कवी – मोरोपंत
कविता – सुसंगती सदा घडो…
मोरेश्वर रामचंद्र पराडकर (टोपण नावे – मोरोपंत, मयूर पंडित).
जन्म – इ.स.१७२९ (पन्हाळगड).
मृत्यू – १५/०४/१७९४ (बारामती).
मध्ययुगीन पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी.
मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, श्रीधर हे मोरोपंत यांचे समकालीन पंडित कवी होते.
मोरोपंतांचे वडील रामचंद्र पराडकर हे कोल्हापूरच्या छत्रपतींकडे नोकरीला होते. मोरोपंतांचे बालपणही तिथेच गेले. पन्हाळगडावरील केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्र पारंगत विद्वान बंधुंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. त्यानंतर पुढे मोरोपंत हे बारामती येथे स्थाईक झाले.
मोरोपंतांची साहित्यातील प्रतिभा अफाट होती. मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. सुमारे ४५ वर्षे अखंडितपणे मोरोपंतांनी जवळपास ७५ हजार कविता रचल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ८ हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व ओवीबद्ध गीते लिहिली. तसेच १०८ रामायणे रचली.
पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबूजी नाईक याच्याकडे पुराणीक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला. बारामती येथे कऱ्हा नदीच्या काठी एक वाडा बाबूजी नाईक यांनी मोरोपंतांना भेट दिला. या वाड्यातच मोरोपंतांनी त्यांच्या बहुतांश काव्यरचना केल्या. या वाड्याच्या खोलीत भिंतींवर यमक, अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजविली.
मोरोपंतांनी १०८ रामायणे लिहिली आणि त्या प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य होते.
मोरोपंतांनी मराठीत पहिल्यांदा गझल रचना लिहिली. त्याला ते गज्जल असे संबोधत. मोरोपंत, माणिक प्रभू या नंतर पुढे माधव ज्युलियन यांनी मराठीत गझल आणली.
मोरोपंतांनी समग्र महाभारत आर्यावृत्तात रचून चमत्कार केला. त्यामुळेच त्यांना आर्याभारती म्हटले जाते.
कुशलवोपाख्यान, सीतागीत, सावित्रीगीत, मंत्र भागवत, हरीवंश, संकिर्ण रामायण, श्लोककेकावली, अंबरिषाख्यान, आर्या, कृष्णविजय, संशय रत्नावली, सार रामायण…. अशा मोरोपंतांच्या कितीतरी साहित्य कलाकृती आजही अजरामर आहेत.
समाज प्रबोधनात्मक, उपदेशपर, मार्मिक, आर्त याचना करणारे असंख्य केकावली श्लोक मोरोपंतांनी रचिले. आणि त्याला रसिकांची पसंती आणि भरभरून प्रसिद्धीही मिळाली. मयूराने फोडलेला आर्त टाहो म्हणजे “केका”. यावरूनच मोरोपंतांच्या आर्तभाव प्रकट करणाऱ्या श्लोक रचनांना केकावली असे संबोधले जाते. याच केकावली मधील काही प्रचलित गाजलेले श्लोक आपण पाहुयात –
मोरोपंतांची केकावली मधील काही श्लोक –
सुसंगती सदा घडो…
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो
न निश्चय कधी ढळो उजन्विघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो
स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो
नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे जरीहि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे
जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे
पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे
कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा
दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतयासी घे कळवळोनी माता कडे
असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे
- मोरोपंत
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/