राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपाला धोबीपछाड देत पाचपैकी चार जागा जिंकल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. पुण्यात आणि नागपुरात भाजपाच्या वाट्याला नामुष्की आली. ते दोन्ही मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ले होते. पण एकही जागा जिंकता आली नाही. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले. हा निकाल कालच लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस यांचे प्राबल्य असलेल्या नागपूरच्या पदवीधर मतदारसंघातील भाजपची मक्तेदारी तब्बल ५८ वर्षांनंतर मोडित निघाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांच्यावर १८ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते प्राप्त झाली. भाजपने विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी महापौर संदीप जोशी यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे समर्थक मानले जातात तर जोशी हे फडणवीसांचे. ऐनवेळचा हा बदल कार्यकर्त्यांना रुचलेला दिसत नाही. नागपूरच्या विजयाने काँग्रेस पक्षाला मात्र संजीवनी मिळाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते. मात्र प्रमुख लढत महाविकास आघाडीचे अरूण लाड व भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख यांच्यामध्येच होती. ही लढतही एकतर्फी झाल्याचे दिसून आले. लाड यांना देशमुख यांच्यापेक्षा पहिल्याच पसंती क्रमांकांच्या मतमोजणीत तब्बल ४८ हजार ८२४ मते मिळाली. पुणे हा देखील भाजपचा गड मानला जातो. गेली सुमारे तीस वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र भाजपला फाजील आत्मविश्वास नडला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्क्याने विजयश्री खेचून आणली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय आहे. या निकालाने मराठवाड्यात महाविकास आघाडी आणखी मजबूत झाली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या २४ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे ९९७२ मतांसह आघाडीवर आहेत. महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ७७९३ मते प्राप्त झाली असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत. अपक्ष उमेदवार शेखर भोयर हे महाआघाडीच्या उमेदवाराला कडवी झुंज देत आहेत. ७६२२ मतांसह ते तिसऱ्या स्थानी आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंती क्रमांकाची तब्बल १ लाख २२ हजार १४५ मते मिळवत, महाविकास आघाडीच्या अरुण गणपती लाड यांनी जोरदार विजय मिळवला. त्यांनी ४८ हजार ८२४ मतांनी भारतीय जनता पक्षाच्या संग्राम देशमुख यांचा सहज पराभव केला. पुण्यातील दोन्ही जागांवर झालेला पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागणारा आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे जयंत आसगावकर यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी ३३ फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी २५ हजार ९८५ मते घेतल्याने अखेर तब्बल ३६ तासानंतर विजय निश्चित झाला.
पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) सतीश चव्हाण यांनी हॅट्ट्रिक साजरी केली. त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. ही निवडणूक चव्हाण यांना जड जाईल, अशी चर्चा निवडणुकीपूर्वी वर्तविली जात होती. मात्र, चव्हाण यांचा विजय भाजपनेच सोपा केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोराळकर यांना उमेदवारी मिळवून दिली आणि इथेच भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला. बीडचे मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली, तर माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष सोडला.
पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे केडरबेस असलेले घुगेही शांत राहिले. बोराळकर हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार असून, ते फडणवीस यांनी लादल्याची भावना भाजपमधील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली. त्याचा मोठा फटका बोराळकर यांना बसला. यापूर्वी श्रीकांत जोशी हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार भाजपकडून याच मतदारसंघात निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्यामागे गोपीनाथ मुंडे नावाची मोठी शक्ती होती. ती परिस्थिती बोराळकर यांच्या बाजूने दिसली नाही. प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत गिरीश महाजन यांनी सूत्रे हाती घेऊन आर्थिक नियोजन केले. मात्र, त्याचा प्रभाव पडला नाही. पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा फटकाही भाजपला बसल्याचे दिसते. चव्हाण यांचा अफाट जनसंपर्कही कामी आला. चव्हाण यांची ‘सच’ (सतीश चव्हाण) या बॅनरखाली स्वत:ची निवडणूक यंत्रणा आहे. ती त्यांनी याहीवेळी प्रभावीपणे वापरली. महाविकास आघाडीमध्ये भाजप विरोधात एकजूट हाेती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, चंद्रकांत खैरे, राजेश टोपे आदींनी चव्हाण यांच्या विजयासाठी मोठे काम केले. शिवसेनेचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचारात होते.
पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून एक अपवाद वगळता पुणे विभागात ३६ वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीने पराभवाची धूळ चारली आहे. अरुण लाड यांच्या विजयाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शह दिला, तसेच गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टेही काढले. सत्तेत आल्यानंतर प्रथमच मिळालेल्या यशाने राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण आणखी घट्ट करण्यास मदत झाली आहे
सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या भूमीतील अरुण लाड हे कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. गेल्यावेळी त्यांनी बंडखोरी करून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. सोळा हजाराहून अधिक मते मिळवून त्यांनी या मतदारसंघातील स्वतःची तयारी दाखवली. मात्र, त्यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. बंडखोरीनंतरही राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत त्यांनी जवळीक कायम ठेवली. नियमित मतदार नोंदणीतून ते पदवीधरांच्या संपर्कात राहिले. गेल्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर अरुण लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अखेरच्या क्षणी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकजूट दाखवली. गावपातळीपर्यंत बैठका, मेळावे घेऊन यंत्रणा गतिमान केली. गेल्या निवडणुकीत झालेली बंडखोरी आणि नेत्यांमधील दुफळी टाळून राष्ट्रवादीने चूक सुधारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यांनीच अरुण लाड यांची उमेदवारी निश्चित केली होती, यामुळे प्रचारात मंत्री पाटील आघाडीवर राहिले. अरुण लाड हे वयस्कर उमेदवार असल्याची टीका विरोधकांकडून झाल्यानंतरही लाड यांनी टीकेला प्रत्युत्तर न देता नियोजनबद्धरितीने मतदारांपर्यंत पोहोचण्यात बाजी मारली. शांत, संयमी स्वभाव, गेल्या आठ-दहा वर्षांपासून केलेली मतदार नोंदणी, जनसंपर्क आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवल्याने अरुण लाड यांना दणदणीत विजय मिळवता आला.
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाच्या दिवशीच राज्यातील विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागा जिंकू, असा दावा केला होता. याशिवाय विरोधक तिघे, चौघे एकत्र आले तरीही आम्ही एकटेच भारी पडू, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. निकालानंतर मात्र त्यांनी एकटे, एकटे लढा मग बघू, अशी प्रतिक्रिया दिली. विधान परिषदेच्या सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे समीकरण अधिक घट झाले आहे. यापुढील निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्र लढूनच भाजपला रोखण्याचा प्रयत्न करू शकते.
उमेदवाराच्या नावापुढे पसंती क्रमांक लिहून मतदान करण्याच्या पद्धतीत १९ हजार ४२८ पदवीधर नापास ठरले. २ लाख ४७ हजार ६८७ मतांपैकी १९ हजार ४२८ मते बाद ठरली. पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मतांवर समाधान मानावे लागले. एकूण मतदान २ लाख ४७ हजार ६८७ इतके झाले. त्यापैकी २ लाख २८ हजार २५९ मते वैध ठरली.
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवून पुन्हा सत्तेवर येण्याचे दिवास्वप्न बघत सत्तास्थापनेचे मुहूर्त काढणाऱया भाजपचे विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील बालेकिल्ले साफ ढासळले. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड, पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर दणदणीत मतांनी विजयी झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार थेट सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारत महाविकास आघाडीच्या पारडय़ात भरभरून मते टाकली. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला महाझटका दिला आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी एक डिसेंबरला मतदान झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवून एकीचे बळ दाखवून दिले. महाआघाडीने अतिशय पद्धतशीरपणे व्यूहरचना केली होती.
या निवडणुकीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण, भाजपचे शिरीष बोरनाळकर यांच्यात प्रमुख लढत होती. सतीश चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते तर भाजपचे शिरीष बोरनाळकर यांना ५८ हजार ४७३ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना ५७ हजार ८९५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. सतीश चव्हाण यांनी हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
भाजपचा भक्कम गड म्हणून ओळखल्या जाणाऱया नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा संपूर्ण गडच ढासळला आहे. मागील 58 वर्षांपासून भाजपच्य ताब्यात असलेला हा मतदारसंघ कांग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपकडून हिसकावून घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल २५ वर्षे तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी १२ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, पण देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा दणदणीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत सतराव्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांनी कोटा पूर्ण केल्यामुळे वंजारी यांना ६१हजार ७०१तर संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा दणदणीत पराभव केला आहे. अरुण लाड यांनी तब्बल
४८ हजार ८२४ मतांनी पहिल्या पसंतीच्या फेरीतच संग्राम देशमुख यांना अस्मान दाखवले. तर पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर व भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांच्यात लढत होईल असे वाटले होते. पण जितेंद्र पवार थेट तिसऱया क्रमांकावर फेकले गेले आणि प्रा. जयंत आसगावकर विजयी झाले.
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे, भाजपचे डॉ. नितीन धांडे व अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत होती; पण भाजपचे उमेदवार नितीन भांडे या निवडणुकीत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना केवळ २ हजार ५२९ मते मिळाली. ते २१ व्या फेरीतून बाद झाले. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत साफ आपटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा पराभव जिव्हारी लागला असला तरी मान्य करावा लागला आहे. आमचा अंदाज चुकला. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं, अशी कबुली फडणवीस यांनी दिली.
विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचे यश मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीवर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्याच्यामुळे निश्चित आमचा हुरूप वाढलेला आहे. एक वर्ष पूर्ण झाले त्याच्या निमित्ताने एखादी चांगली भेट मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोर्हे यांनी दिली.
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्च शिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होत आहे. राज्यात ऑपरेशन लोटसच्या वल्गना करण्यात येत होत्या. अनेकदा तीनचाकी सरकार असं म्हटलं जात होतं. परंतु महाविकास आघाडीची ताकद भाजपाला लक्षात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होईल इतकी ही भक्कम आघाडी असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला. या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण 24 जिल्ह्यात थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. कोल्हापूर व गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ देखील सुसाट होईल. असेही ते यावेळी म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले. त्यामुळेच मागील अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट आहे.
महाविकास आघाडीच्या रूपाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने बाजी मारली आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पुणे विभागाचा निकाल यापूर्वी आम्हाला अनुकूल नव्हता. मात्र यावेळी तो मोठ्या फरकानं आम्हाला अनुकूल असा निकाल लागला आहे. दरम्यान, नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्हाला यश मिळत नव्हतं. तिथे देखील काँग्रेसच्या उमेदवाराच्या रूपाने महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नागपूरची जागा कायम फडणवीस आणि गडकरींकडे होती. या निकालांवरून असं दिसतं की “महाराष्ट्राचं चित्र बदलतंय” आणि त्या बदलाला सर्वसामान्य लोकांचा मोठा पाठिंबा आहे. एकत्रित येत राज्यातील महाविकास आघाडीनं जी कामगिरी केली आहे, त्यावर लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. ‘धुळे-नंदुरबारमधील निकाल अपेक्षित निकाल होता. कारण, तिथे निवडून आलेले विद्यमान आमदार होते. राजीनामा देऊन ते पुन्हा उभे राहिले होते. त्यांच्या पाठीशी एक मोठा वर्ग होता, तो कायम राहिल, असं पवार म्हणाले.
याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत की, भाजपाला निवडून द्यायचं नाही हा एकाच महाविकास अजेंडा होता. मी महाविकास आघाडीला चॅलेंज देतो, हिंमत असेल तर एकटे एकटे लढा. आमच्या उमेदवारांचा जो पराभव झाला आहे त्याच आम्ही नक्की चिंतन चिंतन करू. प्रत्येक पक्षाची वोट बॅक असल्यामुळे आमचा पराभव झाला. मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र (शिवसेना ) पाहायला मिळालं. शिवसेनेला या निवडणुकीत अक्षरशः भोपळा मिळाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही शिवसेनेला उमेदवार निवडता येत नाही. मी विनोदी विधान करतो अस शरद पवार बोलतात, त्यांना बोलू द्या. शिवसेना सोबत असती तर बळ मिळालच असतं. पण ते सोबत नाही, त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे हा विजय मिळाला आहे. या सरकारने गेल्या वर्षभर जे काम करून दाखवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चित्र बदलत असून या बदलाला जनतेचा मोठा पाठिंबा आहे हे या विजयावरून स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. आता सर्वसामान्य लोकांनी तसेच सुशिक्षित मतदारांनी महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे अशा शब्दात शरद पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी वक्तव्य करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले. गेल्या वेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
महाविकास आघाडीच्या कामाला मिळालेली पोचपावती
या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटित प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे. हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
नागपूर आणि पुण्यात बऱयाच वर्षांपासून या मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मात्र हा निकाल त्या वाचाळवीरांना जबरदस्त चपराक असल्याचे अजित पवार म्हणाले.
या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळं चित्र निर्माण होत नाही. असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं याऐवजी भाजप बेसावध राहिली, असं म्हणणं योग्य ठरेल. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंपून येतो, हा आभास होता नागपूर आणि पुणे या हक्काच्या जागा गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आत्मचिंतनाची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच आहे. तीन चाकांच्या रिक्षाने आज बुलेट ट्रेनला हरवले, असा खोचक टोला परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपला लगावला. अमरावतीची जागा यापूर्वीदेखील शिवसेनेची नव्हती. याअगोदर तिथे अपक्षच निवडून आले होते व आतादेखील तिथे अपक्षच निवडून आले आहेत. ती जागा भाजपने आताही जिंकली नाही. याउलट भाजपने त्यांच्या परंपरागत निवडून येणाऱया नागपूर पदवीधरसारख्या जागा गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांनीच आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहू, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
भाजपचा जो पराभव झाला आहे. तो महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाचा फाजील आत्मविश्वास आणि ‘मी पुन्हा येईन’ या अहंपणामुळे हा पराभव झाला. नागपूर, पुण्यासारखा परंपरागत मतदारसंघ भाजपने गमावला. भाजपवरचा विश्वास कमी होतोय आणि महाविकास आघाडीवरचा विश्वास वाढतोय असं चित्र दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
भाजपचे मुख्यालय असलेल्या नागपुरात उमेदवार पराभूत झाल्याने भाजपला हादरा बसला आहे. 1958 नंतर पहिल्यांदाच भाजप गड ढासळला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
नागपूर हा १९५८ पासून भाजपचा बालेकिल्ला होता.
नागपुरात महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. १९५८ पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. नागपुरात भाजपचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासून हा गड भाजपच्या ताब्यात होता. १९५८ मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते अविरोध निवडूण आले. हे संघाचे मुख्यालय आहे. येथे पराभव होणे हा भाजपला मोठा धक्का आहे.
भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय मिळाल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मिळालेला ‘बुस्टर डोस’ असल्याचे मानले जात आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयी जल्लोष केला. परंतु महाविकास आघाडीने फार फुरफुरुन जाण्याची आवश्यकता नाही.
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चार जागा पटकावून आघाडीने भाजपला धोबीपछाड दिली. नागपूरच्या संघभूमीत झालेल्या पराभवाने भाजप नेत्यांवर नामुष्की ओढावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दुकलीने योग्य उमेदवारांची निवड केली नाही, अशी चर्चा आता भाजपमध्ये सुरू झाली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने एकजुटीच्या बळावर जोरदार मुसंडी मारली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ राखतानाच राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेतला. तर दुसरीकडे, काँग्रेसने पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. हे तीनही निकाल आघाडीसाठी उत्साह वाढवणारे आहेतच; पण नागपूर पदवीधर मतदारसंघाचा कौल खऱ्या अर्थाने आघाडीच्या ‘संघशक्ती’चे दर्शन घडवणारा ठरला. भाजपचा हा सुमारे साठ वर्षांपासूनचा भक्कम गड शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वज्राघाताने ढासळला. अमरावतीत आघाडी व भाजपला मागे टाकत अपक्ष उमेदवाराची सरशी झाली. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला यश मिळाले, तरी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील अनेक वर्षांची सद्दी आघाडीने संपवली. एकूणच, संघटनकुशल भाजपसाठी धक्कादायक अशा या निवडणुकीने आघाडीची सांघिक शक्ती दाखवून दिली आहे. हा निकाल आघाडीचे नैतिक बळ उंचावणारा ठरला आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
०५.१२.२०