ग्लोबल टिचर – रणजितसिंह डिसले

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ आज जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप पुरस्कार आणि ७ कोटी रूपये असं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा एक- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असं राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसेच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ‘क्युआर कोड’च्या माध्यमातून त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड राज्याचा व देशाचा गौरव आहे.

पुरस्कार स्वरूपात मिळणारी ७ कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे जगावेगळेपण सिद्ध करणारा आहे. भारताला गुरुशिष्यपरंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. रणजितसिंह डिसले यांनी ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना जाहीर झालेला ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ राज्यातील आणि देशातील शैक्षणिक चळवळीला नवीन दिशा व गती देईल, असा मला विश्वास वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या उल्लेखनिय कामाचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील केलं. ‘युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय.’ अंस ट्विट राज ठाकरे यांनी केलं.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले.
कोरोनाच्या(covid19) संकटकाळात सगळीकडे शाळा बंद होत्या. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. परंतु यामध्ये मुली मागे पडताना दिसून येत आहे. मुलींच्या हातात मोबाईल फार कमी येत असल्याने या डिजीटल शिक्षण पद्धतीचा त्यांना काही फायदा होत नाही. त्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी या काळात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.

२००९ मध्ये सोलापूरच्या परितेवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झाल्यानंतर शाळेची अवस्था फारच वाईट होती. शाळेची इमारत गोठा म्हणून वापरली जात होती. त्याचबरोबर स्थानिक नागरिक आपल्या मुलींना शाळेत शिकवण्यासाठीदेखील पाठवत नव्हते. रणजित डिसले गुरुजींनी हे बदलण्याचा निर्धार करत घरोघरी जात पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर यामध्ये असणारी प्रमुख समस्या म्हणजे इंग्रजी भाषेतील पुस्तके. त्यांनी सर्वात आधी ही पुस्तके मातृभाषेत म्हणजेच मराठीत भाषांतरित केली. यामध्ये त्यांनी तंत्रज्ञानाची देखील जोड दिली. त्यांनी पुस्तकांमध्ये क्यूआर कोड तंत्राचा वापर केला असून, विद्यार्थी व्हिडीओ लेक्चर देखील पाहू शकतात तसेच कविता आणि गोष्टीदेखील ऐकू शकतात. त्यांच्या या प्रयत्नामुळे आसपासच्या गावांमध्ये आणि त्यांच्या शाळेच्या गावामध्ये बालविवाहाच्या दरामध्ये मोठी घट झाली.

महाराष्ट्रात क्यूआर कोडची सुविधा सर्वांत आधी रणजित यांनी सुरु केली. एका दुकानात दुकानदार कोड स्कॅन करीत असल्याचे त्यांनी पाहिले होते. यावरून त्यांना काही सुचले. हा प्रयोग त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकासंबंधी करण्याचे ठरविले आणि त्यात ते यशस्वी झाले. याचबरोबर २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी या पद्धतीने सर्व सिलॅबस जोडण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता सरकारने सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांमधे राज्य सरकारने क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एनसीईआरटीनेदेखील याची घोषणा केली आहे. क्यूआर कोडचा (QR Code) क्विक रिस्पॉन्स कोड हा फुलफॉर्म आहे. बारकोडच्या पुढील जनरेशनमधील हा कोड असून यामध्ये विविध माहिती सुरक्षित राहते. चौकोनी आकाराचा हा कोड असून आपल्या नावाप्रमाणेच फास्ट काम करण्याचे कार्य हा कोड करतो. पुस्तक असो किंवा वेबसाईट असो सर्व प्रकारची माहिती या क्यूआर कोडमध्ये समाविष्ट असते.

डिसले यांना पुरस्कार मिळताच सर्वच स्तरांतून त्यांना अभिनंदनिचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांच्या रुपाने जगात सर्वश्रेष्ठ शिक्षक म्हणून तो मान भारताला मिळाला आहे. त्यातही महाराष्ट्राची मान आणि शान जगात उंचावली आहे. एक जिल्हा परिषदेचा गुरुजी काय करु शकतो, याचे उत्तम अणि दणकट असे सर्वोच्च उदाहरण हे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत आणि गुरुजींच्याही बाबतीत नाकं मुरडणारे तसेच नकारात्मक भूमिका घेऊन विनाकारण त्रास देणाऱ्यालाही ती चपराक आहे. शिक्षक कधीही फुकट पगार उचलत नाहीत, हे समाजानं कानात तेल ओतून घेतल्याप्रमाणे ऐकले पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थी हे एक डिसले यांना मिळालेल्या पुरस्कारासारखच सर्वोच्च नातं असतं. विद्यार्थी हा गुरुजी नावाच्या शास्रज्ञाची प्रयोगशाळा असते. तिथे तो उज्वल भारताच्या निर्मितीसाठी प्रयोगशील असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ घडवत नाही. तर उद्याच्या भविष्याचा श्वास त्याच्यात सोडतो. आज महाराष्ट्रात गुणवत्तेचा चढता आलेख जो दिसतो, तो गुरुजींमुळेच होय. उच्च शिक्षणातील चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भव्य यशस्वीतेच्या तळाशी प्राथमिक, माध्यमिकचे गुरुजीच असतात. परंतु काही विघ्नसंतोषी लोकं शिक्षकांविरुद्ध समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. त्यांच्याविषयी अधिक न लिहिता त्यांना जाग्यावरच अनुल्लेखाने मारलेले बरे.

डिसले यांच्या पुरस्कारासंबंधाने सोशल मीडियावर शुभेच्छांचा जो पाऊस पडला, त्याही पेक्षा अधिक चिंतन झालेले आपल्याला दिसते. विद्यार्थी, शाळा, अभ्यासक्रम आणि एकूणच शिक्षण पद्धती तथा शिक्षण प्रणालीबाबत भरीव चर्चा झाली. शिक्षकांना सद्या मिळत असलेल्या पुरस्काराबद्दल आणि ग्लोबल पुरस्काराबाबत धर्माबाद जि. नांदेड येथील एक उपक्रमशील शिक्षक ना. सा. येवतीकर यांनी त्यांची भूमिका मांडली. ते म्हणतात, आपले पुरस्कार ग्लोबल का नाहीत ?

जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या अनेकांसाठी त्यांचे कार्य मान उंचावणारी आहे एवढं मात्र खरे. आपल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत डिसले सरांनी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे. त्यातील क्यू आर कोड द्वारे मुलांना शिकविण्याची जी पद्धत त्यांनी विकसित केली. त्याचा वापर महाराष्ट्र शासनासह केंद्र सरकारने देखील केला आहे. याच उपक्रमाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या निमित्ताने राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार विषयी जरा चर्चा करावी असे वाटते.

आपल्याकडे तालुका स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत जे पुरस्कार दिले जातात त्यासाठी अनेक अग्निदिव्य परीक्षेतून पार व्हावे लागते. अनेक अटीची पूर्तता झाल्याशिवाय पुरस्कारासाठी पात्र समजले जात नाही. त्याचसोबत वशिला आणि ओळख या दोन्ही गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत. आज असे कित्येक तरी पुरस्कार प्राप्त शिक्षक मंडळी आहेत, ज्यांना पुरस्कार दिल्याने त्या पुरस्काराचे महत्व कमी झाले आहे. जे कधी हातात खडू घेतले नाहीत, वर्गात चार मुलांना घडविले नाहीत अशा शिक्षकांना अटी पूर्ण करतात, वशिलेबाजी करतात, त्यांची वरपर्यंत ओळख असते त्यांना पुरस्कार जाहीर होते. प्रत्यक्षात डिसले सरासारखे अनेक शिक्षक असतात जे की वयाची अट पूर्ण करत नाहीत, वशिलेबाजी नसते आणि कोणाची ओळख ही नसते असे शिक्षक संपूर्ण आयुष्य पुरस्कारापासून कोसो दूर राहतात. पुरस्कारासाठी अटी व नियमांची एवढी मोठी यादी असते की ते पूर्ण करतांना होतकरू शिक्षक नाकीनऊ होतो. अध्यापन कार्य केलेल्या गोष्टींपेक्षा इतर अवांतर गोष्टीवर जास्त भर दिला जातो. स्वतःची पुस्तके प्रकाशित आहेत का ? असतील तर ISBN आहेत का ? प्रसिद्ध वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध आहेत का ? प्रबंध लिहिला आहे का ? शाळा सोडून इतर राष्ट्रीय कोणकोणत्या उपक्रमात सहभागी झालात का ? या प्रत्येक बाबीसाठी गुणांकन केल्या जाते. ज्या गोष्टीवर फोकस करायला हवे तो विद्यार्थी आणि शाळा यास जरा कमी किंमत दिल्या जाते.

यामुळे उपक्रमशील, क्रियाशील आणि विविध प्रयोग करणाऱ्या शिक्षकांची कोणीही दखल घेत नाही, ही खूप मोठी शोकांतिका काम करणाऱ्या शिक्षकांच्या मनात नेहमी घर करून राहते. हे शिक्षक फक्त काम करता राहतात, त्यांना पुरस्काराची कुठलीही अपेक्षा नसते. वास्तविक होतकरू आणि चांगल्या शिक्षकांची शिफारस अधिकारी वर्गानी स्वतःहून करायला हवे. शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी ह्या पदाची निर्मिती करण्यात आली. मात्र शिक्षकांना या अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन तर कधी मिळतच नाही मात्र त्यांनी शाळेत येऊच नये अशी अनामिक भीती प्रत्येक शिक्षकांच्या मनात असते. अधिकारी वर्ग शाळेला भेट दिले म्हणजे आपले नशीब फुटले असे शिक्षक आपसांत बोलत असतात. असे का ? ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला त्या शिक्षकास आपल्या सरकारने आजपर्यंत कोणता पुरस्कार देऊ केला आहे ? हे एक चिंतानात्मक आणि संशोधन करणारा विषय आहे. नुसते संशोधन करून थांबायचे नाही तर यापुढील शिक्षक पुरस्कार देतांना फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या सर्व नियमांना तिलांजली देऊन उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने त्या पुरस्काराचा दर्जा देखील वाढू लागतो. म्हणून पुरस्कारासाठी सेवेची अट रद्द करण्यात यावी. वशिलेबाजी बंद करून ओळखीवर पुरस्कार देणेही बंद करावे लागेल. त्रयस्थ मंडळीकडून तपासणी करून पुरस्कार जाहीर करण्यात यावे. निवड करण्याची प्रक्रिया घाईत करण्याची आपली खूप जुनी पद्धत बंद करून निदान सहा महिन्यांच्या कालावधीत केला जावा. ज्याप्रकारे या पुरस्काराची चर्चा सर्वत्र होत आहे तशी आपल्या पुरस्काराची देखील चर्चा व्हायला हवी, असे वाटते.

डिसले यांच्या पुरस्कारासंबंधाने शिक्षकांमध्ये चिंतन झालेले आहे, ही योग्य बाब आहे. सर्वच शिक्षकांनी त्यांचा आदर्श घेणे आता वाईट नाही. आधुनिकतेची कास धरत जगाच्या पातळीवर आपल्या जिल्हा परिषदेचा विद्यार्थी कसा टिकेल याचा विचार त्यांनी केला. आजच्या शिक्षणाबाबतीत माहिती व तंत्रज्ञान यांचा लीलया वापर करीत त्यांनी आता आभाळालाच गवसणी घातली आहे. जिल्हा परिषदेचे हे गुरुजी सात कोटी रुपयाच्या महापारितोषिकांचे ग्लोबल टीचर बनले आहेत. आता किमान राज्यसरकारने शिक्षण पद्धतीची नवी संरचना ठरवतांना अशा प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या आणि प्रयोगशील शिक्षकांच्या अभ्यासानुसार ती ठरवावी. शिक्षणतज्ज्ञ हे नेहमी शिक्षणविषयक चिंतन मांडतात. पण त्याला शाळा या अंतिम केंद्रबिंदूची आवश्यकता आहे. नवे शैक्षणिक धोरण ठरवितांनाही काही महत्त्वाच्या गोष्टी स्विकिरल्याच पाहिजेत. शिक्षक मेहनत घ्यायला कधीच मागे हटणार नाही. फक्त आता हरेक शाळेत रणजितसिंह डिसले निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
०४. १२. २०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *