शाळा : शिक्षक संभ्रमात, विद्यार्थी – पालक गोंधळात (भाग -३)

शाळा कधी सुरू होणार ? याची हुरहूर विद्यार्थ्यांच्या मनाला लागलेली असतानाच अखेर सोमवारी शाळेची घंटा वाजली. शासनाने कोरोनाविषयक नियम पाळून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या केलेल्या सूूचनेनुसार माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाली. मात्र कोरोनाबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात शाळेत व महाविद्यालयाकडे पाठच फिरविल्याचे चित्र दिसत होते.

काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांची २० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती पहिल्या दिवशी नव्हती. मात्र, विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्याचे दिसत होते. तशा सूचनाही विद्यार्थी व शिक्षकांना संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यानी दिल्या होत्या.
सकाळीच काही अंशी विद्यार्थी शाळेत येण्यास सुरुवात झाली होती. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर कक्ष तैनात करण्यात आला होता. तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे थर्मल गनने तापमान तपासण्यात येत होते. विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी कोरोना विषयक घ्यावयाच्या काळजीचे फलक लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने एक दिवसा आड नियमित विद्यार्थ्यांचे वर्ग घेत गर्दी टाळण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळांची पहिली घंटा तब्बल आठ महिन्यांनंतर सोमवारी वाजली. पुणे जिल्ह्यातील ९ वी ते १२ वीच्या १हजार २४६ पैकी २१५ शाळा शासकीय नियमांचे पालन करत सुरू झाल्या. कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. २ लाख ३८ हजार ४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ हजार ४३१ विद्यार्थी उपस्थित होते. केवळ ४ टक्केच विद्यार्थी उपस्थित राहिले. उर्वरित शाळा येत्या १ डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत काही पालक सकारात्मक असले तरी काही पालकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे चित्र जिल्ह्यात होते.

पहिल्या दिवशी शासकीय नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची तपासणी करून शाळेत सोडण्यात आले. ऑक्सिमिटर आणि थर्मामिटरच्या साह्याने तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना एक बाक सोडून बसविण्यात आले. शाळा काही तास सुरू राहणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना एकमेकांच्या जवळ येऊ दिले जाणार नाही. मधली सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. मैदानी वर्गही रद्द करण्यात आले आहेत. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना थेट घरी पाठवले जात आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमती पत्र मागवण्यात आले होते. जवळपास १० हजार ५०० पालकांनी हे पत्र शिक्षण विभागाला पाठवले. यात काही पालक हे शाळा सुरू करण्यास अनुकूल होते. तर काही पालकांच्या मते लस येईपयर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी करत पाल्यांना शाळेत पाठवणार नसल्याचे म्हटले आहे.

जिल्हा परिषद घेणार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी
कोरोनाचा संसर्ग होईल या भितीने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा परिषद पूर्णपणे खबरदारी घेत आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत कोरोनाची लागण झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद स्विकारेल अशी माहिती अध्यक्ष निर्मला पानसरे व उपाध्यक्ष रणजित शिवत यांनी दिली. शिवतरे म्हणाले, नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, मात्र पुढील काही दिवसांमध्ये ही संख्या वाढेल. याशिवाय सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात आलेली आहे. सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करण्यात आले. तरी देखील विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याची उपचाराची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील २०७ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सोमवारी १९६ शाळाच भरल्या. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलमध्ये केवळ एकाच विद्यार्थ्याची उपस्थिती होती.

जिल्ह्यात ४५८ माध्यमिक शाळा असून, नववीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या २२ हजार ५७९, दहावीची २३ हजार ३२८, अकरावी १७ हजार ७२६, बारावीची विद्यार्थी संख्या १९ हजार ५०३ इतकी आहे. जिल्ह्यातील अवघ्या १,२०८ पालकांनी शाळांना संमत्तीपत्र सादर केले आहे. कोरोनामुळे पालकांमध्ये अद्याप संभ्रम असल्याने शाळेत पाठविण्यासाठी बहुतांश पालकांनी नकार दर्शविला आहे.

शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळत होता. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा शिक्षकांचीच संख्या अधिक होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाची तपासणी करूनच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत होता. शाळेच्या मुख्य दरवाजावर सॅनिटायझर, थर्मल गन ठेवण्यात आले होते. तसेच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांचीही तपासणी करण्यात येत होती. पालकांनीच मुलांना शाळेत सोडण्याची सक्ती केल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी शाळेच्या परिसरात कमी दिसत होती.

कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले वर्ग सोमवारी भरले. शाळेत येताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला थोडी भीती होती. पण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्र-मैत्रिणीसमवेत संवाद साधल्यानंतर या विद्यार्थ्यांची भीती दूर झाली. शाळा सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता. एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था शाळांनी केली होती. त्यांना वेळापत्रक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेऊन शाळा भरणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. संमतीपत्रे मिळालेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांचे एका दिवशी, तर उर्वरीत विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी वर्ग भरविण्याचे नियोजन अनेक शाळांनी केले आहे.

राज्यातील इ. ९ वी ते १२ वीच्या शाळा आवश्यक काळजीसह आज सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे मी अभिनंदन करते. पहिले पाऊल विश्वासाचे, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे.

नववी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यी वर्गासाठी २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी आहे. त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

संपूर्ण देशातच अद्यापपर्यंत कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाचा धोका अद्यापपर्यंत संपलेला नाही. आपल्या राज्याचा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता दर दिवशी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू केल्यास व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा पालक यांच्यामधील एखादी जरी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली तर त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

परदेशात तसेच आपल्या देशातील अन्य राज्यात देखील शाळा सुरू करण्याचे घेतलेले निर्णय रद्द करून पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे हरियाणा राज्यातील एका शाळेत १६ मुले कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. महाराष्ट्रात देखील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत घाईगडबडीत व परिणामांचा विचार न करता घेतला गेलेला आहे. या वर्गांत शिकणारी मुलं १५ वर्षे ते १८ वर्षे या वयोगटातील आहेत.

कोरोना सारख्या गंभीर आजाराशी लढा देण्याइतपत त्यांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना धोका देखील फार मोठ्या प्रमाणात संभवतो. आपल्याकडे आरोग्य यंत्रणा देखील अद्यापपर्यंत सक्षम नसून या चुकीच्या निर्णयामुळे कोरोनाचा प्रसार झाला तर त्याला शासनच जबाबदार राहील.

त्यातच जिल्ह्यात लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ताप किंवा अन्य लक्षणे असलेला रुग्ण हा नेमका कोरोना पॉझिटिव्ह आहे की त्याला अन्य आजार आहे हे समजण्यास देखील वेळ लागणार आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अद्यापपर्यंत निर्जंतुकीकरण किंवा अन्य खबरदारीची उपाययोजना करण्यात आलेली नाही.

शाळा सुरू करताना सर्व बाबी या प्रशासनावर सोपिवण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासन देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यास सक्षम नाही. आज देखील ग्रामीण भागातून शाळांमध्ये येण्याकरता वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना बस किंवा अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने या सर्व बाबींचा पुनर्विचार करून जोपर्यंत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व अन्य लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे रणजित देसाई म्हणाले आहेत.

माध्यमिक शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, यासाठी शिक्षण विभाग पालकांकडून संमतीपत्र भरून घेत आहे. काही पालक संमतीपत्र भरून देत आहेत तर काही पालक चक्क नकार देत आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमिवर पालक मुलांना शाळेत पाठविण्यास फारसे तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.

इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग पालकांशी संपर्क साधत आहेत आणि मुलांना शाळेत पाठविण्यास सांगत आहे. शाळेत दररोज तीन ते चार तासिका होणार आहेत. एक तासिका ४५ मिनिटांची राहणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही. दरराेज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे तरी कसे, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. मुलांना शाळेत पाठविल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत कोणती काळजी, खबरदारी घेण्यात येणार आहे, याविषयी पालकांच्या मनात साशंकता आहे. शिक्षण महत्त्वाचे असले तरी, जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल कमी दिसत आहे. इयत्ता नववी व बारावीचे महत्त्वाचे विषय शाळेत शिकविले जाणार आहेत. हेच विषय ऑनलाइनसुद्धा शिकविण्यात यावे. सध्या तरी ऑनलाइन शिक्षणावरच शिक्षण विभाग व शाळांनी भर द्यावा, असे पालकांचे मत आहे.

उद्या मुलांना कोरोनाची लागण झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालक करीत आहेत; परंतु शिक्षण विभाग पालकांच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत बोलाविण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षण विभाग, शाळा, मुख्याध्यापक कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक दिसून येत नाहीत. शाळांमध्ये विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करणार नाहीत, याची जाणीवही पालकांना आहे. त्यामुळेच कोरोनाच्या परिस्थितीत शाळेत जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी पालकांचा आग्रह दिसून येत आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना त्रास होत असेल तर उपचारासाठी खास सुविधा करण्यात आली आहे, त्यांना आराम करण्यासाठी रजा दिली जाणार आहे.

ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आढळले त्या शाळा सोमवारी सुरू करण्यासाठी बाजूंच्या शाळांमधील विषय शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शाळा परिसरात सोमवारी खास पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात यावा असे आदेश पोलिसांना दिले आहेत.

इयत्ता नववी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत काठिण्य पातळीवरचे विषय शिकविण्यात येणार आहेत. इंग्रजी, गणित व विज्ञान विषय ऑनलाइन शिकविण्यात अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेता, मुलांना शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांसोबतच इतरही इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, जीवशास्त्र, रसायनशास्त्रासारखे विषयही शिक्षक शिकविणार आहेत; परंतु काही विषय ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा शिकविण्यात येणार आहेत.

मुलांनी शाळेत यावे. याविषयी आग्रह नाही. कोरोना परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही पालकांकडून संमतीपत्र भरून घेत आहोत. पालकांना ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आहे. ज्यांना ऑफलाइन शिक्षण घ्यायचे आहे, त्यांना ते उपलब्ध राहील.

कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही. त्यामुळे मुलांना शाळेत बोलावून शिक्षण देणेही महत्त्वाचे आहे; परंतु मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती पालकांना द्यावी. नुसतेच संमतीपत्र भरून आम्ही मुलांना शाळेत कोणाच्या आधाराने पाठवायचे. परिस्थिती पाहूनच, मुलांना शाळेत पाठविण्याचा विचार करू असे पालक बोलत आहेत.

शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून शाळेत शिकवायला जाणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आल्या आहेत. शिक्षकही मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत असून, शेकडो शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिक्षकच पॉझिटिव्ह निघत असतील तर शाळा कशा सुरू होणार, ही नवीनच गुंतागुंत प्रशासनाला भेडसावत आहे. यामुळे पालक व विद्यार्थीही धास्तावले आहेत.

दिवाळीनंतर कोरोनाची लाट पुन्हा येईल, अशी शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत होती. नंतर झालेल्या टेस्ट आणि वाढलेली पॉझिटिव्हची संख्या यावरून संकेत खरे ठरत आहेत. अशात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. १७ नोव्हेंबरपासून मोठ्या संख्येने शिक्षक टेस्ट करीत आहेत. गुरुवारपर्यंत आलेल्या टेस्टच्या अहवालावरून विदर्भात २०० च्या जवळपास शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. अजूनही ७० टक्के शिक्षकांच्या टेस्टचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक पॉझिटिव्ह येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रशासन शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत आहेत. पण शिक्षकाच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या बरीच मोठी आहे. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग करायची आहे. केवळ थर्मल स्कॅनिंगने कोरोना डिटेक्ट होईल का, असाही सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.‌शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घ्यावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिक्षकांची पॉझिटिव्हची संख्या वाढल्याने पालकांमध्ये धास्ती वाढली आहे. या भीतीपोटी अनेक पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यासंदर्भातील संमतिपत्र भरून दिले नसल्याची माहिती आहे.

संस्थाचालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भात नकार आहे. बहुतांश पालकसुद्धा मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रशासन साहित्य पुरवायला तयार नाही. आता शिक्षण विभागानेही हात वर केले आहे. संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनावर ढकलली आहे. तरीही शाळा सुरू करण्याचा अट्टहास का, असा नाराजीचा सूर शिक्षकांमधून उमटत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याने व दिवाळीची सुट्टी संपल्याने सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू हाेईल. सध्यस्थितीची गरज म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी भविष्यात ते पारंपरिक शिक्षणाची जागा घेऊन प्रभावी ठरेल असे १५ टक्के पालकांना वाटते. तर पारंपरिक शिक्षणाची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊच शकत नाही, असे ठाम मत ६३ टक्के पालकांनी मांडले. दुसरीकडे २१ टक्के पालकांना ऑनलाइन व पारंपरिक शिक्षणात प्रभावी माध्यम नेमके काेणते हेच सांगता आले नसल्याचे सर्वेक्षणातून समाेर आले.

शिक्षक व समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी ऑनलाइन शिक्षणासंदर्भात राज्यातील पालकांच्या समस्या, निरीक्षणे, अडचणी सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन शिक्षणाबाबत ४० टक्के पालकांनी आपला अनुभव साधारण असल्याचे तर ३३ टक्के पालकांनी समाधानकारक असल्याचे सांगितले. ६.३ टक्के पालकांनी तो अतिशय वाईट तर १३ टक्के पालकांनी अतिशय चांगला असल्याचे मत मांडले.

ऑनलाइन’मध्ये नेटवर्कची समस्या उद्भवते.‌ ऑनलाइन शिक्षण देताना सर्वाधिक पालकांना नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 13 %पालकांनी त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्याचे सांगितले. शिक्षकांनी ऑनलाइन शिकवलेले समजत नसल्याच्या तक्रारीही पालकांनी केल्या. यासोबतच शाळेचे सदोष वेळापत्रक, अभ्यास घेण्यास वेळ देता न येणे, आर्थिक ओढाताण, कुटुंबातील आजारपण अशा गोष्टीही समस्या म्हणून पालकांनी सर्वेक्षणादरम्यान मांडल्या.

अनेक पालकांची समुपदेशनाला संमती नसली तरी ऑनलाइन शिक्षणाच्या काळात ऑनलाइन अभ्यासाशी तडजोड करण्यासाठी, तो समजावून घेण्यासाठी आणि पुढील अभ्यासाची वाटचाल कशी करावी याच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पालक, विद्यार्थ्यांसाेबतच शिक्षकांच्या समुपदेशनाचीही गरजही त्यांनी व्यक्त केली.

कोरोना अद्याप संपला नाही; परंतु २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने मुलांच्या आरोग्याची जबाबदारी स्विकारायची कुणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकाचा होकार किंवा नकार याबाबत हमीपत्र घेण्यात येत आहे. जिल्ह्यात पालकांकडून संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. आणखी दोन दिवसात सर्व पालकांच्या समंतीपत्र शाळांकडे प्राप्त होतील. त्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाकडे येणार आहे. त्यामुळे तूर्तास किती पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिली हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पालकांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये, अशा सूचनाच शिक्षण विभागाने शाळेला दिलेल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची भीती आहे. त्यात शिक्षकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये सुद्धा काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही भीती वाढत आहे.

मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याचा अहवाल येईल. ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आले त्या शाळा बंदच राहणार आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नाही हाच प्रश्न आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणेही आवश्यक आहे.

शाळेचे वर्ग सुरू होण्यापूर्वी शाळा निर्जंतुकिकरण करण्यात आले असून कोवीड अनुषंगाने ईतर सुरक्षेची साधने शाळेत ठेवण्यात आली आहेत. मार्च महिण्यात दहावीचा भुगोल विषयाचा पेपर बाकी असताना परिक्षा रद्द करून शाळेला कुलूप ठोकण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष सुरू होताच शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणात ईंटरनेटची बाधा व मोबाईल उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. आजपासून शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. परंतु, कोवीडची दुसरी लाट येणार असल्याच्या चर्चेने पालकांची धाकधूक वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवायचे का या बाबत पालक संभ्रमात पडले आहेत.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२४.११.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *