जाने कहा गये वो दिन…

एके दिवशी दुपारी निवांत झाल्यानंतर मोबाईल उघडला. पाहतो तर काय त्यात तीन-चार व्हिडिओ गेम्स डाऊनलोड केलेली. क्षणात ओळखलं ही करामत नक्कीच माझा नातू अर्णवचीच असणार. जेमतेम आठ वर्षे वय पण मोबाईल वर गेम खेळण्यात एकदम पारंगत. आजची लहान मुलांची पिढी ही नक्कीच हुशार आहे पण फक्त या गॅझेट च्या दुनियेत. दिवस रात्र आजची पोर या गॅझेट ला चिटकून असतात. बाहेर मोकळ्या हवेत जाण्याची यांची इच्छा नसते.
जे गेम आम्ही मित्रा सोबत मैदानात खेळायचो ते गेम आता मोबाईल वर आलेत. आजची पिढी स्क्रिन वर कितीही गेम खेळण्यात पटाईत असली तरी वास्तविक गेम खेळण्यापासून मोबाईल च्या वेडापायी दूर फेकली गेली आहे.


आजच्या नव्या पिढीला जुन्या वास्तविक खेळांची माहिती आणि त्यांचे फायदे माहित करून देणे हे प्रत्येक पालकांचे आता कर्तव्य झाले आहे.
आजकाल हे खेळ फक्त गरिब,भटके किंवा स्टेशन च्या आजूबाजूला झोपड्यात राहणारी पोरंच खेळताना दिसतात आणि त्यांना बघितलं की बालपणाच्या आम्ही खेळलेल्या खेळाच्या रम्य आठवणी डोळयासमोर येतात. मग बालपणातील सर्व खेळ आठवायला सुरुवात होते. विटी-दांडू, लपंडाव, मामाचे पत्रे हरवली ,कबड्डी,आट्यापाट्या , लगोरी,पतंग, भोवरा, रस्सीखेच,सूरपारंब्या, कुईकुई जामीन कोण, टायर फिरविणे, गोट्या असे अनेक खेळ आठवले की मन रोमांचित होत. 
भातुकली,किस बाई किस, झिम्मा फुगड्या,सागरगोट्या, काचकवडी, दोरीउड्या, लंगडी, खेळणे हे सहसा मुलींचे खेळ असायचे.

उन्हाळ्याची सुटी लागली, की आपापलं खेळाच साहित्य घेऊन मुल कोवळ्या उन्हातच बाहेर पडायचे. मग एक एक खेळ सुरू व्हायचा. दिवस माथ्यावर येऊन ऊन तापलं की घरचे येऊन ओढून न्यायचे तरीपण आमचं मन भरायचं नाही.
कोणी पतंग छान उडवायचा तर दुसरा भोवरा छान फिरवायचा. त्याच्याकडून ते कौशल्य आणि कसब शिकण्यात कमीपणा कधीच वाटायचा नाही.


दिवसभराच्या या खेळातून खूप भाग दौड व्हायची मग तहान लागली की जवळच्या बाहेरच्या गार डेऱ्यातून मग तांब्याभर पाणी ढसा ढसा पिऊन ताजतवान व्हायचं आणि परत खेळ सुरू व्हायचे. मैदानी आणि धावपळीच्या खेळामुळे शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त रहायचे.

संध्याकाळी विशेषतः मैदानी खेळ सुरू व्हायचे. गल्ली गल्लीतल्या नाही तर वेगवेगळ्या आळीतल्या टीम बनऊन कब्बडी, हुतुतु , खोखो खेळले जायचे. अत्यंत चुरशीने ह्या लढती व्हायच्या. अंधार पडे पर्यंत हे खेळ चालू असायचे.कधी कधी मग मोर्चा शेतात निघायचा. चढायला सोपं झाड बघुन मग सूर पारंब्या हा खेळ सुरू व्हायचा.
दुपारच्या भर उन्हात नदीत पोहायचा आनंद काही वेगळाच.

पूर्वी कुटुंब मोठी असल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असायची. त्यामुळे आजच्यासारखे एकापेक्षा एक आकर्षक खेळणी विकत घेऊन देण्याचे मुलांचे लाड व्हायचे नाहीत म्हणून मुले देखील बिन पैशाच्या खेळाचे नवीन नवीन शोध लावत. चिंध्या पासून चेंडू बनवून एक दुसऱ्याला मारण्याचा धप्पाधपीचा खेळ रंगायचा तर कधी लगोरीत मन रमायचं. लगोरी हा खेळ मोठ्या आखलेल्या रिंगणात दोन विरुद्ध संघात,लगोऱ्याचा पिरॅमिड बनवून खेळला जाणार खेळ. हा खेळ खेळण्यासाठी चपटे लाकडी गोल ठोकळे किंवा सपाट दगडांचा वापर केला जातो. त्यालाच ‘लगोरी’ असं म्हणतात. हा खेळ खेळताना सात किंवा अकरा खेळाडूंचे दोन संघ असतात.

विठू दांडू चा खेळ ही असाच मजेशीर आणि रंगतदार. सुरुवातील टॉस व्हायचा. तेव्हा सहसा खापराचा किंवा दगडाचा तुकडा एका बाजूला थुंकी लावून उंच आकाशा कडे ओली का सुकी म्हणत फेकायचा.या खेळात इतकी रंगत यायची की आम्ही सगळे तहान भूक विसरायचो.

खेळताना कोणी सवंगडी नसला तरी अडत नव्हतं. रबराचे टायर, छोटी  काठी घेऊन फिरवत अधूनमधून वाट काढत गल्लीतून चक्कर मारायची. आपोआपच कोणीतरी त्यात सामील व्हायचा. गोटया खेळण्याची मजा तर काही औरच होती. पावसाळा आला तरी मुलांच्या खेळण्यात व्यत्यय यायचा नाही.
पूर्वी लोकप्रिय असलेल्या या सर्व देशी खेळांची सद्दी संपवली ती क्रिकेट या विदेशी खेळाने. क्रिकेट या खेळाने अशी लोकप्रियता जमवली की दोन-तीन मुले एकत्र आले की त्यांचा खेळ सुरू व्हायचा. एक चेंडू आणि लाकडी बॅट असली की खेळ सुरू व्हायचा. सहसा स्टम्प नसायचे. पण त्या वाचून काही अडायचे नाही. भिंतीवर तीन रेषा मारल्या जायच्या, तर कधी विटावर वर विटा रचल्या जायच्या. एकूण मुलांची संख्या पाहून 2 संघ बनवायचे. टॉस जिंकणारा कर्णधार नेहमीच बॅटिंगच घ्यायचा. मैदानाचा आकार पाहून नियम ठरलेले असायचे. फील्डिंग करणारे खेळाडू कमी असले की, पत्राच्या पलीकडे चेंडू मारलेल्या बॅट्समनला आऊट दिले जायचे. एलबीडब्ल्यू ने आउट द्यायचा प्रश्नच नसायचा. एखादा संघ जिंकायचा पण जोपर्यंत हरणाऱ्या संघाच्या कॅप्टनने स्कोअरबुक वर सही केली नाही तोपर्यंत विजयी झालो असे वाटायचे नाही.

काळ जसा बदलत गेला तसे खेळाचे प्रकार बदलत गेले. विटीदांडू, लगोरी, भोवरा, लपंडाव यांसारखे खेळ हद्दपार होऊन त्यांची जागा मोबाईल गेम ने घेतली.उन्हाळ्याच्या सुट्टीत आता मुले मैदानी खेळाऐवजी टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत.आताच्या मुलांना व्हिडीओ गेम्स याबाबत कमालीचे आकर्षण वाटते. मोबाईल फोन आणि संगणकामध्ये भरपूर गेम्स आहेत. व्हिडीओ गेम्स हे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे आहेत. या गेम्सद्वारे बुद्धीला चालना देणारे, निखळ मनोरंजन करणारे व शैक्षणिकदृष्टया सुद्धा चांगले आहेत. तसेच शास्त्रंज्ञानी व्हिडीओ गेम्स खेळण्याचे अनेक फायदे सुद्धा सांगितले आहेत. या गेम्समुळे मेंदु, डोळे, हात यांचा समन्वय वाढतो आणि क्रिया जलद होते, संगणक वापरण्याची कौशल्य वाढते तसेच गती जलदपणे होते व मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास चालना मिळते परंतू ज्याप्रमाणे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा वाढत आहेत. आजकालच्या लहान मुलांना व्हिडीओ गेम्सचे व्यसन जडत आहे व हे व्यसन मुलांना एका वेगळ्याच काल्पनिक जगाच्या आकर्षणात ओढून नेत आहे व सतत गेम्स खेळत असल्यामुळे त्यांना त्याची सवय होते जर गेम खेळण्यास मनाई केली तर त्यांची अतिशय चिडचिड होते, बैचेनी वाढते व मुले दुःखी होतात. अशा या मानसिकतेला गेम्सचे व्यसन असेच म्हणता येईल व ही खुप गंभीर बाब आहे. लहान मुलांच रुसणं, वेळेवर न जेवणे, कमी झोप असे प्रश्न पालकांना सतावत आहेत.पण या आधुनिक मोबाइल आणि टीव्हीमुळे मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना पण निर्माण होऊ शकते.मुले चिडचिडी बनत असून, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांच्यात आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे.
  
या विचित्र परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पालकांनीच आधी मोबाइलमधून बाहेर पडण्याची गरज आहे. मुलांना नुसते व्हिडीओ गेम्स न देता दुस-या चांगल्या  गोष्टींची सवय सुद्धा लावणे गरजेचे आहे म्हणजेच बोधकथा वाचणे, बालगीते, कविता वाचन, पुस्तके वाचणे इत्यादी. पुर्वी मुलांच्या ज्ञानात भर पडेल असे बोधकथा, गोष्टीची पुस्तके किंवा इतिहासाच्या गोष्टी, विचारधन, कोडी, चित्रकला, ज्ञानमंजुशा या सर्व गोष्टींची जागा आता गॅजेटने घेतली आहे.लहान मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सोशलमिडियाचा वापर करण्यावर त्यांचा अधिक भर पडतो. यामध्ये आता व्हाट्सअपचा वापर लहान मुले सुध्दा करतात परंतु या अशा गॅजेटमुळे लहान मुले आळसी होताना दिसत आहेत. लहानमुलांनी धावत्या जगाबरोबर धावणे ही काळाची गरज जरी असली तरी लहान वयात ज्या खेळाबदल आकर्षण असायला हवे ते खेळ खेळणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन मैदानी खेळातून मुलांना व्यायाम हा मिळतोच तोच दररोज मिळणारा व्यायाम हा मुलांच्या र्दिघायुष्यासाठी अधिक महत्वाचा आहे. इंटरनेटवरच्या खेळांपेक्षा या अस्सल मातीतल्या खेळांमध्ये किती धम्माल असते ती पाहण्यासाठी मुलांनी थोडं मैदानाकडे फिरकायला हवं.. कमीत कमी तुमच्या सोसायटीच्या आवारात तरी रोज किमान दोन तास खेळलं पाहिजे. लहान मुलांच्या विकासात खेळाचं अनन्यसाधारण महत्व आहे. खेळ ऊर्जा निर्माण करतो अन आतल्या उर्जेला योग्य वाटही करून देतो. पूर्वीचे सर्व चांगले, छान अन संस्कारक्षम होतं आणि आत्ता बदलत्या जीवनशैली, तंत्रज्ञान, गतीमान जीवन यामुळे सगळं वाईट होतंय असं काही नाही. काळ बदलला तशी आव्हाने वाढली व यावर मात करायला या नव्या गोष्टी, तंत्र याचा स्वीकार करावाच लागेल. मात्र लहानांची निरागसता, त्यांची वाढ, मुल्यशिक्षण, संस्कारक्षमता, निसर्गाशी जवळीक जपताना सध्याचे तंत्रज्ञान अन जीवनशैली याचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी पालकांची आहे नसता मुलांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यास  नवीन पिढी आम्हाला  कधीही माफ करणार नाही . 

*लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *