कृषी व्यवस्थेतल्या बलुतेदारांच्या शोषणाची कहाणी: ‘मळण ‘

रामराव अनिरुद्ध झुंजारे ( जन्म- १५-२-१९५६ ) यांचे मूळगाव शेलगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर वर्गांचे शिक्षण घेण्यासाठी रामराव झुंजारे हे नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात दाखल झाले. या काळात विविध चळवळीमध्ये त्यांचा सहभाग वाढला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचाही त्यांना याच काळात लळा लागला. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पोटापाण्यासाठी नोकरी लागावी म्हणून त्यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे बी.एड. प्रशिक्षण पूर्ण केले. याच शिक्षणाच्या बळावर त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एका कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.
शिक्षण घेत असतानाच रामराव झुंजारे यांना नांदेड, भोपाळ, हैदराबाद आदी शहरात अनेक कष्टाची कामे करावी लागली. प्रचलित समाजव्यवस्थेतील जात वास्तवामुळे त्यांना गरीबीसोबतच जातीयतेचेही चटके सहन करावे लागले. जात आणि वर्ग या दोन्ही कचाट्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर त्यांनी लेखनाला प्रारंभ केला.
दलित, ग्रामीण साहित्याच्या वाचनातून रामराव झुंजारे यांचा लेखन पिंड घडत गेला. आपण जे वाचतो त्यामध्ये आपण भोगलेल्या जीवनाचा तर कुठेही लवलेश सापडत नाही, या अस्वस्थतेतूनच झुंजारे यांनी हातामध्ये लेखणी घेतली. सुरुवातीला त्यांनी काही कथा लिहिल्या. दैनिक लोकसत्ताच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत त्यांची ‘भाकरीचा धनी’ ही कथा विदर्भ विभागातून पहिली आली. त्यानंतर काही दिवाळी अंकांतूनही झुंजारे यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. वाचकांच्या प्रतिसादामुळे त्यांचे लेखनबळ द्विगुणित झाले.
मुंबई येथील ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक कालवश प्रा. केशव मेश्राम यांच्याही वाचनात झुंजारे यांच्या कथा आल्या आणि त्यांच्याच शिफारशीने मुंबईच्या डिंपल पब्लिकेशन, ठाणे या नामांकित प्रकाशन संस्थेने झुंजारे यांची पहिली आत्मकथनात्मक कादंबरी ‘ झुंज’ ही १९९८ साली प्रकाशित केली. एका दलित विद्यार्थ्याने शिक्षणासाठी केलेल्या अविरत संघर्षाची कहाणी ‘झुंज’ मधून आलेली आहे, ती वाचकांना आवडली. त्यानंतर डिंपल पब्लिकेशनकडूनच त्यांची ‘बोंब दवंडी ‘ ही दुसरी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. विविध नियतकालिकांतून, वृत्तपत्रांतून तसेच दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या रामराव झुंजारे यांच्या कथांचा संग्रह कोल्हापूरच्या प्रसिद्ध अशा मेहता पब्लिशिंग हाऊस या संस्थेने ‘ काळ्या मायची कहाणी’ या नावाने २००९ साली प्रकाशित केला. याच संग्रहातील ‘ठिणगी’ नावाची एक कथा औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे. इ. स. २०११ मध्ये मुंबईतील प्रागतिक विचारसरणीचे प्रकाशक लोक वाङ्गमय गृह यांनी झुंजारे यांची ‘जलम बेडी’ ही कादंबरी अत्यंत आकर्षक आणि देखण्या स्वरूपात प्रकाशित केली.या कादंबरीला दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे दिला जाणारा ५०,००० रुपये रोखीचा ‘लोकमत अक्षर रंग’ पुरस्कार मिळाला आहे.
जवळजवळ नऊ वर्षानंतर रामराव झुंजारे यांची

‘ मळण ‘ ही कादंबरी त्यांच्याच मुलांनी सुरू केलेल्या बीज प्रकाशन गृह शेगाव या संस्थेने नोव्हेंबर २०२० मध्ये प्रकाशित केली आहे. ही कहाणी आहे नांदेड परिसरातील निसर्गाने कुशीत घेतलेल्या एका खेडेगावातल्या मांग कुटुंबाच्या संघर्षाची. ही तशी कुटुंब कहाणी असली तरी या कहाणीत गाव आणि शिवार आहे. शेत आणि शेतीतले, मातीतले राबणारे जीव आहेत.
शेलापूरच्या गावकुसाबाहेर वसलेल्या राज (मांग ) वाड्यात एक नवा जीव जन्म घेतो. म्हादनाक आणि जयाबाई यांना गणा, सखा , जमुना अशी तीन अपत्ये असतात. त्यातच हे चौथे अपत्य जन्मास येते. त्याचे नाव तुकाराम. आपल्या बाळाच्या जन्माचे स्वागत करावे यासाठी दोघेही पती-पत्नी जीवाचे रान करतात. बाळांतीणीसाठी काहीबाही जतन करून ठेवतात. जयाबाई बाळांतीन झाल्यानंतर म्हादनाक घरातल्या भालीने बाळाची नाळ कापतो. ‘भाल’ म्हणजे ढोरांची कातडी काढण्यासाठीचे हत्यार. बाळ आणि बाळंतीणीची सोय करण्यासाठी म्हादनाक आपल्या बारक्या पोराला सोबत घेऊन गावखोरीच्या जंगलात जातो. तिथे प्रचंड वेली आणि झाडांच्या जाळीत दोन वाघ दोन गाईंचा फडशा पाडून गायींवर ताव मारीत असतात. त्या वाघांशी लढून तो गायी सोडवून घेतो. खुश होऊन त्या दोन्ही गाईंचे कातडे काढतो. एवढ्यात कारल्याचा आडेलू महार तिथे टपकतो. मृत गाईंचे कातडे काढण्याचा अधिकार त्या काळी फक्त महारांना असतो. कातड्यासाठी महार मांगाचे भांडण लागते आणि शेवटी तडजोड म्हणून एक एक कातडे दोघेही वाटून घेतात. उमरीच्या ढोरवाड्यात
जाऊन म्हादनाक कातडे विकून बाजार करतो. आनंदाने घरी येतो.
त्याच दरम्यान महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला जाणार आहे, अशी बातमी म्हादनाकाला कळते आणि परिसरातल्या महार मांगांसोबत तो महाडला जातो. सत्याग्रहात सहभागी होऊन घरी आल्यावर बायकोला सर्व हकिकत सांगतो. तो म्हणतो , ” बाबासाहेब आंबेडकर लई मोठे शूर ईर. म्हणून त्यायनं न डगमगता, न भीता न डरता, न वाकता न झुकता चवदार तळ्याचे पाणी वंजळीत घेऊन गट गट पिऊन टाकले. त्यायचं बघून समद्या मांगा महारायनंबी पाणी वंजळीत घेऊन पिऊन टाकले. तव्हा महाडचे वंगळे लोकं भलतेच खवळले. लई म्हणजे लई चिडले. म्हणले तळं बाटलं. तळं नासलं. म्हणून मांगा महारायला लाठ्याकाठ्यायनं बदबद बदडले.कैकायचे डोसके फुटले.”
याप्रसंगी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शांत राहायला सांगितले. म्हणूनच तळ्याचं पाणी चवदार राहिलं; अन्यथा त्या तळ्याची चव बदलली असती. तळं रक्तानं रंगलं असतं , असं लेखक लिहून जातो. या सत्याग्रहाच्या शेवटी बाबासाहेबांनी दलितांना दिलेला संदेशही खूप महत्त्वाचा आहे. आपण हा सत्याग्रह का केला तेही बाबासाहेब सांगतात आणि शेवटी म्हणतात ,
” माहे खेत्री लोकंहो, जरा ध्यान देऊन, कान देऊन ऐका. मी तुम्हाला काही चांगल्या चुंगल्या गोष्टी सांगण्यासाठी उभा हाव. मांगकी,महारकी करू नका. गावकी करु नका. माणसावाणी स्वाभिमानाने जीवन जगा. दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका. नीतीची कास धरून जीवन जगा. एकजुटीने रहा. आपसात मारामाऱ्या करू नका, की हेवेदावे करू नका, की भांडण करून घेऊ नका. चांगले कपडे घाला. शिळं खाऊ नका की उष्ट्या अन्नाला हात लावू नका.पोरा पोरींना शाळेत घाला. मेलेली ढोरं ओढू नका .मेलेल्या ढोराचं मांस खाऊन मुर्दाड होऊ नका ” म्हादनाक बाबासाहेबांचा संदेश आपल्या भाषेत सांगतो. आपल्या बायको आणि मुलांना देवधर्माच्या नरकातून काढतो.
१९५६ साली बाबासाहेबांनी धर्मांतर करेपर्यंत महार- मांग गावगाड्यात एकत्र होते. मात्र धर्मांतरानंतर महार बौध्द झाले आणि मांग मांगच राहिले. मांगांना मांगकी बरोबरच महारकीही करावी लागली. पूर्वी बलुतेदारीत नसलेला मांग १९५६ नंतर बलुतेदार झाला. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर तर मांगाच्या दुःखाला पारावार उरला नाही. महारांनी मोठ्या प्रमाणात गावे सोडून शहरात स्थलांतर केले; तर मांग गावकामगार झाला. म्हादनाकाच्यानंतरची पिढी अशीच गावगाड्यात गावकामगार म्हणून वावरू लागली.
तुकाराम हा म्हादनाकाचा तिसरा मुलगा या कादंबरीचा नायक. बाप आंबेडकरी चळवळीत वावरलेला असतानाही तुकारामाला मात्र बापाच्या अकाली मृत्यूमुळे गावकामगार व्हावे लागले. त्याला शिक्षण घेता आले नाही. मात्र त्याच्यावर झालेले आंबेडकरी संस्कार तो कधीही विसरला नाही, हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.
गावगाड्यातील कृषी व्यवस्थेत शेतकऱ्यांचा हक्काचा गावकामगार म्हणून तुका आणि त्याचं कुटुंब राब राब राबते. गावातील प्रत्येक शेतकरी त्याला राबवून घेतो; मात्र त्याचा मोबदला ठरलेला नसतो. शेतकरी जे देईल तेच त्याच्या हक्काचे. मागण्याचा अधिकारच त्याला नाकारलेला आहे. कामाला नाही म्हणण्याचा अधिकारही त्याला नाही. शेतकरी सांगेल ते काम त्याने केलेच पाहिजे हेच त्याचे प्राक्तन आहे.
‘मळण’ या कादंबरीतला नायक तुका हा कृषी व्यवस्थेतील शोषणाचा बळी असला तरी तो स्वतः शेतीवर जीव असलेला शेतीमातीचा जाणकार आहे. त्याच्या नावे सातबारा नसला म्हणून काय झाले? परंतु तो खराखुरा शेतकरी आहे. तुका शेतीचे प्रत्येक काम मन लावून करतो. शेतीत राबणाऱ्या बैलांचीही तो मनोभावे काळजी घेतो. तो केवळ राबणारा जीव नाही; तर तुकारामाच्या वंशाचा, विचारांचे सौंदर्य जपणारा, शक्ती आणि युक्तीने परिपूर्ण, नीतीमान असा माणुसकीचा साक्षात पुतळा आहे.
आई वडिलांची सेवा करणारा इमानदार मुलगा, गाव आणि गावगाड्याची सेवा करणारा गावाचा गावकामगार, बापाने दिलेल्या स्वाभिमानी आंबेडकरी विचारांवर ठाम असलेला सच्चा वारसदार, देवधर्म, कर्मकाण्ड नाकारणारा विज्ञानवादी, प्राणिमात्रांवर दया करणारा भूतदयावादी, गरीबांविषयी कळवळा असलेला कनवाळू, कुटुंबावर प्रेम करणारा कुटुंबवत्सल, दिनरात शेतीत राबूनही शेतकऱ्याचा पाला पाचोळाही आपल्या घरी न नेणारा, परस्त्रीला माता मानणारा शुद्ध चारित्र्याचा खरा बुद्ध अनुयायी, राघू पाटलाने जातीय भेदभावाचे वर्तन करताच त्याला खडेचोट बोल सुनावून रातोरात त्याचे खळे सोडून येणारा स्वाभिमानी मांग अशी कितीतरी रूपं या कादंबरीच्या नायकाची वाचकांना भुरळ पाडतात.
आंबेडकरपूर्व आणि आंबेडकरोत्तर दलित जीवनाचे दर्शन घडविणारी ही कलाकृती सामाजिक दृष्ट्या जशी महत्त्वाची आहे, तशीच ‘अंबुजी’ भाषेचा पुरेपूर वापर करून मराठी भाषेच्या सौंदर्यात भर घालणारी कलाकृती म्हणूनही ही कादंबरी खूप महत्त्वाची आहे. कृषी संस्कृतीतील मांग जात समूहाचे स्थान अधोरेखित करणारी ही कलाकृती आहे. त्याच बरोबर मराठी शब्दकोशात भर घालणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीची खास” झुंजार शैली” वाचकांना अंतर्मुख करणारी, खिळवून ठेवणारी आहे. बाईल, झोझड, गब्बूच्या गब्बू लेकरु, परत वाघ, आवशान, माय पापडी, गाव म्हारोडा एक करणे, काडी पहिलवान, निरंकाळ उपाशी , ढोऱ्या, भवंड येणे, सोबणी, लाज बोडी, सिंधळ बोडी, घोडमुंज्या, वसबुडव्या, मेंगुळं, ढिलंपुचुक, बोलीला बोकूड लावणे, पादरं मीठ, परवेश, याचं त्याचं खाऊ आन आपलं नाही देऊ, कळ लाऊन कौतिक बघणारा, बिबा, शिवेपलिकडचं अवकाळी बेणं, गुलजार, दाल्ला, तनीस, आलम दुनियेत अशी अस्सल अंबुजी शब्दकळा आशयाला अधिकच गडद करते.
शेती मातीशी निगडित कितीतरी शब्द या कादंबरीत आढळतात. उदाहरणार्थ – कोळपं, इचका, केणा, हराळी, तण, बैलांचा खरारा, भारा, आऊत , उभाट्या वखर हाणणे, वखराची फास, मोंडी फास, भळा, इळतीची काठी, काडवण, कडबा,वळंबा, जानोळे, तुत्या, दगडी कुंड, पिठलं भाकर, वटकी, जव, कासरा , मळा, चकमक, मुशारदार, शेतात नाला आन घरात साला असू‌ नव्हं, खोंगाभर, पसाभर, टिबन, सालदार, वराडी जवारी, गुड, कवाद, रानकुतरे, रानमांजरी, रानम्हसी, रानडुकरं, रानहेले, रानगाई, सरपं, लव्हरं, तितरं, घोरपडी, धामणी, परडं, आजगरं, कोंग्या, खळं, मेढ, बंडाटी, सुगी, मळण, बुद्धदेव, मदन, रास, धसकटं, फडं, पेंड्या, कणसं, झाडणी, हातणी, जागल, फरसडी, अंबाडी, आगटी, आकन, निकन, मातरं इ.
लोक लयीत व्यक्त होणारे संवाद हे या कादंबरीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. लेखकाची खास म्हणून एक भाषिक शैली या कादंबरीला लाभलेली आहे. ही कादंबरी मुळातूनच वाचावी तेव्हाच ती खास भाषिक लकब आपल्याला कळू शकते.
एकंदरीत मराठवाड्यातील सरंजामी मानसिकतेचे, शेतीमातीचे, खळेदळे आणि गाव संस्कृतीचे दर्शन घडविणारी, दलित जीवनाच्या तीन पिढ्यांचे अस्सल चित्रण करणारी ही कलाकृती ऐतिहासिक स्वरूपाची आहे. रामराव झुंजारे यांची ही कादंबरी दिल्लीच्या थाॅमसन प्रेस इंडिया लिमिटेड या नामांकित कंपनीने छापली असून, दर्जेदार कागद, उत्कृष्ठ बांधणी आणि सुंदर अक्षर रचना तसेच चित्रकार राजू बाविस्कर आणि रेखाटक भारत दाढेल, जितेंद्र साळुंखे यांच्या कलाकुसरीमुळे पुस्तक देखणे झाले आहे.
या कादंबरीत कथानकाचा मोठा अवकाश असला तरी समग्र गावगाड्याचे चित्रण करण्यात लेखकाचे अनुभव विश्व तोकडे पडल्याचे जाणवते. ही कादंबरी म्हणजे या कथानकाचा शेवट नाही. कादंबरीच्या पुढील भागात ही उणीव भरून काढता येईल. एकूणच खूप मोठा आवाका लेखकाने धरलेला असून, लेखकाचा त्रिखंडात्मक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल, यात वाद नाही. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
‘मळण’ ( कादंबरी )
लेखक- रामराव अनिरुद्ध झुंजारे
प्रकाशक- बीज प्रकाशन गृह शेगाव जि.बुलढाणा
प्रथमावृत्ती ४ नोव्हेंबर २०२०,
पृष्ठे – २३६, मूल्य – ३१५ रुपये.
पुस्तक परिचय- डॉ. मारोती कसाब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *