प्रेमी युगुले आत्महत्या का करतात?

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या वाळकी बु. येथे काल १८ रोजी एका प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दोघांचे प्रेमसंबंध होते हे अनेकांना माहिती होते. मुलीचा विवाह झाला होता. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते. हे सगळ्यांना माहीत असले तरी त्यांचा विवाह होऊ शकला नव्हता. कारण ते एकाच भावकीतले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. प्रेमात तर ते धुंद झाले होते. मुलगी दिवाळीत माहेरी आली. तेव्हा या दोघांना प्रेमाच्या उकळ्या फुटल्या पण जे दुःख आता त्यांच्यासमोर होते त्यांच्यापासून मुक्ती हवी असेल तर मृत्यूशिवाय पर्याय नव्हता. पाण्याने भरलेल्या विहिरीत या दोघांनी स्वत:ला झोकून देऊन आपली जीवनयात्रा संपवली.

विहिरीतून मृतदेह बाहेर काढताना दोघांनी एकमेकांना घट्ट बांधून घेतले होते. दोघांचीही घरे एकमेकांच्या शेजारी असल्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनीही एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवित आहोत. आमच्या इच्छेने आम्ही आत्महत्या करीत असून आमच्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी धरु नये.

प्रेमी युगुल शेवटी मृत्यूचा मार्ग स्विकारतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. प्रेमाला कुटुंबाकडून स्वीकारले जात नसल्याने एका प्रेमी युगुलाने शरणापूर फाट्याजवळ रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. औरंगाबादकडे येणारी रेल्वे शरणापूर फाट्याजवळ आली असता, या प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेच्या धक्क्याने मुलगी जागेवरच मरण पावली. आसपासच्या लोकांनी धाव घेतल्याने, रेल्वेच्या धडकेने जखमी झालेल्या मुलाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तरुणीचा विनयभंग करतानाचा व्हिडीओ गावगुंडांनी शूट केला आणि सोशल मीडियावर वायरल केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरातील ही घटना घडली होती. बुलडाणा जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी गोंदेगावात फिरायला आले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरुवात केली.

‘आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळं असल्यामुळे आम्ही फिरायला आलो’ असं तरुण काकुळतीला येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरुणांनी तरुणीच्या वडिलांना फोन करण्यास सांगितलं.

संपूर्ण व्हिडीओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरपटत नेताना दिसत आहे. तरुण सारखं ‘दादा, तिला सोडा, आम्ही परत येणार नाही’ अशा शब्दात गयावया करत आहे. तरुणाने आपल्या भावाला फोन लावून बोलवून घेण्याचीही विनंती केल्याचं व्हिडीओत दिसत होतं. प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध आणि चीड व्यक्त करण्यात आली होती.

प्रेम प्रकरणातून एका प्रेमी युगुलाने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोहाळे ता. मोहोळ येथे घडली. कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांचे अगोदरपासून प्रेमसंबंध होते. मृत मुलगी ही विवाहित आहे. गेल्या बारा-तेरा दिवसांपूर्वी सोहाळे येथे ती माहेरी आली होती. त्या वेळी दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी सोहाळे येथील माणिक महादेव बचुटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला.

‘त्या’ रविवारी सकाळी माणिक बचुटे हे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. चार दिवसांपूर्वीच प्रेमसंबंध घरातील व नातेवाइकांना समजेल, या भीतिपोटी एका प्रेमी युगुलाने नरखेड (ता. मोहोळ) येथे आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याच्या घटनेने मात्र तालुक्‍यात खळबळ उडाली होती.

व्हॅलेंटाइन डे’ साजरा करत असताना कोल्हापूर जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाने जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. धरणगुप्ती तालुक्यातील शिराळ येथे घडली. शिराळ येथील प्रकाश कांबळे व महादेवी करांडे यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. परंतु यावरू दोन्ही कुटुंबात वाद झाले होते. त्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ते त्यातून बचावले होते. प्रकाश विरोधात पोलिसांनी कारवाईही केली होती. दोन्ही कुटूंबे दोघी प्रेमींना भेटूही देत नव्हते. मात्र, शुक्रवारी सकाळी ते दोघेही भेटले व जयसिंगपूर परिसरात फिरुन आल्यावर दुपारी उमळवाड गावाजवळ एका एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा सपंवली.

‘आम्ही स्वखुशीने आत्महत्या करत असून याबद्दल कोणालाही जबाबदार ठरवू नये’, अशी चिठ्ठीही प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्‍यापूर्वी लिहून ठेवली होती. पोलिसांना ही चिठ्ठी सापडली आहे. कुटूंबियांच्या विरेधाला कटांळून त्यांनी प्रेम दिनी हे पाऊल उचलल्याचा उल्लेख केला आहे.

कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली आहे. मुंबईत ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, २१ वर्षीय प्रेमा पुन्नास्वामी देवेंद्र हिने दुपारी सायन कोळीवाडा इथल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमाच्या मृत्यूचं समजताच तिचा प्रियकर व्यंकटेश पेरुमलने (वय २५ वर्ष) वसईत धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आयुष्य संपवलं.

प्रेमा आणि व्यंकटेश यांचे प्रेमसंबंध होते आणि लग्न करुन संसार थाटण्याची दोघांची इच्छा होती. परंतु त्यांच्या लग्नाला दोघांच्याही पालकांचा विरोधात होता. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने आत्महत्या करुन आयुष्य संपवलं.

शेगावीच्या श्री क्षेत्र नागझरी येथील रेल्वे पुलानजीक डोंगरगावच्या अल्पवयीन प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
डोंगरगाव ता बाळापूर येथील अल्पवयीन मुलगी व भागवत मधुकर वाघमारे यांनी धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलीसांनी दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार सागर गोळे यांचे मार्गदर्शनाखाली बाळू मेजर व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दरम्यान दोघांचे मृतदेहाचे तुकडे झालेले होते.मृतदेह सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रूग्णालय शेगाव येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी रेल्वे पो स्टे मध्ये आकस्मिक मृत्युची नोंद केली.

प्रेमभंग झाल्यांनंतर किंवा प्रेमविवाहासाठी नकार मिळाल्यानंतर आत्महत्या किंवा हत्येसारखा गुन्हा घडल्याच्या आपण अनेक घटना आपण पाहिल्या असतील. आत्महत्येचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या प्रेमी युगुलाने आत्महत्येचा सगळा प्रकार सोशल मीडियावर लाईव्ह शेअर केला होता.

या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाइव्ह केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पन्नाच्या शाहनगर पोलीस स्टेशन परिसरातील देवरी पिपरिया गावात हे घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांना या प्रकरणी प्राचारण करण्यात आलं.

देवरी गावचा अरुण पाल (वय २०) आणि खुशी (१९) दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. पण त्यांचं हे नातं भिन्न समाजातील असल्यानं कुटुंबास मान्य नव्हतं. यावर्षी २५ फेब्रुवारी रोजी कुटुंबियांनी खुशीचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं. होळीच्या दिवशी खुशी तिच्या माहेरी आली होती. त्यावेळी तिची भेट अरुणशी झाली. दोघांना आपले प्रेमाचे सर्व दिवस आठले आणि रडू लागले.

यानंतर आपण एकत्र राहू शकत नाही एकत्र मरू तरी असा विचार करत दोघांनीही एकत्र मरण्याचं ठरवलं. दोघेही गावात झाडीमध्ये गेले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर खुशीची ओढणी झाडाला उंच बांधली. यानंतर एकमेकांना मिठीत घेतच दोघांनी आपला जीव सोडला.

वर्ध्यात एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केली आहे. समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडीमध्ये एका घरात प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आले. आत्महत्या केलेल्या जोडप्यातील मुलीचं लग्न झालेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांचे प्रेमसंबंध होते यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याच बोललं जातं होतं. आत्महत्या केलेल्या या मुलीचं दुसऱ्याच इसमाशी पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र प्रियकरासोबत अजूनही तिचे प्रेमसंबंध सुरु होते. महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या केलेली तरुणी गर्भवती होती. काल दवाखान्यात जाते अस सांगून बाहेर ती घराबाहेर पडली, मात्र उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.

गुढीपाडव्याच्या मंगलदिनीच प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील भागात असलेल्या झाडावर या प्रेमी युगलांनी गळफास घेतला.

त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध असल्याने मागील १० दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. मागील दहा दिवसांपासून पोलीस आणि कुटुंबीय या दोघांचा शोध घेत होते. यामध्ये मृत प्रेयसी ही अल्पवयीन होती. त्यामुळे पोस्को कायद्यांतर्गत प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता.

त्यानंतर घरातील होणाऱ्या विरोधामुळे अल्पवयीन प्रेयसी आणि सज्ञान प्रियकराने आपले जीवन संपवल्याचे बोलले जात आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात होती.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये समोर आला. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. सटाणा तालुक्यातील लाखमापूरमधील ही घटना आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

एकाच समाजाचे असताना केवळ मुलाचे शिक्षण कमी असल्या कारणावरून घरच्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्माराम दळवी आणि सुनिता गांगुर्डे असं या प्रेमी युगुलाचे नाव. निराशेमध्ये या दोघांनीही आपलं आयुष्य संपवलं.

आत्मारामचं ४थी पर्यंत शिक्षण झालं होतं. तर सुनिता ही एफ.वाय.बीए.चं शिक्षण घेतं होती. एकाच समाजाचे आणि शेजारी राहणारे आत्माराम आणि सुनिताचे प्रेमसंबंध होते. परंतू शैक्षणिक तफावतीमुळे दोघांच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्या लिहल्या होत्या. त्यात आमच्या मृत्युस कुणालाही जबाबदार धरू नका असं लिहण्यात आलं होतं. बरं इतकंच नाहीतर तर, ‘जिवंत असताना आम्हाला एकत्र येऊ दिलं नाही पण गेल्यानंतर आम्हाला एकाच ठिकाणी ठेवा. आमच्या आत्म्याला शांती लाभेल’ असंही चिठ्ठीत लिहण्यात आलं होतं.

वयात आलेल्या मुलामुलींमध्ये शारिरीक आकर्षण निर्माण होते.
त्यामुळे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या काळात त्यांचे समुपदेशन होत नाही. कारण ते चोरून प्रेम करतात. अशी बहुतांश प्रकरणे यशस्वी होत नाहीत. रक्त गरम असते. या वयात काहीही करण्याची त्यांच्यात धमक असते. अनेकवेळा प्रेमसंबंध स्थापित झाल्यानंतर त्यांच्यासमोर जे अडथळे येतात, त्यामुळे त्यांना असे वाटते की आता संपले सगळे! तेव्हा नैराश्याने पछाडले गेल्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की आम्ही एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत असून आमच्या विरोधात सारे जग आहे. आमचे कुटुंबीय, नातेवाईक आमच्या प्रेमसंबंधांच्या विरोधात आहेत. ते आम्हाला काही एकत्र येऊ देत नाहीत. आमचे प्रेम आता यशस्वी होत नाही. त्यामुळे आत्महत्या हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे.

मुले मुली शाळा महाविद्यालयात एकत्र शिकतात. तारुण्यसुलभ भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ते एकमेकांकडे आकर्षिले जातात. त्यांच्यात प्रेमसंबंध गहिरे होत जातात. त्यांच्या या प्रेमसंबंधांना मान्यता मिळेलच याची शाश्वती नसते. हे उघडकीला आल्याने अनेक ऑनरकिलींगच्या घटना घडल्या आहेत. कधी जात, धर्म आड येतो तर कधी गरिबी वा एकच भावकी असल्याचे कारण. या सामाजिक अडथळ्यांना तोंड देतांना एकतर ते पळून जातात किंवा आत्महत्येचा मार्ग निवडतात. झाडाला गळफास घेऊन, विष घेऊन, एकदाच बंदूकीची गोळी झाडून घेऊन, तळ्यामध्ये किवा विहिरीत अथवा नदीत उडी घेऊन ते आत्यहत्या करतात.

या प्रकाराला टिव्ही, चित्रपट यांच्यासह आजची जीवनशैली कारणीभूत आहे. तसेच जे सोशल मीडियाचे भूत आजच्या तरुणाईवर सवार झाले आहे त्यामुळे तेही तितकेच जबाबदार आहे. काहींनी तर फेसबुक लाईव्ह आत्महत्या केलेल्या आहेत. लाईव्ह मरण्याचे हे.कसले. फॅड! यावरून एकच लक्षात येते की, तुमचा लाखमोलाचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१९.११.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *