भाजपाच्या विजयाची पताका फडकवा-आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

नांदेड/प्रतिनिधी:

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने यापूर्वीही विजय मिळवलेला आहे. आतादेखील विजयश्री खेचून आणून या मतदारसंघात भाजपाच्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रमुख आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.


मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे आयोजित बैठकीत आ.निलंगेकर बोलत होते. व्यासपीठावर बैठकीच्या अध्यक्षस्थानी
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते.
संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, दत्ताभाऊ कुलकर्णी, आ. राम पाटील रातोळीकर,आ. राजेश पवार, आ.तुषार राठोड, जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर,ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, संघटनमंत्री संजय कोडगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतुकराव हंबर्डे ,दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे, सुधाकर भोयर, संध्या राठोड, गंगाधर जोशी, लक्ष्मण ठक्करवाड, श्रावण भिलवंडे,प्रवीण पाटील चिखलीकर शिवराज विजय गंभीरे, व्यंकट मोकले, डॉ. मीनलताई खतगावकर, डॉ. शीतल भालके यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


दोन दिवसांपासून आ. निलंगेकर मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. मंगळवार दि. १७ जुलै रोजी त्यांनी उस्मानाबाद व लातूर येथे बैठका घेतल्या. बुधवारी नांदेड, हिंगोली व परभणी येथे बैठका झाल्या. गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत बीड, जालना व औरंगाबाद येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.


आ. निलंगेकर म्हणाले की, या निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपल्यावर जी जबाबदारी आहे ती प्रत्येकाने योग्य प्रकारे पार पाडली तर विजय अधिक सोपा आहे. यासाठी बुथ रचना अधिक सक्षम करून घेतली जावी. गरजेनुसार कार्यकर्त्यांनी प्रवास करावा. निवडणुकीतील विजयासाठी प्रत्येकाने वेळ देण्याची गरज आहे. रुसवे-फुगवे दूर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. ही निवडणूक नियोजनाची आहे.योग्य नियोजन केले तर निवडणुकीत विजय मिळतो. त्यासाठी नियोजनावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


आ. निलंगेकर म्हणाले की, या मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी आपली जबाबदारी विसरली आहे. मागील बारा वर्षात त्यांनी पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. निवडणूक आल्यानंतरच त्यांना पदवीधरांची आठवण होते, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना भाऊराव देशमुख म्हणाले की, प्रत्येक बुथवर किमान २०ते २५ कार्यकर्त्यांची मजबूत रचना असणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केले तर विजय सुकर होणार आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदवीधराशी किमान दोन वेळा संपर्क साधावा, असे ते म्हणाले.


यावेळी बोलताना खा. चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातून शिरीष बोराळकर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची ग्वाही दिली. या समयी व्यंकटराव गोरेगावकर व प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्यात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस डॉ. माधवराव ऊंचेकर तर आभार जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर यांनी मानले.

छायाः करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, सचिन डोंगळीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *