अभिनंदन मुंबई इंडियन्स!

अभिनंदन मुंबई इंडियन्स!

आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या मुंबई इंडियन्सनं दुबईत झालेल्या आयपीएल २०२० च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. याबद्दल त्या सर्व टीमचं उशिरा का होईना अभिनंदन! एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले. आयपीएल जेतेपद कायम राखणारा चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला.

मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या.

समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी’कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसनं पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( २०) बाद केले. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी मुंबईनं २०१५च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १ बाद ६१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मानं या दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला.

मुंबईनं १० षटकांत १ बाद ८८ धावा केल्या आणि त्यांना अखेरच्या १० षटकांत विजयासाठी ६० चेंडूंत ६९ धावा हव्या होत्या. पण, ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित व सूर्यकुमार यादव यांच्यात ताळमेळ चूकला अन् रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यानं स्वतःला रन आऊट करून घेतले. रोहितला त्याचे दुःख नक्की वाटले. रोहितनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलच्या अंतिम सामन्यात दोन अर्धशतकी खेळी करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. यापूर्वी त्यानं २०१५च्या फायनलमध्ये ५० धावा केल्या होत्या. रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विजयासाठीच्या आवश्यक धावा अन्य फलंदाजांनी सहज केल्या. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं.

इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या या संघानं दुबईत झालेल्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पण, हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर गौतम गंभीर ट्रेंड सुरू होता. त्यामागे एक मजेशीर कारण आहे.

ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनिस बाद झाला आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याल नेटिझन्सनं ट्रोल केलं. गौतमनं त्याच्या फॅन्टसी XI संघाचा कर्णधार स्टॉयनिसला केलं होतं.

क्विंटन डी’कॉक आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईनं १८.४ षटकांत ५ बाद १५७ धावा करून जेतेपद पक्कं केलं. इशान किशन १९ चेंडूंत ३३ धावांवर नाबाद राहिला.

कर्णधार म्हणून पाच जेतेपद पटकावणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू आहे. या जेतेपदासह मुंबई इंडियन्सनं Fair Play Award ही जिंकला. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानं Orange Cap आणि दिल्ली कॅपिटल्सच्या कागिसो रबाडानं Purple Cap चा मान पटकावला.

लोकेश राहुलच्या KXIP संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आलं, परंतु त्याच्या फलंदाजीनं यंदाची आयपीएल गाजवली. लोकेशनं १४ सामन्यांत ५५.८३च्या सरासरीनं ६७० धावा केल्या. त्यात १ शतक व ५ अर्धशतकांचा समावेश होता. पंजाबला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये DC चा शिखर धवन ( ६१८), SRH चा डेव्हिड वॉर्नर ( ५४८), DC चा श्रेयस अय्यर ( ५१९) आणि MIचा इशान किशन ( ५१६) हे अव्वल पाचमध्ये राहिले.

गोलंदाजांमध्ये DCच्या कागिसो रबाडानं पर्पल कॅप जिंकली. त्यानं १७ सामन्यांत ३० विकेट्स घेतल्या. MIचा जसप्रीत बुमराह १५ सामन्यांत २७ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ अव्वल पाच जणांमध्ये ट्रेंट बोल्ट ( २५ विकेट्स), अॅनरिच नॉर्ट्झे ( २२) आणि युझवेंद्र चहल ( २१) यांचा क्रमांक लागला. Royal Challengers Bangaloreचा देवदत्त पडिक्कलने Emerging Player of the year हा पुरस्कार पटकावला. त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चर Most Valuable Player of the tournament ठरला. त्यानं १४ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या.

कोरोना साथीमुळे यंदा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा UAE मध्ये झाली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 5 गडी राखून विजय मिळवत आयपीएल विजेतेपद पाचव्यांदा पटकावलं. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेतही काही वाद झाले. काही मैदानावर तर काही मैदानाबाहेर. यापैकी 5 विषय विशेष गाजले. 13 व्या आयपीएल मोसमात झालेल्या पाच मोठ्या वादांवर एक नजर :

एक :

स्पर्धेतील पहिल्याच दिल्लीविरुद्ध पंजाब सामना टाय झाला. टीव्ही फुटेजमध्ये दिसलं की ख्रिस जॉर्डननी रबाडाच्या 19 व्या षटकात एक रन पूर्ण काढली नव्हती. पहिली रन काढताना जॉर्डननी क्रिझमध्ये बॅट टेकवली नव्हती असं टीव्ही फुटेजमध्ये दिसलं त्यामुळे एक शॉर्ट रन धरण्यात आली आणि त्यामुळे मयंक अग्रवाल आणि पंजाबच्या धावसंख्येत एकच रन वाढवण्यात आली. पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावा हव्या असताना मयंकनी पहिल्या तीन चेंडूंवर 12 धावा काढल्या. जर एक कमी पडली नसती तर पंजाबनी तीन चेंडू राखून सामना जिंकला असता. पण शेवटच्या दोन बॉलवर त्यांच्या दोन विकेट पडल्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि ती दिल्लीने जिंकली. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागनेही यावर टीका केली.

दोन :

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्यातल्या 18 व्या षटकात टॉम कुर्रनला मैदानातील अंपायर शम्सुद्दीन यांनी एलबीडब्ल्यू आउट दिलं. कुर्रननी रिव्ह्यू घेतला. पण राजस्थानकडे रिव्ह्यू राहिलाच नव्हता. पण अंपायरनी चर्चा केली चेन्नईचा कर्णधार धोनीनीही आक्षेप घेतला. नंतर कॅचसाठी रिव्ह्यू घेतला गेला. तिसऱ्या अंपायरनी व्हिडिओत पाहून सांगितलं की चेंडू बॅटला लागला नव्हता. त्यामुळे एलबीडब्ल्यूचा निर्णय बदलून कुर्रनला पुन्हा फलंदाजीला बोलवण्यात आलं.

तीन :

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीनी दोन कॅच सोडले. फलंदाजी करताना फक्त 5 धावा केल्या. याबद्दल बोलताना महान फलंदाज कॉमेंट्रेटर सुनील गावस्कर यांनी विराट आणि त्याची बायको अनुष्काच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केलं. हे विधान आक्षेपार्ह होतं त्यामुळे अनुष्काने ट्विटरवर गावस्करांना सुनावलं की, ‘ मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचं वक्तव्य चुकीचं होतं. तुम्ही अशी वक्तव्य का करता ? क्रिकेटरच्या मैदानातील कामगिरीसाठी त्याची बायकोच जबाबदार आहे का, तुम्ही क्रिकेटरच्या खासगी जीवनाबद्दल आदर बाळगला आहे हे मी जाणते मग तुम्हाला असं वाटत नाही का की माझ्याबद्दलही तुम्ही तसंच वागलं पाहिजे. मला क्रिकेटच्या विषयात जबरदस्तीने आणणं कधी थांबणार? ’ त्यानंतर गावस्करांनी स्पष्टीकरण देताना त्यांच्या वाक्याचा वेगळा अर्थ घेतला गेल्याचं सांगितलं.

चार :

चेन्नईविरुद्ध हैदराबाद सामान्यातील दुसऱ्या डावातील 19 व्या षटकात हैदराबाद खेळत असताना अंपायर पॉल रेफल यांनी शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू वाइड दिला. चेन्नईचा कर्णधार धोनीने विरोध दर्शवल्यावर रेफलना आपला निर्णय बदलावा लागला. सनराइजर्स हैदराबादनी 168 रनचा पाठलाग करत सहज सामना जिंकला.

पाच :

एलिमिनेटर सामन्यात रॉयल चैलेंजर्स बेंगलोरविरुद्ध हैदराबाद सामन्यात डेव्हिड वॉर्नरला डीआरएसच्या मदतीने बाद देण्यात आलं. कॉमेंट्रेटरसह सर्वांनीच हा निर्णय चूक होता असं म्हटलं. मोहम्मद सिराजच्या सहाव्या ओव्हरमध्ये वॉर्नरचा विकेटच्या मागे कॅच घेतला होता. मैदानातील अंपायरने नॉट आउट दिला पण विराटनी रिव्ह्यू घेतल्यावर लक्षात आलं की चेंडू वॉर्नरच्या ग्लोजला लागून यष्टिरक्षकाने झेल घेतला होता. या निर्णयाने क्रिकेट पंडित आणि कॉमेंट्रेटर चकित झाले. कॉमेंट्रेटर म्हणाले, मला वाटतं अंपायरचा निर्णय चुकीचा आहे. बेनिफिट ऑफ डाउट फलंदाजाला मिळायला हवा होता असं अनेकांना वाटलं.

दरवर्षीप्रमाणे या १३ व्या स्पर्धेतही काही वाद झाले. काही मैदानावर तर काही मैदानाबाहेर. विराट कोहली, अनुष्का शर्मा, धोनी आणि गावस्कर यांच्याभोवतीचे वाद जास्त गाजले. वाद तर प्रत्येकच ठिकाणी असतात. काही लोकांना वादविवाद करण्यात, वादग्रस्त विधाने करण्यातच धन्यता वाटत असते. काही घटनाही घडतात आणि त्यावरुन वाद उद्भवतात. इतक्या मोठया आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा हा खेळ म्हणजे संपूर्णतः वादातीत कसा असू शकतो. परंतु जसा स्तर तसे वाद आणि मिटण्याचीही ताकद तितकीच असते. ते काहीही असो, पाचव्यांदा आयपीएलवर इतिहास कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सचे मनःपूर्वक अभिनंदन!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१५.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *