गल्ली ते दिल्ली भारत बंद (भाग १)

केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ अपवाद वगळता राज्यात सर्वत्र बंद शांततेत पार पडला. राज्यभरातील बाजार समित्या बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार दिवसभर बंद होते. अनेक ठिकाणी निदर्शने काढून जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. काही ठिकाणी कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने पारित केलेला नवीन कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवारी (ता.आठ) पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचेही चित्र होते.

भारत बंद’ला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरात शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विधेयकाची होळी केली, तर सोलापुरात आंदोलकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वगळता या बंदमध्ये जनता सहभागी झाल्याचे चित्र दिसले नाही. महाआघाडीतील पक्षांनी आयोजित केलेला ‘टिळक चौक ते मंडईतील टिळक पुतळा’ हा मोर्चा टि‌ळक चौकातच अडवण्यात आला. त्यामुळे आंदोलकांनी चौकातच ठिय्या देत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात तब्बल २० राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. सांगली जिल्ह्यात कडकडीत तर ग्रामीण भागात संमिश्र बंद पाळण्यात आला. सांगली शहरात काढण्यात आलेली आवाहन रॅली पोलिसांनी अडवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. साताऱ्यात निदर्शने करत रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोलापुरात बंददरम्यान मोर्चा काढणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत वाद झाला. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात आठ जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी ‘लोकमत’ला दिली.
शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयामध्ये दिवसभर डांबून ठेवण्यात आले. दुपारी चौकशीनंतर कार्यकर्त्यांची सुटका झाली.

भारत बंद’ला उत्तर महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये बाजार समिती, मालवाहतूक पूर्णपणे ठप्प होती. शहर बससेवा बंद होती. मात्र, बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बस, रेल्वेसेवा सुरळीत सुरू होत्या. दरम्यान, बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विरोधकांनी काढलेल्या आवाहन फेरीला पोलिसांनी आक्षेप घेतल्याने शालिमार चौकात काही काळ तणाव निर्माण झाला. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प होते. आव्हाणे परिसरातील तिन्ही व जळगाव शहरातील दोन अशा पाचही सीसीआयच्या जिनिंग बंद ठेवण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. धुळ्यातही संमिश्र प्रतिसाद मिळाला. धुळे-मुंबई आणि नागपूर-सूरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नगर जिल्ह्यातही बाजार समित्या बंद होत्या. अकोले, शेवगाव येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकरी संपाने चर्चेत आलेल्या पुणतांबा (ता. श्रीरामपूर) येथेही गाव बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भारत बंदला संपूर्ण मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र बाजारपेठा बंद होत्या. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून दिल्लीतील आंदोलकांसाठी लंगर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने मंगळवारी अन्नधान्य आणि औषधींचा साठा पाठविण्यात आला. सोबत ५० जणांचे पथकही दिल्लीकडे रवाना झाले. औरंगाबादमध्ये बाजार समिती आणि धान्य बाजारात कडकडीत बंद होता. शहरातील दुकाने चालू होती. औद्योगिक क्षेत्रावर बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. काँग्रेस व डाव्या पक्षांनी दिल्लीगेटवर रास्ता रोको केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आंदोलकांनी पोलीस ठाण्यातच सभा घेतली. शहरातील प्रत्येक चौकाला पोलीस छावणीचे रूप आले होते. शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला असला तरी सेना रस्त्यावर उतरली नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला. तुळजापूर, लोहारा, उमरगा, वाशी, भूम, परंडा, कळंब या शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठाही बंद होत्या. जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प होते. जालना शहरातही बियाणे आणि खत विक्रेत्यांची दुकाने बंद होती. बीड जिल्ह्यासह शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर सर्व व्यवहार सुरू झाले होते.
हिंगोलीत वकील संघानेही बंदमध्ये सहभाग घेतला. कळमनुरीत शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा, या मागणीचे निवेदन वकील संघाच्या वतीने नायब तहसीलदार सतीश पाठक यांना देण्यात आले. परभणीत वंचित बहुजन आघाडीने उड्डाणपुलावर रास्ता रोको केले. यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.

भारत बंद’ला विदर्भातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त तर शहरी भागांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरात बंद शांततेत पार पडला. सर्व बाजारपेठा सुरू होत्या. तसेच दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू असल्याने शहरात बंदचा फारसा प्रभाव दिसला नाही. जिल्ह्यात मात्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी कोराडी नाका चौकात रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. अमरावती जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली होती. वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चा व रास्तारोको करून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरात रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. गडचिरोलीत शहरी भागातील बाजारपेठ कडकडीत बंद हाेती. गोंदिया, भंडारा जिल्ह्यातदेखील संमिश्र प्रतिसादाचे चित्र होते.

बंदला पश्चिम वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सकाळी रेल्वे अडवून बंदला प्रारंभ केला. त्यामुळे रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विराेध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला भंडारा
जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र हाेते. शहरांत व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद हाेती. मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरु हाेते. पवनी येथे तब्बल दीड तास रस्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अपवाद वगळता एसटी बससह सर्व वाहतूक सुरळीत हाेती. आंदाेलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देवून कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली. अकाेला शहरात अल्प तर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह भाकप व आयटक व विविध संघटनांनी पाठिंबा दिला हाेता. बंददरम्यान शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसने बाजारपेठेत बाइक रॅली काढत व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी हाेण्याचे आवाहन केले. बंदच्या दरम्यान सहभागी संघटनांनी सरकारच्या विराेधात निदर्शने केली.

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ८ डिसेंबर रोजी वाशिममध्ये स्थानिक अकोला नाका येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. कृषी प्रधान भारत देशात शेतकऱ्यांना अन्याय होत असून, शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय व कायदे करणे अपेक्षीत आहे. परंतू, केंद्र सरकारने नुकतेच कृषीचे कायदे केले असून, या कायद्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसल्याने उपरोक्त कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली. विविध शेतकरी संघटनांच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वाशिम येथे धरणे व चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अकोला नाका येथे चक्का जाम केल्याने काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती.

मंगरुळपिर येथे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी ८ डिसेबरला भारत बंद चे आव्हान करण्यात आले होते.बदला मंगरुळपिर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता. केंद्र सरकारने केलाल नवीन कृषि कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी विविध संघटनांनी व पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला मंगरुळपिर शहरात व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता. तर तालुक्यातील शिवणी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठलराव गावंडे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दिडतास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.

शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकऱ्यांचे वाटोळे लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
रॅली संभाजी चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात सर्वांनीच जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना न्याय द्या, स्वाभिमाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कृषी विधेयक रद्द करा अशीही मागणी करण्यात आली.

भारत बंदमुळे सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यात एसटी बसच्या ३७१७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठाण्यात जोरदार आंदोलन करून ठाणे बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठाणे शहरात राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथे आंदोलन केले.

कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला मालेगावमध्ये संमिश्र प्रतिसाद .बाजार समितीच्या मुख्य मुख्य आवारातील लिलाव तसेच मुंगसे व झोडगे उपबाजारात लिलावात भाग बाजारातील लिलाव बंद ठेवण्यात आली होती शहरातील काही दुकाने बंद होती दाभाडी येथे शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून केंद्र शासनाचा निषेध केला.

ठाणे येथील रेस्ट हाउस च्या बाहेर आज राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकार च्या विरोधात आंदोलन केले या वेळी आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.

नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिंडोरी तालुक्यातील चींचखेड येथे कृषी विधेयकाची होळी करीत भारत बंदला सक्रिय सुरुवात केली. केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे असल्याचा आरोप करीत ते रद्द झाले पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

कालच्या भारत बंदला गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आलापल्ली येथे मोठ्या व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला नाही. काल सायंकाळी कांग्रेस तालुका अध्यक्ष मुश्ताक हकीम यांच्या नेतृत्वात कांग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी बाजारपेठ बंदची सूचना दिली होती त्यानुसार आलापल्ली येथील छोटे व्यावसायिक चहा टपरी, तसेच छोटे हाटेल व्यावसायिक यांनी आपले व्यवसाय सकाळपासूनच बंद ठेवले होते. परंतु रोजच्या प्रमाणे सकाळी 9 वाजता मोठे किराणा व्यापारी, कापड दुकानदार यांनी आपले प्रतिष्ठान सुरु केल्याने गावातील सर्व छोटे मोठे व्यवसाय नियमित सुरु झाले. या बंदच्या निम्मिताने मात्र चहा, आणि छोटे व्यावसायिक यांची फसगत झाल्यासारखी झाली तसेच बस, शाळा, पेट्रोल पम्प आदी सुरूच होते.

सिरोंचात काहीच प्रतिसाद मिळाला नाही सर्व व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू होते. कोरची शहरातील औषधांची दुकाने, दवाखाने, वाहतूक, बँका व ए.टी.एम., शासकीय कार्यालय वगळून बाकी सर्व प्रकारची दुकाने व कामे बंद ठेवून शेतकऱ्यांवर लादलेला काळा कायदा विरोधात बंदला समर्थन दिले आहे. कृषी कायद्याविरोधात यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यवतमाळ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे, दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्ते बाजार पेठेत फिरत आहेत.

भारत बंद च्या पार्श्वभुमीवर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील बाजारपेठ सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली. तसेच गावांत असलेले विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सुध्दा बंद ठेवण्यात आले
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड यासह देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर १२ दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांना आतंकवादी, खलिस्तानवादी असे संबोधून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात पंजाब, हरियाणा, चंदीगड भारतातील शेतकरी संघटनांनी नवीन कृषि कायद्याच्या विरोधात एकत्रित आले आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या धोरणाविरुद्ध शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, किसान मोर्चा व विविध संघटनेतर्फे अमळनेर बंद आंदोलन करण्यात आले. बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्वच दुकाने बंद होती. सकाळी साडेनऊ वाजेला विजय मारुती मंदिराजवळ सर्व कार्यकर्ते जमले. त्यांनतर बंद रॅलीला सुरुवात झाली.

केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी अन्यायकारी धोरणामुळे आज देशात मोठया संख्येत शेतकरी आंदोलन करित आहे. विविध शेतकरी संगठनांनी भारत बंद पुकारलेला असुन त्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , राष्ट्रीय काॅग्रेस,शिवसेना व इतर मित्र पक्षाचे समर्थन देण्यात आले होते. गोंदिया येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, राष्ट्रीय काॅंग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षाच्या गोंदिया येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमे जवळ प्रदर्शन करण्यात आले व शेतकऱ्याच्या समर्थनात व केन्द्र शाशनच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र सुरू आहे. सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली. शेतकरी कायद्याच्या विरोधातील भारत बंद आंदोलनाला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, जलक्रीडा व्यावसायिक, श्रमिक मच्छीमार संघाने आपला पाठींबा दर्शविला आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्यात आले.

मालवणात पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत, मात्र त्यांना किल्ले दर्शन व जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता न आल्याने हिरमोड झाला आहे. अनेक पर्यटकानी बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन केले. भारत बंदचा मालवण बाजारपेठेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. बाजारपेठ गजबजली दिसून येत होती. पोलीस प्रशासनानेही प्रमुख नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.

ओरोस मुख्यालय चौकात रोजच्या प्रमाणे सर्व हॉटेल्स, इतर दुकानं सुरू आहेत. नागरिका,पर्यटकही मोठ्या संख्येने वर्दळ सुरू आहे. या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला नाही. शिरगांव येथील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ, सर्व व्यापारी अस्थापना, दुकाने सुरू होते.

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्येही शेतकरी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारलेल्या भारत बंद’मध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीकडून ‘बोदवड बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्याला बोदवड शहरातून प्रतिसाद मिळाला.
बोदवड शहर सकाळपासूनच कडकडीत बंद होते, तर महाविकास आघाडीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मंडप टाकून लाक्षणिक उपोषणासह घोषणा देण्यात आल्या, तर तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.
आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांचे तालुक्यातील राजकीय मंडळी सहभागी झाली होती.

कृषी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज बंद आवाहनास येथील व्यवसायीक यांनी 100 टक्के व्यवसाय बंद ठेऊन पाठींबा व्यक्त केला. तसेच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच रिक्षा, बससेवा बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. येथील सर्व व्यावसायिकांनी स्वयस्फुर्तीने बंद ला शंभर टक्के प्रतिसाद दिला.

बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत निवेदन देऊन उद्यापासून पुर्ववत लिलाव सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन बाजार समितीत सुनील डचके यांना निवेदन दिले.
ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्वाचे माध्यम एसटी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नव्हती. येथील नागरिकांनी कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी दि.८ डिसेंबर रोजी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे या महाविकास आघाडीचे वतीने करण्यात आलेल्या आवाहनास येथील नागरिकांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेऊन पाठींबा दिला.

केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला नांदेड जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नांदेडकरांनी स्वत : हून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, डावी आघाडी यासह इतर पक्ष आणि संघटना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

बंदमध्ये कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा हा शेतकर्यांच्या विरोधात असल्यामुळे पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. नांदेडात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व डावी आघाडीचे कार्यकर्ते शेतकर्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी चौक येथून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता. आयटीआय चौक येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर डावी लोकशाही आघाडी व समविचारी संघटनेने निदर्शने केली. देगलूर नाका येथे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. सकाळपासून शहरासह जिल्हाभरातील बहुतांश बाजारपेठा बंदच होत्या. सायंकाळी चार वाजेनंतर मात्र तुरळक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली होती. या बंद दरम्यान कुठेही अनूचित प्रकार झाला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंदच होत्या. दिवसभर बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाला.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणनू एसटी महामंडळाने मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून बस सेवा बंद केली होती. त्यामुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली. सायंकाळनंतर मात्र काही मार्गावरील बसेस सोडण्यात आल्या होत्या.तर दुसरीकडे खाजगी वाहतुक, ऑटो मात्र सुरु होते. शहरातील रस्त्यावरील गर्दीही आज तुरळक होती.

केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी पुकारलेल्या भारतबंदला मंगळवारी परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेतकऱ्यांसाठी विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह शेतकरी संघटना, विविध कामगार संघटना आणि सेवाभावी संस्थांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळपासूनच शहरातील व्यापारपेठ कडकडीत बंद राहिली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहरातून मोटारसायकलवरून काहीजणांनी बंदचे आवाहन केले. त्यासही व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी बस वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसानंतर बस स्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळाला.

दरम्यान, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील शिवाजी चौकात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. तीनही कृषी कायदे शेतकरीविरोधी असून ते रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील बस स्थानक परिसरातील उड्डाणपुलावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सेलू, मानवत, पाथरी, जिंतूर, सोनपेठ या तालुक्यांमध्येही बुधवारी बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

हिंगोलीत केंद्र सरकारने पारित केलेला नवीन कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून मंगळवारी (ता. आठ) पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्व प्रतिष्ठाने व भाजीमंडई कडकडीत बंद ठेऊन व्यापारी सहभागी झाले होते. जिल्ह्यात महाविकास आघाडीसह विविध पक्षांनी व संघटनांनी आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. सकाळी बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस बसस्थानकातून बाहेर निघाल्याच नाहीत. हिंगोलीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील काही समित्यांमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान शहरातील बाजारपेठ देखील कडकडीत बंद होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी (ता.आठ) लातूर येथे मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत. या बंदमध्ये सहभाग नोंदवला. या बंदचा मोठा फटका अडत बाजाराला बसला. बंदमध्ये बाजार समिती, अडते, हमाल मापाडी आदींच्या संघटना सहभागी झाल्याने शुकशकाट राहिला. कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली.

केंद्र शासनाने कृषी कायदे केले आहेत. हे कायदे शेतकऱयांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे या कायद्यांना देशभर विरोध केला जात आहे. दिल्ली येथे तर गेल्या बारा दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनचा एक भाग म्हणून शेतकरी संघटनांच्या वतीने मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये हमाल मापाडींच्या संघटनापासून ते ट्रेड युनियनही सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने व्यापारी संघटना देखील त्यांच्यासोबत उतरल्या होत्या. त्यामुळे शहरातील गंजगोलाई परिसरातील असलेल्या सर्वच बाजारपेठ बंद राहिल्या. अनेक दुकानासमोर मालक व त्यांचे कामगार शटर लावून बाहेर थांबल्याचे दिसून आले. शहरातील शिवाजी चौक, नंदीस्टॉप, शाहू चौक, रेणापूर नाका आदी भागातील मार्केट बंद राहिले. याचा सर्वात मोठा फटका मार्केट यार्डला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. ६० ते ७० हजार क्विंटल शेतमालाची आवक आहे. यातून कोट्यावधीचे व्यवहार होतात.

पण बंदमध्ये बाजार समिती, व्यापारी, अडते, हमाल मापाडी संघटनाही सहभागी झाले होते. त्याचा परिणाम मार्केटयार्डात सर्वत्र शुकशुकाट राहिला. कोट्यावधीची उलाढाल मात्र ठप्प राहिली आहे. दरम्यान या बंदमध्ये शेतकरी संघटना, काँग्रेस, आप असे राजकीय पक्ष सहभागी झाले होते. या पक्षांच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध करून हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली.

उमरगा (जि.उस्मानाबाद) येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी बांधवानी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी (ता.आठ) रस्त्यावर उतरले होते. श्री. छत्रपती शिवाजी चौक, राष्ट्रीय महामार्गावर थांबून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. दरम्यान शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातही भाजपा वगळता इतर विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत बंद पुकारला असून केंद्र सरकारविरोधी निदर्शने नोंदवली आहेत. विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. जामनेर येथे सर्व दुकाने बंद आहेत. अमळनेर येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रॕली काढून बंदचे आवाहन केले.
सानपाडा ट्रक टर्मिनल येथील ट्रकचालकांनाही आपल्या गाड्या जागेवरच लावल्या असून भारत बंदला पाठिंबा दिला आहे
ठाण्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला.
ठाणे येथील कोपरी तसेच जांभळी नाका येथील मार्केट, तसेच कोपारित असणारी मार्केटमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.‌ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कृषीमंत्री तोमर यांचे पुतळ्याचे तिरडी आंदोलन करण्यात आले. लालबाग येथे कम्युनिष्ट मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, भारत बंदमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मानखुर्द येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत, शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीनेही राज्यभरात पाठिंबा दर्शवला होता.

