अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन
कोट्यावधी भारतीयांच्या हिंदुत्वाचे हृदयस्थान बनलेल्या अयोध्या नगरीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बहुप्रतिक्षित राममंदिराचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आणि केंद्रबिंदु हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच होते. मोदी सत्तेत आल्यापासून आजपर्यंतच्या सर्वच बहुचर्चित घटनांच्या मध्यवर्ती ठिकाणी तेच राहिलेले आहेत. समर्थकांच्या हृदयात तर विरोधकांच्या टीकेत आणि चर्चेत ते नेहमी राहिलेले आहेत. कोरोना संकटाला बाजूला ठेवून भूमीपूजनाचा सोहळा अत्यंत भावोत्कट, भक्तिरसपूर्ण आनंददायी वातावरणात संपन्न झाला. हा सोहळा देशाने टिव्हीवर पाहिला आणि देशात अनेक सरकारे आली आणि गेली तरीसुद्धा हे ‘मोदी है तो मुमकिन है’ या जयघोषणेची प्रचिती देणाराच ठरला. भूमीपूजनाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर मोदींचे भाषण जे केवळ तेथील उपस्थितांसाठीच नव्हते तर ते तमाम रामभक्त तसेच संपूर्ण देशवासियांसाठीच होते असे म्हणायला हरकत नाही. देशभरात ठिकठिकाणी मिठाई वाटून, फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. या भूमीपूजनाआधी मोदी यांनी हनुमानगढीत जाऊन आरती केली. त्यामुळे रामभक्त हनुमानाचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य शक्य नाही हे रामभक्तांना स्पष्टपणे दिसून आले. इथेही त्यांनी भाषणाआधी सर्वांना जिंकून घेतले. हा सोहळा भारतात संपन्न झाला असला तरी विदेशातही घरघरांत हा सोहळा अनुभवला. त्यामुळे हा वैश्विक आणि ऐतिहासिक ठरतो. या भूमीपूजनाचे सर्वांनीच स्वागत केले. अयोध्येत होणारे राममंदिर राष्ट्रीय ऐक्याचे, समानतेचे आणि शांततेचे प्रतिक ठरेल कारण यामुळे झालेल्या दंगलीमुळे निर्माण झालेले धार्मिक वितुष्ट, हिंदुत्ववादी संघटनांच्या कारवायांमुळे समाजाचे झालेले तुष्टीकरण हे संपून जाईल आणि एका नव्या पर्वाची सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, हे अखिल विश्वच माझे कुटुंब आहे, अशी शिकवण देणाऱ्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वाचे भारतवासी पाईक आहेत. त्यामुळेच सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यावर आमचा विश्वास आहे. राम मंदिराच्या उभारणीच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजे नव्या भारताची सुरुवात आहे.
राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी जाणे हेच राज्य घटनेच्या विरोधी असल्याचे मत व्यक्त करीत असुदुद्दीन औवेसी यांनी विरोध दर्शविला. हे भूमीपूजन म्हणजे बहुसंख्यांकाचा विजय आहे. धर्मनिरपेक्षतेवर हिंदुत्वाने विजय मिळवला असे त्यांचे म्हणणे होते. देशाच्या संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा धार्मिकतेला महत्त्व देणे म्हणजे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र नसल्याचे सिद्ध करणे होय असाही त्यांचा मतितार्थ होता. यात मोदींचे धार्मिक राजकारण असू शकते. ते जनतेलाही मान्यच आहे. बाबरी मशीदीच्या वादग्रस्त जागेबाबत निर्णय देतांना तो तथ्य किंवा पुराव्यावर आधारित नाही तर तो लोकांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा विचार करुन देण्यात आला असा घणाघात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घातला. जे अयोध्येत होत आहे ते एका धर्माने दुसऱ्या धर्मावर केलेले अतिक्रमण आहे. वैदिक धर्म मानणारे हे सत्य मानायला तयार नाहीत. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. ते पुर्वी साकेत नावाने ओळखले जात होते, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली. ती पुरोगामी, संविधाननिष्ठ लोकांना पटण्यासारखी आहे. परंतु रामभक्तांचा युक्तिवाद असा की बाबराने राममंदिर पाडून मशिद बांधली, हे धार्मिक आक्रमण नव्हते काय? असा आहे. आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आपली भूमिका मांडताना सुप्रीम कोर्टाचा निकाल अन्यायकारक आहे असे म्हटले आहे. तेथे बाबरी मशीद होती आणि मशिदच राहील. अन्यायपू्र्ण, दमनकारी, लज्जास्पद आणि बहुसंख्याकांचे तुष्टीकरण करणाऱ्या निर्णयाद्वारे त्या जमिनीवर झालेले पुनर्निर्माण मशिदीचे अस्तित्व नष्ट करु शकणार नाही. त्यामुळे दु:खी होण्याचे काही कारण नाही. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. सन १४३४ मध्ये हागिया सोफिया या मशिदीचे रुपांतर वस्तुसंग्रहालयात झाले होते. गत जुलै महिन्यातच तुर्कस्थानचे राष्ट्रपतींनी त्या वस्तुसंग्रहालयाचे रुपांतर मशिदीत केले. हा बोर्डाचा युक्तिवाद अत्यंत हास्यास्पद आहे. येत्या दोन अडीच वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. भविष्यात मंदिराचे मशिदीत रुपांतरण होणे अशक्यच आहे. तसा प्रयत्न करणाऱ्याला संभाव्य परिणामाची जाणिव असणे आवश्यक आहे. अयोध्येत कोणतेही मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली नाही असे सर्वोच्च न्यायालयाने जरी मान्य केले असले तरी अयोध्येतच मशिदीसाठी स्वतंत्र पाच एकरची जागा दिली आहे. त्यामुळे या सर्वच वादग्रस्त प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर या चर्चेला काही अर्थ उरत नाही. प्रश्न राममंदिर हे आधुनिक भारताचे संस्कृतीचे आधुनिक प्रतिक कसे बनणार हा आहे. समाजातील विषमता, उच्चनीचभाव, शतकानुशतकांचा जातीभेद, स्त्री-पुरुष असमानता हे अडसर भावपूर्ण भाषणाने संपणार नाहीत. राष्ट्रीय, जातीय, धार्मिक एकात्मता सांधायची असेल तर समाजातील सर्वच स्तरांना विश्वासात घ्यावे लागेल. यातूनच नवभारताची निर्मिती होऊ शकेल.
गंगाधर ढवळे ,नांदेड