देशाचे स्वातंत्र्य, संघटना अलिप्ततावादाचे धोरण आणि पंचशील तत्व त्यांचा पुरस्कार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय सामजस्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. नेहरूच्या व्यक्तिमत्त्वात आदर्शवाद व वास्तवता यांच्यातील द्वंद्व कायम राहिले.
शिक्षण व तंत्रज्ञान यांच्या प्रसारासाठी त्यांनी संशोधन संस्था स्थापन केल्या. राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या. अणुशक्ती च्या विकासात त्यांना विशेष आस्था होती. त्यांच्याच प्रोत्साहनातून संशोधन केंद्र भारतात स्थापन झाले. भारताला अणु युगात आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे म्हणावे लागेल. ग्लिंपसिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी 1939, जवाहरलाल नेहरू: अँन ऑटोबायोग्रफी 1936 आणि डिस्कवरी ऑफ इंडिया 1945. हे त्यांचे तीन ग्रंथ विशेष मानले जातात.या महान राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय महान थोर, विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी, भारताचे शिल्पकार, भारत रत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यांला कोटी कोटी प्रणाम…
———————————————————————————————
बाबुराव पाईकराव सहशिक्षक,
कै.बापुराव देशमुख मा.व उच्च माध्यमिक विद्यालय
डोंगरकडा.मो. 9665711514