कवी – भाऊसाहेब पाटणकर
कविता – मृत्यू
वासुदेव वामन पाटणकर (भाऊसाहेब पाटणकर).
जन्म – २९/१२/१९०८ (अमरावती).
मृत्यू – २०/०६/१९९७ (यवतमाळ).
कवी, गझलकार, शायर, कथाकार.
१९३५ मध्ये विधीशाखेची पदवी मिळाल्यावर भाऊसाहेब पाटणकर यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. त्यांचे यवतमाळ येथे वास्तव्य होते. उमेदिच्या काळात त्यांना शिकारीचा शौक होता. पूढे प्राण्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी आली.
भाऊसाहेब पाटणकर यांचे वडील वेदांत पंडित होते. त्यांचा वारसा भाऊसाहेब पाटणकर यांनी पुढे सुरू ठेवून संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व मिळविले.
त्यांनी मराठी भाषेत शायरी रचना केली. त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरीपेक्षा वेगळी होती.
भाऊसाहेब पाटणकर यांची शायर म्हणून कारकिर्द खूप उशीरा सुरू झाली. पण तरीही श्रुंगार, इश्क, जिंदादील यासारख्या विषयांवर त्यांची शायरी अधिक तरूण होत गेली. त्यांच्या शायरीने मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला अधिक समृद्ध केले. त्यांचे मित्र आणि जवळचे लोक त्यांना जिंदादिल पाटणकर या नावानेही संबोधत असत.
भाऊसाहेब पाटणकर यांनी शायरीच्या सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई, हैद्राबाद (महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही) केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांनी भरभरून दाद दिली.
उत्तरकाळी मोतीबिंदूमुळे त्यांची दृष्टी अधू झाल्यावर त्यांची पत्नी इंदूताई भाऊसाहेब पाटणकर यांच्या रचना ऐकून लिहून काढत असत.
जिंदादिल, दोस्त हो, मराठी मुशायरा, मराठी शायरी, मैफिल असे त्यांचे साहित्य प्रकाशित झाले.
रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी २९ डिसेंबरला गझलमध्ये उत्तम योगदान देणाऱ्याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
भाऊसाहेब पाटणकरांनी प्रेम, इश्क, श्रुंगार या विषयांवर अनेक रचना तर केल्याच, पण स्वतःला मृत्युशय्येवर आहोत अशी कल्पना करून एक भन्नाट मार्मिक अजरामर अशी रचना लिहिली – “मृत्यू”.
मी उभ्या जन्मात कधी तोंड लपवलं नाही, पण मी मेल्यावर मात्र त्यांनी माझे तोंड कफनात झाकले. मी मेल्या नंतर लोक शोक करतील असा माझा समज होता, पण मी कफन बाजुला करून पाहिलं तर एकाच्याही डोळ्यात अश्रू नव्हता. हे पाहून माझ्या प्रेतावर टाकलेल्या कफना आडून मी रडू लागलो. मी जन्मभर हसलो पण मेल्यावर मात्र मी रडलो याची खंत मला आहे.
खरतर मला त्यांनी कफनात झाकले हे एकाअर्थी त्यांचे उपकारच आहेत, कारण निदान माझे अश्रू तरी त्यांना दिसणार नाहीत.
मृत्युशय्येवर एकांतात मी एवढा रडलो की माझ्या अश्रुं मुळे चिता विझायला लागली. आणि मला आता चिंता लागून राहिली की मी जळणार कसा…?
मृत्यू
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
– भाऊसाहेब पाटणकर
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/