देऊळ बंद नव्हे, चालू झाले पण…

कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत देवस्थाने बंद ठेवले होते. यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व देवस्थाने बंद ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाडव्यापासून अर्थात आज दिनांक १६ नोव्हेंबर पासून मंदिरांसह सर्व धर्मियांची देवस्थाने खुली करण्यात येतील असे जाहीर केले होते. यानुसार काल सकाळपासूनच मंदिरे, मशिदी, चर्च, जैन मंदिरे, बौध्द विहार, गुरूद्वारा आदी देवस्थाने खुली करण्यात आली आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच मंदिरं सुरु करण्यात आली आहेत.

देवस्थाने खुली करण्यात आली असली तरी यासाठी नियमांचे पालन करावे लागणार आहे. यात ६० वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाही किंवा दिला जाणार नाही. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॅनिटाईज केल्यानंतरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमांसह राज्यातील सर्व देवस्थाने खुली करण्यात आली आहेत.

कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून उघडण्यात आली आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि हाजी अली दर्ग्यासारख्या प्रार्थना स्थळांवर भाविकांची गर्दी दिसून आली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरचे विठ्ठुल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनाची आस लावून बसलेल्या भाविकांनी भल्या पहाटे रांगा लावल्या होत्या. हाजी अली दर्ग्यावरही हीच स्थिती होती. सिद्धिविनायक मंदिरात दररोज एक हजार भाविकांना दर्शनाची परवानगी असेल. सर्वांना टप्प्याटप्प्याने दर्शनाची मुभा दिली जाईल. मोबाईल ॲपवरून दर्शनासाठी बुकिंग करता येईल, असे या मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

सिद्धिविनायक मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असून भाविकांच्या शरीराचे तापमान मोजल्यानंतरच दर तासाला शंभर भाविकांना दर्शनासाठी आत सोडले जात आहे. हात स्वच्छ करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सरकारने जारी केलेल्या मानक संचालन प्रक्रियेनुसार (एसओपी) कोविडमुक्त क्षेत्रातील धार्मिक स्थळे उघडण्यावर भर देण्यात आला आहे. नियमांचे पालन करीत भाविकांना मंदिरांमध्ये दर्शनाची परवानगी असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत शनिवारी धार्मिक स्थळे खुली करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा राक्षस अजूनही अस्तित्वात आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपसह वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलन केले होते. मनसेचीही भूमिका तीच होती. परंतु भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहेत. राज्याच्या विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन झाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ असा मजकूर असलेले फलक झळकविण्यात आले होते.

राज्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली, मात्र मंदिरे खुली करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील सात महिन्यांपासून बंद होते. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले होते. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली, तरीही मंदिर सुरू करण्यास राज्य सरकारने दिरंगाईच केली. दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. मग, मंदिरांबाबतच वेळ काढूपणाचे धोरण का? असा सवाल शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून व्यक्त केला गेला.
या आंदोलनात धर्मगुरू आणि आचार्यांकडूनही लाक्षणिक उपोषण केले गेले. १७ मार्च पासून मंदिर बंद असल्याने शिर्डीप्रमाणेच इतर देवस्थान आणि परिसरातील अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. दररोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात.

शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हार-फुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. याशी संबंधित सर्व व्यावसायिकांना आणि देवस्थानालाही आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला होता.

महाविकास आघाडी सरकार जागे झाले तर ठीक आहे आणि दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारला दिला होता. सरकार झोपले आहे, त्याला जागे करण्यासाठीच हा घंटानाद आज राज्यभरात केला जात असल्याचे, प्रविण दरेकर यांनी आंदोलनाच्या वेळी म्हटले होती.

केंद्राने संपूर्ण देशभर मंदिरे, मशिदी, चर्च अशी प्रार्थनास्थळे सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरुही झाली होती. मात्र, महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे आपल्या हिंदू धर्माच्या, हिदुत्वाच्या किंवा या सर्व प्रक्रियेच्या विरोधात आहे अशी लोकांची भावना झाली होती. एकीकडे दारुची दुकाने सुरु होत आहेत, मॉल सुरु होत आहेत परंतु आमची श्रद्धास्थान असलेली दैवतं, त्यांची मंदिरे सुरु होत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत त्यांनी मंदिर प्रश्नी आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.

उद्धवा दार उघड, आता तरी जागा हो, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभर घेतली होती. सरकारचे कान उघडे असतील तर आजच्या घंटानादाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय ते घेतील. पण जर दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भाजप स्वत: मंदिरे उघडी करेल, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच सोशल डिस्टन्सिंगची जी काळजी घ्यायची आहे, त्याबाबत मंदिरांना सूचना देऊ, भक्तगण काळजी घेतील, असेही दरेकर यांनी पुढे नमूद केले होते.

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि आंदोलनानंतर आठ दिवसात मंदिर उघडण्याबाबत नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं आश्वासन मिळालं असल्याचं सांगितलं. पण १० दिवसात मंदिर उघडी नाही झाली तर पुन्हा पंढरपुरात येऊ अशा इशाराही त्यांनी सरकारला दिला होता.

प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, “मुंबईतले अधिकारी संपर्कात होते. त्यांचं एकच तुणतुणं सुरु होतं. धार्मिकस्थळ उघडली तर कोरोना पसरेल. मी त्यांना म्हटलं की, सकाळी लवकर उठा आणि बाजारात फिरा. जेथे कुठलाही फिजिकल डिस्टंसिंग पाळलं जात नाही. येथे कोणाला कोरोना झाला का? हे सांगावं. लॉकडाऊनमुळे देशभरात ८५ लाख लोकं शहर सोडून गावात गेले. शेकडो किलोमीटर चालत गेले. ज्या ज्या गावातून हे लोकं गेली, तेथे लोकांनी त्याला मदत केली. त्यांनी त्या गावात कोरोना पसरवला हे मला सांगा.”

मंदिर खुलं झालं आहे असं समजा. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात जाऊ शकतो, काही प्रमाणात नाही करू शकत. दहा दिवसाचा इशारा दिला आहे. रस्त्यावर उतरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर लढणारी माणसं आहोत.पंढरपूर प्रशासनाचे हार्दिक आभार. आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे. शासनाने जर दहा दिवसांत ऐकलं नाहीतर आम्ही पुन्हा याठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. मनसेनंही मंदिरे खुली झाली पाहिजेत अशी ठाम भूमिका घेतली होती.

ही श्रींची इच्छा’ म्हणत राज्यातील मंदिरे कालपासून सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत भाविकभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर अखेर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली झाली आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्याला परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी सर्वार्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.

पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, शिर्डी, शेगाव यासह राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक मंदिरात सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदी उपाययोजनांची पूर्तताही करण्यात आली. दर्शनासाठी प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सक्तीचे केले आहे.

पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. तर करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली असलेली सर्व ३०४२ मंदिरे सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ या सहा तासांसाठी रोज खुली राहणार आहेत.

मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी विशेष अ‍ॅपवर ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. पहिल्या दिवशी एक हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. शिर्डीतील साईदर्शनासाठीही ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. मंदिरात हार, प्रसाद आदी पूजा साहित्य नेता येणार नाही. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात प्रवेशासाठी मास्क बंधनकारक आहे.

असं असलं तरी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान कालपासून होण्याबाबत संभ्रम कायम आहे. कारण, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना प्रशासनाकडून अद्याप आदेश मिळाले नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

मंदिरे सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत. आदेश मिळाल्यानंतर तात्काळ पुढील कारवाई सुरु करु, असं सप्तश्रृंगी मंदिर, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील हे तीन प्रमुख मंदिर सोमवारपासून सुरु होणार की नाही, याबाबत अद्याप काही सांगता येत नाही, ही चर्चा होती. तसेच बुलढाण्यात शेगांवचं गजानन महाराज मंदिर सोमवारी उघडणार नाही तर श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी आज १७ नोव्हेंबरला मंगळवारपासून उघडणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. दर्शनासाठी ई-पास घ्यावा लागणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. पुण्यातही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे. आठ महिन्यांनी आज सर्वांसाठी मंदिर खुलं होणार असल्याने आनंदाचं वातावरण आहे.

दुसरीकडे राज्य सरकारने दिवाळी पाडवा अर्थात सोमवारपासून मंदिर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. असं असलं तरी मंदिर संस्थांनांना सरकारकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, १० वर्षाच्या आतील लहान मुलं आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसंच मास्क घातल्याशिवाय कुणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही, हे सर्वांना आता माहीत झाले आहे.

शिर्डीतील साईमंदिरात दररोज सहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे. साई मंदिर खुलं झाल्याने भाविकांनी पहाटपासुनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे दर्शन रांगेत भाविकांनी गर्दी दिसून येत आहे. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना मंदिरात ‌जावून साईंबाबांचं दर्शन मिळत असल्याने भाविकांमध्ये‌ समाधानाचं वातावरण आहे.

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यांनी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजच्या मंगल दिनी प्रत्येक मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आज भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर तब्बल आठ महिन्यानंतर खुलं झाल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक भल्या पहाटे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणाहून भाविक सहकुटुंब दाखल झाले आहेत. आई भवानीच्या दर्शनाची आतुरता होती ती पूर्ण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदीरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात आले. आठ महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. जवळपास आठ महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं. अक्कलकोटचं वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी उघडं करण्यात आलं. आठ महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी काही भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, मंदार पुजारी यांच्या हस्ते आज पहाटे ५ वाजता मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. मंदिर उघडण्यात आल्यावर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचं दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केला. एका तासात अंदाजे १०० भाविक दर्शन घेवून सुखरूप बाहेर निघतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोईकरीता मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे.

श्रीगणेश टेकडी मंदिर, श्री साई मंदिर, श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, रामदासपेठेतील गुरुद्वारा, एसएफएस चर्च, धरमपेठेतील बुद्धविहार, दीक्षाभूमी, मोठा ताजबाग येथे त्याअनुषंगाने व्यवस्था लावण्यात येत होती. व्यक्तिश: अंतर जपणे, निर्जंतुकीकरण असणे, टेम्परेचर स्कॅनिंग आदी व्यवस्था या ठिकाणी लावण्यात येत होत्या. मात्र, अनेक देवस्थान व्यवस्थापनाने प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचाच विचार केल्याचेही दिसून येत होते. प्रत्येक देवस्थानांमध्ये नैमित्तिक पूजनाव्यतिरिक्त टाळे लागलेलेच दिसून येत होते.

श्री गणेश टेकडी मंदिरात भव्य महाआरतीने राज्य शासनाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते. हे देवा कोरोनाला आता पळव, अशी आर्त विनवणी याद्वारे करण्यात आली. महाआरतीनंतर मात्र मोजक्याच लोकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते.

वर्धा महामार्गावरील श्री साई मंदिरात निर्माण कार्य सुरू असल्याने, मागच्या दाराने भक्तांना प्रवेश दिला जात आहे. प्रसाद वितरण न करण्याचा निर्णय घेतला असून, एका वेळी २५ महिला व २५ पुरुष भक्तांनाच प्रवेश दिला जात आहे. हात पाय धुण्याची व्यवस्था, टेम्परेचर स्कॅनिंग, व्यक्तिश: अंतर, मास्क, सॅनिटाझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • अविनाश शेगावकर, श्री साई मंदिर

मोठ्या ताजबागमध्ये भक्तांना मास्क अनिवार्य आहे. एकावेळी मोजक्या लोकांना सोडण्यात येत असून, पहिली खेप परत आली की दुसरी खेप सोडण्यात येत आहे. दर्शनासाठी रेखांकन करण्यात आले असून, सातत्याने काळजी घेण्याची उद्घोषणा केली जात आहे.

  • गुणवंत कुबडे, प्रशासक – मोठा ताजबाग

रामदासपेठ येथील गुरुद्वारामध्ये सकाळीच नैमित्तिक प्रार्थना झाली. सदर येथील एसएफएस चर्चमध्येही सकाळीच मोजक्या लोकांसोबत प्रार्थना करण्यात आली. तसेही चर्चमध्ये रविवारी सामूहिक प्रार्थना होत असल्याने, इतर दिवशी गर्दी नसतेच. धरमपेठ येथील बुद्धविहारातही अशीच स्थिती होती. शिवाय, शहरातील अनेक प्रार्थनास्थळांमध्ये भक्तांसाठी विशेष नियमाअंतर्गत तयारी केली जात असल्याचे चित्र होते.

देशभरात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे मंदिर धार्मिक स्थळ बंद आहेत. केवळ नैमित्तिक पूजा आणि सणांच्या निमित्ताने होणाऱ्या महापूजेसाठी मंदिरं उघडली जात होती. कालच राज्य सरकारने नियमांचे पालन करुन मंदिरं उघडण्याची परवानगी दिली. त्याचा राज्यभर जल्लोषही झाला. मात्र, परमहंस संत कोंड्या महाराज पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात होणार असल्याच्या निमित्ताने ट्रस्टी आणि भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच त्यांना मंदिराची दानपेटी फोडलेली आढळून आली. हे करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर पोते पांघरले आणि केबल कनेक्शन देखील तोडले.

पहाटेला पुजाअर्चा करण्यासाठी भक्त मंदिरात गेले असता चोरीची घटना उघडकीस आली. या घटनेने धाबा गावात एकच खळबळ उडाली आहे. संस्थानने चोरी झाल्याची तक्कार धाबा पोलीस स्टेशनला नोंदवली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मंदिरं उघडताच चोरी झाल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील धाबा येथील प्रसिध्द कोंडय्या महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. यावेळी मंदिरातील सीसीटीव्हीवर पोते पांघरुन कनेक्शनही कापण्यात आलं. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अडथळा येत आहे

राज्यातील मंदिरं उघडल्यावर लगेच चोरट्यांनी मंदिरांवर डाव साधल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र-तेलंगणातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. हे मोठे मान्यतेचे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावात आहे. आजपासून कोंडय्या महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

कोरोनामुळे २२ मार्च २०२० सुरू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्यात अनलॉक प्रक्रियेअंतर्गत शिथिल झाली. मात्र सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेली सर्व मतावलंबीयांची देवस्थळे आतापर्यंत बंदच होती. यासंदर्भात राज्य सरकारकडे विविध पक्ष, संघटनांनी देवाचे दार उघडण्याची विनवणी केली, आंदोलने केली. अखेर सोमवारपासून राज्यभरात देवस्थाने भक्तांसाठी उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने भगवंताच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासूनच सज्ज होते. कपाट उघडताच, देवाचे दर्शन होताच भक्तांचा गहिवर ओसंडून वाहत असल्याचे भासत होते.

तब्बल आठ महिन्यांपासून देवदर्शनाविना भाविक, अशी स्थिती दिसून येत होती. अर्थात भक्तांनी भक्ती सोडली, असे नव्हते. जप, तप, साधना, आराधना सुरूच होत्या. पण मनाची कपाटे उघडण्यासाठी संकेतांची मोठी परंपरा आहे. आधुनिक काळात हे संकेत देवस्थळातून मिळतात अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे ‘देवा कधी होईल रे तुझे दर्शन’ अशी विनवणी भक्त भगवंताकडे करत होते. संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने आतापर्यंत देवस्थानांना उघडण्याची परवानगी नाकारली होती. आता मात्र शुभ संकेताचा एक भाग म्हणून देवस्थाने भक्तांसाठी उघडण्यात आली आहेत. आता देऊळ बंद नव्हे पण सकाळपासूनच भक्तांनी शहरातील विविध धार्मिक स्थळांमध्ये गर्दी केली होती. जणू टाळेबंदी पूर्णतः संपवण्याचा हा सोहळा एक साथ साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली जात होती. याचे परिणाम भोगावे लागतील तर मग दोष कुणाला देणार?

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१७.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *