( दोस्तहो, राजकारण, समाजकारण, दौरे, सत्याग्रह, कोरोना.. वगैरेच्या गदारोळात मूळ झरा बऱ्याच दिवसापासून गोठून गेला होता. आज अचानक खुला झाला. खास आपल्या सेवेत ही एक ताजी टवटवीत लावणी.. )
किती जन्माचा विरह साजणा,
किती जन्माची तहान
जीवा-शिवाच्या मिलानासाठी
आतुर अवघे रान !
हा मोसम ऐसा भला हो
धो धो बरसू चला !
सख्या, मिठीत घ्याना मला हो
धो धो बरसू चला !! ध्रु !!
हे धुंद पांढरे धुके
हृदयाचा ठोका चुके
ही लाडीक हळवी हवा
अन् आठवणींचा थवा..
दिडदा दिडदा नाद दरीतून
गजर असा चालला हो..!
सख्या, मिठीत घ्या ना मला
धो धो बरसु चला !!१!!
नदी, नाले, पर्वत, किले
जे हवे तुम्हाला दिले
नीट बघून घ्या ना जरा
अन् हळूच कुंपण करा !
श्वासांचाही सातबारा
आभाळासह दिला हो..
सख्या, मिठीत घ्या ना मला
धो धो बरसू चला !!२!!
आभाळ सांडले किती..
का उगा पुराची भीती ?
कशी पडझड झाली सुरू..
हा हिशेब नंतर करू !
मिलनाचेही ऑडिट कसले.. ?
विचार नाही भला हो..
सख्या, मिठीत घ्याना मला
धो धो बरसू चला !!३!!
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर २३/११/२०२०