तूर उत्पन्नाच्या आशाही मावळतीकडे ;ढगाळ वातावरणाचा तुर पिकांना फटका

कृषीवार्ता ; विठ्ठल चिवडे


ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जगवणाऱ्या प्रमुख पिकांचे नुकसान झाले.उभ्या पिकांना मोड फुटले तर कुठे धान्य जाग्यावर सडले यामुळे मोठा आर्थिक फटका बसला.शेवटी मदार तुरीच्या उत्पन्नावर असताना मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पन्नाच्या अशाही आता मावळतीकडे जाताना दिसत आहेत.

कुरुळा महसूल मंडळातील अर्थार्जनाची मदार खरीप हंगामावर अवलंबून असल्याचे जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांचा प्रपंच चालतो.सोयाबीन,कापूस,ज्वारी आणि आंतरपीक म्हणून तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.गत हंगामाने खंगाळलेली ओटी यंदाच्या हंगामात तरी भरेल अशी अपेक्षा असतानाच ऐन काढणीच्या मोसमात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वरूणाची अवकृपा झाली आणि हाती आलेली सुगी वाया गेली.


शेवटी मदार तुरीच्या उत्पन्नावर असतानाच आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन तूर पिकावर कीड व रोग प्रदूर्भावास पोषक वातावरण तयार झाले.त्यामुळे सद्यस्थितीत तुर पिकावरील फुल, चट्टा यावर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे.
परिणामी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या रासायनिक औषधींचा वापर होत आहे.खर्चाचे प्रमाण वाढले असून अपेक्षित उत्पन्न हाती येणार की नाही याबाबत शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे.डोंगराळ भाग असल्याने अत्यल्प सिंचनक्षेत्र त्यामुळे जिरायती शेतीवरच भिस्त.


यंदाच्या हंगामात कुरुळा मंडळात ७८० मी मी पावसाची नोंद झाली.परंतु योग्य नियोजन व धोरणात्मक निर्णयाचा अभाव,राजकीय अनिच्छा यामुळे पाऊस होऊनही परिस्थिती जैसे थे. यातून पारंपरिक शेती आणि तुटपुंजे उत्पन्न यातच शेतकरी गुरफटला असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *