येऊ नकाच कोणी आता, माझ्या दहनविधीला…’
कंधार – दिगांबर वाघमारे
एरव्ही स्मशानभूमी अंत्यविधी, राख सावडणे, दशक्रिया या कार्यक्रमासाठी ओळखली जाते. मात्र, भिती वाटणाऱ्या ठिकाणी कार्तीक पौर्णिमेच्या लख्ख चांद्रप्रकाशात सप्तरंगी साहित्य मंडळाची ३५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कंधार येथील स्मशानभूमीत मानव जीवन आणि मृत्यू यांतील प्रवास उलगडणारी काव्यमैफिल रंगली.
या काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी शहरातील ज्येष्ठ कवी नाना गायकवाड होते तर सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, महासचिव पांडूरंग कोकुलवार, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, जिल्हा पदाधिकारी रणजीत गोणारकर यांनी सहभाग नोंदवला.
कंधार शहरातील हिंदू स्मशानभूमीत घेण्यात आलेल्या काव्यमैफिलीत प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विलास कांबळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे, स्वच्छतादूत तथा पत्रकार राजेश्वर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, इंजिनिअर प्रदिप ढवळे, क्रांती वाहन चालक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे, पत्रकार अॅड.सिध्दार्थ वाघमारे, मुरलीधर थोटे, सय्यद हबीब, बंटी ढवळे, नारायण जोंधळे, भीमराव झुंजारे, दिपक ढवळे, स्वप्निल कदम आदींची उपस्थिती होती.
जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू…मात्र तो कोणाला कधी आणि कोणत्या रूपात गाठेल हे कोणीही सांगू शकत नाही.. मृत्यू हे जीवनाचे शाश्वत आणि अंतिम सत्य आहे. या मृत्यूला तर सर्वांनाच सामोरं जावं लागतं. परंतु काही असाध्य दुर्धर आजारांमुळे काहींना आपला डाव अर्ध्यवरती मोडावा लागतो, तोही अकस्मात! काव्यपौर्णिमेत कविता सादर करतांना कवी रणजीत गोणारकर यांनी हृदयद्रावक कविता सादर केली,
चिता पेटली होती भावाची जेव्हा
हंबरडा फोडला होता मी तेव्हा
भाऊ माझा होता पाठीराखा
प्रसंग गुजरलाच होता हा बाका
अंत्यसंस्कार आणि रक्षाभरणी कार्यक्रम सोडल्यास सहसा स्मशानात कुणीही जात नाही. स्मशानभूमी म्हणजे दुखवट्याची जागा मानली जाते. मात्र हल्ली कवितांची मैफील, चारोळ्या, स्नेहभोजन, वृक्षरोपण आदी कार्यक्रम रंगू लागले आहेत. एवढेच नव्हे तर महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन स्मशानभूमीत करण्याचा प्रघात सुरू आहे. तसेच स्मशानात लग्नही होऊ लागली आहेत. माणूस मरतो पण कार्यरुपी उरतो. हाच सामाजिक आशय घेऊन कवी पांडूरंग कोकुलवार म्हणाले,
जीवनाचं अंतिम सत्य खरं ठरलं आहे,
म्हणूनच आज स्मशानात जळतो आहे,
रिकाम्या हाताने आलो रिकामा जात आहे,
मी नसलो तरी तुमच्या आठवणींत असणार आहे!
स्मशानात केवळ राख भरणी दिनी कावळ्याला खाऊ घालण्याची प्रथा आहे. मात्र, स्मशानभूमीत विवाह सोहळे, वाढदिवस, विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यानंतर उपस्थितांसाठी स्मशानभूमीतच भोजनावळीचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे, हे अनेक ठिकाणी घडत आहे. परंतु माणूस गेल्याचे दुःख काय असते हे ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी चिता पेटली या आपल्या कवितेतून मांडले,
जखमेच्या वेदना किती सोसावे
आतंरीक दुःख कोणा ते सांगावे
काळजाच्या घडाला कळ पोचली
अस्थी तुझी शोधतांना राख बोलली
कवी तथा समीक्षक गंगाधर ढवळे यांनी ग्रामजीवनाच्या शोषणाचा स्रोत कसा आणि कुठे असतो हे आपल्या मसनवटा या कवितेतून व्यक्त केले. त्यांनी गावकुसाबाहेरच्या मानवी समुहाचे आक्रंदन मांडले. जीवन आणि मृत्यू यांतील एक पदर आपल्या खास खंदारी भाषेत उलगडून दाखवला,
मसनवट्यातल्या पाऊलवाटंनं…
मायच्या म्हागं म्हागं जातांना
म्या घाबरत व्हतो, दचकत व्हतो, दबकत व्हतो*श
माय म्हनली, ‘घाबरु नगंस लेकरा, गुमान ये!’
मेलेल्या मानसापरीस जित्येच वंगाळ.
कोरोनाकाळाने मोठ्या प्रमाणावर लोक गिळंकृत केले. अनेकांना आपल्या आप्तगणांची मूठभर माती लाभली नाही. ज्या शवदाहिनीत शव जळत होते तिथे त्याचे तोंड पाहणेही दुरापास्त झाले होते. मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे हे तसे कित्येकदा उलगडले आहे. ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे यांनी,
हृदयाला चिरुनी या क्रूर काळाने घात केला
येऊच नका कुणी आता माझ्या दहनविधीला
मेलेल्या प्राणात मी माझा देह साठविला
आडवू नकाच आता हा बांध फुटलेला
ही कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले.
स्मशानभूमी व परिसरात वावरण्यास लोक घाबरतात तसेच अपवित्र मानतात. तेथे भूत, पिशाच्च, वाईट आत्मा किंवा कुठल्याही नकारात्मक शक्तीचा वास असतो, ही भावना मनात असते. समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रध्देचा पगडा असून, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी, माणूस सज्ञानी व्हावा, यासाठीच स्मशानभूमीत काव्यपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र अनुरत्न वाघमारे यांनी हाती घेतले. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार पांडूरंग कोकुलवार यांनी मानले.