रणधुमाळी गावकारभारपणाची

महाराष्ट्रात हळूहळू कोरोना महामारीचं संकट कमी होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या किंवा मुदत संपलेल्या वा मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.


ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला अन् गावातल्या चौकाचौकात गावकारभारी कोण? अशा प्रकारच्या चर्चेच्या फेऱ्या झडायला सुरुवात झाली.गेल्या दोन वर्षापासून काही मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागली होती. काहीजण गत पंचवार्षिक निकाल लागल्यापासून पराभवाचे सल घेऊन , मनात डूख धरुन तयारी करत होते.

तर काही जण फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रचाराला लागले होते.दादा , अण्णा, भाऊ , भावी सरपंच असे डिजिटल बॅनर करून स्वतःला मिरवत होते.काही नवखी तरुण मंडळी आखाड्यात उतरण्यासाठी छोटे मोठे समाजकार्य करत असल्याचे दाखवत आहेत.

निवडणूक आयोगाने दि.१९/११/२०२० रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर केले आहे. त्यामुळे बऱ्याच गावकारभाऱ्यांचा विचका झाला आहे. मोठ्या तयारिनीशी आखाड्यात उतरायचे आणि काही करून यावेळी रण मारायचेच असे ठरवणाऱ्यांना आरक्षण सोडतीने मोठा झटका देऊन एका वारात गार केले आहे.काही मंडळी पैस्याच्या थैल्या भरुनच तयार होती.

आरक्षण जर मनासारखे जाहीर झाले तर मताला हजार रुपये द्यावे लागले तरी चालतील पण यावेळी बाजी मारायचीच.असे म्हणणारे आरक्षण सोडतीमुळे मात्र हिरमुसले आहेत.

गावचा कारभार करणे आज मोठे अहंभावाचे बनले आहे. गावची नस ओळखता येवो न येवो परंतु गावाचा सरपंच म्हणून मिरवता आले पाहिजे ही भावना आज प्रत्येक गावपुढाऱ्यात रुजत आहे. गावात रस्ते,पाणी, लाईट(विज) या समस्या आजही आहेत. किती सरपंच गावासाठी झटत असतात हा संशोधनाचा विषय असला तरी बहुतांश सरपंच हे स्वतःचा खिसा भरण्यासाठी धडपडत असतात हे मात्र सत्य आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर प्रत्येक ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिला जाणारा निधी, करावयाची कामे, त्यातील ग्रामपंचायतीने केलेली कामे आणि त्यासाठी खर्च केलेला निधी दिसत असतो.जर कोणी ते बारकाईने पाहिले तर अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.तो वार्षिक, पंचवार्षिक अहवाल जर गावकऱ्यांनी अभ्यासला तर आपल्या गावपुढाऱ्यांची पितळे कशी उघडी पडतात ते आपल्या लक्षात येईल.

गावातील रस्ते, सौरदिवे,चौकात विज,पथदिवे, स्मारक सुशोभीकरण,ग्रामस्वच्छता, परसबाग निर्मिती, सुशोभीकरण, नळयोजना,पाणीपुरवठा, शाळा दुरुस्ती, शाळेला भौतिक सुविधा पुरवठा, गटार बांधणी, स्मशानभूमी बांधनी,अशा अनेक कामासाठी तो निधी राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीला उपलब्ध होत असतो.त्यापैकी बरेच कामे दरवर्षी कागदावर पुर्ण होतात. निधी खर्च केला जातो. पण गावात मात्र जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे गावचा कारभार करु इच्छिनाऱ्यांनो किमान आपल्या मनाची तरी लाज बाळगा.

स्वतः चा बंगला त्या बंगल्यासमोर सरपंच पदाची पाटी आणि बाजूला चारचाकी गाडी आणि गाडीवर सरपंच नाव लिहून स्वतः ची इज्जत वाढते असे समजू नका.तुमची इज्जत वाढो न वाढो पण गावात जे परगावचे लोक येत असतात त्यांच्या समोर गावची इभ्रत जाईल असे किमान वागू नका..

“सरपंच म्हणून मिरवतय पण गावात पाण्याची सोय करता आली नाही” असा शब्द जरी एखाद्या बाईने अथवा पुरुषाने उच्चारला तरी तुमची लाखमोलाची धनसंपदा तुमची इभ्रत वाचू शकणार नाही.
अनुसूचित जातीजमातीच्या अथवा भावी महिला सरपंचांनो कोणाच्या हातचे खेळणे होऊ नका.शासनाने, कायद्याने तुम्हाला अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर स्वतः करा..गावकुसाबाहेरची मानसिकता सोडून गावचा कारभार हाकून दाखवा.


महिला अथवा एखादा अनुसूचित जाती जमाती चा सरपंच होतो पण पाच वर्ष एखाद्या कानोड्यात पडून राहतो.पाच वर्ष संपून जातात पण त्यांना कोणी ओळखतही नाही. महिला असेल तर तिचा नवरा आणि अनुसूचित जाती जमाती चा सरपंच असेल तर उपसरपंच हाच गावचा कारभारी असल्यागत मिरवतो.नुसता मिरवतोच नाही तर कारभारही करतो.त्यामुळे सरपंच हे पद नावाला नसून गावचा कारभार हाकून दाखवण्यासाठी असतो.हे फक्त लक्षात असू द्या.

गावातील मतदारांनो शे दोनशेच्या नोटेसाठी,एकदोन वेळेसच्या मटण पार्टीसाठी अन् दोन चार दिवसाच्या दारुसाठी आपले अमूल्य मत वाया घालवू नका.योग्य उमेदवारास मतदान करून गावची तळमळ असणारा कारभारी निवडा.

गावचा कारभारी जुणेजानते होवोत वा नवीन तरुण तुर्क होवोत. पण गावातील विकासाच्या कामासाठी त्यांनी झटायला हवं.बाहेर राहून सल्ले देण्यापेक्षा रणात उतरून लढा द्यायला हवा.आणि गावातील समस्या दुर करून सरपंच पण मोठ्या तोऱ्यात मिरवावं.हीच अपेक्षा. तुर्तास एवढेच.

सतीश सोपान यानभुरे
७०८३१४४८८५
२०/११/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *