संघ, शरद जोशी आणि स्वदेशी वगैरे..

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर
•••

संघ आणि शरद जोशी यांचा अजेंडा एकच होता. शेतकरी आंदोलनाच्या विरोधात आता जे लोक पिसाळून बोंब मारत आहेत, त्यात जोशी समर्थक आघाडीवर आहेत !

अशी एक पोस्ट मी परवा फेसबुक वर टाकली होती. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात. काही मित्रांना धक्काही बसला असेल. एकदोन भक्तांनी सवयीप्रमाणे त्याला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न केला. पण त्यातील एक प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची होती. आणि ती एका संपादक मित्राची होती.

तसेच काल शेतकरी आंदोलनाला सहकार्य म्हणून अदानी – अंबानी – रामदेव यासारख्या लुटारू मानसिकतेच्या विरोधात त्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला. लोकजागर तर्फे हा बहिष्कार gio चे सिम कार्ड बंद करणे आणि नंबर दुसरीकडे पोर्ट करणे.. अशी सुरुवात करून होणार आहे. बहिष्काराचा शुभारंभ १४ डिसेंबर पासून करणार आहोत. जनतेनेही त्यात सहभागी व्हावं, अशी आम्ही विनंती केली. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यावर येणाऱ्या शेकडो सकारात्मक प्रतिक्रियांमध्ये अगदीच २/४ प्रतिक्रिया जरा वेगळ्या आहेत. अर्थात त्या दखलपात्र मुळीच नाहीत.

हे दोन्ही विषय तसे शेतकरी, शरद जोशी, संघ आणि स्वदेशी.. या विषयाशी संबंधित आहेत. म्हणून त्यावर संभ्रम नको म्हणून ही भूमिका मांडत आहे.

बरेचदा सोशल मीडियातून झटपट व्यक्त होण्याची घाई झाल्यामुळे किंवा काही लोक मुळातच विशिष्ट मानसिकतेच्या आहारी गेल्यामुळे मेंदूचा वापर त्यांनी बंदच केला असतो. काही तर थेट मानसिक रुग्णच असतात. पण बरेचदा शहाणी, तटस्थ किंवा अभ्यासू मंडळी देखील महत्वाचे विषय देखील सहज घेतात. आपण स्वतः देखील प्रत्येक विषयाचा सारख्याच गंभीरपणे विचार करतोच असं नाही. त्यामुळे आपल्याही मनात चुकीच्या धारणा घट्ट झालेल्या असतात.

या निमित्तानं आलेली एक महत्त्वाची प्रतिक्रिया पुढं देत आहे. ती अशी..

शरद जोशी आणि संघाचा अजेंडा एक कसा राहील ? जोशी जागतिकीकरणाचे समर्थक तर संघ स्वदेशीवाला !

ही प्रतिक्रिया एका मान्यवर मित्राची आहे. वरवर पाहता बिनतोड वाटू शकते. पण खोलात गेलो तर लक्षात येईल की, मुळात त्यातील आधार किंवा गृहितक हेच फसवे आहेत. संघ इमानदारीनं स्वदेशीवाला आहे का.. हाच खरा प्रश्न आहे ! त्यावर मी जे उत्तर दिलं, ते असं..

संघ खरंच स्वदेशीवाला आहे का ? ती सारी त्यांची नाटकं आहेत ! बहुसंख्य संघ वाल्यांची पोरं विदेशात शिकतात. इंग्रजी माध्यमात शिकतात. संस्कृत किंवा मराठी माध्यमात किती आहेत ? सोशल मीडिया, व्हॉट्स अप, न्यूज चॅनल्स, प्रिंट मीडिया, ह्यात संघाचे लोक सर्वात जास्त आहेत. बहुधा ८०/९० टक्के असतील. आणि ह्या साऱ्या गोष्टी विदेशातून आलेल्या नाहीत का ? ह्यातले आपले स्वदेशी संशोधन कोणते आहे सांगा. शाखेत त्यांच्या हातात असलेली ‘लाठी’ (बांबू) सोडली तर संघाच्या चड्डी पासून आणि आता थेट पँट पर्यंत त्यांना विदेशीचाच आधार घ्यावा लागतो ना ? आधुनिक विज्ञानाचा फायदा घेणारे संघाचेच लोक जास्त आहेत. स्वतः संघ कार्यालयात जे एसी बसवले असतील, ते तंत्रज्ञान देशी आहे की विदेशी ? सरसंघचालक मोबाईल वापरत नाहीत का ? तो कोणत्या कंपनीचा आहे ? ते तंत्रज्ञान कुठले आहे ? त्यांच्या सुरक्षेसाठी शाखेतील लाठी/काठी का वापरली वापरली जात नाही, ती तर अस्सल स्वदेशी असते ! त्या स्टेनगन्सचं तंत्रज्ञान स्वदेशी आहे की विदेशी ? स्वदेशी धोती किती संघवाले वापरतात ?

यांचा सारा स्वदेशीवाद बहुजन समाजाला मूर्ख बनवण्यासाठी आहे ! हे लोक गाय, गोमूत्र, स्वदेशी वगैरे कितीही नाटकं करत असले.. तरी किती लोक गायी पाळतात ? किमान.. उत्तम आरोग्यासाठी किती लोक गोमूत्र पितात ? आणि आणखी एक थेट प्रश्न.. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पैकी संघाशी संबंधित कुटुंबातील किती विद्यार्थी आयुर्वेदाचे शिक्षण घेत आहेत आणि किती मॉडर्न सायंस (एमबीबीएस) कडे जातात ? आयुर्वेद तर त्यांच्या व्याख्येप्रमाणे स्वदेशी आहे ना ? शिवाय बिमार पडले म्हणजे, हे लोक कोणत्या आयुर्वेदिक डॉक्टर कडे जातात, कोणत्या आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये भरती होतात, याचे पण आकडे काढा. एका क्षणात यांची चालबाजी उघडी पडेल.

तात्पर्य काय,

जे जे शेतकरी आंदोलनाला विरोध करत आहेत, दिशाभूल करत आहेत, त्यांची खरी ओळख समजून घ्या. त्यांचे विचार नीट समजून घ्या. आपण विवेकवादीच असायला हवं.

उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्याला न्यायालयात जाण्याची परवानगीच नाकारणारे इंग्रजांचे वंशज वाटत नाहीत का ? हेच खरे देशद्रोही नाहीत का ? अशा कायद्याचे समर्थन करणारे खरंच शुद्धीवर असतील का ? स्वतः विचार करा. स्वतःच्या डोक्याचा वापर करा आणि नंतर निर्णय घ्या..!

शेतकऱ्यांना सहकार्य करा. बहिष्कारात सहभागी व्हा.

बाकी शिल्लक विषयावर सविस्तर लिहितोच आहे..

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान | लोकजागर पार्टी
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *