कवी – बाबूराव बागूल
कविता – वेदाआधी तू होतास
बाबूराव रामजी बागूल (बाबूराव बागूल) (आबा).
जन्म – १७/०७/१९३० (नाशिक).
मृत्यू – २६/०३/२००८ (नाशिक).
जातीव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतीकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यिक तपस्वी म्हणजे बाबूराव बागूल.
बागूल यांच्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता.
दलित समाजात जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव बालपणातच त्यांनी घेतले.
बागूलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत म्हणून त्यांच्या वडिलांनी बागूलांना मुंबईत माटुंगा येथे लेबर कँप मध्ये राहणाऱ्या मावशीकडे पाठविले.
शाळेत शिकत असतानाच आंबेडकरवादी विचारांचा पगडा त्यांच्या बालमनावर झाला.
चौथीत असतानाच त्यांनी आंबेडकरगीत लिहिले.
आर्थिक परिस्थितीमुळे पुढे म्याट्रीकपर्यंत शिक्षण थांबवावे लागले.
अण्णाभाऊ साठे यांच्या सहवासात आल्यावर बागूल यांच्यावर कामगार चळवळीचा प्रभाव पडला.
साम्यवादी विचार, जातीव्यवस्था, बेरोजगारी, आर्थिक विषमता या साऱ्या कालखंडात रचलेल्या अनेक कवितांमधून बागूल या़च्या विचारांचा प्रभाव जाणवतो.
१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपमध्ये सूरत येथे बागूल यांना नोकरी मिळाली. पण तिथे जातीभेदामुळे त्यांना रहायला घर मिळणे अवघड गेले. जात लपवून ते तिथे राहिले. पण असं जात लपवून राहणं त्यांच्या स्वाभिमानी मनाला मान्य नव्हते. त्याच विषयावर आधारीत त्यांनी “जेव्हा मी जात चोरली” ही कथा लिहिली. आणि या कथेला सर्वत्र प्रसिद्धीही मिळाली.
पुढे नवयुग, युगोत्तर मध्ये त्यांच्या अनेक कथा कविता प्रकाशित होत राहिल्या.
बागूल यांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोष, जातीय-आर्थिक विषमता, बेरोजगारी, अन्याय, चीड, विद्रोही लेखन केले.
१९६९ मध्ये “मरण स्वस्थ होत आहे” हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला.
“वेदा आधी तू होता” हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला.
अघोरी, कोंडी, पावशा, सरदार, भूमीहीन, मूकनायक, अपुर्वा अशा कादंबरी, लेखसंग्रह प्रकाशित झाले.
बागूलांच्या लेखांमुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची लाट आली.
१९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बागूल अध्यक्ष होते.
बागूल यांच्या साहित्याची दखल घेऊन कवीवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला.
माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या त्याच्या महानतेची गाथा सांगणाऱ्या बागूल यांच्या प्रसिद्ध कवितेचा “वेदाआधी तू होतास” आस्वाद आपण घेऊयात.
मानवी अस्तित्वाचा शोध घेत असताना बागूल यांनी देवधर्मासह अन्य तथाकथित मोठ्या गणल्या गेलेल्या संज्ञांची चीरफाड केली आहे.
माणसाची नेमकी महती, तीही मोजक्या शब्दांत आणि मार्मिकतेने बागूल यांनी त्यांच्या या कवितेत मांडली आहे…..
वेदाआधी तू होतास
वेदाआधी तू होतास,
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप
तू व्यथित व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ऋचा’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले,
हे प्रतिभावान माणसा
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही…
- बाबूराव बागूल
◆◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/