जालना जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांसह इतर पक्ष, संघटनांनी ही या बंदला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे जालना शहरातील मार्केट मंगळवारी भारत बंदमुळे बंद राहिल असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात भारत बंदच्या या आंदोलनास जालना शहरात प्रतिसात मिळाला नाही. शहरातील मुख्य मार्केटसह शहरातील सर्वच भागातील दुकाने व्यापाऱ्यांनी सुरू ठेवले होते. अनेक व्यापाऱ्यांना आपले दुकाने अर्धवट उघडले होते. तसेच शहरातील कृषी केंद्र मात्र बंद होते. त्यामुळे शहरातील पाच ते दहा टक्के दुकाने भारत बंदच्या आंदोलनात बंद राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे जालना शहरात तरी भारत बंदच्या आंदोलनास प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते.

बीड जिल्ह्यात देखील विविध पक्ष व संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. बीड शहरातून सोलापूर, परळी, नगर, औरंगाबाद, जालना आदी जाणाऱ्या सर्व बस स्थानकात थांबून होत्या. इतर खासगी अस्थापना काही प्रमाणात सुरु होत्या. परळीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी दुचाकी फेरी काढून आवाहन केले. माजलगावमध्येही बंदचे अवाहन करण्यासाठी फेरी काढण्यात आली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रणित बाजार समित्यांमध्ये बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, बाजारपेठांच्या गावांतही बंदच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला.

शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी माजलगाव शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. व्यापारी बांधवानी प्रातिसाद दिल्याने बंद कडकडीत पाळण्यात आला. सकाळीच बंदचे आवाहन करत विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

औरंगाबाद येथील बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत कडकडीत बंद ठेवला आहे. ते भाजी मंडईमध्ये जाणवला नियमित येणारे शेतकरी व्यापाऱ्यांच्या तुलनेत केवळ दोन ते तीन टक्केच फळभाजीपाला विक्रेते रस्त्यावर दिसले. जवळपास साडेनऊ वाजेपर्यंत ही गर्दी दिसून आली. त्यानंतर भाजीमंडईत आलेली किरकोळ विक्रेत्यांनीही भाजी मंडईतून परत गेले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत किराणासह भाजीपाला मार्केटमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. आजच्या भारत बंदचा परिणाम थेट सर्व व्यवहारावर जाणवला. बाजार समितीत पहाटे दोन वाजेपासून जिल्ह्यात परत जिल्ह्यातून शेतमाल भाजीपाला धान्य विक्रीसाठी येतात. मात्र भारत बंद असल्यामुळे काल पासून एकही वाहन बाजार समितीत दाखल झाले नाही. नियमित हजारो क्विंटल आणि येणारा धान्य भाजीपाला, फळे याची केवळ एक ते दोन गोणी आवक झाल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळी साडेआठनंतर बाजार समितीत शुकशुकाट
शहरात किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी हातगाडीवर विक्रीसाठी भाजीपाला व फळांची खरेदी करून माघारी परतले. शहर परिसरातील काही गावातील शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. मात्र ग्राहकच नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. भाजीमंडईमध्ये नियमित असणारी गर्दीच्या तुलनेत केवळ दोन ते पाच टक्केच लोक दिसून आले. सकाळी साडेआठ नंतर भाजी मंडई येथील सर्व छोटे-मोठे व्यापारी माघारी परतल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

महाविकास आघाडीच्या वतीने परळी शहर कडकडीत बंद करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेला बंदला येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता.आठ) सकाळी दुचाकी फेरी काढून दुकाने बंद करण्याची विनंती करण्यात आली. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून दुचाकी फेरीस सुरुवात करुन गणेशपार, अंबेवेस, नेहरू चौक, पोलिस ठाणे, आझाद चौक, शिवाजी चौक, स्टेशन रस्ता मार्गे राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात येऊन आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.कृषी विधेयकाच्या विरोधात नाशिक शहरातील नाशिकरोड येथील बिटको उड्डाण पुलाखालील भाजी बाजार विक्रेत्यांनी देखील बंद पाळला असून तसा फलक लावला होता.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. भाजपविरोधी सर्वच राजकीय पक्षांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. तर भाजपसमर्थकांनी बंदचे समर्थन‌ केले नाही. या आंदोलनाला यश मिळाले आहे. तसेच सरकार झुकले असून आजही चर्चेची तयारी दर्शवली असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
०९.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *