◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – रॉय किणीकर
कविता – रुबाया
रघुनाथ रामचंद्र किणीकर (उर्फ – रॉय किणीकर).
जन्म – १९०८
मृत्यू – ०५/०९/१९७८
कार्यक्षेत्र – साहित्य, पत्रकारीता, अभिनय.
साहित्य प्रकार – कविता, नाटक, कथा, कादंबरी, अनुवाद, बालसाहित्य.
रॉय किणीकर यांचे वडील वकील होते.
रॉय किणीकर यांच्या आयुष्यातील बहुतांश वर्षे कर्नाटकातील गुलबर्गा येथे गेली. पुढे पुणे आणि औरंगाबाद येथे त्यांचे वास्तव्य होते.
औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक अजिंठाचे ते संपादक होते. शिवाय ते त्यात ललित लेखनही करीत असत.
त्यांनी अनेक नाटकांमध्येही कामे केली होती.
नभोवाणीसाठी त्यांनी श्रुतिकाही लिहिल्या होत्या.
रात्र, उत्तररात्र हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. या संग्रहातील रचनांमुळेच खरेतर ते प्रकाशझोतात आले.
रॉय किणीकर हे त्यांच्या शैलीबद्ध “रुबायांसाठी” ओळखले जात.
प्रेम, मिलन, देव, करूणा, जीवन अशा विविध विषयांवर त्यांनी अनेक रुबाया लिहिल्या आहेत आणि या विशिष्ट काव्यप्रकारात साहित्यात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या या रुबायातील टवटवीतपणा आजही अजरामर आहे.
कुटुंबाची परवड झाली तरी साहित्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केलं नाही.
“ये गं ये गं विठाबाई” या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे १९६३ साली लेखन पारितोषिक मिळाले.
एक असामान्य प्रतिभावंत अशा या साहित्यिकाने आपला ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवून ठेवला आहे.
मराठी साहित्यात रॉय किणीकर यांनी जे भरीव योगदान दिले त्याला तोडच नाही. त्यांच्या जबरदस्त क्षमतेच्या रुबायांचा आस्वाद आपण घेऊयात…
वेगवेगळ्या विषयांवरच्या सखोल विचारपुर्वक लिहिलेल्या त्यांच्या रुबाया आपल्याला चिंतन करायला भाग पाडतात. इतिहासापासून ते सद्य सामाजिक जीवन आणि जुन्या चालीरीती पासून ते वैज्ञानिक दृष्टीकोन, आनंद, दुःख, आर्त आर्जव अशा वेगवेगळ्या भावभावना आशय विषय ताकदीने रसिकांसमोर मांडण्याचे सामर्थ्य त्यांच्या रुबायांमध्ये आणि अन्य लेखना मध्ये दिसून येते.
पाहुयात त्यांच्या काही उपदेशपर चिंतनशील रुबाया –
रुबाया
इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला
येताना त्याने दार लावले नाही
जाताना त्याने वळून पाहिले नाही
येईन म्हणाला, पाहिन वाट म्हणाली
दारात अहिल्या शिळा होऊन बसली
पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगावयाचे सांगून झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही
खांद्यावर घेऊ नको सोन्याचा सूळ
चार्वाक म्हणाला, पुनर्जन्म हे खूळ
देहाला कसलें आहे पुण्य नि पाप
आत्म्यास भोगु द्या अमरत्वाचा शाप
- रॉय किणीकर
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता,
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/